उषा टोळे यांचा ‘‘मॅगी, कुरक रे..’ हा लेख (१४ ऑगस्ट) सर्वाग परिपूर्ण व वैचारिक आहे. बाई कितीही शिकली व उच्च पदावर नोकरी केली; तरी स्वयंपाकघर तिला काही सुटत नाही. चार/पाच मोलकरणी ठेवल्या, तरी बाईला त्यांच्यावर लक्ष ठेवावेच लागते; त्यामुळे स्वयंपाकघरात अडकतेच. तिची कुतरओढ होते.
मग त्यावर उपाय म्हणून मॅगी, वेफर्स, इ. ‘जंक फूड’ घरात पाय रोवून बसते. ते अगदी अयोग्य आहे. भूक तर लागणारच; त्यामुळे खाणे तर पाहिजेच; पण त्यावर उपाय आहे. मुंबई- नागपूर, पुणे इ. शहरांत लाडू, चिवडा चकली पदार्थ दुकानात आरामात मिळतात, ते आणायला हरकत नाही; पण एखादी घरगुती बाई पुरणपोळ्या, करंज्या इ. ताजे पदार्थ बनवून देत असेल, तर तिच्याकडून घ्यावेत. बाईने पण छोटय़ा प्रमाणात हे पदार्थ बनवावेत, म्हणजे स्वच्छता, दर्जा जपता येईल. असे अनेक बायकांनी घरातल्या घरात करावे. ४/५ जणींनी मिळून मोठय़ा प्रमाणात पदार्थ करण्याच्या भानगडीत पडू नये; कारण दर्जा घसरतो. आजकाल नवनवीन कोर्सेस व वेगवेगळ्या तऱ्हेचे पदार्थ निघाले आहेत. पण आपले परंपरेने आलेले पदार्थ विसरू नयेत; म्हणजे नोकरीवाल्या स्त्रियांना जुने पदार्थ आपल्या मुलांना खिलवता येतील. एका दगडात तीन-चार पक्षी मरतील- जुनी परंपरा टिकवली जाईल, आई- मुलांना घरगुती पदार्थ खायला मिळतील व घरगुती बाई मन लावून पदार्थ केल्यामुळे छान होतील. स्त्रीला बदलायचे तर असे बदला. कमावतीला पण फायदा होईल.
घरातील किंवा बाहेरील स्त्रियांनी स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवू नये. सोप्पे, छान, मस्त पदार्थ बनवावेत, पण लौकर! उदा. शिरा करतानाच दुप्पट रवा भाजावा, म्हणजेच दुसऱ्या दिवशी उपमा करावा. भाताचे निरनिराळे प्रकार करावेत, पोळ्यांना सुट्टी द्यावी. पाव-भाजी करावी. पुलाव-मसाले भातात भाज्या टाकाव्यात. घरच्यांना उपाशी न ठेवता जेवण करता येईल. कधीतरी पराठे-दही- चटणी करून पोटभर जेवण करावे. स्त्रिया मुळताच हुशार असतात; त्यामुळे त्या आपली डोकी वापरून नाना तऱ्हेचा स्वयंपाक करतीलच. ‘शॉर्टकट’ घेतला; तरी नावे ठेवायची नाहीत किंवा बाईने ऐकून न ऐकल्यासारखे करावे आणि आपल्या कलागुणांना जपावे.
जेवण मात्र सर्वानी एकत्र बसून मनमोकळ्या गप्पांमध्ये झाले पाहिजे. मागचे-पुढचे आवरायला घरातील सर्वानी खारीचा वाटा उचलावा. म्हणजे बाई नेहमी हसतमुख दिसेल व त्यामुळे घर हसायला लागेल.
इतकी वर्षे स्वयंपाकघर बाईच्या हातात होते; त्यामुळे पुरुष किती सांभाळू शकेल ही शंका येते. एखादा दिवस पुरुषाला स्वयंपाकघरात बागडण्याचे स्वातंत्र्य द्यावे व ते स्वच्छ ठेवले पाहिजे, म्हणजे आवरून ठेवावे ही अट मात्र आहे. बाईने आपली ‘फूटफट्टी’ लावू नये. ४/५ वेळांनंतर पुरुष ते चकचकीत ठेवेल, याची खात्री बळगा. बायकांना नोकरीची संधी मिळाली, तर पुरुषांना घरात राहून घर सांभाळण्याची जबाबदारी द्यावी. नवरा नेहमी ताजेतवाना दिसला पाहिजे. चुकत-माकत पुरुष शिकेलच-पुरुषार्थ दाखवेलच, याची खात्री ठेवा.
माझ्या अनेक लेखांत मी लिहिले होते की, बायकांना बाळंतपणानंतर पाच वर्षे सुट्टी द्यावी. म्हणजे बाळाचे संगोपन आईने केल्यामुळे दोघांच्याही मनाला शांती मिळेल. संगणकावरून आईला काम करता आले तर जरूर थोडा वेळ करावे. कामाशी संपर्क ठेवून असावे. पण ऑफिसातील माझी सहकारी माझ्या पुढे जाते (अर्थात वरची जागा मिळाल्याने पगाराने) हे मनात न आणता आनंदाने घरी राहावे. कामावर रुजू झाल्यावर दुप्पट उत्साहाने काम करावे. पैसा तुमच्यासाठी धावेल. पण तेवढा धीर पाहिजे. मुलाची भावनिक भूक भागवल्याने मूल पण स्वस्थ राहील. पाळणाघरापेक्षा मूल घरीच वाढवल्यास उत्तम!
– रेखा केळकर, कामशेत

अप्रतिम कथा
३१ जुलैच्या अंकातील अभिजित भूमकर यांची कथा आजच्या एस.टी. प्रवासातील प्रवाशांच्या मनोवृत्तींचा अत्यंत वास्तव, आडवा-उभा छेद घेणारी आहे.
‘एस.टी.चा अचानक, करकचून ब्रेक दाबावा लागल्यानंतर घडणाऱ्या घटनांचे वर्णन प्रवासी व्यक्तींच्या आकार, चष्मा, रंग-रूप-कपडे-वय, इ.चाच उल्लेख करून रेखाटल्याने आगळीच गंमत येते. स्वत:च एस.टी.मध्ये बसलो आहे असे वाचकाला वाटावे एवढे चित्रवत्- जिवंत-पारदर्शी वर्णन भूमकरांनी मोजक्या आणि हालचालींची गती-वेग दर्शविणाऱ्या शब्दांमध्ये केलेय. इंग्रजी शब्दांचा योग्य वापर ‘फीलिंग’ वाचकांपर्यंत पोहोचवितो.
गुंड प्रवृत्तीच्या लाल शर्टाला आधुनिक युवतीची छेड काढण्याची हिंमत इतर प्रवाशांच्या युवतीच्या मित्राच्या भ्याडपणाचा अंदाज आल्याने कशी वाढते. अडीच गुंडांची त्यांच्या वीसपट सज्जनांवरची चढाई कशी यशस्वी होते, हे लेखकाने अत्यंत प्रभावीपणे अल्प शब्दांमध्ये मांडले आहे. कृतिशून्य प्रवासी-कंडक्टरच्या मनातील आंदोलने जाणत असतानाच एस.टी. थांबताच बडबडी, वृद्ध स्त्री व तरुण लेक आत येतात. पुढची धमाल अफलातूनच.
लाल शर्टने तरुणीला मांडीवर बसायची सूचना दिल्यावर भडकलेल्या निशीने खरडपट्टी काढल्यावर तिचा हात पकडण्याची खुमखुमी जिरविण्यास निशी कुकरच्या झाकणाने फायरिंग करीत राहते. मित्रासह गुंड एस.टी.तून धडपडत उतरतो. ‘‘आपन गुमान रायलो तर हेच सडकछाप गँगस्टर नायतर पुडारी होत्यात. आपनच त्येनला बळ देतो.’’ ती ग्रामीण दुर्गा पंजाबी ड्रेसला सुनावते.
आजच्या आधुनिक युवती, त्यांचे बॉय-फ्रेंडस्, अन्य कृतिशून्य प्रवासी बघे-कंडक्टर यांना खेडवळ तरुणीने शिकविलेला धडा पाठ करावा.

– अनुराधा गुरव, कोल्हापूर.

दादरची खाद्यभ्रमंती
‘लोकप्रभा’चा फूड टुरिझम (२८ ऑगस्ट) विशेषांक मनापासून आवडला. पोटोबासाठी जिवाची मुंबई आणि खाणाऱ्यांची मुंबई हे दोन्ही लेख खूप चांगले होते. महाराष्ट्राला खाद्यपदार्थाची एक समृद्ध परंपरा लाभली आहे, त्यामुळे आपल्या इथे भरपूर खाद्यप्रकार आणि खाद्यपरंपरा उपलब्ध आहेत. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहारातही आता भारतातील आणि विदेशातील लोकप्रिय, पण पौष्टिक खाद्यपदार्थ मिळू लागले आहेत. मुंबईतूनही पुरणपोळी, फरसाण आणि दिवाळी फराळाचे पदार्थ परदेशात मिळण्याची सोय झाली आहे. खाद्यपदार्थाच्या देवाणघेवाणबाबत जग जवळ येत आहे ही एक चांगली बाब आहे. मुंबईत खरेदी करण्यासाठी आजही दादर विभागाला विशेष प्राधान्य दिले जाते. दादर स्टेशनवरून पश्चिम दिशेला गेलं की तिथे सर्व प्रकारच्या खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दादरचं फूल मार्केट प्रसिद्ध आहे. खरेदीसाठी आलेला ग्राहक दादरमधील अनेक खाद्यपदार्थाची चव चाखूनच जातो. दादर फूल मार्केटच्या एम. सी. जावळे मार्गावर अगदी मोक्याच्या ठिकाणी कामत व्हेज फास्टफूड आहे त्यामुळे तेथील बहुतेक फूल विक्रेत्यांची सकाळच्या न्याहरीची चांगली सोय होते. येथील ब्रेड पकोडा, क्लब सॅन्डविच, कांजीवरम इडली, म्हैसूर मसाला डोसा, जैन पावभाजी विशेष प्रसिद्ध आहे. या फास्ट फूडच्या समोरच व्होरा ब्रदर्स यांचं फरसाणचं दुकान आहे. या दुकानात फक्त १० रुपयांपासून पुढे शेव, चिवडा, चकली, अनारसे अशा अनेक चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत, त्यामुळे ग्राहकांची तेथे नेहमीच वर्दळ असते. व्होरा बदर्सच्या फूटपाथवरून पुढे चालत गेल्यावर लक्ष्मी रेस्टॉरंट हे उडीपी हॉटेल लागतं. हे हॉटेल तसं जुनंच. आजही दाक्षिणात्य खाद्यपदार्थाची चव सांभाळून आहे. येथील मेदुवडा आणि चहा प्रसिद्ध आहे. या हॉटेलच्या बाजूलाच गोकुळदास गाठीयावाला हे प्रसिद्ध फरसाणचे दुकान आहे. येथे तुम्हाला चांगल्या दर्जाचे खाकरे, कचोरी, कठोड, गाठीयाचे प्रकार, केळा व मरि वेफर्स, शेव असे पदार्थ मिळतील. येथून इंग्लड, अेमरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड अशा परदेशी शहरांतही फरसाण पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. कबुतरखान्याजवळील मारुतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरासमोरील बाजूला सर्वात जुने असे विसावा हे उडीपी हॉटेल आहे. येथे ही इडली, उपमा, डोसा, मेदुवडा, चहा/कॉफी अशी अल्पोपाहाराची चांगली सोय आहे. येथेही कधी कधी प्रवेशासाठी रांग लावावी लागते. विसावाच्या थोडय़ा बाजूला सौराष्ट्र फरसाण मार्ट आहे. या दुकानातील फाफडा, कचोरी, अळुवडी, खमंग ढोकळा, समोसा, जिलेबी, बटाटा वेफर्स चवदार असतात. सकाळी येथे ठरावीक वेळेत उंधियो हा खास गुजराती खाद्यपदार्थही मिळतो. कबुतरखान्याजवळ डॉ. भवानी शंकर रोडवरील मांसाहारी जेवणासाठी हॉटेल सावंतवाडी प्रसिद्ध आहे. या हॉटेलमध्ये मालवणी सी-फूड डिशेसबरोबरच पंजाबी आणि चायनीज पदार्थाची चव चाखायला मिळते, तसेच या रोडवरील सुधा वडेवाला म्हणून दादरमधील सर्वात जुनी आणि प्रसिद्ध वडापावची गाडी लागते येथे मिळणाऱ्या बटाटावडा आणि लाल सुक्या चटणीची चव अप्रतिम आहे. येथे वडापाव खाण्यापेक्षा फक्त बटाटेवडे खायला येणाऱ्या खवय्यांची संख्या अधिक आहे. येथील समोरच्या फूटपाथवर राम मंदिरच्या बाजूला कानिफनाथ कोल्ड्रिंक हाउस आहे. येथे आपल्याला उसाचा चवदार ताजा रस मिळतो. रानडे रोडवर नक्षत्र मॉलच्या समोर श्रीकृष्ण डेरी फार्ममध्ये तुम्हाला थंडगार स्पेशल लस्सी मिळेल. उन्हाळ्यात या छोटय़ाशा दुकानात रांगेत उभे राहून प्रवेश मिळवावा लागतो, पण लस्सीचा ग्लास तोंडाला लावल्यावर ती अमृतासमान लागते. दादर पूर्वेला असणारा कैलास लस्सीवालादेखील लस्सीच्या विविध प्रकार आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे. रानडे रोडवरील देना बँकेच्या समोरच्या गल्लीत गोडबोले स्टोअर्स आहे. येथे चांगल्या दर्जाचे उपवासाचे आणि डाएट पदार्थ मिळतात. या दुकानातून १७६ देशांत कुरियरमार्फत खाद्यपदार्थ थेट घरपोच पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच शिवाजी पार्क पोलीस ठाण्यासमोरील हॉटेल सिंधुदुर्ग हे खवय्यांच्या पसंतीचे आहे. शिवसेना भवनच्या खाली असलेले कोकण बाजार हे कोकणातील उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. कोकणातील उत्तम दर्जाची कुळीथ पीठ, नाचणी पीठ, कोकम सरबत, शेंगदाण्याची चटणी, मसाले येथे मिळतात.
– सुहास बसणकर, दादर

मार्गदर्शक विचार
‘लोकप्रभा’ २२ ऑगस्ट अंकात ऋतुजा फडके यांनी ‘पेहराव कसा असावा, कोणत्या वेळी कसा असावा!’ याचे विवेचन अगदी थोडक्यात, पण पद्धतशीर मांडले आहे. पेहराव करताना प्रत्येक व्यक्तीने जागेचे, वेळेचे भान ठेवण्यास पाहिजे हे विधान पटले. लेखात म्हटल्याप्रमाणे ‘‘निसर्गाने दिलेले हे शरीर आहे ते कितपत झाकावे आणि कितपत झाकू नये, याचे तारतम्य ठेवणे आवश्यक आहे.’’ आधुनिक फॅशनच्या नावाखाली पाहण्यात येणाऱ्या पेहरावाविषयी त्यांनी हे मत मांडले असावे. अर्थातच, हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. ज्या पुरुषांचा स्वत:वर ताबा नाही, त्यांना कपडय़ाची गरज काय आहे? असा प्रश्न त्यांनी पुरुषवर्गाला उद्देशून केला आहे. एकंदरीत, पेहरावाविषयी लेखिकेचे विचार मार्गदर्शक आणि उद्बोधक आहेत. – जयवंत कोरगावकर, परळ, मुंबई.

‘फूड टुरिझम’च्या विशेषांकातील कोल्हापूरमधील खाद्यभ्रमंतीविषयक ‘रांगडय़ा चवीचं कोल्हापूर’ हा लेख खूप आवडला. कोल्हापूरमधील खाद्यभ्रमंतीसाठी खास असलेल्या ठिकाणांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तिथल्या ऐतिहासिक ठिकाणांची माहिती खूप उपयुक्त आहे. मांसाहारी हॉटेल, मिसळ आणि राजाभाऊ भेळ ही ठिकाणं सांगितल्याबद्दल विशेष आभार. माझा मित्र मला कोल्हापूरला फिरण्याबाबत नेहमी विचारायचा. ‘लोकप्रभा’च्या या लेखाने यासाठी आमची मदत केली.
– नीलेश गडेकर, ई-मेलवरून
‘लोकप्रभा’च्या २८ ऑगस्टच्या ‘फूड टुरिझम’ या विशेषांकातील ‘रांगडय़ा चवीचं कोल्हापूर’ हा लेख खूपच आवडला. कोल्हापूरमध्ये कुठे, कोणता पदार्थ चांगला मिळतो याची तपशीलवार माहिती दिल्याबद्दल आभार! हा लेख वाचून उर भरून आला.
– सचिन पाटील, ई-मेलवरून

बिहारच्या सद्य:स्थितीवर नेमकं बोट
बिहारमधील राजकारणाच्या बिकट परिस्थितीवर आपण ‘बिहारी जुगाड’ या मथितार्थमधून बोट ठेवले आहे. आता येनकेनप्रकारेण बिहार आपल्या हातून जाऊ द्यायचा नाही, असा चंग बिहारमधील सर्वच पक्षांनी बांधलेला दिसतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्येच नव्हे तर भारतभर अनेक रथीमहारथी घायाळ झालेले एकमेकाच्या आधाराशिवाय ते उभेच राहू शकत नाहीत, म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार. पण एकाच काडीवर सर्व लटकू लागले तर सारेच बुडतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण अगदी बरोबर विवेचन केले आहे, काँग्रेस, राजद यांना बिहारमध्ये कुणी विचारत नाही, अशा लोकांची सोबत नितीशकुमार यांना घ्यावी लागते. कारण एवढी वर्षे त्यांना भाजप सोबती म्हणून चालला आणि अचानक नितीशकुमारांना निधर्मीवाद सोईस्कररीत्या आठवला. सरतेशेवटी बिहारची जनता योग्य तो न्याय करतीलच. – प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे, वर्सोवा, मुंबई

चार सप्टेंबरच्या अंकातील श्रावणरंग अप्रतिम! सर्वच लेख सुंदर आनंददायी आहेत. आमच्या पिढीला बालपणात घेऊन जाणारे आहेत. आम्ही आमच्या अंगणात आणि शाळेत येताजाता श्रावण अनुभवला. आता मुलांना ते रंग शोधायला वर्षांसहलीला जावे लागते. हा फरक लेखांतूनही जाणवला.
– शर्मिला पिटकर, कांदिवली, मुंबई

दि. २८ ऑगस्ट २०१५ च्या अंकात महाराष्ट्राची खाद्यमुशाफिरी या सदराखाली मुंबईपासून नागपूपर्यंतच्या सुप्रसिद्ध पदार्थाची माहिती व त्या त्या ठिकाणी मिळणाऱ्या पदार्थाची विशेषता प्रसिद्ध केली आहे. कामानिमित्त किंवा कोणत्याही कामाने त्या शहरात जाणाऱ्यांसाठी पोटोबा करण्यासाठी आता हा अंक नेहमी जवळ ठेवून प्रत्येक चवीचा आनंद मिळेल.
– बबन लोणकर, बुलढाण
४ सप्टेंबरच्या अंकातील लेख अतिशय सुंदर असून एकूण मराठी भाषेचे प्रभुत्व लेखकांकडून दिसून येते. दिवसेंदिवस या अंकाची गुणवत्ता वाढत आहे. हा उपक्रम असाच चालू ठेवणे. लेख वाचताना आनंद वाटतो. आपल्या ‘टीम’ला शुभेच्छा. हा अंक संग्रा आहे.
– विजय महाशब्दे, वाशी