१६ डिसेंबरचा लग्नसराई विशेषांक आवडला. गेली दोन र्वष ‘लोकप्रभा’ लग्नसराई विशेषांक काढत आहे. आतापर्यंतचे सगळेच अंक अप्रतिम झाले आहेत. यंदाचाही अंक आवडला. यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल तो ‘प्रांतोप्रांतीची लग्नं’ या विभागाचा. इतर प्रांतांतील लग्नं अनेकदा फक्त सिनेमा-मालिकांमध्येच बघायला मिळतात. त्यातही त्या प्रांतातील परंपरा, प्रथा हे सगळंच दाखवतातच असं नाही. त्यामुळे उत्सुकता असूनही विविध प्रांतांतील लग्नांविषयी माहिती बघायला मिळत नाही. लग्नसराई विशेषांकामुळे मात्र ती माहिती मिळाली. आपल्याकडे खास लग्नांमध्ये काही विशेष पदार्थ असतात, काही गोष्टींना त्या दिवशी महत्त्व असतं. तसंच त्या त्या प्रांतातील पद्धती, पदार्थ समजले. मराठी आणि काही इतर प्रांतांतील काही पद्धतींमध्ये काही प्रमाणात साम्यही आढळून येतं, पण प्रत्येक भाषेनुसार त्याला तिथला शब्द मिळालाय, याबद्दलही समजले. याशिवाय इतरही लेख उत्तम आहेत. प्राची साटम यांचा ‘आकांक्षाची स्पिन्स्टर पार्टी’ हा लेख अतिशय आवडला. त्यातही त्या लेखाचा शेवट अधिक भावला.
– अदिती कारखानीस, कांदिवली

लेखांमधलं वैविध्य जपावं
गेल्या काही अंकांपासून वाचक लेखक, ब्लॉगर्स कट्टा आणि कथा या लेखांची संख्या वाढल्याचे आढळून आले आहे. त्याबद्दल ‘लोकप्रभा’चे आभार. अंकामध्ये इतर मुख्य विषयांचे महत्त्वाचे लेख असतातच, पण त्याशिवाय ललित, हलकेफुलके लेख आम्हाला वाचक लेखक, ब्लॉगर्स कट्टा या माध्यमातून वाचायला मिळतात. या लेखांची वाढवलेली संख्या आता कमी करू नये ही विनंती.
– कैलास रोडे, नाशिक

कॅनडाचा अप्रतिम प्रवास
१६ डिसेंबरच्या अंकातील विजया एरंडे यांचा ‘निसर्गसुंदर, समृद्ध कॅनडा’ हा लेख आवडला. लेखाची भाषा अगदी साधी, सोपी असल्यामुळे फार जड काहीतरी प्रवासवर्णन वाचतोय असं अजिबात वाटलं नाही. आणि म्हणूनच ते कंटाळवाणंही वाटलं नाही. कॅनडा या देशाविषयी नेहमीच कुतूहल, आकर्षण वाटत आलं आहे. तिथली माणसं, राहणीमान, खाद्यपदार्थ, सांस्कृतिक रचना, वातावरण या सगळ्याविषयी कुतूहल वाटतं. आतापर्यंत त्याबद्दल अनेक लेखांमधून वाचलं आहे, पण प्रत्येक वेळी कॅनडाचं एक वेगळंच रूप समोर येतं; तसंच ‘लोकप्रभा’च्या यंदाच्या अंकातील लेखामुळे झालं. कॅनडाबद्दल जेव्हा वाचते तेव्हा त्याविषयीच्या प्रेमात भरच पडते.
– शारदा प्रधान, पुणे</strong>

पंचनामा हवा
‘टीव्हीचा पंचनामा’ या सदरातून नेहमीच मनोरंजक मजकूर वाचायला मिळतो. पण, गेल्या काही अंकांमध्ये हा पंचनामा दिसत नाही. चॅनल्सवरील काही मालिकांचा योग्य रीतीने पंचनामा या सदरातून आधी वाचला आहे. जसं मराठी मालिकांवर या सदरात लिहिलं गेलं तसंच एकदा हिंदीकडेही वळावं, असं वाटतं. हिंदीत तर पंचनामा करण्यासारख्या मालिकांची संख्या मोठी आहे. ते वाचायला आवडेल. या सदरात खंड पडू नये, ही इच्छा.
– सीमा तावडे, धुळे</strong>

झळ गरिबांनाच
‘पावसाने तारलं आणि कॅशलेसने मारलं’ ही कव्हरस्टोरी वाचली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नोटाबंदीचा काय परिणाम झाला आहे, याचा आपल्या वार्ताहरांनी घेतलेला आढावा खरोखरच सुन्न करणारा आहे. शहरी भागात एटीएम असतात. हे बंद असेल तर ते एटीएम असे पर्याय असतात. बँका असतात. एकेकाची दोन-तीन बँकांमध्ये खाती असतात. घरटी दोन-तीन कमावती असतात. त्यामुळे ते इथून नाही तर तिथून पैसे काढू शकते. साहजिकच शहरातील लोकांना नोटाबंदीचा तुलनेत कमी त्रास झाला. ग्रामीण भागात मुळात बँका कमी, एटीएम तर विचारूच नका. काही गब्बर मंडळी वगळता सामान्य लोकांच्या हातात पैसा कमी, त्यामुळे त्यांना या सगळ्याची जास्त झळ पोचली, हे वाचून वाईट वाटले.
– गिरीधर कनाते, मुंबई

अन्नदाताच नाडला जातो
‘पावसाने तारलं आणि कॅशलेसने मारलं’ या कव्हरस्टोरीत नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे किती हाल होत आहेत, हे वाचून डोळ्यात पाणी आले. शेतकरी हा खरं तर आपला सगळ्यांचा अन्नदाता, पोशिंदा आहे. तो शेतात घाम गाळतो, धान्य पिकवतो, म्हणून सगळा देश दोन वेळचं जेवू शकतो; पण आपल्याकडे सगळ्यात कमी किंमत आहे ती शेतीला. निसर्ग, सरकार, समाज या सगळ्यांच्याच पातळीवर शेतकरी भरडला जातो आहे, हे चांगलं लक्षण नाही. नोटाबंदीच नाही तर कोणताही निर्णय घेताना त्याचा शेतकऱ्यावर काय परिणाम होईल याचा विचार आधी करायला हवा. शेतकऱ्यावर अवलंबून असलेल्या ५० टक्के लोकसंख्येचा विचार आधी केला जातो, हे चुकीचं आहे. शेतकऱ्याला आता तरी नाडू नका.
– गोविंद वाडकर, नाशिक

वैविध्य कलांचे
विनायक परब यांचं ‘समकालीन’ हे सदर लक्ष वेधून घेणारं आहे. या सदरातील लेखांमध्ये विविध संकल्पना मांडलेल्या असतात. त्या सगळ्यांना समजाव्यात म्हणून त्याबद्दल दिलेलं विश्लेषण महत्त्वाचं ठरतं. कलेची आवड असल्यामुळे मी हे सदर नियमित वाचतो. त्यातील अनोख्या संकल्पना, क्रिएटिव्हिटी वाचून, बघून ज्ञानात भर पडते. असे माहिती आणि अभ्यासपूर्ण सदर वाचकांसाठी विशेषत: कलाप्रेमींसाठी नेहमीच फायदेशीर ठरतं.
– वैभव पाटील, भांडुप

अवघड आणि कौतुकास्पद भ्रमंती
‘लोकप्रभा’तून बऱ्यापैकी नियमितपणे प्रसिद्ध होणारे गौरी बोरकर यांचे लेखन मी वाचते. त्या सतत इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी कशा फिरतात, हा त्यांचं लेखन वाचून पडणारा मूलभूत प्रश्न आहे. सर्वसामान्यपणे वर्षांतून दोनदा आठ-दहा दिवसांसाठी असं फिरायचं झालं तरी आधीची तयारी आणि आल्यानंतरचा थकवा यांनीच दम निघतो. देशातल्या देशातच फिरताना आमचं असं होतं, त्या तर जगाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात. सतत वेगवेगळं हवामान, खाणंपिणं याच्याशी जुळवून घेत फिरणं म्हणजे त्यांच्या शरीरक्षमतेची खरोखरच कमाल आहे. त्यांच्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातली आश्चर्य आम्हाला मात्र घरबसल्या अनुभवायला मिळतात.       – आनंद मते, वाशीम.

सुंदर निसर्गभ्रमंती
रुपाली पारखे ‘आसमंतातून’ तसंच ओवी थोरात ‘जंगलवाचन’ या सदरातून निसर्गाची जी भ्रमंती घडवून आणतात, ती अतिशय आनंददायक आहे. निसर्ग ही खरं तर प्रत्यक्षात जाऊन अनुभवण्याची गोष्ट; पण या दोघींच्या लेखांमधून आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहोत आणि लेखात वर्णन केलेले वास्तव अनुभवतो आहोत, असंच वाटत राहतं. निसर्गाची इतकी सुंदर सफर घडवून आणल्याबद्दल या दोघींचेही मनापासून आभार.
– श्रीराम शेलार, कोल्हापूर.

‘लोकप्रभा’ असाच वाचनीय राहो
‘लोकप्रभा’शी आमचे अतूट प्रेमाचे आणि मैत्रीचे नाते आहे, असे माझ्यासारख्या असंख्य वाचकांना वाटते, कारण ‘लोकप्रभा’चा प्रत्येक अंक खास असतो. त्यामुळे कधी एकदा शुक्रवार उजाडतो आणि अंक हातात पडतो असे होऊन जाते. ताज्या घडामोडींचे सूचक असलेले मुखपृष्ठ, आतील विविध विषयांवरचे माहितीपूर्ण लेख या सगळ्यामुळे अंकाचे रूप अधिकच आकर्षक आणि रोचक होऊन जाते. मान्यवरांच्या लेखांसहित वैशाली चिटणीस यांचे खाद्यसंस्कृतीवरील लेख, सुहास जोशी, चैताली जोशी यांचे लेख वाचनीय असतात. अंकाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
– वैशाली खाडिलकर

‘डय़ूमेला बोत्स्वाना’ हा शुभांगी पाटील यांचा नितांतसुंदर लेख वाचला. अतिशय आवडला. – नीता कांबळे, पुणे

‘रानातील एक दिवस’ हा मंदार भारदे यांचा लेख वाचून खरंच असं वाटलं की, सगळं बाजूला ठेवून एका दिवसासाठी का होईना, रानात जाऊन यावं.
– सिद्धार्थ पांढरे, राजगुरुनगर

‘खरेदी पहावी करून’ हा चिनार जोशी यांचा गमतीशीर लेख मस्त होता.
– लीना दप्तरे, दादर, मुंबई

मग कशाला बघता मालिका?
मालिकांमधील खटकणाऱ्या गोष्टी हा रेखा केळकर यांचा लेख वाचून कमालीचे आश्चर्य वाटले. ‘लोकप्रभा’मध्ये बऱ्यापैकी नियमितपणे टीव्ही वाहिन्यांवर चर्चा सुरू असते. बहुतेकांचा सूर या मालिका किती उथळ, रटाळ, तद्दन फालतू, बिनडोक आहेत असाच असतो. इतके सगळे जण म्हणतात, तर त्या तशाच असणार. मी मराठी, हिंदी कोणत्याच मालिका बघत नसल्यामुळे त्यांच्या दर्जाविषयी मी बोलणे उचित नाही; पण मालिका अशा आहेत तर तुम्ही त्या बघता कशाला, असा एक प्रश्न मला या सगळ्याच प्रेक्षकांना विचारावासा वाटतो. मनोरंजनाचे इतर किती तरी चांगले पर्याय आहेत, ते निवडा, त्यात आपला वेळ घालवा. जे हिणकस आहे, ते हिणकस कसे आहे, याची चर्चा कशाला करता?
– गौरव पांचाळ, रत्नागिरी