News Flash

भूतां परस्परे जडो.. मैत्र जिवाचे!

दहशतवादाचे मूळ फक्त गमावलेल्या विश्वासात आहे असे वाटते.

lp04पॅरिसमध्ये घडलेल्या घटनांवर आधारित ‘मथितार्थ’ आणि कव्हर स्टोरी वाचली (२० नोव्हेंबर). असे प्रसंग घडले की, केवळ पोलीस किंवा सैन्यदले यांच्याकडून बळाचा वापर करून दहशतवादाचा प्रश्न सुटू शकणार नाही, असे नेहमी म्हटले जाते. कोणी या प्रश्नाला मूलत: आर्थिक मानते, तर कोणी राजकीय. कोणी हा प्रश्न चुकीच्या शिक्षणाशी जोडते, तर कोणी धार्मिक किंवा वांशिक असहिष्णुतेशी. हे सर्व अतिसुलभीकरण वाटते. हे सर्व खरे असते, तर दहशतवाद आणि त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा हा फक्त गरीब, अशिक्षित आणि व्यक्तिगत आयुष्यात प्रामाणिकपणे कडवी विचारसरणी मानणाऱ्या माणसांमध्येच दिसला असता; पण परिस्थिती अजिबात तशी राहिलेली नाही हे वारंवार दिसून येते. मग दहशतवादाचे मूळ काय आणि त्यावर उपाय काय असू शकतो, असा प्रश्न पडतो.

दहशतवादाचे मूळ फक्त गमावलेल्या विश्वासात आहे असे वाटते. मग तो विश्वास समोरच्या माणसामध्ये असलेल्या व्यक्तिगत चांगुलपणावरचा असेल, समाजाच्या संवेदनशीलतेवरचा असेल, व्यवस्थेच्या प्रामाणिकपणावरचा असेल, कायद्याच्या अंमलबजावणीवरचा असेल, न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षपणावरचा असेल, कुटुंबावरील असेल किंवा मग सरतेशेवटी अगदी स्वत:वरचादेखील असेल. कशाचाही आणि कितीही राग मनात असला तरी कोणी सार्वजनिक ठिकाणी पूर्णपणे अनोळखी माणसांना वेचून गोळ्या घालण्याचा बेत कसा काय आखू किंवा अमलात आणू शकतो? याचे कारण समोरच्या माणसाच्या चांगुलपणावर आणि एकूणच समाजाच्या संवेदनशीलतेवर विश्वास अजिबात शिल्लक राहिलेला नसतो. त्यामुळे मग कुठल्याही वडय़ाचे तेल कोणत्याही वांग्यावर काढण्यास हात अजिबात कचरत नसावा. एखादी गोष्ट कितीही मनाविरुद्ध घडत असली तरी व्यवस्थेच्या प्रामाणिकपणावर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर थोडा जरी विश्वास असेल, तर माणूस टोकाला न जाता परिस्थिती सुधारण्याची वाट पाहू शकतो. (बस थांब्यावर कितीही गर्दी असली तरी पुढची बस ठरावीक वेळेत येईलच आणि त्यात रांगेनेच प्रवेश दिला जाईल, असा विश्वास असेल तर बेबंद धक्काबुक्की होत नाही, तसेच काहीसे हे.) कितीही अन्याय झाल्याची भावना मनात असली तरी जर न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षपणावर विश्वास असेल, तर ‘देर है पर अंधेर नही’ असा आश्वासक विचार कडेलोट होऊ  देत नाही. (न्याय फक्त मिळून चालत नाही, तर तो मिळत आहे असे स्पष्टपणे दिसणे महत्त्वाचे असते, ते याकरिताच.) वरील सर्वच गोष्टींवरून विश्वास उडाला असेल तरीही इतर अनेक जण काढतात तसा मीही यातून काही तरी मार्ग काढून भविष्यात परिस्थिती माझ्यापुरती तरी सुधारेन, हा स्वत:वरचा विश्वास जरी शाबूत असेल तरीही माणूस अतिरेकी विचारांपासून दूर राहू शकतो.

विश्वास असेल तर विरोधी विचार समजून घेण्याची सहिष्णुताही आपोआपच येते. याचे कारण म्हणजे ज्या माणसावर आपला विश्वास आहे, त्याचे न पटणारे विचारही आपण ऐकून घेऊ  शकतो. असे होण्याशी शिक्षण, आर्थिक स्तर, किंवा धार्मिक श्रद्धा याचा काहीही संबंध नाही. दुर्दैवाने व्यक्तिगत स्तरावर अनोळखी माणसाच्याही चांगुलपणावर विश्वास ठेवावा असे वातावरण नाहीसे होत चालले आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावरही एखादे राजकीय ईप्सित साध्य करण्याकरिता कोणतीही विचारसरणी सोयीपुरती वापरून घेणे हासुद्धा मूलत: कोणाचा तरी विश्वासघातच असतो; जो मध्यपूर्वेत घडला आणि इतरही अनेक ठिकाणी घडत आहे. सगळाच विश्वास हरवून टोकापर्यंत आलेली माणसे आत्महत्या तरी करतात किंवा हत्या करायला मागेपुढे पाहात नाहीत. (शहरी आणि ग्रामीण भागांतील वाढते आत्महत्यांचे प्रमाण किंवा ‘पार्किंग करताना झालेल्या क्षुल्लक वादातून हत्या’ अशा बातम्या आपण वाचत असतो, ज्या धोक्याच्या घंटाच आहेत.)

त्यामुळे दहशतवादावर दूरगामी उपाय जर काही असलाच, तर तो व्यक्तीपासून ते राष्ट्रांपर्यंत परस्परविश्वास कसा ढळणार नाही ते पाहणे हाच असेल असे वाटते. याचा अर्थ व्यक्तिगत किंवा राष्ट्रीय हितसंबंध नसावेत किंवा सोडावेत असे नाही; पण तसे ते इतरांनाही आहेत याचे भान ठेवून त्यांचा सुवर्णमध्य साधणे भाग आहे. अगदी व्यक्तिगत आयुष्यातदेखील संवेदनशीलता आणि ‘सर्वाच्याच हितसंबंधांची जाणीव ठेवण्याची वृत्ती’ कशी वाढेल ते पाहणे कधी नव्हे इतके आज गरजेचे झाले आहे. कितीही आदर्शवादी विचार वाटला तरी ‘भूतां परस्परे जडो मैत्र जिवाचे’ला पर्याय नाही आणि ‘शॉर्टकट’ तर मुळीच नाही!
– प्रसाद दीक्षित, ठाणे (ई-मेलवरून)

मुद्दे न पटणारे

दि. २७ नोव्हेंबरच्या अंकातील कव्हर स्टोरीतील निशांत सरवणकर यांचे मुद्दे बहुतांशी न पटणारे आहेत. कुठल्याही मराठी माध्यमातून शिक्षण दिल्या जाणाऱ्या शाळेत मुसलमान मुलाला घेणार नाही असे कधीच होणार नाही. त्यामुळे त्यांना पोलीस खात्यात काम करावे असे वाटत असेल तर मराठी भाषा शिकायला मिळेल तिथे जाण्यास काय हरकत आहे? मुसलमान मुलांना मराठी शाळेत येण्याची मनाई आहे काय? पोलीस दलात भरती व्हायला मराठी येणे आवश्यक आहे हे माहीत नाही का? मग त्यांनी आपल्या मुलां-मुलींना मदरसामध्ये न पाठवून सरकारी किंवा खासगी मराठी भाषी शाळेत पाठवायला काय हरकत आहे. यासाठी पोलीस दलाने कशासाठी प्रयत्न केला पाहिजे? मुसलमान सर्व सामान्य समाजात स्वत: का म्हणून मिळून मिसळून राहात नाही. मंदिर परिसरात नारळ फोडून प्रसाद वाटत असताना तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एखादा मुसलमान असेल तर तो प्रसाद घेणार नाही हे मी अनुभवलेले आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान या देशातील शासन तंत्र त्यांना स्पष्टपणे सांगत असतात की तुम्ही सर्व समाजाला अनुकूल असे राहा. जेव्हा आपणहून हा समाज सर्व गोष्टी लक्षात घेऊन सारासार विवेकबुद्धीने विचार करील तेव्हा त्यांच्या सर्व समस्या सुरळीतपणे सुटू लागतील हा विश्वास आहे.
– चंद्रकांत लेले, भोपाळ (ई-मेलवरून).

मुद्देसूद विवेचन

दि. २७ जुलैच्या अंकातील ‘द फ्रेंच लेसन’ हा मथितार्थ मुद्देसूद आणि विवेचनात्मक आहे. आपल्या प्रसारमाध्यमांनी, विशेषत: इलेक्ट्रॉनिकमाध्यमातून जो काही पोरखेळ चालतो, त्यांना घटनेचे गांभीर्यच कळत नाही. अशा प्रसंगी काय दाखवावे, कोणते प्रश्न विचारावे, याचे तारतम्यदेखील त्यांच्या प्रतिनिधींना नसते. वेडय़ाचा झटका आल्यासारखे असंबद्ध बोलत असतात.  फ्रेंच प्रसारमाध्यमांना खरंच मानलं पाहिजे. आमच्या प्रसारमाध्यमांनी त्यांच्याकडून बोध घेण्याची नितांत आवश्यकता आहे.

दुसरीकडे आपली राजकीय नेते मंडळी आगीत तेल ओतण्यास तत्पर असतात. विशेषत: सरकारी पक्षाकडून अशा वेळी संयमाची अपेक्षा असते, पण खेदाने येथे नमूद करावेसे वाटते, आपल्या राजकीय नेते आपल्या अपरिपक्वतेचे प्रदर्शन करीत असतात.

आज मुस्लीम तरुण आयसिसमध्ये भरती होण्यामागे हे महत्त्वाचे कारण आहे. पण इथे मंत्री पंतप्रधानांचे ऐकत नाहीत, मग मुख्यमंत्र्यांना कोण विचारतो. दहशतवाद हा मोठा गहन प्रश्न आहे, तो समजूतदारपणे सोडवायला हवा. जबरदस्ती करून हा प्रश्न सुटण्याऐवजी चिघळण्याची शक्यता जास्त आहे. दहशतवादाचा राक्षस जेवढय़ा लवकर शमेल तेवढे चांगले.
– प्रफुल्लचंद्र पुरंदरे, वेसावे, मुंबई (ई-मेलवरून).

दर्जेदार साप्ताहिक

मी आपल्या प्रत्येक साप्ताहिकाचा नियमित वाचक आहे. मी जन्माने मुंबईकर असून कर्माने पुणेकर आहे. सुमारे १५ वर्षे दादरला वाढलो व नंतर कर्माने पुणेकर झालो व पस्तावलो. त्यामुळे मुंबईची पदोपदी आठवण येते व हळहळ वाटते. असो, साहित्यातील विविधता, दर्जेदार कागद व छपाई व मुख्य म्हणजे योग्य किंमत यामुळे मी व माझे कुटुंबीय  ‘लोकप्रभा’वर अगदी खूश आहोत.
– प्रकाश खटावकर, कर्वे रस्ता, पुणे.

अशा आणखीही संस्था

दि. २३ ऑक्टोबरच्या अंकातील ‘पर्यावरण आणि आपण’ या संवेदनशील विषयावर ‘लोकसत्ता’ने घडवून आणलेली चर्चा आणि ‘कचरा’ समस्येवरील मान्यवरांचे विचार वाचल्यावर नाशिकमध्ये १९८५ पासून कार्यरत असलेल्या ‘निर्मल ग्राम’च्या कार्याची ओळख करून द्यावी असे वाटले. नाशिक शहरापासून जवळच गोवर्धन (गंगापूर) येथे निर्मल ग्राम निर्माणकेंद्र आहे. पर्यावरणाशी संबंधित वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता याविषयी मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्याचे काम या केंद्रात अव्याहतपणे चालू आहे. सर्वोदयी भाऊ  नावरेकर यांनी या केंद्राची स्थापना केली आणि संपूर्ण नावरेकर कुटुंबीयांनी हे कार्य पुढे चालू ठेवले आहे. प्रदूषणमुक्त व खत देणारी शौचालये, कचऱ्यापासून खत बनविण्याची पद्धती, सांडपाण्याचा पुनरुपयोग यासंबंधी शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या केंद्रामार्फत दिले जाते. शौचालय, मुतारी, शोषखड्डा, बायोगॅस प्लांट्स, कम्पोस्ट खड्डे इत्यादी सुविधांची पूर्णाकृती मॉडेल्स केंद्रात निरीक्षण, अभ्यास यासाठी तयार केलेली आहेत. प्रशिक्षणार्थीसाठी सफाईची सद्य:स्थिती, सफाईचे विविध घटक, सफाईची वैज्ञानिक वैशिष्टय़े व चित्रात्मक प्रदर्शन आहे. या उपक्रमांमधून जमा झालेल्या पैशाचा केंद्राच्या अन्य कामांसाठी विनियोग केला जातो.
– अनिल ओढेकर, नासिक (ई-मेलवरून).

जागतिक अंक

0123456789 हे जागतिक अंक बहुतेक सर्व भारतीयांना परिचित आहेत. फोन, कॅलक्युलेटर, टॅक्सीमीटर, घडय़ाळे, मापन टेप, कोनमापक, वजनमापक, रक्तदाबमापक वगैरे सर्व विज्ञानसाधने, तसेच शासकीय नाणी, नोटा, टपालाची व रेलगाडीची तिकिटे, वाहन नंबर प्लेटी, तसेच खेळपत्ते यांवर ते असतात.. भारतीय संविधानाची त्यांना मान्यता आहे.. मराठी माध्यमाच्या शाळातही हायस्कूलमध्ये तेच अंक गणित व विज्ञान यांच्या शिक्षणासाठी वापरतात. ते अंक सर्व हिंदी नियतकालिकातही वापरले जातात. मराठी नियतकालिकांतही ते स्वीकारावेत.
– म. ना. गोगटे, पुणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2015 1:01 am

Web Title: readers response 84
Next Stories
1 त्या मालिकेचा उल्लेख हवा होता
2 शॉपिंग मार्गदर्शक अंक
3 ‘महिलांचा सम्मान’ नवरात्र विशेष
Just Now!
X