15 August 2020

News Flash

हॉकीतील सांघिक कौशल्याचे यश

हॉकीच्या सुवर्णयुगाची नांदी (सा. लोकप्रभा, ३० डिसेंबर) क्रीडाअंतर्गतचा सविस्तर लेख वाचला.

हॉकीच्या सुवर्णयुगाची नांदी (सा. लोकप्रभा, ३० डिसेंबर) क्रीडाअंतर्गतचा सविस्तर लेख वाचला. लखनौ येथे कनिष्ठ गट विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने विश्वचषक जिंकून खरोखरच इतिहास घडविलेला आहे.

एके काळी हॉकीवर जागतिक वर्चस्व असणारा आपला हॉकी संघ पुन्हा एकदा पूर्ण वैभव हॉकीला प्राप्त करून देईल अशा आशा उंचावल्या आहेत. भारतीय कनिष्ठ हॉकी संघाची ही कामगिरी सांघिक व समन्वय दर्शवणारी आहे. हॉकी व क्रिकेटसारख्या खेळांत सांघिक कामगिरी व खेळाडूतील समन्वयाला मोलाचे स्थान आहे आणि याला भारतीय खेळाडूंनी कौशल्यपूर्ण खेळाची जोड देऊन ऑस्ट्रेलिया व जर्मनीच्या बलाढय़ संघांच्या उपस्थितीत हा विश्वचषक जिंकणे सोपे नव्हते, मात्र भारतीय हॉकीपटूंनी उत्कृष्ट खेळी व कौशल्यपूर्ण समन्वय घडवून हॉकीला पुन्हा स्वर्गीय दिवस प्राप्त करून देण्याचा जणू पायाच रचला आहे. हे यश असेच टिकून राहो, ही अपेक्षा. याच अंकातील मुखपृष्ठ कथा नाताळ आणि नववर्ष विशेषही आवडले. विशेष म्हणजे ख्रिसमस (नाताळ) हा सण आशियाई सण आहे, ही आमच्या ज्ञानात ‘लोकप्रभा’ने भर टाकली त्याबद्दल धन्यवाद.
– धोंडीरामसिंह राजपूत, औरंगाबाद.

ठोस उपायांची चर्चा व्हावी
दि. २३ डिसेंबरच्या ‘लोकप्रभा’ची कव्हर स्टोरी, ‘म्याव म्यावचे टारगेट तरुणाई’ अत्यंत महत्त्वपूर्ण, देशाच्या दृष्टीने चिंता उत्पन्न करणारी व कोणाही सर्वसामान्य विचारी मनाला धक्का देणारी आहे; मात्र अशी माहिती यापूर्वीही कमी-जास्त प्रमाणात सामाजिक चर्चेत आली आहे. या संदर्भात चर्चा केवळ आकडेवारीपुरती मर्यादित न राहता त्यावरील ठोस उपायांसंबंधीपण झाली पाहिजे! देशातील वा विदेशातील डॉक्टर्स, मनोविकारतज्ज्ञ, समुपदेशक वा अन्य विचारवंत त्यांच्या परिने या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असणारच; परंतु कदाचित संरक्षण कमी पडते व हल्ले मोठे होत चालले आहेत. असा काही प्रकार या संदर्भात होत असावा.

संपूर्ण जगच प्रचंड उलथापालथीचे शिकार झाले आहे. सर्वच घडामोडींना एक प्रचंड वेग आला आहे. वाढत चाललेली ही मोकळीक आहे की स्वैरता आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. काही पिढय़ांपूर्वी ‘सातच्या आत घरात’ हा परवलीचा शब्द होता. त्यानुसार वागण्यात धन्यता मानली जात होती, कारण त्या भावनेच्या मागील सुरक्षिततेची जाणीव थोरामोठय़ांना नक्कीच होती!
– श्यामसुंदर गंधे, पुणे.

ही नसती उठाठेव कशासाठी?
दि. २३ डिसेंबरच्या ‘लोकप्रभा’च्या अंकात ‘मग कशाला बघता मालिका?’  हे विचाराला चालना देणारे पत्र वाचले आणि माझे मन विचार करू लागले, खरंच का बरं बघतो मी मालिका? आणि काही विचार सुचले. कारण मी ‘लोकप्रभा’चा नियमित वाचक आहे तसा दूरदर्शनवरील काही मालिकांचा प्रेक्षकही आहे. त्यामुळे ‘लोकप्रभा’त प्रसिद्ध झालेले मालिकांशी संबंधित लेख आजही स्मरणात आहेत. एकाच लेखकाने लिहिलेले तीन लेख मला भावले म्हणून आजही मी जतन केले आहेत.

  • हव्याहव्याशा वाटणाऱ्या मालिका (७ नोव्हेंबर २०१४)
  • हव्याहव्याशा मालिका नको नकोशा (११ नोव्हेंबर २०१६)
  • वार्ता गमतीच्या (१०-६-१६).
  • या पहिल्या दोन लेखांत मालिका का हव्याहव्याशा वाटतात आणि त्याच मालिका का नको नकोशा वाटू लागतात याचे मार्मिक विश्लेषण केले आहे तसेच मालिकेतील कोणते प्रसंग गमतीचे वाटतात हे तिसऱ्या लेखात सांगितले आहे. मालिकेतील खटकणाऱ्या गोष्टींबद्दल दुसऱ्या एका लेखकाचा लेखही ‘लोकप्रभा’तच वाचला होता; पण कोणत्याही लेखात मालिका रटाळ आहेत असा सूर मला तरी जाणवला नाही.

दूरदर्शनवरील हिंदी-मराठी मालिका सुरुवातीला काही भागांपर्यंत प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतात. त्यामुळे पुढे काय होणार अशी उत्सुकता वाटत असते; पण नंतर अवास्तव प्रसंग घुसवून मालिका वाढविण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जातो. हेच अवास्तव प्रसंग प्रेक्षकांच्या मनाला पटत नाहीत म्हणून खटकतात. तरीही पुढे काय या उत्सुकतेपायी प्रेक्षक मालिका पाहातच राहतात.

पण मराठी, हिंदी मालिका कधीच न पाहाणाऱ्या पत्रलेखकाला मालिकात चांगलेही काही असू शकते हे कसे कळणार? म्हणून त्याने ‘मग कशाला बघता मालिका’ असा अनाहूत सल्ला देण्याची नसती उठाठेव करू नये यातच त्यांचा गौरव आहे असे मला वाटते.
– चारुहास नेरुरकर, माहीम.

कंट्रोल प्रेक्षकांच्या हातात हवा
काही दिवसांपूर्वी ‘लोकप्रभा’च्या अंकात मराठी मालिकांवर वाचकांची बरीच टीका आली होती; पण एका वाचकाने असे लिहिले होते की, मराठी मालिका भिकार, कंटाळवाण्या असतील तर प्रेक्षक त्या कशाला बघतात? रिमोट कंट्रोल वापरून त्यांनी चॅनेल बदलावे; पण असे करणे ग्राहकहिताच्या विरुद्ध आहे, कारण असाच विचार करून किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स, हॉटेल वगैरेमध्ये समाधानकारक माल, सेवा नसेल, दर खूप जास्त असतील तर तुम्ही घेऊ नका, असे ते ग्राहकांस म्हणतील; पण चांगल्या प्रकारची सेवा मिळवणे हा ग्राहकांचा हक्क आहे. मालिका अत्यंत वाईट, कुसंस्कार करणाऱ्या, भांडणे, कारस्थाने, फसवाफसवी, अनैतिक वर्तन यांना उत्तेजन देणाऱ्या असतील, तर त्या बंद पाडण्याचा हक्क प्रेक्षकांना हवा. म्हणजेच चॅनेलचा रिमोट कंट्रोल प्रेक्षकांकडेच हवा.
– घनश्याम कवी, पुणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2017 1:01 am

Web Title: readers response 136
Next Stories
1 तरुण मुलामुलींना वेळीच सावरायला हवे
2 पिझ्झा-बर्गर संस्कृतीशी लढाई
3 तरुणाईचे असे का झाले?
Just Now!
X