lp10दि. १८ आणि २५ सप्टेंबर ‘लोकप्रभा’चे दोन्ही गणेश विशेषांक आवडले. दोन्ही अंकांतून देशोदेशी आणि आपल्या देशातील राज्या राज्यातून साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाच्या लेखाबरोबर ‘कोकणातील गणेशोत्सव’ आणि ‘कोण म्हणतो हे टिळकांना रुचले असते?’ (१८ सप्टें) हे लेख आवडले. परंतु त्याबरोबरच अलीकडच्या सणांच्या संस्कृतीवर प्रकाश टाकायला पाहिजे होता. तसेच मराठीतील कलाकारांच्या गणेशोत्सवाबद्दलच्या मुलाखतींमधली एकाची मुलाखत पटली नाही. तसेच कलाकारांऐवजी सर्वसामान्य गणेशोत्सव साजरा कसा करतो ते छापायला हवे होते. कारण त्याच्या उत्सवप्रियतेचा कळस गणेशोत्सवात बघायला मिळतो.

गणेशोत्सव हल्ली जगातील अनेक देशांमध्ये उत्साहाने साजरा होतो. जगभरात जेथे भारतीय माणसे गेली तेथे तेथे त्यांनी गणपतीची भक्ती केली. त्यांच्या गणेशभक्तीचे स्वरूप विस्तारत गेले. जगातील प्रमुख मराठी भाषिक वस्तीत आज गणेशोत्सव अतिशय थाटात साजरा होतो. त्यामुळे जगात गणपती लोकप्रिय देवता मानली जाते. आता शंभर वर्षांचा काळ लोटला आहे. गणेशोत्सवात उत्साह वाढतच आहे. सार्वजनिक गणेशोत्सव लोकवर्गणीतून जोरदारपणे साजरे केले जातात. या गणेशोत्सवांना राजकीय पक्षांचं पाठबळ असतं हे उघड आहे.

लोकमान्य टिळकांनी हे उत्सव साजरे करण्यासाठी जी भूमिका किंवा हेतू होता तोच हेतू आज या उत्सवामागे राहिला नाही. सण, उत्सव साजरे व्हायलाच हवेत. कारण उत्सवातून सामाजिक ऐक्याचं सुरेख दर्शन घडतं. भारतीय परंपरेत सण, उत्सवांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ते साजरे करण्यामागे असलेला विचार समजून घेतला तर या सणांची, उत्सवाची गोडी अधिक वाढेल. सार्वजनिक गणेशोत्सवाकडे याच दृष्टीने पाहिले पाहिजे. दुर्दैवाने गेल्या दहा दशकांचा काळ लोटल्यानंतर सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये खूप बदल झाला आहे. पूर्वी गणेशोत्सव सामाजिक आणि सांस्कृतिक भूमिकेतून प्रबोधनपर व्याख्याने, कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा होती. आता ही प्रथा बंद झाली आहे. भव्य देखावे, भव्य आणि उंच मूर्ती, आकर्षक सजावट आणि ध्वनिक्षेपकाद्वारे ऐकविण्यात येणारे फिल्मी संगीत असं या उत्सवाचं स्वरूप राहिलं आहे. देखावे सादर करताना सध्या ज्वलंत असलेल्या सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्याचा कौतुकास्पद प्रयत्न होतो. शिवाय काही मंडळी सामाजिक उपक्रम राबवितात.

परंतु उत्सवाच्या परंपरेची जागा स्पर्धा आणि बाजारूपणाने घेतली आहे. अनिष्ट गोष्टींमुळे पूर्वीचा सांस्कृतिकदृष्टय़ा श्रीमंत आशयसंपन्न असलेला गणेशोत्सव आज उथळ बनत चालला आहे. सार्वजनिक उत्सव समाजासाठी असतात. परंतु हल्लीच्या उत्सवात समाजालाच वेठीला धरले जात आहे. याचे दुष्परिणाम रुग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना भोगावे लागतात. मंडपात पत्त्यांचे डाव रंगतात. मिरवणुकीत नशाबाजी, लज्जा आणणारे हावभाव साजरे केले जातात. याला राजकारण्यांचे पाठबळ आणि प्रशासनाची हतबलता.

तेव्हा गणेशोत्सवामुळे होणाऱ्या परिणामांचाही गांभीर्याने विचार व्हायला व्हावा असे मला वाटते. उलट आता न्यायालयाच्या आदेशामुळे सरकारकडे आयती संधी चालून आली आहे, या आदेशाकडे बोट दाखवत सरकारला कुणालाही न दुखावता उत्सवातील असंस्कृतपणा मोडून काढणे शक्य आहे.
– सुनील कुवरे, शिवडी

काळाचा फरक लक्षात घ्या
दि. १८ सप्टेंबरच्या ‘लोकप्रभा’तील ‘टाचणी व टोचणी’- सदरातील आमले यांचा, ‘कोण म्हणतो हे टिळकांना रुचले नसते?’  हा लेख मुंबई उच्च न्यायालयाचे २८ ऑगस्ट २०१५ रोजीचे श्रीगणेशोत्सवासंबंधीचे ताशेरे प्रारंभी देत, त्यावर मतप्रदर्शनासहितचा वाचनात आला. मुळात हा उत्सव सार्वजनिक नव्हता; परंतु तत्कालीन ब्रिटिश शासनाच्या, ‘फोडा व झोडा’ नीतीस अनुसरून मुस्लीम समाजास पाठिंबा व हिंदू समाजास (त्यातही जातीजातीत भांडणे लावून समाजास कमजोर करणे) सतत धाकाखाली ठेवण्याच्या नीतीविरोधात समाजास आत्मभान देण्यासाठी व बहुसंख्याकांची एकत्रित ताकद निर्माण करण्यासाठीची राजकीय व सामाजिक गरज होती. म्हणून गणेशोत्सव रस्त्यावर आणला गेला. तरीही त्या वेळची व आजची सामाजिक स्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. सक्तीची वर्गणी, खंडण्या, बीभत्स बटबटीतपणा, वाहतुकीस त्रास ठरणारे मांडव, कर्णकर्कश व अर्थहीन संगीत याने या उत्सवाचा धार्मिक आत्मा केव्हाच लुप्त झाला आहे. म्हणून उच्च न्यायालयाने वरील मत व्यक्त केले आहे. पाकिस्तानचा उदय हे गणेशोत्सवाचे फळ हे मत अत्यंत चुकीचे आहे. या उत्सवाचे स्वरूप कोणाला रुचले असते वा नसते, यापेक्षा स्वयं गणेशदेवतेला तरी रुचते काय हा कळीचा प्रश्न आहे. ॐकार स्वरूप गणपती, सर्व विद्या, कला, ज्ञान विज्ञान यांचा जाणता व अधिपती आहे. तो विश्वात्मक म्हणजे अप्रतिम आहे. ॐ या ध्वनीचे चित्र व मूर्तीरूप म्हणजेच आजचा गणपती; तो मूषकरूपी काळावर स्वार म्हणजे त्याने काळालाही वाहन बनवले आहे. सर्व वेदविद्या त्याच्या ॐकार स्वरूपातच वेष्टित आहेत. आणि वेदांना तर कोणतीही मूर्तिपूजा अभिप्रेत नाही. उलट परमात्म्याचे दृश्य तेजोमय रूप-सूर्याची (मंत्रद्वारा) तर अग्नीची समंत्रक हवनाद्वारे उपासनाच वेदांना अभिप्रेत आहे. म्हणून कोणत्याही वैदिक वा औपनैषदिक उपासना हवनाशिवाय पूर्ण होत नाही. संत ज्ञानेश्वरांचा ‘ॐ नमोजी आद्या’- या जातवेद अग्नीला उद्देशूनच आहे, व हा अग्नीच गणेशु, म्हणजे आरंभ, मध्य व अन्तीचा चैतन्यरूप परमात्मा होय! जर सर्व मंगलकार्याच्या आरंभी गणपतीचे पूजन होते, तर शिवपार्वतीच्या विवाहात आरंभी कोणती पूजा झाली होती? तर अर्थातच पवित्र अशी अग्नीची उपासना झाली होती. अग्नी हा गणेश तर यज्ञ हाच विष्णू होय; शिव, रुद्र हे अग्नी तर ब्रह्मा म्हणजेच वेद होय; विश्वाच्या प्रारंभीच वेदरूपी घटना विश्वमानवाला प्रदान केली गेली, व वेदधर्माच्या रक्षणासाठीच सर्व संत-सत्पुरुष, अवतार यांचे कार्य झालेले आहे.
– श्यामसुंदर गंधे

इतर देशांत पहिला भारतीय कोण?
दि. २५ सप्टेंबरच्या अंकातील ऑस्ट्रेलियातील गणेशोत्सवाविषयी माहिती वाचताना त्या देशात स्थायिक झालेल्या पहिल्या मराठी माणसाचा उल्लेख झाला. अशी प्रत्येक देशात स्थायिक झालेल्या भारतीय व्यक्तींविषयी माहिती वाचकांना मिळाली तर छानच होईल. भारतात येणारा पहिला पोर्तुगीज वास्को द गामा, पहिला चिनी ह्य़ु एन त्संग, पहिला रशियन अफसानी निकीतीन अशी उदाहरणे आहेत. मला वाटते की हा एका लेखाचा विषय असू शकतो. तरी ‘लोकप्रभा’ने याविषयी माहिती द्यावी, ही विनंती.
– मंगेश निमकर, कळवा, ठाणे</strong>

हा तर भोळसटपणा
दि. ९ ऑक्टोबरच्या अंकातील ‘आत्मसन्मानाचा लढा’ हा विवेक आचार्य यांचा लेख अतिशय माहितीपूर्ण व विचार प्रवर्तक आहे. मी आफ्रिकेत व अमेरिकेत सात-आठ वर्षे राहिलो. गोऱ्या लोकांनी अक्कल हुशारीने व कष्टाने निर्माण केलेल्या समृद्धीत वाटा मिळविणे, तेथे राहणे याचे आकर्षण भारतीयांना तसेच इतर विकसनशील देशातील लोकांना आहे. परंतु अशा देशात आपण स्थायिक होऊन आपणास तेथील गोऱ्या लोकांनी समान, चांगली वागणूक दिली पाहिजे अशी अपेक्षा करणे हा भारतीयांचा भोळसटपणा व अव्यवहारीपणा असेच म्हटले पाहिजे. भारतात आजही १२५ कोटी लोकांना पुरून उरेल इतकी नैसर्गिक संपत्ती उपलब्ध आहे. ती योग्य प्रकारे प्रामाणिकपणे, कष्टाने विकसित केल्यास भारतीयांना कोठल्याही परदेशात प्रवेश मिळण्यासाठी खटपट करायची गरज नाही. आपल्या परंपरा, संस्कृती, भाषा, धर्म हे सारे काही उत्कृष्ट आहे. जगातील कोणत्याही देशाइतके उच्च राहणीमान, सुराज्य आपणही निर्माण करू शकू.
– विश्वास देशमुख, ई-मेलवरून.

lp11रुचकर आवडते…
वैदेही भावे यांच्या ‘रुचकर’ या सदराची मी नियमित वाचक आहे. त्या देत असलेल्या रेसिपींपैकी काही रेसिपी करण्याचा मी प्रयत्न करत असते. रेसिपीसोबतच त्यांनी दिलेल्या काही टिप्सची विशेष मदत होते. सणवार आणि ऋतूंनुसारही पदार्थाचा त्यात समावेश असतो. त्याचाही उपयोग होतो. मायक्रोव्हेव रेसिपींची संख्या वाढवावी ही विनंती.
– सुनीता लोखंडे, नागपूर.

उपेक्षित विषयाला ग्लॅमर
मी ‘लोकप्रभा’चा नियमित वाचक आहे. नुकताच संतोष विणके यांचा ‘गाढवांचा फॅशन शो’ हा लेख वाचला. खूप माहितीपूर्ण लेख होता. नेहमी उपेक्षित राहिलेल्या या महत्त्वपूर्ण प्राण्याला तुम्ही ग्लॅमर मिळवून दिले. असे विविध हटके विषयांवर लेख प्रसिद्ध करून आम्हा वाचकांच्या ज्ञानात भर घालत जा, हीच विनंती.
– अमोल सावंत, ई-मेलवरून.

lp12प्रतिशब्द हवेत
आपल्या साप्ताहिकातून गेले काही महिने वैद्य खडीवाले यांचे आयुर्वेदीय लेख वाचनात आले. समाज जागरणासाठी ज्या पोटतिडिकेने ते लिहीत आहेत त्याबद्दल वाचक त्यांचा सदैव ऋणी राहील. मात्र एक नम्र विनंती करावीशी वाटते की, त्यांनी आपल्या लेखातील आशय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविताना त्यातील बोजड शब्दांना प्रतिशब्द द्यावेत. शेवटी लेखकाचे विचार, अभ्यासाचे लोकांना आकलन होणे महत्त्वाचे. उदा. पक्वाशय, पच्चमानाशय, आंत्रवृद्धी, भगंदर यांची इंग्रजी नावे कंसात लिहावीत. बदललेली जीवनशैली, राहणीमान, मानसिक ताणतणाव, नोकरीतील रात्रपाळ्या, व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनता, वृद्धापकाळातील आजार, डायबेटीस, हृदयविकार, कर्करोग, साथीचे आजार, अयोग्य आहार, महागडी औषधे यामुळे ‘औषधाविना उपचार’ या शीर्षकाकडे लोक आकृष्ट होतात.
– पुरुषोत्तम देशपांडे, ई-मेलवरून.

कारणे वेगळी
दि. ९ ऑक्टोबरच्या ‘लोकप्रभा’मध्ये वैद्य खडीवाले यांनी ‘मूतखडा आणि कुपथ्य’मध्ये बिया असलेल्या फळभाज्या, उदा. टोमॅटो, काकडी, वांगे, भेंडी, सर्व पालेभाज्यांचे सेवन करू नये असे म्हटले आहे. बिया किडनीमध्ये जाऊन अडकतात आणि त्यामुळे स्टोन होतो हा निव्वळ गैरसमज आहे. जवळपास पन्नास वर्षांपूर्वी हे सिद्ध झाले आहे, हा सिद्धांत चुकीचा आहे. लघवी बराच वेळ तुंबवणे, कमी पाणी पिणे ही कारणे मूतखडा होण्यास कारणीभूत आहेत.
– शिल्पा पुरंदरे, मुंबई.