करिअर निवडताना ‘आयआयटी’मध्ये जायचं की वैद्यकीय व्यवसायाकडे वळायचं, हा प्रश्न निर्माण झाला होता. गणित उत्तम असल्यामुळे ‘आयआयटी’त जावं, असं एक मन सांगत होतं, तर आजीचा सेवाभाव वैद्यकीय शिक्षणाकडे खेचत होता.. शेवटी निर्णय घेतला टॉस करण्याचा.. पुढेही पदव्युत्तर शिक्षण ‘गायनॅक’मध्ये करायचं की सर्जरीमध्ये? प्रश्न पडला. नाणेफेकीत कौल मिळाला सर्जरीला. ही दोन्ही दानं माझ्या बाजूने पडली म्हणून मनासारखं काम करता आलं. नाही तर?

प रमेश्वर तुमच्यासाठी काय योजना आखतो हे त्याचं त्यालाच माहीत असतं.. माझ्या बाबतीतही त्याची काही योजना असावी.. म्हणूनच कदाचित एका नाणेफेकीच्या ‘कौला’नं माझ्या जीवनाची दिशा बदलली.. तसा मी मध्यमवर्गीय कुटुंबातला. वडील महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात काम करायचे, तर आई गृहिणी. माझी आजी, आईची आई इंदुमती पुंडे ही कस्तुरबा रुग्णालयात मेट्रन होती. असाधारण सेवाभाव होता तिच्यात. रुग्णसेवा हाच धर्म होता. तिच्याकडूनच तो वारसा माझ्यात झिरपला. आजीच्या आयुष्याची थिअरी काही वेगळीच होती. कोणत्या वर्षी मनुष्यानं काय केलं पाहिजे याबाबत तिचे आराखडे होते.. ठोस मतं होती.. म्हणजे तिशीपासून चाळिशीपर्यंत सर्वशक्तिनीशी माणसानं काम केलं पाहिजे.. चाळिशीनंतर संध्याकाळचं जेवण कमी करणं, पन्नाशीनंतर बाहेरचं खाणं कमी करणं, सत्तराव्या वर्षी आंबट खाणं सोडणं, ८० व्या वर्षी कडक बिछान्यावर झोपणं आणि नव्वदाव्या वर्षी आसक्ती सोडणं गरजेचं आहे, असं ती सांगायची. यामागे कर्मसिद्धांत होता. आजीचं निधन ७९ व्या वर्षी झालं; परंतु विचार व सेवाभावी वृत्तीची पुंजी ती माझ्यासाठी कायमची ठेवून गेली.
आमच्या येथे आठवडय़ातून एकदा ज्ञानेश्वरीवर प्रवचन व्हायचं. साधारणपणे वयस्कर अशी पन्नासेक माणसं जमायची. थोडी लहान मुलं असायची. आजगावकर गुरुजी ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर तेथे जमलेल्या सर्वाना एकमेकांच्या पाया पडायला लावायचे. प्रत्येक माणसात परमेश्वर असतो, या भावनेतून या वेळी मोठी माणसे माझ्याही पाया पडायची. मला त्याची मोठी गंमत वाटायची..
आमच्या वडिलांचं गणित उत्तम होतं. ते खुल्या विचारांचे असल्यानं त्यांनी माझ्यावर त्यांचे विचार अथवा मी काय बनावं हे कधीच लादलं नाही. माझंही गणितावर प्रभुत्व होतं. बहुतेक वेळा पैकीच्या पैकी गुण मिळायचे. त्यामुळे ‘आयआयटी’मध्ये जायचं की वैद्यकीय व्यवसायाकडे वळायचं, हा माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता. गणित उत्तम असल्यामुळे ‘आयआयटी’त जावं, असं एक मन सांगत होतं, तर आजीचा सेवाभाव वैद्यकीय शिक्षणाकडे खेचत होता. काय करावं याचा निर्णय घेता येत नव्हता.. शेवटी निर्णय घेतला टॉस करण्याचा.. नाणेफेकीत जो कौल येईल त्या क्षेत्रात जायचं.. आणि वैद्यकीय शिक्षणाचा कौल लागला. पुढे परळच्या जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश घेतला. तेथे डॉ. रेगे, डॉ. मेहता, डॉ. मनू कोठारी, डॉ. रामचंदानी यांच्यासारखे नामवंत शिक्षक लाभले. सेवाभाव आणि शिकविण्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या या शिक्षकांमुळे आयुष्याला एक दिशा मिळाली. डॉ. भटनागर यांचं विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर बारीक लक्ष असायचं. महाविद्यालयीन जीवनात मी क्रिकेट खेळायचो. क्रिकेटचा सचिवही होतो. टेबल टेनिसही उत्तम खेळायचो. याच काळात मृदुलाची ओळख झाली.. केईएममध्येच आमची ‘केमिस्ट्री’ जमली. तिनं फिजिओथेरपीमध्ये शिक्षण केलं. ‘एमबीबीएस’ला मला गायनॅकमध्ये उत्तम गुण मिळाले. त्या तुलनेत सर्जरीमध्ये कमी मार्क होते. त्यामुळे पुन्हा प्रश्न पडला की, पदव्युत्तर शिक्षण ‘गायनॅक’मध्ये करायचं की सर्जरीमध्ये? कारण कॅन्सर सर्जन बनावं असंही वाटत होतं. त्यामुळे पुन्हा एकदा ‘टॉस’ केला आणि कौल मिळाला ‘सर्जरी’ला. माझं पदव्युत्तर शिक्षण सुरू झालं..
केईएममधल्या शिक्षणाबद्दल काय बोलायचं.. खरंच आम्ही खूप भाग्यवान होतो. आम्हाला लाभलेले शिक्षक असाधारण कौशल्य असलेले व सेवाभावी वृत्तीचे होते. डॉ. रवी बापट यांच्या किती तरी आठवणी सांगता येतील. बापट सर कधी वॉर्डामध्ये येतील सांगता येत नसे. त्यामुळे आमची वॉर्ड सोडून जायची हिंमत नसायची. डॉ. बापट सरांसाठी वॉर्ड हे दुसरं घरच होतं. डॉ. सम्सी यांचे वर्णन शब्दांच्या पलीकडलं.. सकाळी बाहय़ रुग्ण विभागात रुग्णांना तपासायचं. साधारणपणे दीड-दोन वाजायचे. त्यानंतर डॉ. सम्सी सर वॉर्डात जाऊन रुग्णांना भेटायचे. इथे आमच्या पोटात कावळे कोकलत असायचे आणि डॉ. सम्सी सर प्रत्येक रुग्णाला जाऊन कसा आहेस, जेवलास का, शिरा खाणार का, असं आत्मीयतेनं विचारत असायचे.. कामावरील पराकोटीची निष्ठा कशाला म्हणतात हे डॉ. बापट व डॉ. सम्सी यांच्याकडून शिकायला मिळालं. एम.एस. झाल्यानंतर मी केईएममध्येच पोस्टिंग न घेता कूपरला जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं; तथापि कूपर रुग्णालयात प्रत्यक्ष कामाचा खूप अनुभव मला मिळाला. केईएममध्ये डॉ. अविनाश सुपे यांच्याशी गट्टी जमली ती आजतागायत! डॉ. सुपे सध्या केईएमचे अधिष्ठाते आहेत, तर मी गेली आठ वर्षे ‘टाटा मेमोरियल सेंटर’मध्ये संचालक म्हणून काम करत आहे.
एस.एस. केल्यानंतर कर्करोग शल्यविशारद होण्यासाठी टाटा कर्करोग रुग्णालयात ‘हाऊसमन’ म्हणून दाखल झालो. गंमत म्हणजे तेथे पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर हे दिवसभर वॉर्डात माझे रजिस्ट्रार म्हणजे ‘बॉस’ असायचे आणि संध्याकाळी मी त्यांना शिकविण्याचं काम करायचो.
एम.एस. केल्यानंतर म्हणजे पदव्युत्तर शिक्षणानंतरही मी तब्बल नऊ वर्षे शिकतच होतो. यात इंग्लंडमध्ये स्तनाच्या कर्करोगावर काम केलं. तिथे तसंच भारतात मला या विषयावर मूलभूत संशोधन करता आलं. कर्करोगाच्या वेगवेगळ्या अंगांचा अभ्यास या काळात केला. यातूनच ‘लॅन्सेट’मध्ये माझा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्याची दखल घेऊन इंग्लंडच्या ‘रॉयल कॉलेज’नं त्यांच्याकडे अध्यापनासाठी मुलाखतीला बोलावलं. मला भारतात येण्याची ओढ होती. एक वर्ष भारतात काम करून पाहातो. तिथं जमलं नाही तर परत येईन, असं सांगून मी त्यांचा निरोप घेतला. इथं संशोधन व कामासाठी वातावरण कसं असेल. माझं जमेल का, हा प्रश्न होता; तथापि टाटा कर्करोग रुग्णालयात दाखल झालो आणि पुन्हा वळून बघण्याची गरजच पडली नाही.
परदेशात पैसा आहे, संशोधनाला वाव आहे; परंतु रुग्णसेवेचा भाव व रुग्णांशी जुळणारं भावनिक नातं जसं इथे आहे त्याची सर जगात कोठे येणार नाही. जिव्हाळा.. आपुलकी हे पैशाने विकत मिळणार नाही. उदाहरण म्हणून सांगतो- केईएममध्ये असताना एका शिक्षकावर मी शस्त्रक्रिया केली होती. कोकणातील कोणत्या तरी गावचे ते शिक्षक होते. निघताना त्यांनी मला गेली तीस वर्षे ते वापरत असलेलं पार्करचं पेन भेट म्हणून दिलं. त्या वेळचे त्यांच्या डोळ्यांतील कृतज्ञतेचे भाव आजही मी विसरू शकत नाही. असाच एक ज्ञानेश्वर नावाचा रुग्ण. शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरी गेला आणि मला तार पाठवली. केईएममध्ये मला कोण तार पाठवणार, असा प्रश्न पडला. मी शस्त्रक्रिया करत असल्यामुळे माझ्या सहकाऱ्याला तार वाचायला सांगितली. तरेत ज्ञानेश्वरनं लिहिलं होतं, ‘घरी सुखरूप पोहोचलो.’ एक रुग्णाने तर चक्क पिशवी भरून पापलेट आणली होती. असे असंख्य किस्से सांगता येतील. हे सारे परदेशात दिसणारही नाही.
टाटा रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होणारी तगमग याचं वर्णनही करता येणार नाही. कर्करोगाच्या पाशातून सुटण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड. जीवन-मरणाच्या या लढाईत डॉक्टरांची सुरू असलेली शर्थीची झुंज.. इथं सारं काही वेगळंच आहे. माणुसकीच्या ओलाव्याच्या अनेक कहाण्या इथं घडत असतात, पाहायला मिळतात. रुग्ण आणि डॉक्टरांचं एक वेगळंच विश्व इथे आहे. डोळे पाणावणाऱ्या अनेक घटना इथे घडतात.
एक दिवस ‘श्वास’ चित्रपटातील कथेप्रमाणे एका लहान मुलाला त्याचे आई-वडील घेऊन आले. त्याच्या दोन्ही डोळ्यांत कर्करोग होता. शस्त्रक्रिया करून त्याला वाचवता येणार होते, परंतु दृष्टी जाणार होती. मुलाच्या आई-वडिलांना कल्पना दिली आणि त्याला दाखल करून बेडही दिला. दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया होती. सायंकाळी राऊंड घेण्यासाठी गेलो, तर बेडवर कोणीच नव्हते. वाटले, बहुतेक मुलाला घेऊन गेले घरचे. स्वाभाविक होतं. त्यांच्यासाठी निर्णय मोठा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाला घेऊन त्याचे आई-वडील आले. त्यांना विचारलं तेव्हा म्हणाले, ‘‘शस्त्रक्रियेचा आमचा निर्णय पक्का आहे. मुलाची दृष्टी शस्त्रक्रियेनंतर जाणार, असं तुम्ही सांगितले. त्याच्या हातात केवळ बारा तास होते. तेवढय़ा वेळात जेवढी मुंबई दाखवता येईल तेवढी रात्रभर फिरवून दाखवली.’’ आजही त्या आठवणीनं डोळ्यांत पाणी येतं. एक तरुण मुलगी टाटामध्ये दाखल झाली होती. तिचा आजार बळावला होता. जास्तीत जास्त सहा महिने तिनं काढले असते. तिच्याबरोबर एक तरुण अहोरात्र तिची शुश्रूषा करायचा. त्या मुलीला बेडवरून उठणंही कठीण होतं; परंतु त्या मुलाचं तिच्यावर प्रेम होतं. तिच्याशी लग्न करायचं होतं. त्यासाठी रुग्णालयातच भटजी बोलावून लग्नही केलं. अशा अनेक घटना हृदयाच्या तारा छेडतात.. मुळापासून हलवून सोडतात. अश्रूंना मोकळेपणे वाट करून देतात.
आज जगभरात कर्करोगावर जसं संशोधन सुरू आहे तसंच भारतात ‘टाटा’मध्येही मोठय़ा प्रमाणात सुरू असतं. येथील अनेक डॉक्टरांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध तर होतातच, शिवाय येथील संशोधनावर आधारित उपचार पद्धतीचं अनुकरणही परदेशात केलं जातं. डॉ. डिक्रुझा यांचा मानेमध्ये गाठी असताना शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील शोधनिबंधाची ‘अ‍ॅस्को’मध्ये (अ‍ॅस्को-अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल आँकोलॉजी) दखल घेतली गेली. गर्भाशयाच्या कर्करोगावरील डॉ. दीक्षित यांचा शोधनिबंध ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झाला. अशा कित्येक गोष्टी टाटा मेमेरियलमध्ये होत असतात.
‘अ‍ॅटॉमिक एनर्जी’कडून संशोधनासाठी सर्व प्रकारचं सहकार्य मिळतं. यातून काही औषधं तसंच उपचार पद्धतींमध्ये मोठय़ा प्रमाणात संशोधन झालं. गर्भाशयाचा कर्करोग यावर संशोधन केलं. यात एक चाचणी व सर्वेक्षण पद्धती विकसित केली. यासाठी अत्यंत स्वस्तात म्हणजे एका चाचणीसाठी केवळ नऊ रुपये एवढा खर्च येतो. यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या शेकडो रुग्णांचा जीव वाचू शकला आहे. आम्ही ‘व्हीआयएफ’ पद्धती वापरून केलेल्या कामामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तीस टक्के रुग्णांना वाचवू शकलो. हा एक प्रकल्प होता. संपूर्ण भारतात याची अंमलबजावणी केली, तर वर्षांकाठी २२ हजार मृत्यू टाळता येतील. अमेरिकेत ‘अ‍ॅस्को’ परिषदेत याबाबतचा शोधनिबंध वाचून दाखवला तेव्हा उपस्थित जगभरातील तज्ज्ञांनी उभं राहून टाळ्यांनी स्वागत केलं. याबाबत काही राज्यांमध्ये आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. एखादं औषध चांगलं आहे, परंतु ते परवडू शकत नसेल तर त्याचा उपयोग काय? आम्ही भारतातील रुग्णांचा विचार करून उपचार पद्धतीचा विचार करतो. ‘तंबाखू मुक्ती’साठीही टाटा मेमोरियलचे सातत्यानं प्रयत्न सुरू असतात. तंबाखूमुळे कर्करोग होण्याचं प्रमाण प्रचंड आहे. गुजरातमधील एका खेडय़ात एकदा गेलो होतो. तिथे शेताला कुंपण म्हणून तंबाखूची झाडं लावतात. तंबाखूच्या वासाने जनावरं शेतात येत नाहीत असं एका म्हाताऱ्या शेतकऱ्यानं सांगितलं. तो म्हणाला, आता कुंपणच शेत खात आहे. आमची पिढी तंबाखू खाऊन कर्करोगाने मरत आहे. हे सारं थांबायला पाहिजे. तंबाखू मुक्तीसाठी टाटाच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू आहेत.
देशभरातून टाटा रुग्णालयामध्ये रुग्ण येत असतात. त्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांचा होणारा खर्च, प्रवासाची दगदग लक्षात घेऊन देशभरात ६४ ठिकाणी कर्करोग केंद्राच्या माध्यमातून एक समान उपचार देण्याची योजना आखली आहे. यासाठी दोन बैठका पार पडल्या असून देशभरातील २९ मोठय़ा कर्करोग उपचार केंद्रांनी यात सहभाग घेतला होता. प्रत्येकाला परवडू शकेल असे उपचार देण्यावर ‘टाटा’चा भर आहे. केवळ मोठय़ा शहरांमध्येच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात कर्करोगावरील उपचार पोहोचला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ‘नॅशनल कॅन्सर ग्रिड’च्या माध्यमातून पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. उपचारात सुसूत्रता व एकवाक्यता आणण्यात येत आहेत. यासाठी डाटा जमा करणं, संशोधन, प्रशिक्षण आणि उपचार असे सूत्र निश्चित करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेश व पंजाबमध्ये ठोस कामही सुरू झालं आहे.
या साऱ्यांत राज्यकर्त्यांचं सहकार्य आवश्यक असतं. देशाचे माजी व विद्यमान पंतप्रधान तसंच राज्याचे आजी-माजी मुख्यमंत्र्यांचं कायमच सहकार्य मिळालं आहे. राजकारणी लोकांमधील एक गोष्ट मला आकर्षित करते, ती म्हणजे, माणसं व त्यांची गुणवत्ता ओळखण्याची त्यांची क्षमता. मी पाहिलेल्या मुख्यमंत्री व पंतप्रधानांसह काही मोठय़ा नेत्यांमध्ये माणसं हेरण्याची शक्ती थक्क करणारी होती. असंख्य व्यवधानं सांभाळताना नेमकी माणसं हेरणं, हा त्यांचा गुण वेगळाच म्हणावा लागेल.
पद्मश्रीसह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मला मिळाले, मानसन्मान मिळाला. देशविदेशात अनेक मोठय़ा माणसांच्या संपर्कात येऊ शकलो, तरी रुग्णसेवेतून जे समाधान मिळतं ते कशातूनही मिळू शकणार नाही. टाटा मेमेरियल सेंटरमध्ये चालणारं संशोधन व उपचार पाहण्यासाठी परदेशातून तज्ज्ञ डॉक्टर मंडळी येतात. इथल्या कामाचं, त्यातही कमी जागेत मोठय़ा प्रमाणात रुग्णांवर केले जाणारे उपचार पाहून ते थक्क होतात. एक खरं की, उपचारासाठी येणारी रुग्णांची संख्या आणि जागा याचा ताळमेळ तसंच कमी जागेत होत असलेले उपचार याबाबत त्यांचे काही आक्षेप आहेत. त्याचा विचार करून नवी मुंबई तसंच हाफकिन संस्थेत आम्ही विस्तारित कर्करोग प्रकल्प राबविण्याचं काम हाती घेतलं आहे. हाफकिनमध्ये पाच एकर जागेत रुग्णांसाठी तीनशे खाटा व नातेवाईकांसाठी तीनशे खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. नवी मुंबई तसंच मुंबईत आणखी एका ठिकाणी रुग्ण व नातेवाईकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचं काम सुरू असून त्यामुळे टाटा रुग्णालयाच्या बाहेर रुग्ण व नातेवाईक रस्त्यावर पथारी पसरून असल्याचं चित्र आगामी काळात दिसणार नाही.
माझ्या आजीचा वसा घेऊन माझी रुग्णसेवा सुरू आहे. त्यातून मिळणारं समाधान कोटय़वधी रुपयांनीही विकत घेता येणार नाही. आज मागे वळून बघताना सहज मनात विचार येतो.. तेव्हा नाणेफेकीने आयआयटीत जाण्याचा कौल दिला असता तर? .

डॉ. राजन बडवे

(संचालक ‘टाटा मेमोरियल सेंटर’)

शब्दांकन – संदीप आचार्य
sandeep.acharya@expressindia.com