lp06२१ ऑगस्टचा ‘लोकप्रभा’चा स्वातंत्र्य दिन विशेष हा अंक आवडला. अंकातील विषयांचे वैविध्य अधिक आवडले. लग्न आणि स्वातंत्र्य या दोहोंभोवती फिरणाऱ्या अनेक गोष्टींचे वेगवेगळे पैलू वाचता आले. एखाद्याच्या लग्नाची तारीख जवळ आली की ‘तुझं स्वातंत्र्य संपत आलं’ असं आपण गमतीने म्हणतो. पण त्यामागे असलेला वेगळा अर्थ लक्षात येत नाही. तोच या अंकात वाचायला मिळाला. शिवाय लग्न करणं-न करणं हा ज्याचा-त्याचा प्रश्न असतो. त्याचं उत्तरही त्या त्या व्यक्तीनेच सोडवायला हवं. पण लग्न करण्या-न करण्याच्या स्वातंत्र्यावर आजचा समाज वर्चस्व गाजवत असतो हे चुकीचं आहे. या दोन्ही बाजूंचे, दोन्ही दृष्टिकोनातले लेख पटले. स्वातंत्र्याचा टेंभा मिरवतानाच अनेकदा गल्लत होते. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही असं नमूद केल्याबद्दल ‘लोकप्रभा’चे विशेष कौतुक. लग्नविषयक लेखांचा संपूर्ण विभाग उत्तम झाला आहे. एखादी गोष्ट नको असेल किंवा जमणार नसेल तर सरळ नकार देऊन मोकळं व्हावं. पण अनेकांना हे जमत नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे समोरच्या व्यक्तीचं दडपण. पण हे दडपण न घेता नकार देण्याचंही स्वातंत्र्य व्यक्तीला आहे. त्यामुळे ते त्याने उपभोगावं. याविषयीचा लेखही पटला. या संपूर्ण अंकात ‘स्वातंत्र्याची ऐशीतैशी’ या एका वेगळ्या लेखाने लक्ष वेधून घेतलं. तर ‘युथफुल’मधील सगळेच लेख तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारे, पण विचार करायला लावणारे होते.
– दीप्ती देसाई, मुलुंड.

शुक्रवार, १० जुलै, २०१५ च्या अंकातील, धनंजय मदन यांचा ‘नक्षलग्रस्त प्रदेशातून सायकलिंग’ हा लेख अतिशय आवडला. मी काही महिन्यांपूर्वीच हेमलकसा येथे गेलो असल्याने किती घनदाट जंगल आहे याची कल्पना मला आहे. अशा जंगलातला सायकलचा प्रवास किती खडतर असेल..
– सत्यजित शाह, ठाणे.

lp07कित्येकदा असे दिसून येते की रस्त्यांवरील हातगाडीवर तसेच लहानसहान उपाहारगृहांमध्ये खाद्यपदार्थ बनवण्यासाठी अशुद्ध पाण्याचा वापर करण्यात येतो (खाणाऱ्यांची मुंबई, पर्यटन विशेष – रोहन टिल्लू, २८ ऑगस्ट.) अशा ठिकाणी खाण्याचा आस्वाद घेणे, विविध आजारांना निमंत्रण देणारे ठरू शकते. म्हणून कुठल्याही हॉटेलमध्ये बाहेरच्या देखाव्याला न भूलता त्यांच्या स्वयंपाकघरात डोकावून बघणे जरुरीचे आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
– केतन र. मेहेर, विरार (पूर्व.)

lp08असा ध्यास हवा
१४ ऑगस्टच्या ‘लोकप्रभा’च्या अंकातील ‘ओंकारनाथ’ (मेडिसीन बाबा) यांच्या उपक्रमाबद्दल माहिती वाचली आणि मनाला अतिशय भावली. आज मोबाइल आणि टीव्हीच्या दुनियेत संपूर्ण जग वेडे झालेले असताना आजही अपवादात्मक समाजसेवेत वेडे होणारे ओंकारनाथदेखील आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटते. असे अनेक नागरिक आहेत जे समाजसेवेत वेडे झाले आणि समाजसेवेत वेडे होऊ इच्छितात, परंतु अशा लोकांना कोणाच्या तरी माध्यमांची गरज असते व त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो. तरी ओंकारनाथसारख्या समाजसेवेचा ध्यास घेणाऱ्यांना अशा लोकांना प्रोत्साहित करावे. तसेच त्यांचे सविस्तर पत्ते, संपर्क क्रमांक वगैरे माहितीदेखील द्यावी.
– डॉ. मिलिंद पवार, अकोला.

२४ जुलैच्या अंकातील सर्वच लेख उत्तम आहेत. विशेषत: ‘डोळस दुनियादारी’ हा मानसी जोशी आणि लीना दातार यांचा लेख खूपच सुंदर होता. अशाच मुलाखती प्रकाशित कराव्यात. ‘लोकप्रभा’ एक सकारात्मक शक्ती निर्माण करते. आपणा सर्वाचे अभिनंदन.
– प्रफुल्लचंद्र पुरंदरे, वर्सोवा

‘लोकप्रभा’चा ४ सप्टेंबरच्या अंकातील ‘सुंदर साजिरा श्रावण’ हा विभाग आवडला. श्रावण सुरू झाल्यानंतर सगळीकडे प्रसन्न वाटतंय. सभोवताली उत्साहाचं वातावरण झालंय. अशात श्रावणविषयक आठवणी, कविता, लेख वाचायला मिळणं म्हणजे मेजवानीच. ‘सुंदर साजिरा..’मधील सगळेच लेख उत्तम. सगळ्या कविताही मस्त. हे लेख आणि कविता वाचून घरबसल्या श्रावण अनुभवण्याचा आनंद मिळाला.
– सुरेश घोलप, चिंचवड.

११ सप्टेंबरच्या ‘लोकप्रभा’तील ‘संवेदनांचे रंग रुपेरी’ या लेखातील चौकटीत नाना पाटेकर यांचा उल्लेख अनवधानाने नाना नाटेकर असा झाला, ही बाब हरीश तायडे आणि इतर काही वाचकांनी निदर्शनास आणून दिली.
– कार्यकारी संपादक