lp04    खर्च करायला पैसे असतात, पण नेमकं काय आणि कोठे खरेदी करावं हे न कळणासारखी परिस्थिती अनेकांची असते. आपल्या पैसे योग्य पद्धतीने खर्च व्हावे असे सर्वानाच वाटत असते. अशांसाठी लोकप्रभाचा शॉपिंग विशेषांक मार्गदर्शक वाटला. गेल्या काही वर्षांत मोबाईलची इतकी नवनवीन मॉडेल्स बाजारात येतात की गोंधळून जायला होते. नेमके आपणास हवे असणारे फीचर्स आणि किंमतीचा मेळ कोणत्या मॉडेलमध्ये असेल हे ‘आवाक्यातलं फोर जी’ या लेखामुळे कळू शकले. फॅशन, गाडय़ा अशा अनेक उत्पादनांबाबत आपण या विशेषांकातून मार्गदर्शन केल आहे. ऑनलाईन शॉपिंगवरदेखील प्रकाश टाकला आहे. पण हे सर्वकाही क्रयशक्ती अधिक असणाऱ्यांसाठी योग्य आहे. पण सर्वसामान्यांच्या शॉपिंगबद्दलदेखील थोडे मार्गदर्शन घडावे अशी अपेक्षा आहे. रुचकर विशेषांकामुळे दिवाळीची तयारी करायला मदत झाली हे जाताजाता नमूद करावेसे वाटते.
– अनिकेत जोशी, कल्याण.

पायाभूत सुविधा,  पर्यटनपूरक वातावरण हवं…

lp05‘एमटीडीसी कात टाकतेय’ हा सुहास जोशी यांचा लेख उत्तम होता. बोलणाऱ्याची मातीदेखील विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे सोनेदेखील पडून राहते, हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाबाबत खरे आहे. सह्य़ाद्री पर्वताच्या रांगा, कोकण समुद्रकिनारा, किल्ले, लेणी असा निसर्गसंपन्न महाराष्ट्राचे पर्यटन सोने विकण्यासाठी एमटीडीसीच्या वेबसाइटचे नूतनीकरण केले. ‘इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’ नावाचा पर्यटन मेळावा भरवल्याबद्दल सर्व शासकीय पदाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन.

पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू केलेले हा प्रयत्न स्तुत्य आहे, पण त्याचबरोबर काही मूलभूत गोष्टींचीदेखील आठवण करून द्यावी वाटते. मुंबई आणि कोकण किनारपट्टीला जागतिक दर्जाची मनोरंजन पर्यटन नगरी बनवण्यास मोठा वाव आहे. पर्यटन विकासासाठी गोरेगाव फिल्मसिटीला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला पाहिजे. समुद्रकिनारी भराव टाकण्यासाठी जुन्या धोरणात बदल केला पाहिजे. खार जमिनींचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. हेरिटेजचे, सीआरझेडचे जाचक ठरणारे निकष सैल केले पाहिजेत. कोकणातील किनारपट्टीवर मोबाइल सुरळीत रेंज मिळावी. मुंबईतल्या राणीच्या बागेचे वैभव पुन्हा मिळवून द्यावे लागेल. चौपाटीसमोरील तारापोर मत्स्यालयाचे नूतनीकरण केल्यावर पर्यटकांच्या ते रांगा लागल्या.

कोकणात समुद्रकिनारी उत्तम वॉटर स्पोर्ट व कडेकपाऱ्यातून रोपवे सरकारने सुरू केले पाहिजेत. एमटीडीसीने भागीदारीत तारांकित हॉटेल्स बांधली पाहिजेत. समुद्रकिनारी व पर्यटनस्थळाजवळील झोपडपट्टी हटवली पाहिजे. परदेशी पर्यटकांना हैराण करणाऱ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते चांगले ठेवून, सार्वजनिक स्वस्त वाहतूक परिवहन सेवा सक्षम केली पाहिजे. खासगी वाहतूक दरांची पर्यटकांकडून लूट थांबवली पाहिजे. पर्यटनस्थळाजवळील पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या स्टॉल्सचे उत्तम नियोजन असेल तर पर्यटक खूश होतील. नुसते जाहिरातीतून ‘अतिथी देवो भव..’ म्हणून चालणार नाही.

माझ्या समुद्रकिनारी असलेल्या गावाच्या अनुभवावरून सांगतो, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने गावच्या त्यांच्या प्रतिनिधीला भरपूर आर्थिक मदत पुरवली व पेपरातून जाहिरात केली तर त्याचा पर्यटन व्यवसाय चांगला वाढेल.
– श्रीनिवास स. डोंगरे, दादर, मुंबई, ई-मेलवरून.

सर्वच धर्मात उन्मादाची बाजारपेठ

lp08नेहमीप्रमाणेच २ ऑक्टोबर २०१५ चा ‘लोकप्रभा’चा अंक हा वाचनीय आहे, विशेषत: विनायक परब यांचे संपादकीय आणि कलाजाणीव हे पान. सुहास जोशी यांची कव्हर स्टोरी फारच छान. दिवसेंदिवस गणेशोत्सवाचे बदलत जाणारे स्वरूप फारच भयानक आहे. कधी कधी तर या उत्सवातल्या आवाजाने नको नको होते. बरेच सेलेब्रिटी कमरेला ढोल बांधून नाचतात आणि माध्यमे ही त्यांना प्रसिद्धी देतात, हे बघून फारच वाईट वाटते आणि मग त्याच माध्यमात आवाजाचे कसे, कधी, कुठे केव्हा प्रदूषण होते याच्या आकडेवारीसहित बातम्या छापून येतात. या वर्षी दुष्काळ डोळ्यांसमोर ठेवून हा उत्सव साजरा केला नसता तर? किंवा ते पैसे दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून दिले असते तर? गणपती बाप्पा रागावले असते का? उत्सव उत्साहात साजरा व्हावा हे मान्य, पण या उत्साहाचा इतरांना त्रास व्हायला नको. अर्थात हे सर्वच धर्माच्या लोकांनी लक्षात ठेवायला हवे. या लेखात फक्त एकाच धर्मातील उत्सवाबद्दल लिहले आहे; ते खरे आहे हेही मान्य. पण मोठमोठय़ा आवाजात भोंगे आणि डीजे लावून इतर लोकही भर ट्रॅफिकमध्ये मिरवणुका काढतातच की त्याविषयीसुद्धा नमूद केले असते तर एकंदर भारतीय लोकांच्या संस्कृतीच्या नावाखाली उन्मादाची बाजारपेठ आणखी चांगल्या पद्धतीने समोर आली असती.
– किशोर टापरे, मुंबई, ई-मेलवरून.

विचार न पटणारे

‘राजकीय आशीर्वादाने चालणारी बाजारपेठ बंद होईल का?’ ‘सारा रोख हिंदूंवरच का?’ अनिल काळे, नागपूर यांच्या पत्रामधील कोणताही विचार पटणारा नव्हता. पत्रलेखकांचा पूर्ण गोंधळ उडलेला दिसत होता. कारण त्यांनी ‘संस्कृतीच्या नावाखाली उन्मादाची बाजारपेठ’ या लेखाबद्दल मुद्दे पटले म्हणून अभिनंदन तर केलेय, मात्र हिंदूंवरच टीका का? याला कारण वैभवशाली हिंदू संस्कृती आणि सण यांना राजकीय आशीर्वादाने पूर्णपणे काबीज केलेय. समजूतदार नागरिक शांत राहून सहन करण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही. सुप्रिम कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवून गल्लाभरू उत्सव गल्लोगल्ली साजरे होताना दिसतायत. श्रद्धेचा व्यापार थांबवण्यासाठी ‘लोकप्रभा’सारख्या साप्ताहिकाची, त्यातील विचारांची नितांत गरज आहे.
– सुहास सावंत, भांडुप (पश्चिम).

गीताईचा उल्लेख हवा होता

lp07‘लोकप्रभा’ १८ सप्टेंबरचा अंक वाचला. विसाव्या शतकातील संत हा लेख भावला. लेखात विनोबा यांनी लिहिलेल्या गीताईचा उल्लेख नाही हे पाहून थोडे आश्चर्य वाटले. विनोबा आजन्म कर्मयोग या सिद्धांतानुसार चालले, ‘गीताई माउली माझी, मी तिचा बाळ नेणता पडता रडता घेई उचलोनी कडेवरी,’ अगदी सोप्या शब्दात विनोबांनी गीताई लिहिली की जिभेवर आणि मनावर सहजगत्या रुळते. अनवधानाने उल्लेख राहिला असेल. कारण गीताईविना विनोबांवरील लेख अपुरा असे मनात येते.

लोकप्रभाचे गणेश विशेषांक अर्थपूर्ण आणि माहितीपूर्ण असतात. गणपती हा सर्वानाच प्रिय आणि वंदनीय देव. कोणतेही कार्य याविना अपूर्ण अशी याबद्दल श्रद्धा. प्रथम मान याच भगवंताला. मंगल म्हटले की गणेश इतके समीकरण दृढ झाले आहे. फक्त गणपतीला घडवताना किंवा चित्रीकरण करताना त्यांना जे चित्र विचित्र चितारतात तो प्रकार मनाला क्लेश देतो. पँटशर्ट घातलेला, सायकल चालवणारा, चष्मा घातलेला, गणपती पाहून ही एकप्रकारची विटंबनाच वाटते. यावर आळा घातला पाहिजे, कारण यामागे श्रद्धेला तडा जातो. आपण आपल्या अंकात अनेक ठिकाणच्या गणेश मंदिरांची माहिती देत असता. मध्य प्रदेशमध्ये देखील अनेक गणेश मंदिरे आहेत. आपण त्यांचाही उल्लेख करावा, असे प्रामाणिक मत आहे. कारण ‘लोकप्रभा’ आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही हे लक्षात घ्यावे ही विनंती.
– सुरेश कुळकर्णी, इंदूर, मध्य प्रदेश, ई-मेलवरून.

माहितीचा खजिना

lp06गणेशासंबंधी धार्मिक, राजकीय, (‘कोण म्हणतो टिळकांना’-रवि आमले) पौराणिक माहिती असा सर्वागीण माहितीचा खजिना ‘लोकप्रभा’ने गणेश विशेषाच्या दोन्ही भागांमध्ये दिला. गणेश भाग २ मध्ये (१८ सप्टेंबर ) पॉल मार्टिन दुबोस या फ्रेंच अभ्यासकाने केलेला गणेशाचा अभ्यास आणि त्यातून पुढे आलेली माहिती विशेष होती. कारण गेल्या वर्षीच्या गणेश विशेष मध्ये ‘गणेशाचे पुरातत्त्वीय संदर्भ हे ख्रिस्तोतर दुसऱ्या शतकानंतरचे?’ असा मुद्दा काही पुरातत्त्वज्ञ व विशेषत: अरविंद जामखेडकर यांनी मांडला होता. तेव्हा आणि आताही तो मुद्दा अनुत्तरितच राहिला होता.

आजवर मी गणेश विशेषांक वाचत आलोय. त्यात साधारणपणे गणेशासंबंधी आलेले वर्णन असे. १. गणेश ही आदिदेवता आहे, २. गणेश सृष्टीचा निर्माता आहे, ३. ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती आणि सूर्य या पंच देवांसह सगळ्यांनीच (मानव, सुर, असुर, ऋषीमुनी वगैरे) आपापल्या कार्यसिद्धीकरिता त्याची आराधना केलेली आहे. ४. परंतु त्याने कोणत्याही देव/देवतेची स्थापना किंवा आराधना केलेली नाही. म्हणून ही देवता सार्वभौम मानली जाते. तात्पर्य गणेश देवता ही सार्वभौम, आदिदेवता आहे! मग व्यास ऋषींसाठी (मर्त्य मानवासाठी) लेखनिक म्हणून (महाभारत लेखन) दुय्यम, तिय्यम दर्जाचे काम त्याने का स्वीकारले? काही अटींवर हे कार्य स्वीकारले तरीही त्यावर तोडगा काढण्यात व्यास मुनींनी दर शंभरावा श्लोक कूट श्लोक अशी रचना करून; गणेशावर कुरघोडी केली असे होत नाही का?
– अनिल ओढेकर, नाशिक.

कृपया नोंद घ्यावी

दि. ३० ऑक्टोबर २०१५ च्या ‘लोकप्रभा’मध्ये चर्चा या सदरात उषा टोळे यांनी ‘शताब्दी गीतारहस्याची’ या मथळ्याखाली (पृष्ठ क्र. ६२) लेख लिहिला आहे. लोकमान्य टिळकांनी मंडाले तुरुंगात बंदिवासात असताना लिहिलेल्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे सध्या शताब्दी वर्ष सुरू आहे. त्यासंबंधी रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत त्यांनी या लेखात लिहिला आहे. ‘एक व दोन ऑगस्ट २०१५ रोजी हा कार्यक्रम रत्नागिरीच्या गीता भवनात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व गीता भवन यांच्या वतीने झाला’ असे त्यांनी लेखात म्हटले आहे. वास्तवात हा कार्यक्रम ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, कोकण विभागीय केंद्र रत्नागिरी’ या संस्थेच्या माध्यमातून पार पडला याची नोंद घ्यावी ही विनंती.
– राजा लिमये, अध्यक्ष, कोकण विभागीय केंद्र,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.