05-lp-cvr आता शिक्षण क्षेत्रात असलेले हिडीस प्रकारचे वास्तव सदर लेखाने येण्यापूर्वीच रोहितने दाखवले. हैदराबाद विद्यापीठात रोहित हा विषम व्यवस्थेचा बळी होता, त्याला आता राजकीय रंग दिला जातोय, हे पालुपद नेहमीचेच आहे. तो एक सामाजिक बहिष्काराचा प्रश्न असून आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचा अध्यक्ष असलेला रोहित हा पीएच.डी. करणारा विद्यार्थी होता. त्याला अन्यायकारकरीत्या, सामाजिकदृष्टय़ा विद्यापीठ प्रशासनाने बहिष्कृत केला होता. प्रशासकीय इमारत, ग्रंथालय येथे त्याला प्रवेशबंदी करण्यात आली होती. तसे पाहता या प्रश्नाची दाहकता पाहता, या जीवघेण्या व्यवस्थेने अशा प्रकारे रोहितच नव्हे तर अनेक जण बळी गेलेले आहेत. बाल मुकुंद भारती हा आयआयटी परीक्षा पास होऊन देशात आठवा आला. त्याला डॉक्टर व्हायचे होते. एम्स दिल्लीची ही केस भारतीला २०१० साली आत्महत्या करावी लागली. जातीय चटके काय असतात याचा अनुभव शाळा-कॉलेजमध्ये सर्वच मागास विद्यार्थ्यांना येत असतो.

नुकतेच एका आंबेडकरी बाण्याच्या वृत्तपत्रातील फ्रंटपेजवरील बातमीने मी अस्वस्थ झालो. सरसंघचालक मोहन भागवत पुन्हा एकदा वादग्रस्त बोलले. त्यास खा. रामदास आठवलेंनी उत्तर दिले, भारतीय संविधान कदापि बदलता येणार नाही. आठवलेजी, उत्तरं कसली देता, ठोस कृती करण्याची वेळ आली आहे. रोहित वेमुलाच्या आत्मसमर्पणाने सर्व देशात आणि विशेषकरून विद्यार्थी वर्गात आलेल्या संतापाच्या लाटेचे क्रांतीत रूपांतर करण्याची हीच वेळ आहे. जातीयवादी शक्तींना सणसणीत धडा शिकवण्याची संधी आहे. देशभरातील अन्यायग्रस्त तरुणांना एकत्र करून या ज्वलंत प्रश्नावर रान उठवावे. संसदेत देखील या प्रश्नाची सरबत्ती करून सरकारला वेठीस धरावे. तेव्हा उठा सज्ज व्हा! समविचारी लोकांना, पुढाऱ्यांना आव्हान करा. जातीयवादी नको तेवढे मोकाट सुटलेत. त्यांना वठणीवर आणण्याची तयारी करा! पुनश्च रिडल्ससारखे शक्तिप्रदर्शन नव्हे शक्तिशाली असे आंदोलन उभे करा! संविधानाच्या दुष्मनांविरुद्ध एकजूट झालीच पाहिजे.

डॉ. आंबेडकरांनी दलित, मागास, आदिवासींच्या प्रतिनिधित्वासाठी आग्रह धरला होता. तेच प्रतिनिधित्व अलीकडे शैक्षणिक संस्थांमधून नाकारले जात आहे. रोहितला फेलोशिप मिळाली नव्हती. झालेली मानहानी असह्य़ होऊन तो मृत्युमुखी पडला. म्हणून आत्महत्येच्या विरोधात जनजागृती व्हायलाच हवी.
– उत्तम भंडारे, चेंबूर, मुंबई.

योग्य प्रश्न उपस्थित

‘दुंभगलेल्या समाजाचे विद्यापीठीय धडे’ ही कव्हरस्टोरी वाचली. रोहित वेमुला या हैदराबादच्या तरुण संशोधकाच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा घटनाक्रम कव्हरस्टोरीमध्ये मांडला आहे. यामुळे घटनेची खोलवर माहिती मिळाली. तसेच लेखाच्या शेवटी मांडलेले प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि योग्य आहेत. त्याचा खोलवर विचार करायला हवा.
– सुजाता शेळके, मुंबई.

अंक आवडला
06-lp-cvr‘लोकप्रभा’ १२ फेब्रुवारीचा लग्नसराई विशेष हा अंक खूप आवडला. मागच्या वर्षीप्रमाणे या  वर्षीही लग्नसराई विशेष अंकाने पसंती मिळवली असं म्हणायला हरकत नाही. वेगळे विषय, विचार, मांडणी यांमुळे यंदाचा विशेष अंकही तितकाच उत्तम झाला. सध्याचा ट्रेंड आणि चर्चेचा विषय असलेला ‘डेस्टिनेशन वेडिंग’ हा विषय लेखातून मांडल्यामुळे त्याबाबत अधिक माहिती मिळाली. ‘सोनेरी क्षणांचा कॅण्डिड नजराणा’ हा लेख वाचण्यासह बघायलाही आवडला. या लेखातील फोटो उत्तम असल्यामुळे लेखाचा विषय चटकन लक्षात आला आणि तो अनुभवताही आला. कलाकारांच्या आयुष्याविषयीही नेहमी कुतहूल वाटतं. त्यांच्या लग्नाबाबतच्या आठवणी, मतं वाचायला मिळाली. संगीत सोहळे, बॉलीवूडमधला लग्नाचा तामझाम, लग्नपत्रिका, फॅशन, लग्नाचं जेवण, लग्न ठरलेल्या मुलीच्या मनोगत असे सगळेच विषय वेगळे आणि वाचनीय ठरले. लग्नसराई विशेष अंक आवडला.
– कल्पिता शेलार, नागपूर.

विज्ञानाधिष्ठ कुतूहलाला प्रोत्साहन द्यायला हवे!
‘विज्ञानानिष्ठ विचारांसाठी..’ या प्रसाद हावळे यांच्या वृत्तांतरूपी लेखात (लोकप्रभा, २९ जाने.) विज्ञानवेध- २०२५ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित मराठी विज्ञान परिषद अधिवेशनाचे उद्दिष्ट प्रतित झाले. त्या अनुषंगाने काही मुद्दय़ांवर लक्ष द्यावेसे वाटते.

५०-६० वर्षांनतर भारताला ६८०० अब्ज युनिट विजेची निकड व त्या अनुषंगाने दरडोई वीजवापर आणि मानव विकास निर्देशांक यांची सांगड या मुद्दय़ांकडे आतापासूनच गांभीर्याने पाहायला हवे. त्यासाठी पारंपरिक-अपारंपरिक-पर्याप्त ऊर्जानिर्मितीवर लक्ष व ‘लक्ष्य’ केंद्रित करण्याबरोबर वीज बचतीचे अनेकविध मार्ग अमलात आणण्याबरोबर वाया जाणारी ऊर्जा वाचविणे हाच पर्याय होय व त्यात तेल व नैसर्गिक वायू उत्खनन वेळी वाया जाणारे इंधन हा त्यातील मोठा भाग आहे. विज्ञानात कुतूहलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि कुतूहलातून शोध जन्माला येतात हे इतिहास सांगतो आणि मग त्याला गरजेची सांगड घातली जाते. त्यासाठी विज्ञानाला अधिकतम गतिमान करायला हवे. त्यासाठी बालमनापासून विज्ञानाधिष्ठ कुतूहलाला प्रोत्साहन दय़ायला हवे. ग्रामीण भागात ‘ज्ञानकेंद्रे’ उभारावीत. त्याहीपुढे जाऊन असे ठाम मत व्यक्त करावेसे वाटते की, ग्रामीण भागात अंधश्रद्धेचा पगडा अधिक असल्याने ही ज्ञानकेंद्रे, विज्ञान केंद्रेसुद्धा व्हायला हवीत आणि विज्ञानाला सांस्कृतिक नजरेतून पाहण्याची मानसिकता प्रत्येकात रुजायला हवी त्यासाठी विज्ञानावर आधारित मनोरंजन होणे गरजेचे आहे, मग ते नाटय़मंच-छोटा पडदा ते मोठा पडदा असो. किंबहुना ग्रामीण भागात होणाऱ्या कीर्तनांत शास्त्रीय-वैज्ञानिक प्रबोधनाची प्रयत्नरूपी सांगड असली तरीही रुजलेला अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्यासाठी नाटय़मंच-छोटा पडदा ते मोठा पडदा या मनोरंजन माध्यमातून विज्ञानाधिष्ठ कथामालिका यांचा उपयोग करीत अधिक प्रभावशाली ठरावा.
– किरण चौधरी, वसई, ई-मेलवरुन

कालगणनेची अगम्य गणिते
परंपरा भारतीय वर्षांरंभाची या दीर्घ लेखातून सूर्य भ्रमण आणि चंद्र भ्रमणानुसार केलेल्या कालगणनेच्या विविध पद्धती कळल्या. त्याचबरोबर चार युगे व मन्वंतर यांची फार छान माहिती मिळाली. ही सर्व माहिती ज्योतिषशास्त्रीय ग्रंथातून सापडते असे लेखात म्हटले आहे. परंतु ही लाखो वर्षांच्या कालगणनेची गणिते कोणत्या परम डोक्याच्या ज्योतिषांनी मांडली व त्यांचा कालखंड कुठला? ही सर्व गणिते सर्वसामान्य उच्चशिक्षित माणसांच्यासुद्धा बुद्धीपलीकडील वाटतात. त्यामुळे मनात अनेक प्रश्न निर्माण होतात ते असे:

१. युधिष्ठिर शक तीन हजार चव्वेचाळीस वर्षे चालल्यावर विक्रम राजाच्या नावाने विक्रम संवत सुरू झाले व ते एकशे पस्तीस वर्षे चालले. त्यानंतर आजचा शालिवाहन शक एकोणीसशे सदतीस वर्षांपूर्वी सुरू झाला. तरीसुद्धा कालनिर्णय पंचांगात, जे जनमानसात प्रमाण मानले जाते, विक्रम संवत दोन हजार बहात्तर (शालिवाहन शके १९३७ + त्या आधीची १३५ वर्षे असे मिळून २०७२) असे का दाखवले जाते?

२. कलियुगात युधिष्ठिराच्या राज्यारोहणापासून युधिष्ठीर शक सुरू झाला. म्हणजे हा महाभारत काल म्हणायचा. परंतु भगवान श्रीकृष्णाचा अवतार द्वापारयुगात झालेला आहे असं पुराणे सांगतात. महाभारतात युधिष्ठिर व श्रीकृष्ण द्रौपदी वस्त्रहरणापासून ते अनेक प्रसंगांत बरोबर दाखवले आहेत. मग या द्वापारयुगकालीन कृष्ण अवताराची आणि कलियुगकालीन युधिष्ठिराबरोबर सांगड कशी घालायची?

३. चार युगांपैकी कृत म्हणजेच सत्य युगात श्रीरामावतार झाला असे पुराणात म्हटले आहे. या कृत युगातील १७ लाख २८ हजार वर्षांतील कुठल्या तरी शेवटच्या काळात श्रीरामप्रभूंचा अवतार असे गृहीत धरल्यास कृत (सत्य) युगानंतर आलेल्या त्रेता युगाची १२ लाख ९६ हजार वर्षे अधिक द्वापारयुगाची ८ लाख ६४ हजार वर्षे अशा एकूण २१ लाख ६० हजार वर्षांनंतर कलियुग अवतरले. हे सत्य मानल्यास आज श्रीराम जन्मभूमीचा जो वाद चालू आहे ती जागा काय किंवा नाशिक पंचवटीमधील ज्या वास्तू समोरून सीतेचे अपहरण झाले ती वास्तू वा आजच्या श्रीलंकेतील रावणाच्या लंकेचे अवशेष हे सर्व २१ लाख ६० हजार वर्षांपूर्वीचे आहेत का असा सामान्य वाचकाला प्रश्न पडतो. याबाबत खुलासा व्हावा.
– सुधीर देशपांडे, विलेपार्ले, मुंबई.

ग्रंथोक्त आधार
मन्वंतरांची संकल्पना ही केवळ ज्योतिष्यांनी मांडली नसून ती पुराणांमध्येही सापडते. या पुराणांचा काळ आधुनिक अभ्यासक इ.स. दुसरे-तिसरे शतक ते आठवे-नववे शतक या दरम्यानचा मानतात. शक्यता अशी आहे की, पुराणांनी आपण सांगत असलेल्या कथा या अतिप्राचीन काळातील आहेत हे सांगण्याकरिता या काळाचा निर्देश केला असावा आणि कथा जितकी प्राचीन तितकी ती जुन्या युगात, जुन्या मन्वंतरात घडली असे सांगितले असावे. या गोष्टी अनेकदा ग्रंथोक्त असतात; पण इतिहास, पुरातत्त्वशास्त्र इत्यादी अभ्यासशाखांना त्याविषयीचे कोणतेही पुरावे प्राप्त होत नाहीत. विचारलेल्या शंकांचा खुलासा पुढीलप्रमाणे.

१. विक्रम आणि शालिवाहन हे शक कसे सुरू झाले याच्या कथा जरी पुराणग्रंथांमधून परंपरेने प्राप्त झाल्या असल्या तरी वस्तुस्थिती अशी आहे की हे राजे नेमके कोण, कुठल्या घराण्यातील इ. माहिती शिलालेख, नाणी यांसारख्या कोणत्याही ऐतिहासिक साधनांमधून उपलब्ध झालेली नाही. कालगणना राजाने सुरू केली, तरी ती वापरायची की नाही, हे संपूर्णपणे लोकांवर अवलंबून आहे, हे उघड आहे. विक्रम संवताचा प्रारंभ झाल्यावर १३५ वर्षांनी जरी शालिवाहनाने नवी कालगणना सुरू केली असली, तरी लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आजही अनेक लोक विक्रम संवतच वापरणे पसंत करतात. त्यामुळे शालिवाहन शकात १३५ वर्षे मिळवली की विक्रम संवताच्या गणनेप्रमाणे सध्या कोणते वर्ष चालू आहे हे समजते, जे कालनिर्णयच नव्हे, तर इतरही अनेक पंचांगांमध्ये छापले जाते. यात प्रश्न पडण्यासारखे नेमके काय आहे, ते मला समजले नाही.

२. कृष्णाचा अवतार द्वापारयुगात झाला, असे परंपरा सांगते. मात्र तो त्या युगाच्या प्रारंभी झाला असे कोठेही म्हटलेले नाही. उलट पुराणकारांच्या मते महाभारत युद्ध द्वापारयुगाच्या अखेरीस झाले (अर्थातच युधिष्ठिर आणि कृष्ण तेव्हा असणार). त्यामुळे त्यापूर्वी द्वापारयुग १० लाख वर्षे चालो, की ५० लाख वर्षे, त्याचा युधिष्ठिराच्या शकाशी काय संबंध? युधिष्ठीर शक सुरू झाल्यावर काही काळातच कलियुग सुरू झाले. त्यामुळे फक्त हे पाहायला हवे की, कलियुग सुरू होऊन जो काळ गेला असे मानले जाते, तो आणि युधिष्ठिराच्या राज्यारोहणाचा काळ यात काही तफावत आहे का. असे दिसेल, की तशी तफावत नाही.

३. यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे रामायण हे अतिप्राचीन काळी घडले असे पुराणे सांगतात. परंतु त्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध होत नाहीत. रामाचा अयोध्या ते लंका हा प्रवास (उत्तर ते दक्षिण) होत असताना तो आमच्या गावातून झाला, असे नाशिकपासून नागपूपर्यंतच्या अनेक ठिकाणचे लोक सांगतात. याला ऐतिहासिक असा पुरावा नसतो. वास्तविक पाहता राम जर दक्षिणेत गेलाच असेल तर तो एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गानी कसा जाऊ  शकेल? त्यापैकी कोणता तरी एकच मार्ग खरा असू शकेल. यावरून लक्षात येईल की अशी क्षेत्रे ही लोकांच्या श्रद्धेतून निर्माण झाली आहेत. या ठिकाणी रामाचे वास्तव्य झाले होते, हे पवित्र स्थान आहे, ही श्रद्धा लोकांच्या मनांत असते. पुरातत्त्वशास्त्राच्या मदतीने झालेला अभ्यास पाहता यातील अनेक स्थानांचा इतिहास दोन-तीन हजार वर्षे मागे जातो असे आढळते. मात्र लाखो वर्षांचा इतिहास उपलब्ध होत नाही. श्रीलंकेबद्दल बोलायचे झाले तर तेथेही रावणाची लंका वगैरे सापडलेली नाही. सर्वसामान्य श्रीलंकन माणूस बौद्ध असून तो राम, रावण, सीता यांबद्दल अनभिज्ञ असतो, हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. ज्या भागात तमिळ लोकांची वस्ती आहे, त्या परिसरात भारतीय परंपरांची कल्पना असल्याने अशा गोष्टी मानल्या जातात, इतकेच.
– अंबरीष खरे