‘मालिकांची चाळीस वर्षे’ हा सुहास जोशी यांचा अभ्यासपूर्ण लेख वाचला. दूरदर्शनवर १९८२ साली ‘आकाशाशी जडले नाते’ ही अवकाश संशोधनावर आधारित मालिका झाली होती. डॉ. जयंत नारळीकर, सोहोनी व चित्रे यांनी सादर केलेल्या या मालिकेचा उल्लेख केला असता तर आवडले असते. या मालिकेत शुक्र ग्रहावर वातावरण आहे, तेथे वादळेही होतात इ. माहिती सांगितली होती. पण पुढे डॉ. बाळ फोंडके यांनी आकाशवाणीवर झालेल्या ‘गोफ’ या कार्यक्रमात यशवंत देवांच्या प्रश्नाला उत्तर देताना शुक्र ग्रहावर वातावरण आणि वारा दोन्ही नाही असे सांगितले होते. म्हणजे शुक्र ग्रहावरचे वातावरण अचानक गायब झाले की काय? उद्या पृथ्वीवरचे वातावरण असेच गायब झाले तर! या विचाराने पोटात धस्स झाले तेव्हा.

या लेखात ‘तारा’ वाहिनीचा उल्लेख आला आहे. या वाहिनीवर दादरच्या केटरिंग कॉलेजच्या कुकरी शोची माहिती आली होती. २७ मे २००२ ते ६ जुलै २००२ या काळात रोज हॉटेलमध्ये तयार होणारे पदार्थ दाखविले गेले. मी त्यातील सारांश लिहून ठेवला आहे.

दूरदर्शनवर आठवडय़ातून एकदाच होणारी महाचर्चा आणि इतर वाहिन्यांवरील ‘रोखठोक’सारखे रोज होणारे कार्यक्रमदेखील मालिकाच म्हणायला हरकत नाही. पण त्यात सहभागी झालेल्या तज्ज्ञांची कधी कधी कीव येते.
– अ. गो. कानेटकर, बोरिवली, मुंबई.

‘लोकप्रभा’ने वाचनाचे वेड वाढवले

दि. ९ ऑक्टोबरच्या ‘लोकप्रभा’ मध्ये ‘गांधी त्याला भेटला’ हा लेख वाचला. वाचनाचे महत्त्व काय असते, हे ‘लोकप्रभा’ वाचल्यानंतरच कळाले. ‘कलाजाणीव’मध्ये, शिल्पकृतीत महिला सक्षमीकरण पाहायला मिळाले. तसेच कुंभारकाम मातीची भांडी, मातीतील काव्य पाहायला मिळाले. विनायक परब यांचा ‘नासाच्या एक पाऊल पुढे’ ‘मथितार्थ’ वाचायला मिळाला. वाचक प्रतिसादमधील, प्रतिक्रिया ‘लोकप्रभा’ची श्रीमंती दाखवून देतात. मुखपृष्ठ अत्यंत देखणं होतं.

विवेक आचार्य यांची ‘आत्मसन्मानाचा लढा’ ही कव्हरस्टोरी वाचली. शेतकरी जगवण्यासाठी बिहार पॅटर्न वाचायला मिळाला. ज्ञानभंडाराचे भवितव्य, दानयज्ञाचा श्रीगणेशा, वंचितांचे निकेतन, वाग्देवतेचे मंदिर, निराधारांच्या जीवनात आनंदाचे मळे स्वरगंगेचा अखंड पुकार, आयुर्वेदाचा दिलासा, भगीरथांची गावे उभारणाऱ्यांची कहाणी ही सर्व सदरे वाचनीय होती. ‘लोकप्रभा’ महाराष्ट्रातील वाचकांचा श्वास झालेला आहे. प्रत्येक अंक हातात कधी पडतो अन् वाचायला सर्वप्रथम मिळतो कधी याची आतुरता मनाला लागून राहते. प्रत्येकालाच प्रथम वाचावे असे वाटते. ‘लोकप्रभा’ नियमित वाचल्याने वाचकाचे विचार निश्चितच वाढतात. वाचनाने मनाला फार मोठी प्रसन्नता व प्रगल्भता लाभते.
वाचनाचा अगाध महिमा, म्हणजेच ‘लोकप्रभा.’
– राम शेळके, डॉ. नारायणराव भालेराव हायस्कूल, नांदेड.

परदेशी जायची गरजच काय?

दि. ९ ऑक्टोबरच्या अंकातील आत्मसन्मानाचा लढा हा विवेक आचार्य यांचा लेख अतिशय माहितीपूर्ण व विचारप्रवर्तक आहे. मी आफ्रिकेत व अमेरिकेत सात-आठ वर्षे राहिलो. गोऱ्या लोकांनी अक्कलहुशारीने व कष्टाने निर्माण केलेल्या समृद्धीत वाटा मिळविणे, तेथे राहणे याचे आकर्षण भारतीयांना तसेच इतर विकसनशील देशातील लोकांना आहे. परंतु अशा देशात आपण स्थायिक होऊन आपणास तेथील गोऱ्या लोकांनी समान, चांगली वागणूक दिली पाहिजे अशी अपेक्षा करणे हा भारतीयांचा भोळसटपणा व अव्यवहारीपणा असेच म्हटले पाहिजे. भारतात आजही १२५ कोटी लोकांना पुरून उरेल इतकी नैसर्गिक संपत्ती उपलब्ध आहे. ती योग्य प्रकारे प्रामाणिकपणे, कष्टाने विकसित केल्यास भारतीयांना कोठल्याही परदेशात प्रवेश मिळण्यासाठी तोंड वेंगाडायची गरज नाही. आपल्या परंपरा, संस्कृती भाषा, धर्म हे सारे काही उत्कृष्ट आहे. जगातील कोणत्याही देशाइतके उच्च राहणीमान, सुराज्य आपणही निर्माण करू शकू.
– विश्वास देशमुख, ई-मेलवरून.

माणसाचे मन इतके अजब कसे?

दि. २३ ऑक्टोबरच्या अंकात ‘एक होता आनंद मार्ग’ हा लेख वाचला. ही माहिती फारच उद्बोधक व वाचनीय आहे. मी माझ्या मुलाकडे १९९० मध्ये सिडनीला गेलो होतो त्या वेळी तेथील वर्तमानपत्रात ह्य आनंदमार्गीनी हिल्टन हॉटेलजवळ केलेल्या बॉम्बस्फोटाची माहिती वर्तमानपत्रांत येत होती. त्या माहितीच्या आधारे मी एका वर्तमानपत्रात १७ फेब्रुवा्ररी १९९१ मध्ये लेख लिहिला होता. त्याचा मथळा होता ‘हिल्टन हॉटेलातील बॉम्बस्फोट’

१२ फेब्रुवा्ररी १९७८ रोजी आनंदामार्गी इव्हान पेडरिकनी हॉटेलजवळील कचरापेटीत बॉम्ब ठेवला. दुसऱ्या दिवशी त्या वेळचे आपले पंतप्रधान मुरारजी देसाई हॉटेलमधून बाहेर पडतील त्या वेळी बॉम्बस्फोट घडवून त्यांना ठार मारण्याचा कट होता. त्याप्रमाणे इव्हान पेडरिकनी रिमोट कंट्रोलनी बॉम्बचा स्फोट घडविण्याचा प्रयत्न केला, पण कचऱ्याची पेटी पत्र्याची असल्यामुळे बॉम्बस्फोट झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कचरापेटी रिकामी करताना बॉम्बचा स्फोट झाला. त्या वेळी तीन लोक मारले गेले. ह्य कटाचा सूत्रधार अंडर्सन ह्यला चौदा वर्षांची शिक्षा झाली. व पेडरिक ह्यला जन्मठेपेची शिक्षा झाली. माझ्या आठवणीप्रमाणे अमेरिकेत अशाच एका पंथाची माहिती वाचली होती. त्यात सर्वसाधारण ७० ते ८० लोकांनी विष घेऊन सामूहिक आत्महत्या केल्या होत्या. त्यांना सर्वाना स्वर्गात जायचे होते. माणूस इतका अगतिक का होतो. माणसाचे मन ही एक अजब गोष्ट आहे. अंधश्रद्धा ह्यतूनच निर्माण होतात. सत्य साईबाबांच्या निधनानंतर पंतप्रधान व त्या पक्षाच्या अध्यक्षा अंत्यदर्शनाला जातात हे अजब आहे.
– मु. रा. गोसावी. 

‘सुखांत’ ची सेवा महाराष्ट्रभर पसरावी

दि.  ९ ऑक्टोबर २०१५ च्या सा. ‘लोकप्रभा’ अंकातील ‘उपक्रम’ अंतर्गत ‘शेवटचा दिस गोड व्हावा..’ वाचले. ‘सुखांत’च्या सेवकांच्या सेवेचे जितके कौतुक व अभिनंदन करावे तितके कमीच आहे.

बदलत्या काळात ‘सुखांत’सारख्या समाज सेवाव्रतींची या समाजाला नितांत गरज आहे. मृत्यूनंतर त्या मृत शरीराचे होणारे हाल व दशा पाहवत नाही. ज्यांचे नातलग लांब आहेत त्यांचे तर हाल खूप होतात. परंतु ज्यांचे नातलग, पै-पाहुणे जवळ आहेत अशा व्यक्तींचेही मृत्यूनंतर त्या मृत शरीराचे होणारे हाल अत्यंत दयनीय असतात. शेवटचा दिस गोड व्हावा.. असे प्रत्येकाला मृत्युपूर्वी वाटत असते मात्र बदलती सामाजिक व कौटुंबिक परिस्थिती बघता ‘सुखांत सेवा’ ही काळाची गरज आहे.

मात्र ही सेवा मुंबई- ठाणे पुरती मर्यादित न राहता ती राज्यातील जिल्हा स्तरावर पोहचल्यास बरे होईल. नंतर ती तालुका व ग्राम पातळीवरही जावी अशी अपेक्षा आहे. याच अंकातील शेतकरी जगण्यासाठी ‘बिहार पॅटर्न’ हा काळाची गरज असलेला उपक्रमही भावला.
– धोंडीरामसिंह राजपूत, औरंगाबाद.

‘लोकप्रभा’ची प्रभावी प्रभा!

‘लोकप्रभा’ नवरात्री विशेषांक नावीन्यपूर्ण वाटला. विविध विषयांवरील माहितीपूर्ण साहित्यामुळे मनोरंजन आणि आनंदप्राप्ती झाली. सर्वच लेख-कथा वाचनीय आहेत. लेखिका वर्षां भावे यांची ‘मंगळ’ ही कथा वाचून वाटले सर्वच पिढीतील वाचकांना या कथेमुळे ‘अमंगळ’ विचार मनातून निघून जाण्यास मदत होईल. डॉ. सुपे आणि वैद्य खडीवाले यांचे आरोग्य-लेख अनेकांना मदत करतील.

‘नवरात्र विशेष’मधील श्रीमहालक्ष्मी, श्रीअंबादेवी यांची महती आणि माहिती ज्ञानवर्धक वाटली. ‘लोकप्रभा’ची प्रभा दिवसेंदिवस अधिक तेजस्वी व वलयांकित व्हावी अशी मनापासून प्रार्थना!

श्री. गुरुप्रसाद शिरसाट यांचा ‘सामान्यांचे असामान्य सुख’ हा लेख सामान्यजनांस सुखावणारा वाटतो. मात्र प्रत्यक्षात सामान्य माणूस मोठी स्वप्ने पाहण्यातच धन्यता मानतो. तो पुढे जातो मग मी मागे का राहावे अशी ईर्षांयुक्त भावना निर्माण होण्यामुळे ‘भ्रष्टाचार’ बोकाळतो आहे.
– देवेंद्र ढोले, नागपूर.

रावणपूजेची अनोखी माहिती

रावणपूजेच्या प्रथेवरील संतोष विणके यांचा लेख वाचला. खूप माहितीपूर्ण लेख लिहिला आहे, आमच्या जिल्ह्य़ात असे मंदिर आहे याची माहितीच नव्हती. कोरकू लोक दसरा कसा साजरा करतात याची माहिती मिळाली.
– अमोल सावंत, अकोला, ई-मेलवरून.

ऑनलाइन शॉपिंगचे भवितव्य काय?

इंटरनेट महाजालात उत्पन्न मिळविण्याचा खात्रीशीर मार्ग नसल्यास कुठल्याही ऑनलाइन कंपनीला आपले अस्तित्व टिकविणे शक्य होणार नाही (ऑनलाइनच्या आक्रमकतेत, भविष्याची बीजं, – सुहास जोशी, ३० ऑक्टोबर). म्हणूनच गेल्या शतकाच्या अखेरीस कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवलेल्या डॉट कॉम कंपन्या नामशेष झाल्या. सध्या ऑनलाइन खरेदीकरिता ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेल्या कंपन्यांनी खासगी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधण्यात यश मिळवले असले तरी आगामी काळात ते एकमेकांतील प्रचंड स्पर्धेला कसे तोंड देतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल.
-केतन र. मेहेर, विरार (पूर्व).

दि. २ ऑक्टोबरच्या अंकातील गाढवांचा फॅशन शो हा संतोष विणके यांचा लेख फारच आवडला. लेखात बरेच फोटो वापरले असल्यामुळे विषयाचा खरेपणा जाणवला. लेखात बरीच माहिती असल्यामुळे, प्रत्यक्ष त्या ठिकाणीच उपस्थित असल्यासारखे वाटले.
– डॉ. विलास माळवे, पुणे.

‘गांधी त्याला भेटला’ हा लेख खूपच छान होता. गांधीजींच्या मार्गाने चालणे खरोखरच अवघड आहे. पदोपदी माणसाला अन्याय सहन करावा लागतो. याव्यतिरिक्त बोलावे लागते.
– राजू शिंदे, ई-मेलवरून.