विशीत ती कथा जेव्हा पहिल्यांदा वाचली तेव्हा त्यातल्या प्रेमाचे फिके-गडद रंग बघून नुसतं बेहोश व्हायला झालं होतं आणि अरुणा ढेरे यांची ती कवितेजवळ जात राहणारी सौष्ठवयुक्त भाषा! त्या वाक्यांनी साहित्यात रस असणाऱ्या आम्हा काही मित्र-मैत्रिणींना पागल केलं होतं. ‘तुरे लवले. पानं घळली. जे झालं ते खूप सहज, खूप उत्कट आणि खूप हवंसंपणानं.’ अशा ओळी वृद्धांनाही आवडतील, तिथे आम्हा विशीतल्या मंडळींचं काय सांगावं? मग काळ भराभर सरकत गेला आणि तरी अधेमधे ती कथा- ‘उंच वाढलेल्या गवताखाली’ हे तिचं शीर्षक होतं- ती वय वाढत गेलं तरी आवडत गेली आणि हळूहळू जाणवू लागलं, की हिरव्यागच्च प्रेमाव्यतिरिक्तही पुष्कळच काही आहे या कथेत. उदाहरणार्थ, राजकारण! पण ते आवाजी नाही आणि म्हणून पटकन् आकळतही नाही. खेरीज ते राजकारण अनेक स्तरांवरचं आहे. अर्चनाच्या- कथानायिकेच्या आसपास कथेमध्ये जे तीन पुरुष येतात, ते सारे निरनिराळ्या तऱ्हेचं राजकीय विधान घेऊन येतात. डेव्हिड हा तिचा चायनीज मित्र. गोलमटोल. सुस्वभावी. त्याच्याविषयी ऐंद्रिय असं तिला काही वाटत नाही. पण त्या दोघांची चांगली मैत्री आहे. डेव्हिडच्या रूपानं लेखिकेनं स्थलांतराचं राजकीय सूत्र आणलं आहे कथेत. खुद्द अर्चनाही स्थलांतरितच. भारतातून अमेरिकेत शिकायला आलेली गुणी, देखणी मुलगी. ती सुस्थिर घरातली आहे आणि अमेरिकेत चुकतमाकत ती स्थिरावली आहे. सुरुवातीला ती प्रोफेसर शर्मा आणि त्यांच्या वस्ताद बायकोच्या प्रेमाच्या सापळ्यात सापडतेही; पण जेव्हा ते आपला त्यांच्या सोयीसाठी वापर करून घेताहेत हे तिला जाणवतं तेव्हा ती त्यांना दूर सारते. विशीत नजरेआड झालेलं प्रेमाविषयीचंच हे विधान मी पुन्हा नीट वाचतो आहे. ‘अर्चना प्रथम आकसली. मग बावरली. मग प्राणपणाने तिने तो प्रेम नावाचा खेकडा झिंजाडूनच टाकला अंगावरून.’

पण डेव्हिडचं स्थलांतर अर्चनाइतकं सोपं नाही. चीनमधले त्याचे गरीब, असहाय पालक त्याच्या डोळ्यांसमोर असून, त्याला गाइड करीत असलेला छळ निमूट सोसावा लागतो. त्याला अर्चनासारखं काही झिंजाडून टाकायचा पर्याय नाहीच मुळी! १९९६ सालची ही कथा मला तेव्हाच्या चीनची आठवण करून देते आहे. आज चीन जगावर ज्या सहजतेने दादागिरी करतो, तसं चित्र तेव्हा नव्हतं. तो डेव्हिड आणि त्याचा निर्धार हा मला चीनच्या मोठय़ा राजकीय स्वप्नाचं अति-लघुरूप वाटतं आहे. ते लघुरूप आहे खरं; पण ते नेमकं आहे! दुसरा पुरुष आहे डॉ. राजीव. डाव्या बांधीलकीने खेडय़ात प्रॅक्टिस करायला निघून गेलेला. अर्चनाची आणि राजीवची प्रीती उंच वाढलेल्या गवताखाली लपून राहिली आहे, असं कथा शेवटी सांगते. पण त्याहून मोलाचा आहे या दोन पात्रांमुळे नजरेसमोर येणारा वैचारिक संघर्ष. अर्चना आणि राजीवचं एकदा भांडण होतं तेव्हाचे संवाद हे  ‘personal is political’ या भूमिकेला धरून होतात. ‘‘प्रश्न राजीवचे नव्हते; पण पर्यायानं माणूस म्हणून त्याचेही होतेच, हे त्याला समजलं होतं. तो जाळावर शेकत नव्हता, पण त्याला धग लागली होती,’’ असं लेखिका लिहिते तेव्हा चळवळीमागचं केंद्र ती उलगडते. पण लगोलग अर्चना आसपासच्या शहरी मुलांच्या ‘लोनलीनेस्’वर बोलते आणि मग राजीव तिला मूर्खात काढतो तेव्हाही, ‘‘त्या अप्रगल्भ वळणावरही तिला आतवर कुठेतरी जाणवलं होतं की, प्रश्नांकडे नेहमीच सामाजिक संदर्भात बघता येत नाही. उलट, जगताना त्या- त्या माणसाच्या आणि परिस्थितीच्या अंगानंच प्रश्नाचा आवाका उलगडत असतो.’’ राजीव आणि अर्चनाची प्रीती ज्या उंच वाढलेल्या गवताखाली लपली आहे तिथेच ती फार फार तर सुरक्षित राहू शकेल. जर का ते गवत वाळलं, तर ठिणगी पडायला काहीच वेळ लागणार नाही, इतके त्या दोन पात्रांचे राजकीय ध्रुव विरुद्ध अक्षांवरचे आहेत!

या दोन पुरुषांच्या मिषानं आलेली राजकीय विधानं ही कालसुसंगत झाली; पण अब्दुल अदीन या कृष्णवर्णीय पात्रामुळे कथेला जो खोलवर राजकीय आशय प्राप्त झाला आहे त्याला तोड नाही. अर्चना आणि अब्दुल हे मनस्वी ओढीनं एकमेकांत मिसळून जातात. पण तेव्हाही आपलं नातं हे शरीराच्या ताकदीच्या ओढीमुळे आणि ओढीसाठी आहे याचं भान अर्चनाला आहे. ती त्याला समजावते की, ‘‘आमच्या देशात मुली डेटिंग करीत नाहीत. (१९९५ चा काळ बरं का!) त्या चुटपुटत्या स्पर्शाची वाट बघतात, किंवा मग भलतं साहस करतात.’’ पुढे अरुणा ढेरे यांनी जे लिहिलं आहे ते एकाच वेळी राजकीय, व्यक्तिगत अन् त्यापलीकडे जात समष्टीचं आद्यरूप समजून घेणारं आहे. ‘‘पण आपलं गुंतणं कसं आहे हे कळतंय ना तुला? हे आहे फक्त एक देखणं तात्पुरतेपण. त्यापलीकडचं खोल काहीही नाही. कबूल रे कबूल मला, हे आहे खूप मधुर, खूपच सुंदर. पण आख्खा माझा जीव काढून तुझ्या हातावर ठेवावा असं नाही. तू कोण आहेस आणि कुठला, कोण तुझे आई-बाप, काय तुझ्या गावाचं नाव हेसुद्धा माहीत नाही मला. आणि मला ते नकोच आहे. आपलं नातं फक्त तुझ्या या शाळीग्रामासारख्या सुरेख, घवघवीत रूपापुरतं आणि संपूर्ण, सुभग हसण्यापुरतंच. समजलं?’’

आता हे सारं संवेदन त्या कथेला तिच्या काळापुढे नेतं. एकतर तेव्हाची तरुण पिढी ही शारीरिक संबंधांबाबत मधल्या वळणावर होती. लग्नाआधी मजा करणं ज्यांना पटतं, पण मानवत नाही अशी बव्हंशी मंडळी तेव्हा होती. त्यातलीच एक अर्चना प्रेमाच्या अनेक स्तरांचा सुस्पष्ट विचार करते, हे झालंच; पण त्याहून महत्त्वाची आहे तिची पुरुषाची निवड. तो कृष्णवर्णीय आहे. आणि या साध्या तथ्यात पुरेसं राजकारण आहे. आजही आपली भारतीय मुलं-मुली ही अनेकदा अमेरिकेत कृष्णवर्णीय समाजाला अंतरावर ठेवतात किंवा बिचकून असतात. गोरेपण आणि काळ्या त्वचेचं सौंदर्ययुद्ध हे १९६० च्या ‘Black is Beautiful’ या घोषणेमुळे प्रस्थापित झालं. ज्या युद्धात गोरेपणच सदाजिंके, तिथे काळेपण आपल्या सौंदर्याची नवी व्याख्या मांडू लागलं. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं. पण जेव्हा कृष्णवर्णीय समाजच काळ्या रंगाला कमी लेखू लागला होता तेव्हा त्याला तोंड देण्यासाठी ‘Black is beautiful’ची गरज होती. टोनी मॉरिसनच्या कांदबरीमधली गौरांगना मॉरीन शाळासोबतिणींना ओरडून सांगते की, ‘‘आय अॅम क्यूट! अॅण्ड यू अगली!’’ तेव्हा कृष्णवर्णीय, विचारी फ्रिडाचं मन आक्रंदन करीत म्हणतं, ‘जर ती क्यूट आहे- आणि आहे असं जग म्हणतंय- तर आम्ही नाही आहोत. अन् याचा अर्थ काय? यामागचं रहस्य काय? ते महत्त्वाचं तरी का आहे? आणि का म्हणून?’’ अब्दुल अदीनचं काळेपण अर्चनाला मनापासून सुंदर वाटतं, हे या साऱ्या पाश्र्वभूमीवर मोलाचं आहे!

कथेच्या सुरुवातीलाच नकळत हे काळे-गोरेपण आलं आहे. ‘जेमतेम चार फुटांवर तो बसला होता. उंच, काळाभोर, कुरळ्या केसांचा. त्याचा चेहरा तिच्याकडे वळला आणि पांढरेशुभ्र दात चमकले.’ ‘काळाभोर’ आणि ‘पांढरेशुभ्र’ ही दोन्ही विशेषणं या कथेत पहिल्याच परिच्छेदात आली आहेत. पण त्याचे अन्वयार्थ कळायला ते विशीतलं पहिलं वाचन काही कामाचं नव्हतं. आज त्या कथेमधलं हे धाडसी राजकीय सूत्र मला लख्ख दिसतं आहे आणि जाणवतंय, की हेही बहुधा वाचकांच्या, समीक्षकांच्या नजरेआड राहिलं. अब्दुल अदीन ही कथानायिकेची निवड आहे; अपरिहार्यता नाही. डेव्हिड, राजीव किंवा शर्मा यांपैकी कोणाही पुरुषासमवेत कथानायिका प्रेमाच्या वाटेवर जाऊ शकेल. ‘उंच वाढलेल्या गवताखाली’ झाकलेलं बरंच काही आताआताशा दिसतंय आणि मग वाटतंय, की हा खरा तर कादंबरीचा ऐवज! या सतरा पानी कथेमधलं नाटय़ हे लेखिकेने विस्तारून कादंबरीमध्ये आणलं तर काय बहार येईल. आणि आजचा बदललेला काळ सामावून घेण्याइतकं द्रष्टेपण त्या कथाबीजात मुदलातआहेच की! एकाच वेळी राजकीय आणि काव्यात्मक विधानं मांडणारी ती कादंबरी लिहिणं लेखिकेला कदाचित आज सोपंही नसेल. वीस वर्षांमागे मनानं जे निवडलं आणि उतरवलं- तिथे, त्या टप्प्यावर पुन्हा वळून जाणं हे सोपं नाही. काळ किती झरझर बदलवतो आपल्याला.. आपल्या आसपासच्या भवतालाला. कथेतली ती सुंदरशी, लेखिकेनं मन ओतून रंगवलेली ‘मनांगहेला’ नावाची नदीही आता बदललीय! ‘जवळून एक नदी वाहते. तिचं नाव- मनांगहेला. कोणत्या आदिवासींनी ठेवलं, माहीत नाही. त्याचा अर्थ त्यांच्या भाषेत काय असेल, कोण जाणे. पण जिचं अंग आणि मन सारखं हेलावतं तिला हे नाव किती छान शोभून दिसतं!’ असं लेखिकेनं कथेत म्हटलंय. ती नदीही एक पात्रच आहे कथेतील. अब्दुल आणि अर्चना तिच्याच काठाशी एकजीव होतात आणि ती सारं समजुतीनं सांभाळते! पण हे ‘गूगल’ मला त्या नदीचा मूळ आदिवासी भाषेतील अर्थ दाखवतं आहे. मोनँगहेला : जिचे काठ ढासळत गेले आहेत अशी नदी! खेरीज, शेजारी गूगलवर हेही येतंय की, बदलत्या पर्यावरणामुळे तिला आता धोका आहे. अमेरिकेच्या ‘एनडेंजर्ड’ नद्यांमध्ये तिचा अव्वल क्रमांक आहे! बाकी हा बदलही साजेसाच. अर्चना तिच्या बहिणीला ही सारी कथा दीर्घ पत्रांमधून सांगते! आता ई-मेल, चॅट आणि व्हॉटस् अॅपने संपर्क त्वरेने होतो खरा; पण भरभरून सांगणं माणसं विसरत आहेत, किंवा जगतच नाहीयेत भरभरून उत्कटपणे- जे जवळच्याला सांगावं!

उंच वाढलेल्या गवतांचे मळे दिसेनासे झाले आहेत. नद्यांची पात्रं कोरडीठक्क पडत आहेत. आणि तना-मनाला समृद्ध करेल अशी तहानही साली कुठे आहे!

डॉ. आशुतोष जावडेकर – ashudentist@gmail.com