13 August 2020

News Flash

शांताबाई आणि लुईसाबाई

मराठी बोटांमध्ये घट्ट चिमूट पकडावी तसं पकडून आणलं. किती विलक्षण गहिरा अनुवाद शांताबाईंनी केला आहे!

शांताबाई ‘थोडेसे खाजगी’ असा करतात. ‘Jo was very near Crying' या वाक्याचा अनुवाद शांताबाईंनी ‘एकदा ती रडण्याच्या बेतात आली होती’ असा केला आहे.

चार बहिणी- मेग, जो, बेथ आणि अॅमी. आणि घरासमोर राहणारा त्यांचा दोस्त लॉरी. त्यांचा तो निर्मळ स्नेह, कधी नात्यात उद्भवणारे ताण, आयुष्याने दिलेले धडे, बेथचा चटका लावणारा आणि वाचकाला अत्यंत समृद्ध करणारा अकाली मृत्यू, जोची लेखननिष्ठा.. आणि या सगळ्या चित्रावर प्रेमळ लक्ष ठेवणारी त्यांची ‘मार्मी’- मिसेस मार्च! जिथे आज घराघरात भांडणं होताहेत, भाऊबंदकी होते आहे, दोन पिढय़ांचा जिथे घरात संवादच संपताना दिसतो आहे, त्या काळात ‘चौघीजणी’ (किंवा मूळचं ‘लिटील विमेन’) हे ‘घरगुती’ असा शिक्का बसलेलं पुस्तक अधिकच मोलाचं आहे. समाजमानसानं शिकून घ्यावं असंही पुष्कळ या ‘घरगुती’ कथनामध्ये आहे. मुळात लुईसा मे अॅल्कॉट हिने पहिलं ‘लिटील विमेन’ लिहिलं आणि प्रकाशकांच्या मागणीमुळे, वाचकांच्या जबरदस्त रेटय़ामुळे त्याचा पुढचा भाग ‘गुड वाइव्हज्’ या नावानं लिहिला. शांता शेळके यांनी दोन्ही भाग एकत्र करीत त्याचा अनुवाद ‘चौघीजणी’ या नावाने मराठीमध्ये आणला. पण त्यांनी फक्त अनुवाद आणला असं झालं नाही. त्यांनी काँकर्डचं ते सारं उदार वैचारिक वातावरण- ज्याचा थोरो, इमर्सन, लुईसाचे वडील ब्रॉन्सन आणि नॅथॅनिएल हॉथोर्न हिस्सा होते- ते मराठी बोटांमध्ये घट्ट चिमूट पकडावी तसं पकडून आणलं. किती विलक्षण गहिरा अनुवाद शांताबाईंनी केला आहे! तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे खरा; पण जाता जाता उदाहरणे देतो. विसाव्या प्रकरणाचं शीर्षक ‘कॉन्फिडेन्शल’ असं आहे. त्याचा अनुवाद ‘गोपनीय’ असा न करता शांताबाई ‘थोडेसे खाजगी’ असा करतात. ‘Jo was very near Crying’ या वाक्याचा अनुवाद शांताबाईंनी ‘एकदा ती रडण्याच्या बेतात आली होती’ असा केला आहे. त्यामधला तो ‘बेतात’ हा शब्द खास मराठी वळण त्या वाक्याला देतो. जो रडण्याच्या ‘जवळ/ नजीक’ येत नाही, ‘बेतात’ येते! आणि कादंबरीमधली गाणी आणि कविता..? तो तर शांताबाईंचा हातखंडाच. एकेकदा शांताबाई मूळ गाण्याच्या कैक योजने वर पोचल्या आहेत अनुवाद करता करता.
kHe that is humble ever shall
have God to be his Guidel या ओळीमध्ये देव हा ‘गाइड’ आहे.. मार्गदर्शक आहे. पण शांताबाई लिहितात-
‘लीनपणे जो जगे तयाला पतनाचे भय कधीच नाही
कुणी न ज्याचे देव तयाचा सदैव सहचर होऊन राही!’
आणि मग देव प्रवासातला सखा होतो, सहचर होतो!
सारखं वाटतं- शांताबाई आणि लुईसाचा पिंड एकसारखा असला पाहिजे. लुईसाचे वडील ब्रॉन्सन हे काँकर्डच्या त्या वैचारिक वातावरणात शिक्षणाचे अभिनव प्रयोग राबवीत होते. (प्रोफेसर भायर ‘व्ही’ हे अक्षर शिकवताना पाठीवर झोपून पाय वर ‘व्ही’च्या आकारात करतात, हे कादंबरीत आहेच.) पण ब्रॉन्सनच्या वैचारिक प्रयोगांची जबरदस्त किंमत त्याच्या कुटुंबीयांना भुकेच्या रूपाने, गरिबीच्या रूपाने द्यावी लागत होती. तरुण होता होता लुईसाने पहिला निश्चय केला तो आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण व्हायचा. घराला एखादा मुलगा सांभाळेल तसं सांभाळायचा. शांताबाईंनी अनुवादाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे- ‘तिने विवाह केला नाही. वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी ती निधन पावली. ‘लिटील विमेन’ हे पुस्तक हेच तिचे खरे वाङ्मयीन स्मारक होय.’ मग वाटतं- शांताबाईंनी त्यांच्या ‘धूळपाटी’ या आत्मकथनामध्ये स्वत:विषयी केलेले अनेक उल्लेख हे लुईसाच्या चित्राला जवळचे आहेत. दोघींचा स्वत:च्या पायावर ठामपणे उभं राहण्याचा निश्चय असो, किंवा त्यांच्या वाढत्या वयात त्यांच्यावर झालेले थोडय़ा निराळ्या वळणाचे संस्कार असोत; लुईसा आणि शांताबाई यांची सर्वसाधारण चाहत्यांमध्ये जी प्रतिमा होती त्यापेक्षा त्यांचं जगणं नक्कीच असांकेतिक होतं. जोचं लग्न हे प्रकाशकांच्या आग्रहाखातरच लुईसानं ‘गुड वाइव्हज्’मध्ये लावलं होतं. आणि शांताबाईंनीही प्रांजळपणे आपण अनुवाद, सदरलेखन हे आर्थिक निकडीपायी केल्याचं लिहून ठेवलं आहे. पण कुठल्याच व्यावहारिक तडजोडीचा वासही येऊ नये इतकं दोघींचं काम- मूळ पुस्तक आणि अनुवाद – हे सशक्त, स्वयंभू आहे!
‘चौघीजणी’ ही युटोपिया असलेली कुटुंबकथा आहे, असं समीक्षकांनी म्हटलं खरं; पण नीना ऑरबॅच्सारख्या संशोधकांनी त्या विधानाची मर्यादाही दाखविली आहे. आपण हे लक्षात घ्यायला हवं की, ‘चौघीजणी’मध्ये फादर मार्च हे पाहुण्यासारखे येतात-जातात. घरी चार मुली, एक आई आणि हॅना असं सहा स्त्रियांचं राज्य आहे. थोरोला आत्मशोध घ्यायला घर सोडून वॉल्डेन तलावाकाठी दोन वर्षे राहावं लागलं. (आणि त्याची फलश्रुतीही त्याच्या मतेच साशंक स्वरूपाची आहे.) ‘चौघीजणी’मधल्या स्त्रिया या स्वत:च्या जिवावर स्वत:चं एक स्वयंपूर्ण ‘कम्यून’ चालवतात (जे गौरी देशपांडे यांना फार हवं होतं.), स्वत:चे निर्णय स्वत: घेतात आणि आपल्या कोषात न राहता जगालाही जोडत जातात. बंडखोरी करतानाही ‘घर’ हे मूल्य त्यांना अव्हेरावंसं वाटत नाही.) जो ही तासन् तास वाचत, लिहीत बसते. अॅमी गरम कोळशाने घरभर पसारा घालत चित्रे काढते. आजारी बेथ ही मांजरींसाठी ‘घरटी’ बनवण्याचं सुतारकाम- जे ‘पुरुषी’ काम आहे- ते करते आणि मेगला खरं तर अभिनेत्री व्हायचं होतं, असा उल्लेख लुईसाच्या पुढच्या ‘जोज् बॉइज्’ या पुस्तकात येतो!
एखादं घर ‘मॉडर्न आर्ट’वाल्या कलंदर मंडळींनी भरलेलं असावं तसं मार्च कुटुंबीयांचं घर आहे. अगदी लग्न करतानाही नवऱ्याचा आवाज साक्ष घेताना थरथरतो. फादर मार्च गहिवरतात. पण शांताबाईंच्या भाषेत- ‘एकटी मेग मात्र ताठ उभी होती. तिने निर्भयपणे ब्रुकच्या डोळ्याला डोळे भिडवले आणि प्रत्येक शपथ स्वच्छ, ठाम, ठाशीव शब्दांत उच्चारली.’ यातला ‘निर्भय’ हा शब्द मूलभूत आहे या पुस्तकासंदर्भात. ते केवळ ‘बायकांचं घरगुती कथन’ नाही. निर्भय स्त्रियांचं स्वत:च्या निवडीने जगणंही त्या संहितेत आहे. म्हणूनच जो ही अविवाहित राहण्याची धास्ती असतानाही लॉरीला नाकारते आणि मेग श्रीमंत मुलगा न पटकवता मध्यमवर्गीय ब्रुकची निवड करते. जोचं लग्न प्रकाशकांच्या रेटय़ामुळेच झालं. पण प्रोफेसर भायरसारखी असांकेतिक व्यक्ती जोडीदार म्हणून लेखिकेने निवडली, हेही पुष्कळसं स्त्रीवादी मांडणीला जवळ जाणारं आहे. लुईसाची पात्रे सज्जन, निरागस आहेत म्हणून त्याला ‘युटोपिया’ म्हणणं हे धाडसाचं ठरेल. साहित्यात डिस्टोपियाइतकाच युटोपियाही महत्त्वाचा असतो. स्वप्नरंजन आणि दु:स्वप्नरंजन या दोन्ही मानवी मनाच्या प्रेरणा आहेत. त्या साहित्यात उताराव्यात यात आश्चर्य नाही. मराठीतही कधी कधी ‘वास्तववादी’ (नैराश्यग्रस्त!) अस्तित्ववादी अशा विशेषणांनी एखादी साहित्यकृती गौरविली जाते. आणि मला वाटतं, मेघना पेठे यांनी पुण्याला भरलेल्या साहित्य संमेलनात ‘कुटुंबकथा’ या प्रकारची आवश्यकता सणसणीत तऱ्हेनं मांडली होती, त्यामागे हेही एक अदृश्य कारण असावं. जोवर घर आहे तोवर कुटुंबकथा असणार, इतकं सरळ आहे हे! लेखक घरचं लिहितोय का दारचं, हे जितकं महत्त्वाचं आहे, त्याहून कितीतरी पटीनं मुळात तो ते कसं लिहितो आहे, हे बघणं महत्त्वाचं आहे!
आणि माझ्या माहितीतले कितीतरी उत्तम पुरुष वाचकही ‘चौघीजणी’चे, उदाहरणार्थ, ‘फॅन’ आहेत! अनेकांना लॉरीने पुरुषाने स्त्रियांशी सौहार्दपूर्ण, मैत्रीपूर्ण तऱ्हेनं कसं वागावं याची नकळत दिशाही दिली आहे. अनेक पुरुष वाचकांना फादर मार्चसारखं सतत घराबाहेर ‘युद्धा’ला सामोरं जायचा अनुभव आहे आणि मग घरातलं काय निसटलं आहे आपल्या हातून, हेही त्यांना वाचता वाचता ध्यानात आलं आहे. आणि गमतीत- मुलीला किती छान तऱ्हेनं ‘प्रपोज’ करावं, हे मला, माझ्या समवयस्क मित्रांना लॉरीने समजावून सांगितलं आहे.
आणि तरीही वेगळ्या नजरेतून ‘चौघीजणी’ हे बायांचं हक्काचं पुस्तक आहे. सध्याची इंग्रजीमधील आघाडीची कवयित्री नमिथा वर्मा हिने आपल्या एका कवितेत कपाटाचे खण उघडल्यावर होणारी भावनिक आंदोलने आपल्या कवितेत मांडली आहेत..
kWhen we open our old drawers
And find those sheets…
wanting to throw them
and cherishing their memoryl
आणि ही ‘जो’ बघा चार बहिणींचे लाकडी खण- पेटय़ा उघडून बसली आहे..
‘ओळीने ठेवल्या इथे चार पेटय़ा
चौघी बहिणींच्या आवडीच्या मोठय़ा
जीवन-मृत्यूत सुखात- दु:खात
नित्य त्यांनी केली परस्परा साथ..’
नाती तुटतात अशा वेगाने गरगरवून टाकणाऱ्या या काळात एकमेकांना साथ देणाऱ्या या बहिणी मला अधिकच आवडू लागल्या आहेत. आणि दीडशे वर्षांच्या कालपटलावरचं लुईसा ते शांताबाई ते नमिथा यांचं एकाच वेळी कणखर, बंडखोर आणि ‘घरगुती’ असलेलं शब्द-संवेदन मला मायेनं जोजवतं आहे!
डॉ. आशुतोष जावडेकर  ashudentist@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2016 1:01 am

Web Title: article of auther shanta shelke and louisa m alcott
Next Stories
1 चल्- चलूया की!
2 इस्तंबुलचा सुगंध
3 विंचुर्णीचे विनोद
Just Now!
X