दि. २ ऑक्टोबरच्या अंकात रवि आमले यांच्या लेखातील चित्र भगव्या रंगात रंगवून नेमकं काय साध्य केलं? लेखात जी. एस. पारेख ऐवजी पाठक हे नाव हवे होते. तसेच २३ किंवा २४ तारखेला कुठला बॉम्बहल्ला गांधीवर झाला होता हे स्पष्ट कराल का? तत्कालीन मुंबईचे गृह खाते, पोलीस, मोरारजी देसाई यांचा ढिसाळ तपास, २० जानेवारीला झालेल्या गन कॅक्टनच्या स्फोटात मदनलाल पहावा दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असताना तपास कामात केलेली अक्षम्य हेळसांड, परिणामी गांधी हत्येसारखी घडलेली अप्रिय घटना, त्याची प्रखर किंमत आजतागायत ज्या लाखो लोकांचा त्या घटनेशी दुरान्वयाने संबंध नाही, नव्हता त्या वर्गाला केवळ त्या जातीत जन्माला आले म्हणून भोगावी लागत आहे. किती निरपराध लोकांची घरे जाळली, किती जणांना प्राणाला मुकावे लागले हेदेखील आमले आणि लोकप्रभाने आपल्या अंकातून स्पष्ट करावे. जो वर्ग केवळ संधी शोधत होता त्यांना केवळ निमित्त मिळाले. न्यायमूर्ती आत्मचरण यांनी स्पष्ट शब्दात
स्वा. सावरकर यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर कपूर कमिशन असा कुठलाही निष्कर्ष सावरकरांबद्दल काढत नाही. एका प्रखर क्रांतिकारकाबद्दल त्याच्या जिवंतपणी नाहीतर मृत्यूनंतर त्याच्यावर चिखलफेक करण्यात धन्यता मानत असेल तर त्यांचे आदर्श कौरवच असले पाहिजेत.
– पुरुषोत्तम देशपांडे, ई-मेलवरून.

lp06अत्यंत योग्य मुद्दे
‘लोकप्रभा’च्या २ ऑक्टोबर या अंकातील ‘संस्कृतीच्या नावाखाली उन्मादाची बाजारपेठ’ ही कव्हर स्टोरी वाचली. लेखात मांडलेले मुद्देही पटले. सणांचे बाजारीकरण झाले आहे यात शंकाच नाही. जिथून पैसा मिळेल तिथून काढला जातोय. हे चित्र बघवत नाही. देवांनाही यात ओढलं जातंय याचं विशेष दु:ख आहे. हा अमुकचा राजा, तो तमुकचा या असल्या गोष्टी ऐकवत नाहीत आणि बघवत तर त्याहूनही नाहीत. ‘इको फ्रेंडली गणेशोत्सव’ हे तर सध्याचं फॅड आहे असं मी म्हणेन. खरं तर ही कल्पना खरंच स्तुत्यच आहे, पण त्याच्याही नावाखाली जे मार्केटिंग चालतं ते पटेनासं आहे. लेखात मांडलेल्या एका चौकटीत यावर चोख भाष्य केलं आहे. मूर्ती शाडूची असली तरी त्यासाठी वापरलेला रंग, दुर्वा, मखर नको म्हणून प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर अशा अनेक गोष्टी लोकं सोयीस्कररीत्या विसरतात. या सगळ्या वस्तूंचा वापर करत ‘आमचा गणपती इको फ्रेंडली’ असा टेंभा मिरवणाऱ्यांनी याचा विचार करायलाच हवा. ध्वनिप्रदूषण आणि जलप्रदूषण यावर तर जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. सगळे नियम धाब्यावरच बसवले आहेत. विसर्जनाच्या दिवशी मोठमोठय़ा आवाजात गाणी लावत विचित्र अंगविक्षेप करत नाचणाऱ्यांना ते जे काही करताहेत ते बाप्पासाठी करताहेत असं वाटतं. पण तो खरा उन्माद असतो. आवाजाची विशिष्ट मर्यादा घालून दिलेली असताना त्याचं वेळोवेळी उल्लंघन होताना दिसतं. आता तर सगळ्याच सणांचं बाजारीकरण झालं आहे. हे कधी थांबेल किंवा थांबेल की नाही हे कोणीच सांगू शकत नाही.
– सुधीर देशमुख, अंधेरी, मुंबई.

lp07गणेशाचा जागर
‘लोकप्रभा’चे दोन्ही गणेशोत्सव विशेषांक सुंदर होते. पहिल्या विशेषांकात प्राचीन काळातल्या गणेशरूपांबद्दल वाचून खरोखरच थक्क झाले. अपल्याला लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव आणि त्याआधी शंकर पार्वती, गणेशाच्या पुराणातल्या कथा यापलीकडे या देवतेबद्दल फारसं काहीही माहीत नसतं. पण एक परदेशी माणूस आपल्या देवतेवर संशोधन करून एवढं सगळं खणून काढतो हे खरोखरच अचंबित करणारं आहे. कदाचित आपण आपल्या देवतेकडे भावनिक दृष्टिकोनातून बघतो आणि वस्तुनिष्ठपणे पाहू शकत नाही आणि ते तसं पाहू शकतात यामुळे असं घडलं असावं. दुसऱ्या अंकात परदेशात गेलेली मराठी तिथे किती उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात, त्याबद्दल वाचायला मिळालं आणि ऊर आनंदाने, अभिमानाने भरून आला. देशाबाहेर गेलेल्या मराठी माणसांचे हे प्रातिनिधिक लेख आहेत. पण याचा अर्थ जगाच्या पाठीवर कुठेही गेलेला मराठी माणूस तेवढय़ाच उत्साहाने, आनंदाने गणेशोत्सव साजरा करतो. मराठी मातीशी त्याची नाळ टिकवून ठेवतो. एका अंकात प्राचीन काळी सर्वदूर पसरलेले गणेशदैवत आणि दुसऱ्या अंकात वर्तमानात सर्वदूर पसरलेले गणेशदैवत वाचायला, अनुभवायला मिळणे हा दुग्धशर्करा योग लोकप्रभाने जुळवून आणला याबद्दल आभार मानावेत तितके थोडेच आहेत.
– विजया कुलकर्णी, ओंध, पुणे.

संग्राह्य़ अंक
‘लोकप्रभा’चे दरवर्षीचे गणेशोत्सवाचे अंक वाचनीय असतात. यंदाच्या दोन्ही अंकांतील सगळेच लेख उत्तम होते. विशेष म्हणजे लेखांच्या विषयांमध्ये वैविध्य होतं. पहिल्या अंकातील कव्हर स्टोरी, कलाकारांच्या मनातला बाप्पा, गणपतीला संबोधित लेख अशा अनेक विषयांमुळे लेखांमध्ये वेगळेपण दिसून आले. तर दुसऱ्या अंकातील देशोदेशीचा गणेशोत्सव हा अत्यंत स्तुत्य लेखसंग्रह वाचायला मिळाला. गणेशोत्सवाचे दोन्ही अंक त्यांच्या मुखपृष्ठांमुळे देखणे झाले.
– भक्ती मोरे, पनवेल.

सुंदर रूपाकार
गणपती विशेषांकात हेमांगी कवी यांनी काढलेले गणपतीचे सुंदर चित्र पाहिले. नथीच्या आकारातून साकारलेला गणेशाचा रूपाकार सुंदर होता. त्यानंतरच्याच अंकात टीव्ही कलाकार सेटवर मोकळ्या वेळात काय करतात, तो कसा सार्थकी लावतात ते वाचायला मिळाले. सारखं शूटिंग करून हे लोक कंटाळत नाहीत का या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
– राधा भोसले, नगर.

क्रीडा संस्कृतीचा अभाव
परदेशी प्रशिक्षकांसंदर्भातला स्वदेश घाणेकर यांचा लेख वाचला. ललिता बाबरचे कोच निकोलाय यांचे भारतीय समाजाविषयीचे निरीक्षण अगदी बरोबर आहे. हे सगळं घडतं कारण आपल्याकडे क्रीडा संस्कृती नाही. खेळाकडे फक्त एकटय़ादुकटय़ा व्यक्तीने नाही तर संपूर्ण समाजाने व्यावसायिक दृष्टीने बघणे गरजेचे आहे. मुळात त्यासाठी राजकारण्यांचे ब्रेन वॉशिंग होणे गरजेचे आहे. आपल्याकडे असलेलं टॅलेंट राजकारण्यांच्या वृत्तीमुळे वाया जातं आहे.
– गौरव भानुशाली, बीड.

घरबसल्या भटकंती
‘लोकप्रभा’च्या अंकात नियमितपणे ट्रेकिंगविषयीचे लेख, ट्रॅव्हलिंग वाचायला मिळतात. काही लेखांमध्ये तर अनवट निसर्गाची अतिशय सुंदर वर्णने असतात. ती वाचून प्रत्यक्ष तिथे जावं, असा खडतर ट्रेक आपणही अनुभवावा, रात्रीच्या उघडय़ा आभाळाचा अनुभव घ्यावा असं वाटतं. पण ते शक्य नसतं. त्यामुळे हे लेख वाचूनच त्या आनंदाचा अनुभव मिळतो. गौरी बोरकर यांनी तर आम्हाला घरबसल्या जगभर हिंडवून आणले आहे.
– विनिता जांभूळकर, सोलापूर.

तरुणाईचा आरसा
पाच जूनच्या अंकातील ‘माझी निवड क्षमता’ हा लेख वाचला. आजच्या तरुणाईचं वास्तव दर्शन त्यातून होते. विशेषत: लेखातील शेवटचा परिच्छेद थेट तरुणाईचा आरसाच म्हणावा लागेल. आपल्याकडून अशा विषयावरील आणखीन लेख अपेक्षित आहेत. इंडियन एक्स्प्रेस ग्रुपतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या लेखांची विश्वासार्हता जपलेली असल्यामुळे ते वाचायला मला आवडतात.
– योगेश खांदारे, ई-मेलवरून.

‘युथफूल’ व्यापक असावे
‘युथफूल’ या विभागांतर्गत असलेले लेख आवडतात. तरुणांच्या आयुष्यात घडणाऱ्या किंवा त्यांच्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांवर भाष्य करणारे लेख वाचनीय असतात. तसंच त्यांच्यातील विशिष्ट गोष्टींशी निगडित ट्रेंडही या निमित्ताने कळतात. फॅशनबाबत छोटे छोटे प्रश्न सतत पडत असतात. त्याची सरळ, साधी उत्तरं यात मांडली जातात. त्याचा फायदा होतो. तरुणाईविषयक आणखी लेख वाचायला मिळतील अशी अपेक्षा आहे.
– नेहा साटम, नाशिक.

उत्तम व संग्राह्य़ अंक
चार सप्टेंबरचा ‘लोकप्रभा’ अंक अतिशय सुरेख आहे. ‘आदिम पाऊलखुणा’मध्ये रमलेले मन श्रावणात भिजून सह्य़ाद्रीच्या कुशीत केव्हा विसावले कळलेच नाही. भटकत्या मनाला सिमेंटच्या जंगलातून निसर्गाच्या सान्निध्यात नेणाऱ्या लेखकांना प्रणाम. निसर्गाकडून आपणास पृथ्वी, अग्नी, अवकाश, जल आणि वायू यांची देणगी कशी लाभली आहे, तिची जपणूक कशी करावी याची वाचकमनाला जाणीव करून देणाराच हा अंक आहे. केवळ एकच गोष्ट खटकते ती म्हणजे ‘वडिलांची आठवण’मधील संत तुकाराम महाराजऐवजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहायला हवे होते. उर्वरित अंक संग्राह्य़च आहे.
– कांता साहेबराव साबळे, मुंबई, ई-मेलवरून.

वैद्य खडीवाले यांनी औषधाविना उपचार या १८ सप्टेंबरच्या लेखात सुचवलेले बहुमूल्य मार्गदर्शन उचित, योग्य आणि स्वआचरणासाठी उपयुक्त वाटते. आपण सुचवलेल्या बऱ्याच गोष्टी रोजच्या आहारविहारात आणल्या तर अस्वास्थ्य टाळू शकतो. पित्ताशयातील खडे यावर माहिती द्यावी.
– दिलीप काकडे, मुंबई, ई-मेलवरून.

वैद्य खडीवाले, डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. सुपे, डॉ. केदारे यांचे लेख अतिशय वाचनीय असतात. आरोग्यभान देणाऱ्या या लेखांबरोबरच लोकप्रभाने फिटनेसविषयी जागृती करणारे लेखही प्रसिद्ध करावेत.
– संजय मारणे, ठाणे.

४ सप्टें. २०१५च्या ‘लोकप्रभा’च्या ‘श्रावणरंग’ मध्ये राजश्री नवलाखे यांच्या ‘वडिलांची आठवण’ या लेखात संत तुकडोजी महाराज यांची रचना दिलेली आहे. पण तिचा उल्लेख संत तुकारामांची रचना असा झाला आहे.
– अनिरुद्ध बिडवे, ई-मेलवरून.