News Flash

माडगूळकरांची मर्दानगी

अन् मग सुरू होतो खरा प्रवास! ऑस्ट्रेलियामधला कस्टम ऑफिसर बायकोने दिलेले लाडू बघून विचारणा करतो..

माडगूळकरांची मर्दानगी

फिजिऑलॉजीचं लेक्चर नुकतंच संपलं होतं आणि आम्ही पायऱ्यांवर बसून नुकत्याच शिकवलेल्या ‘टेस्टेस्टेरॉन’ या पुरुषी संप्रेरकावर बोलत होतो. तेवढय़ात कुणी मुलगी म्हणाली, ‘‘म्हणूनच तुम्ही सारी मुलं एवढी भांडखोर असता! Boys will be boys!’’ आणि पटलं ते आम्हालाही. आम्ही पुरुष आणि आमच्या आतलं सळसळणारं ते टेस्टेस्टेरॉन हॉर्मोन- आमचं न रडणं, आमचे बायसेप्स एकमेकांना दाखवणं, आमचं ‘लॉजिकल’ असणं, आमचं शक्तिशाली असणं, झुंजार असणं, टगं असणं, रांगडं असणं, रंगेलही असणं- हे त्या हॉर्मोनशी सारं निगडित होतं. ते जास्त मात्रेत निर्माण झाल्यास केस गळतात, हा भाग सोडून या हॉर्मोनमध्ये न आवडण्यासारखं असं काही आम्हाला वाटत नव्हतं! पुढे जगताना ‘पुरुष’ असण्याची व्याख्या इतकी मर्यादित नसते, हे आमच्यापैकी अनेकांना कळतही गेलं! पण ते ‘तरणं’ रसायन व्यंकटेश माडगूळकरांच्या तुलनेने दुर्लक्षित राहिलेल्या एका प्रवासवर्णनात शिगोशिग भरलेलं दिसेल असं मला कधी वाटलं नव्हतं. ‘पांढरी मेंढरे, हिरवी कुरणे’ या नावाचं माडगूळकरांचं ते प्रवासवर्णन ऑस्ट्रेलियामधल्या त्यांच्या मुक्कामाची नोंद मांडतं, हे झालंच; पण त्यामधलं पाना-पानांआड उमटणारं आणि प्रवाहीपणे बदलत जाणारं पौरुष हे औरच आहे! वाटतं, खुद्द टेस्टेस्टेरॉननंच चूष म्हणून मस्तीत, तोऱ्यात शब्दांचं रूप घेऊन पाहिलं असावं!

पुस्तकाच्या पहिल्या परिच्छेदामध्येच ती सारी पुरुषी लक्षणे ठासून भरली आहेत. माडगूळकर सुट्टीला गावी गेलेले असतात आणि त्यांचे ‘रजेचे तीन आठवडे ससा, चित्तुरांची, माळढोक, घोरपडींची शिकार करण्यात’ भराभर निघून जातात. चेहऱ्यावरचा पुणेरी तुकतुकीतपणा जातो आणि तो ‘चांगला’ रापलेला दिसू लागतो. निघताना ते गोंदा रामोश्याला विचारतात, ‘‘गोंदा गडय़ा, तू दोन बायका कशा वागवतोस तेवढा कोर्स मला दे!’’
त्या शिकारीमध्ये पुरुषी आक्रमकता सूचित होते. रापलेला चेहरा ‘चांगला’ वाटण्यामागे पुरुषी रांगडेपण अनुस्यूत असतं. आणि दोन बाया नांदवण्याच्या विचारपुशीमध्ये पुरुषी भ्रमरवृत्ती जशी अभिमानाने मांडली जाते तसाच पुरुषा-पुरुषांमधला सामाजिक, आर्थिक तफावत ओलांडून पुरुष असण्याच्या बळावर रंगणारा संवादही दिसतो. (अनेक उद्योगपती आपल्या गाडीच्या चालकाशी उत्तम गप्पा मारतात ते याच धाग्यावर!) बाकी त्या गोंदाचं उत्तरही भारीच आहे. ‘‘दोन बायका नांदवायच्या म्हंजे हातात सारकं टिकारनं ठिवावं लागतं.’’ आणि त्या उत्तरातून पुरुष असण्याचा हिंसेकडे झुकण्याचा जो संबंध आहे त्यावरही प्रकाश पडतो!
अन् मग सुरू होतो खरा प्रवास! ऑस्ट्रेलियामधला कस्टम ऑफिसर बायकोने दिलेले लाडू बघून विचारणा करतो.. पण सभ्यपणे! माडगूळकर त्याला चेष्टेने ‘शामळू’ हे विशेषण लावतात. या दौऱ्यात ते एकटेच असतात. रेडिओ ब्रॉडकास्टर मंडळींचं तिथे प्रशिक्षण असतं. अशा एखाद्या प्रवासात सोबत पत्नी, मुलं, आई, उर्वरित कुणी किंवा कुणी मित्रही सोबत नसणं हे महत्त्वाचं ठरतं. पुरुषाचे अनुभव घेण्याचे पोत बदलतात.. आणि मांडण्याचेही! गाडगीळ आणि पुलंनी सहकुटुंब प्रवास केले. आणि जे एकेकटे प्रवास केले त्यातलं पौरुष हे त्यांनी हात राखूनच मांडलेलं दिसतं. पण व्यंकटेश माडगूळकरांनी ते सारे खास टेस्टेस्टेरॉनयुक्त अनुभव अभिजात लेखनाच्या कसोटीला पार पाडत बेधडक मांडले आहेत! आणि या पुस्तकाचं ते फार मोठं वैशिष्टय़ आहे. मग हंगेरियन माय-लेकी चालवीत असलेल्या हॉटेलमध्ये अपरिचित जर्मन खलाशी माडगूळकरांशी तिथली मुलगी ‘मिस’ आहे की ‘मिसेस’, यावर खल करतो आणि मेलबर्नच्या शेतीप्रदर्शनामध्ये वूडचॉपिंग करणारे चार भक्कम पुरुष लेखकाच्या लेखणीचा ठाव घेतात. किती सुंदर तऱ्हेनं ते पौरुष माडगूळकरांनी व्यक्त केलं आहे! ‘‘लगोलग चारही जवान आपल्या धारदार कुऱ्हाडी दणदण ओंडक्यावर चालवू लागले. एक सरळ घाव, एक खालून वरती घाव. त्या कडेच्या बहाद्दराने ओंडक्याचे दोन तुकडे केले. टाळ्यांचा गजर झाला. पहिला आलेला लाकूडतोडा अठ्ठावन्न वयाचा होता! वा रे नर!’’ या वर्णनामधला तो ‘वा रे नर!’ हा भाग ते कडक पौरुष थेट वाचकांपुढे मांडतो.
सिडनीच्या एका पबमध्ये लेखक ‘टिम’सोबत बियर प्यायला जातो. तो पबमधला अनुभव माडगूळकरांनी सविस्तरपणे लिहिला आहे. ते खास पुरुषी जग त्यांनी फार सहजतेनं लिखाणात मूळ प्रवासवर्णनाला बाधा न आणता उतरवलं आहे. टिम आणि लेखक बियर पिताना एका वेगळ्या दिसणाऱ्या मुलीला बघतात. टिम सांगतो, ‘‘ती मुलगी असून मुलासारखी वागते. फार चांगली आहे. सर्वाच्यात मिसळते. तुझी ओळख करून देऊ का?’’ त्यावर लेखक म्हणतो, ‘‘नो- थँक्स. टिम! आम्ही अशा पुरुषांना ‘हांडगा’ म्हणतो. बाईला ‘दांडगी’!’’ हा संवाद जेंडर क्रिटिसिझम्च्या नजरेतून अगदी रोचक आहे! टिम हा ‘जेंडर’पलीकडे जाऊन ती व्यक्ती ‘फार चांगली’ आहे असं म्हणू शकतो. भारतीय पुरुषी साच्यातला लेखक व्यक्तीच्या ‘जेंडर’-ओळखीवर त्या व्यक्तीच्या माणूसपणाची प्रत ठरवण्याची चूक करतो आणि तिची ओळख करून घ्यायलाही नकार देतो!
पुढे तर माडगूळकर ज्यो आणि ओंग या सहाध्यायांसोबत नाइट क्लबला जातात. तिथे ‘स्ट्रीप्ट्टीज्’ बघतात. ते सारं वर्णन त्यांनी पुष्कळ चवीनं केलं आहे. पण शेवटाला त्या लेखकाचा खास पौर्वात्य पुरुषपिंड जागा होतो. तो अनुभव आवडलेला असतानाही तो निवेदक दोन-दोनदा म्हणतो, ‘‘माय गॉड.. हॉरिबल! आय वूड नॉट डू इट अगेन!’’
पण माडगूळकरांचं पुरुष-सूक्त हे सुदैवाने इतकंच आणि एवढंच नाहीये या पुस्तकात! शेवटी व्यंकटेश माडगूळकर आहेत ते! आणि कदाचित त्यांच्याही नकळत त्या पुस्तकामधली पौरुषाची व्याख्या विस्तारत गेलेली आहे. प्रवासात कॅनबेरामध्ये गेलेले असताना त्यांना आकाशवाणीमधली त्यांची मैत्रीण सई परांजपे यांची आठवण होते. रँग्लर परांजपे ऑस्ट्रेलियात हायकमिशनर असताना सई परांजपे तिथे राहत होत्या. तिथल्या त्यांच्या घराचे फोटो माडगूळकर आठवणीने काढतात. या साऱ्या वर्णनात एकतर त्यांनी ‘सई’ असं एकेरीत संबोधलं आहे. तत्कालीन लेखनात कुणा पुरुष लेखकानं आपल्या मैत्रिणीचा असा जिव्हाळ्यानं, आत्मीयतेनं उल्लेख केलेला दिसत नाही! ते नातं खूप सहजभाव राखणाऱ्या मैत्रीचं आहे. सई ही लेखकासाठी एखाद्या मित्रासारखी आहे असं मी म्हणणार नाही. मैत्रीणच आहे ती. ठरीव स्त्री-पुरुष प्रेमाच्या आकर्षणापेक्षा निराळ्या प्रतलात नांदणारी जिव्हाळ-मैत्री आहे ती!
माडगूळकर प्रवास करताना, पुढे तो शब्दांत उतरवताना पौरुषाच्या सीमाही जोखत होते का? असावं! प्रवासातले अनुभव माणसाला पठडीबाहेर नेऊ पाहतात. एकदा किथ, फ्रँकलिन आणि आबू आपापल्या देशांचा उत्तम स्वयंपाक रांधतात. लेखकाची वेळ आल्यावर लेखक बावचळतो. आपलं हे ज्ञान भात-पिठल्याच्या पुढे नाही हे त्याला जाणवतं. त्यांनी खंतावत म्हटलंय, ‘‘साफ उतरलेल्या चेहऱ्यानं सर्व पदार्थाची उजळणी केली. एकाचीही कृती नजरेसमोर येईना. ‘सुग्रास भोजन’सारखं एखादं पुस्तक आणायची बुद्धी मला सुचली नाही!’’
पण हे पुरुष-आख्यान पुस्तकाच्या शेवटाला माडगूळकरांनी इतकं विलक्षण उंचीवर नेलं आहे, की बस् रे बस्! लेखक तिथल्या आदिवासी पाडय़ात जातो. विली नावाच्या आदिवासी माणसाशी बोलतो. तोवर आत झोपडीत त्याला मुलगा झाल्याची बातमी येते. त्याचं नाव काय ठेवायचं, या दुग्ध्यात असताना लेखक म्हणतो की, ‘‘भीम हे नाव ठेव.’’
‘‘हू वॉज दॅट ब्लोक? नेव्हर हर्ड ऑफ हिम! तो योद्धा होता का? शिकारी होता का?’’ विली विचारतो. लेखक महाभारताच्या भीमाचे पराक्रम ऐकवतो. ‘भीम’ असं नाव झाडाच्या बुंध्यावर कोरून बारसं होतं. अगदी शेवटी माडगूळकर म्हणतात की, ‘‘तुम्ही कधी तिथे गेलात तर विलीला भेटा. आता तो म्हातारा झाला असेल. भीमू चांगला मोठा झाला असेल. त्याला माझी आठवण द्या. म्हणावं, त्यावेळेला सांगायचं राहून गेलं, पण आणखीन एक भीमू नावाचा प्रचंड मोठा माणूस आमच्याकडं होऊन गेला.. मग झाडाखाली बसून त्याला ती सगळी कहाणी सांगा!’’
खरंच सांगतो- हे लिहितानाही मी थरथरतो आहे. हाच का तो लेखक- ज्याचं पुरुषभान आत्ता काही पानांपूर्वी पुरतं सांकेतिक होतं! पौरुषाचा अर्थ डॉ. भीमराव आंबेडकरांना जसा प्रतीत झाला, तसा त्या पिचलेल्या ऑस्ट्रेलियन आदिवासी ‘भीमू’ला व्हावा, हे लेखकाचं स्वप्नच केवढं मर्दानगी बाळगणारं आहे! पौरुष हे नेहमी सत्ता गाजवणारं, जुलमी नसतं. ती आक्रमकता सर्जनशील आणि सहृदयही असू शकते. ते पौरुष आपली रग न सोडताही शहाणं, विचारी आणि क्षमाशीलही असू शकतं. केवढी मोठी गोष्ट आहे- की माडगूळकरांनी पौरुषाची अनेक रूपं एका छोटय़ा प्रवासवर्णनात सामावली! टेस्टेस्टेरॉन आम्हा साऱ्या पुरुषांमध्ये शिगोशिग असतंच; पण ती रग कुठे वळवायची हे पुरुषा-पुरुषावर अवलंबून असतं. माडगूळकरांसारख्या एखाद्या प्रज्ञावान पुरुषाच्या टेस्टेस्टेरॉनला मग सहज कळून येतं, की शिकारीपेक्षा लेखन हे अधिक मर्दानगीचं काम आहे. ती मर्दानगी मग जिवंतही असते- आणि बाईपणाइतकी सर्जनशीलही!
ashudentist@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2016 2:25 am

Web Title: vyankatesh madgulkar books
Next Stories
1 खाणं, लिहिणं आणि जगणं!
2 शांताबाई आणि लुईसाबाई
3 चल्- चलूया की!
Just Now!
X