उद्योग आणि समाजकार्य यांची प्रकृती मूलत:च भिन्न आहे, पण समाजकार्यात उद्योग नाही आणि उद्योगात समाजकार्य नाही, हे असिधाराव्रत मी निष्ठेने पाळते. म्हणूनच वाइन उद्योग असो, क्विल्ट अगदी परदेशी नेणं असो वा च्यवनप्राशचा उद्योग असो हे करत असतानाच ‘श्रद्धानंद’ आश्रमातल्या स्त्रियाचं, मुलांचं आयुष्य संवेदनक्षम मनानं जाणूनही घेता आलं. आज आयुष्याचा जमाखर्च मांडताना मला जमेची बाजू जड झालेली दिसत आहे. आता शेवटचं वळण सुलभ व्हावं एवढीच इच्छा!

माझा मोठा भाऊ अजित आणि मी एका संपन्न, सुसंस्कृत घरात जन्मलो. माझा जन्म १९३८ मधला. माझे वडील इंग्लंडमध्ये १४ र्वष राहून एफ.आर.सी.एस. होऊन मायभूमीच्या ओढीनं िहदुस्थानात परतले होते. एक कनवाळू, गरिबांचे डॉक्टर म्हणून ते ओळखले जात. माझी आई त्या काळात एम.ए.पर्यंत शिकलेली. घर उत्तम प्रकारे चालवणारी आणि वेळात वेळ काढून समाजकार्य करणारी होती. वास्तविक आमचं चौघांचं कुटुंब पण आमचं घर मात्र येणाऱ्या-जाणाऱ्या आणि राहत्या पाहुण्यांनी सदैव गजबजलेलं असे. सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद कृष्ण आणि नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर बाबांचे मामा. संगीतकार मधुकर गोळवळकर त्यांचे मावसभाऊ आणि चित्रकार द. ग. गोडसे त्यांचा भाचा. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि ‘पेडगावचे शहाणे’सारख्या चित्रपटाचा निर्माता मकरंद भावे माझ्या आईचा सख्खा भाऊ.
ही सर्व मंडळी मुंबईला आजारपणाच्या किंवा काही कामाच्या निमित्ताने आमच्या घरी महिना महिना त्यांच्या नोकर-चाकरांसह राहायची. त्यांच्यामुळे आमच्या घरी त्यांना भेटायला येणारे साहित्यिक, संगीतकार, क्रिकेटपटू, चित्रकार यांची वर्दळ असे. रात्री जेवणं झाली की या सर्वाचे गप्पांचे फड बसत. ते ऐकत आम्ही दोघं भावंडं मोठे झालो.
ही सर्व प्रतिभावंत मंडळी स्वकर्तृत्वानं, कष्ट करून यशोशिखराप्रत पोचली होती, त्याचे संस्कार आमच्यावर बालवयातच झाले. पुढे शाळा-कॉलेजातनं आणि इतरही आम्ही काहीसं यश मिळवलं पण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मानदंड ठरलेली ही मंडळी पाहिल्यामुळे आपण कोणी ‘स्पेशल’ आहोत ही भावनाही कधी मनात रुजली नाही.
21                     भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते ‘वाइनलेडी’ किताब स्वीकारताना अचला जोशी.

काही लोकांच्या जीवनात लहानपणापासूनच बरेचसे चढ-उतार, काही रोमहर्षक आव्हानं आलेली ऐकतो. माझं सर्व लहानपण तसं खूपच सरळ आणि समाधानी गेलं. माझ्या महद्भाग्याने शिशुविहारमध्ये खुद्द ताराबाई मोडक आमचा वर्ग घेत असत. त्यांना िहदुस्थानातल्या लेडी मॉन्टेसरी संबोधलं जायचं. त्यांचं शिकवणं म्हणजे आमच्या बरोबर शिशुविहारच्या बागेत बसून आम्हांला खूप गोष्टी सांगणं असे. एके दिवशी आमच्याबरोबर ताराबाई बागेत फिरायला आल्या. तिथल्या झुडपाला आलेली गुलाबाची सुंदर फुलं दाखवून त्यांनी मला विचारलं, ‘‘अचला, तुला या फुलांकडे पाहून काय वाटतंय?’’ मी म्हटलं, ‘‘मला काही नाही वाटत.’’ त्यांनी विचारलं, ‘‘तुला असं वाटत नाही का, की या फुलांना रंग कोणी दिला असेल? त्यांत वास, कोणी घातला असेल?’’ तेव्हा मी गप्प बसले पण त्यांचे शब्द कानांतून मनात गेले, तिथे कायमचे कोरले गेले. ‘देव’, ‘धर्म’ हे शब्दही न उच्चारता ताराबाईंनी माझ्या मनात त्या अव्यक्त, अलौकिक शक्तीबद्दल कुतूहल उत्पन्न केलं होतं. लहानसहान गोष्टीतलं सौंदर्य आणि अर्थ पाहायला आणि त्यांची निर्मिती करणाऱ्या त्या अव्यक्त शक्तीचा आदर करायला शिकवलं होतं. त्या दिवसानंतर मनाला थक्क करणारं काहीही पाहिलं, बरी-वाईट कोणतीही घटना घडली तर त्यामागचं त्या अदृश्य शक्तीचं अस्तित्व जाणवत राहिलं. इतकी मोठी ही शक्ती! आपल्या हातनं काही चुकीचं झालं तर तिला ते आवडणार नाही, ही पापभीरू भावना त्या लहान वयातच मनात कायमसाठी वस्तीला आली. पुढे ही भावना रुजल्यावर तिचं महत्त्व कळलं. तोवर ताराबाई हे जग सोडून गेल्या होत्या. त्यांचे उपकारही मानता आले नाहीत.
शालेय जीवनानंतर कॉलेजात जायची वेळ आली आणि आयुष्यात पहिल्यांदा दोन वाटा दिसायला लागल्या. घरातल्या वातावरणामुळे साहित्याची, वाङ्मयाची आवड निर्माण झाली होती. दुसरीकडे बाबांसारखं डॉक्टर व्हावं, अशी इच्छा होत होती.
इतर अनेक बाबतींत पुरोगामी असणारे बाबा मात्र मुलींनी वैद्यकीय व्यवसाय घेण्याच्या अगदी विरुद्ध होते. ते म्हणत, ‘‘मुली हुशार आणि अभ्यासू असतात त्यामुळे मेडिकलला प्रवेशही मिळवतात, पण एकदा लग्न झालं की त्या व्यवसाय सोडून देतात. याउलट जो मुलगा डॉक्टर होतो, तो कायम डॉक्टरी व्यवसाय करतो. देशाला एक डॉक्टर अधिक मिळतो.’’ त्यांचं असं मत होतं तरी मला निवडीचं स्वातंत्र्य होतं. मी कला शाखेत प्रवेश घेतला.
कॉलेज जीवनाच्या वाटेवर माझ्या विचारशक्तीला आणि एका अर्थी जीवनालाही वळण लावणारे प्राध्यापक न. र. फाटक आणि श्री. पु. भागवत हे दोन फार मोठे गुरुवर्य मला लाभले. त्या वेळी डॉ. मो. दी. पराडकर हे संस्कृत शिकवत असत. त्यांचेही संस्कार मनावर झाले. कालिदासाचा ‘रघुवंश’ आणि भवभूतीचं उत्तररामचरित’ त्यांनी शिकवलं. त्यांचा भर आम्ही अजरामर, अव्यंग साहित्य मुखोद्गत करावं यावर असे. ‘‘तुमच्या पुढच्या जीवनासाठी शिदोरी आहे असं समजा. हे श्लोक तुम्हाला कधी एकटं वाटूं देणार नाहीत.’’ असे ते म्हणत.
सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या वेळी केलेलं पाठांतर मला आयुष्यभर उपयोगी पडलं. कधी एकटी असले की ते श्लोक मी मनात म्हणते. आजूबाजूचं वास्तव आणि भवताल मागे पडतो आणि काव्यात चित्रित झालेले हिमालयाचे देखावे, राम-सीतेच्या वनवासातले प्रसंग यांची अपरा सृष्टी माझ्या मनात जागी होते. मी त्या सृष्टीत रमते.
एकदा भागवतसरांनी एका सुप्रसिद्ध लेखकाच्या एका काहीशा फसलेल्या पुस्तकावर चर्चा ठेवली होती. मी त्या पुस्तकाच्या विषयापासून त्याच्या आविष्कारातल्या उणिवा निर्भीडपणे त्या लेखकाची काहीशी चेष्टा करीत मांडल्या. सरांनी सर्व प्रतिपादन ऐकलं आणि ते शेवटी म्हणाले, ‘‘चेष्टा काय सहसा सर्वाना आवडते, पण तुम्हाला क्षणिक लोकप्रियतेपलीकडे काय मिळणार? आपल्या हातून कोणाचा अनादर तरी होता कामा नये.’’ आयुष्यभर मार्गदर्शकठरणारं सुसंस्कृततेचं, सद्भिरुचीचं मूल्य सरांनी इतक्या सहजतेनं माझ्या मनावर ठसवलं की कुठे तरी आपण बदललोय हे त्याच क्षणी मला जाणवलं. माझ्या विचारसरणीतूनच अनादराची भावना कायमची हद्दपार झाली. केवळ वाङ्मयाकडेच नाही तर जीवनाकडे पाहण्याची सभ्य आणि निकोप दृष्टी त्या दिवशी मला लाभली.
मी एम.ए. झाल्यावर मला एका कॉलेजमध्ये लेक्चररची जागा देऊ केली होती. त्या संदर्भात मी फाटकसरांचा सल्ला घ्यायला गेले. ‘‘कालची विद्यार्थिनी, आज लेक्चरर? दुसऱ्याला शिकवावं, असं तुला येतंय काय? एम.ए.मध्ये चांगले यश मिळालं याचा अर्थ आज तुझ्याजवळ माहिती आहे; पण शिकवायला लागतं ते ज्ञान तुला नाही. ते अनुभवानं येतं. कोणत्याही गोष्टीचं पूर्ण ज्ञान झाल्याशिवाय दुसऱ्याला शिकवण्याची पात्रता येत नाही. तुझ्यासारखे नुकतेच पदवी मिळून बाहेर पडलेले विद्यार्थी कॉलेजात उच्च शिक्षणाचा पाया घालू लागले तर विद्यापीठातल्या शिक्षणाचा दर्जा कसा राहील?’’ त्यांनी दिलेला सल्ला मला पटला आणि आपल्याच विषयातली वाट समोर स्पष्ट दिसत असूनही मी सरळ तिच्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर लग्न, दोन मुलं सारं सुरळीत झालं.
संसारात स्थिरता आली होती. नवरा दिवसेंदिवस कामात गढलेला आणि मुलं पूर्ण वेळ शाळेत गुंतलेली. अशा वेळी बायकांना येते ती मध्यम वयातील विफलता (middle age syndrome) जाणवायला लागली. तेवढय़ात माझ्या नवऱ्याच्या वाचनात एक जाहिरात आली. एका सरकारी विभागात भारताची प्रदर्शनं परराष्ट्रात नेऊन आयोजित करू शकणाऱ्या शिक्षित व्यक्तीची गरज होती. मी मुलाखतीला गेले आणि माझी निवड झाली. तिथलं काम सुरू झालं. माझ्या जीवनाची वाट बदलून टाकणारं हे एक मोठं वळण होतं. या वळणाला पुढे खूप फाटे फुटणार होते..
या नोकरीच्या निमित्ताने माझ्या परदेशवाऱ्यांची सुरुवात झाली. मुंबई-पुणे हा प्रवासही एकटीने न केलेली मी या नोकरीनिमित्त पहिल्यांदा एकटीच अमेरिकेला गेले. तिथे टीम फार तर दोन किंवा तीन कार्यकर्त्यांची असे. प्रदर्शनासाठी भारतातून पाठवलेलं सामान कस्टम्समधून सोडवून आणणं, आíकटेक्टबरोबर बसून नकाशानुसार आपल्या कक्षाची रचना आणि सजावट होते आहे ना पाहणं, त्या देशातल्या भारतीय राजदूतांना भेटून त्यांच्याशी आपल्या कक्षाच्या स्वागत समारंभाची आखणी करणं, त्याची कार्ड त्यांच्या म्हणण्यानुसार छापवून घेणं, कॉन्ट्रॅक्टरशी बसून मेनू ठरवणं, अशी अनेक कामं असत. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामं होऊ लागली. जगात स्वतंत्रपणे वागलं की जो कणखरपणा येतो तो पहिल्या प्रदर्शनातच आला.
प्रदर्शनात त्या त्या देशांच्या कक्षांचे स्वागत समारंभ होत. समारंभात निरनिराळ्या देशांतल्या वाइन चाखायला मिळाल्या. मला मनापासून वाइन आवडल्यावर वाइननिर्मितीची वाट दिसली. वाइनचं आकर्षण वाटल्यानं मी वाइनची माहिती असलेली पुस्तकं गोळा करायला लागले. एकदा अजितनं त्याच्या एका रुग्णाकडून आलेली टोपलीभर द्राक्षं माझ्यासमोर आणून ठेवली. चवीला तुरट, आंबट आणि गोड असलेल्या त्या फळांचा तोंडात फुटलेला मदीर वास मला साक्षात्कारी वाटला. या द्राक्षांची पुस्तकात दिल्याप्रमाणे मी घरी वाइन करून पाहिली. महिन्याभरात वाइन तयार झाली होती. ती साधारण परदेशी वाइनप्रमाणे, हलकी, मखमली, आपल्या कुळाच्या मदीरपणाची ओळख दाखवणारी होती.
मग मला जास्त जास्त वाइन करण्याची इच्छा झाली. एखादी गोष्ट मला साध्य झाली की ती परत परत आणि अधिकाधिक प्रमाणावर करण्याची माझी इच्छा बळावत जाते. ही महत्त्वाकांक्षा आहे का? पण महत्त्वाकांक्षेला आवश्यक असणारी इतर लक्षणं रेटा देऊन पुढे जाणं, आपल्या स्पर्धकांशी वेगळे डाव खेळणं हे माझ्या स्वभावातच नाही. त्यामुळे प्रतिस्पध्र्यानी बनवलेली चांगली वाइन मला आनंद देते. त्यांनी मिळवलेल्या यशाचंही मला कौतुक वाटतं. याचं मुख्य कारण मी खऱ्या अर्थी महत्त्वाकांक्षी नाही, वाइननिर्मिती हा माझा छंद आहे आणि मला वाइनखेरीज इतरही कामांत रस आहे.
शिक्षण आटोपल्यानंतर मी साहित्याचा पाठपुरावा करावा, ही साहजिकच प्राध्यापक न. र. फाटक आणि श्री. पु. भागवत या दोघांची इच्छा होती, पण माझ्या पुढच्या आयुष्यात मी नोकरी केली. मला अनेकदा परदेशी प्रवास करावे लागले. वाइनसारखा व्यवसाय सुरू केला. त्याचंही त्या दोघांनी मनापासून कौतुक केलं. साहित्यापासून हे दूर होतं तरी या दोघांनी मला प्रत्येक वेळी दिशा दाखवल्या.
‘‘कोणताही उद्योग कर, पण कोणा लुंग्यासुंग्यानं येऊन तुला प्रश्न विचारायची हिंमत करू नये, अशी वागणूक ठेव. नियमानुसार उद्योग कर’’ फाटकसरांचा रोखठोक दंडक!
‘‘वाइन ही अत्यंत सुसंस्कृत वातावरण सभोवती वागवते, त्याला शोभेसा तिचा डौल ठेवा,’’ ही भागवतसरांची सूचना! अंधारात एकदम प्रखर उजेड पाडण्याची शक्ती या साध्या शब्दांना कशी येते हे अनुभवायलाच हवं.. हे नुसते शब्द नसतात, ते आयुष्य उजळून टाकणारे मार्गदर्शक प्रकाशकिरण असतात, ती जीवनसूत्रं होती. मी केलीय म्हणून माझ्या दोन्ही गुरुजींनी वाइनची चव पाहिली, यापलीकडे कोणतं कौतुक शक्य होतं?
माहिती आणि ज्ञान यातला फरक मला वाइन करायला लागल्यावर कळला. जेव्हा मी वाइन बॅचमागून बॅच करायला लागले तेव्हा वाइन तयार करण्याचा साचा बनवता येत नाही हे कळलं. प्रत्येक वेळची द्राक्षं वेगळी. हवा वेगळी असते. ते सर्व लक्षात घेऊन रसाचा तोल सांभाळावा लागतो. दोन टाक्यात एकाच वेळी घातलेली वाइन वेगळ्या प्रकारची होताना पाहून प्रश्न पडतो आणि तो सोडवताना अनुभव येतो. न. र. फाटकांच्या बोलण्याप्रमाणे अनुभवाचं ज्ञानात रूपांतर होत होतं. या जाणिवेतनं होणारा आनंद कितीही पशांनी विकत घेता येत नाही.
जगप्रसिद्ध ‘कॅम्यू’ कुटुंबाचे अध्वर्यू मिशेल कॅम्यूंनी माझी वाइन त्यांच्या भारतात बनवण्याच्या ब्रॅण्डीसाठी निवडली. फ्रान्सच्या कोनॅक परगण्यात त्या पती-पत्नींबरोबर राहण्याचं भाग्य ही एक अमोल ठेव मी अनुभवली. या सर्व प्रयत्नांमुळे मला राष्ट्रपतींच्या हस्ते उद्योगासाठी नाही तर उद्योजगतेसाठी पारितोषिक मिळालं. शिवाय ‘वाइन लेडी’ हा किताब! सगळीच गंमत!
लहान उद्योजकाला आपल्या उत्पादनाचा सर्वागानं अभ्यास करावाच लागतो. लठ्ठ पगार
देऊन तज्ज्ञ नेमण्याची ऐपत नसते तेव्हा लहान प्रमाणावर उत्पादन सुरू करून हळूहळू वाढवत नेणं अपरिहार्य असतं. त्यानं आत्मविश्वास वाढत जातो. उत्तम दर्जाला पर्याय नाही हे सूत्रं पक्कं लक्षात ठेवावं लागतं.
वाइनचा व्यवसाय जरा स्थिरस्थावर होतोयसं वाटे तो दुसरा एक व्यवसाय माझ्याकडे चालत आला. एके दिवशी किटी अ‍ॅडम नावाची एक ब्रिटिश बाई मला भेटायला आली. लंडनमधलं ‘ऑसबॉर्न आणि लिटल’ ही कंपनी पडद्यांच्या, कोचाच्या कापडाची निर्मिती करते. त्यांची ती कलातज्ज्ञ आहे. एकदा तिनं मला सारख्या आकाराचे सात षटकोन दाखवले. म्हणाली, ‘‘यांचं मला एक फूल करून हवं आहे. एका इंचात ११ टाके आले पाहिजेत. मी त्या संध्याकाळी ते स्वत:च करून पाठवलं. ते पाहून तिनं तशा १०० फुलांसाठी ७०० षटकोन पाठवले. मी ते घेऊन तळोजाला गेले. तिथल्या काही बायका-मुलांनाही हे काम करायला दिलं. लवकरच त्यांनी तपशिलाप्रमाणे १०० फुलं केली. ती एकमेकांना जोडायला सांगून आमच्या नकळत किट्टीनं आमच्याकडून एक लहान क्विल्ट तयार करवून घेतली. त्यानंतर ती स्वत: तळोजाच्या त्या खेडय़ात आली आणि तिनं इंटरलायनिंग आणि लायिनग लावायचं शास्त्र आम्हाला शिकवलं. ते आम्ही आत्मसात केल्यावर ‘ऑसबॉर्न आणि लिटल’ यांच्याशी क्विल्ट करण्याचा उद्योग सुरू केला. त्या इतक्या सुंदर व्हायला लागल्या की एके दिवशी प्रत्यक्ष फेलिसिटी ऑसबॉर्नचा मला फोन आला. ‘‘अचला, तुझ्या क्विल्ट इतक्या छान होतायत, मी त्या बकिंग हॅम पॅलेसमध्ये विकू शकेन,’’ ती म्हणाली. तळोजाचं खेडं कुठच्या कुठे पोचलं!
क्विल्टचा व्यवसाय स्थिर होईतो, आणखी एका उद्योगाचं आव्हान हाती आलं, ते च्यवनप्राश करण्याचं. आमचे कुटुंबस्नेही डॉ. बाळ खरे यांनी त्यांचे आजोबा-जगन्नाथ पुरीचे शंकराचार्य यांची च्यवनप्राश प्रक्रिया मला दिली आणि त्याचा तुफान खप व्हायला लागला. एक तिसरा उद्योग सुरू झाला.
माझ्या या सर्व व्यवसायांसाठी त्यांचे परवाने घेतलेले आहेत. एक एक परवान्यासाठी मिळवावी लागलेली ‘ना हरकत प्रमाणपत्रं’ अनेक विभागांत दहा-दहा खेपा घालून मिळवली. त्यात खूप ऊर्जा गेली. हे सर्व मिळवताना किती कष्ट घ्यावे लागले, किती लोकांना भेटायला लागलं तो एक मोठय़ा कथेचा विषय आहे, पण ते स्वच्छपणे मिळाल्याचं समाधान आणि आत्मविश्वास माझ्या कामातला कणा आहे. न. र. फाटक म्हणाले त्याप्रमाणे कोणी ‘लुंग्यासुंग्या’ येऊन आम्हाला प्रश्न विचारू शकत नाही. प्रामाणिकपणे व्यवसाय करण्यातली ही फार मोठी जमेची बाजू असते.
प्रत्येक उद्योगाची सुरुवात अगदी लहान प्रमाणात झाली आहे आणि ग्राहकांच्या मागणीनुसार ते उद्योग हळूहळू वाढवीत नेले आहेत. वाइनच्या उद्योगाची सुरुवात जशी अवघ्या एकशे दहा रुपयांच्या भांडवलातून झाली होती, तशीच च्यवनप्राशची पहिली मागणी फक्त वीस किलोंची होती आणि क्विल्टचे पहिले विकलेले फूल फक्त सात पाकळ्यांचं होतं. छोटेखानी स्वरूपात उद्योग सुरुवात करणे हे सावधपणाचं लक्षण आहे.
माझे हे विविध उद्योग चालू असताना माझं ‘श्रद्धानंद’मध्ये जाणं थांबलं नव्हतं. ते माझ्या आईला दुसरं घर वाटे आणि मलाही. ‘श्रद्धानंद’ आश्रमामध्ये गेलं की तिथल्या स्त्रियांच्या जीवनाची होणारी परवड पाहून मन खिन्न होई. गोजिरवाणं, असहाय तान्हं कचराकुंडीत टाकून गेलेल्या स्त्रियांच्या रूपानं मानवी मनोव्यापाराची लाजिरवाणी लक्तरं समोर येत. या सर्वाचं योग्य ते पुनर्वसन आम्ही आश्रमातर्फे करत असलो तरी मन कोडगं होत नाही, ते ढवळलं जातंच. बरेचदा मी भागवतसरांकडे मन मोकळं करत असे. ‘‘अचला, आज तुम्ही या प्रकरणात फार गुंतला आहात. विकृतीला नित्याचं वास्तव समजून नको ते प्रश्न तुमच्या मनात निर्माण होतायत. काही दिवस जाऊ देत. तुमचा आश्रम समाजाप्रमाणे कसा बदलत गेला ते लिहा.’’ असं ते मला अनेकदा सुचवत होते. त्यातनचं माझं ‘आश्रम नावाचं घर’ हे पुस्तक साकारलं. त्यानंतर मी फाटकसरांचं चरित्र आणि इतरही काही लिखाण केलं. कुठे तरी माझे गुरुजी माझी साहित्यनिर्मिती पाहत असतील ना, असं मनात येत राहतं.
वास्तविक उद्योग आणि समाजकार्य यांची प्रकृती मूलत:च भिन्न आहे, पण समाजकार्यात उद्योग नाही आणि उद्योगात समाजकार्य नाही, हे असिधाराव्रत मी निष्ठेने पाळते. हे सर्व होत असताना समाजातल्या इतरही घटना आणि समस्या माझं लक्ष वेधत असत.
इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत माझं शिक्षण झालं होतं. तिथं व्यवस्थापन मंडळात काही कुरबुरी चालू असलेलं कानांवर येई. वाईट वाटे. ९२ साली हे वाद विकोपाला गेले. त्या वेळी झालेल्या निवडणुका अटीतटीच्या झाल्या. संस्थेच्या प्रगतीला कारण झालेल्या लोटलीकरांविरुद्ध काही मंडळी उभी राहिली होती. लोटलीकर आणि संस्थेचे अध्यक्ष पद्माकर ढमढेरे यांनी मला निवडणुकीला उभं केलं. दणदणीत मतांनी लोटलीकर पॅनेल निवडून आलं. तेव्हापासून या मोठय़ा शिक्षण संस्थेशी माझा जवळून संबंध आला. तिथे जमेल ते काम उचलत गेले. या शिक्षण संस्थेशी आणि तिथल्या कार्यकारी मंडळांशी, कर्मचारीवर्गाशी माझे आत्मीयतेचे संबंध आहेत. आश्रमाशी तर माझे ऋणानुबंधच आहेतच, पण शाळेशीसुद्धा माझं जवळचं नातं निर्माण झालं आहे.
‘मराठी विज्ञान परिषद’ ही एक नावाजलेली संस्था. अ. पां. देशपांडे यांच्यासारखा ध्यास घेऊन विज्ञानाचा प्रसार करणारा खंदा कार्यकर्ता संस्थेचा खूप मोठा कारभार सांभाळतात. तिथे माझी विश्वस्त या पदावर नेमणूक झाली आहे. तिथेही जाण्याची मला ओढ वाटते. तिथे होणाऱ्या कामाचे दृश्य परिणाम मला आनंद देतात. तिथे जयंतराव नारळीकर, डॉ. काकोडकर, डॉ. जोशी, प्रभाकर देवधर, डॉ. प्रमोद लेले यांसारख्या मंडळीत बसताना खूप संकोच वाटतो, पण त्या अलभ्य लाभाचं आकर्षणही वाटतं हे कबूल करायलाच पाहिजे.
गेल्या वर्षी मला ‘मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळ’ या एका उत्तम काम करणाऱ्या संस्थेची अध्यक्ष होण्याचा सन्मान त्यांच्या कार्यकारिणीनं दिला. संस्थेचे अध्यक्ष अनंतराव भालेकर आणि त्यांचे सहकारी साठे, मकरंद चुरी दीपा मंत्री आदी सगळे कार्यकत्रे उत्साही, नि:स्वार्थी, कल्पक आणि प्रामाणिक आहेत. असे सहकारी असले तर संस्था झपाटय़ानं पुढे जाईल या खात्रीने मी ते पद स्वीकारलं आहे. त्याबाबत खूप स्वप्न आहेत, काय साधेल ते पाहायचं.
आता पंचाहत्तरी उलटून गेल्यावर पूर्वायुष्यावर नजर टाकल्यावर आयुष्यानं घेतलेल्या वाटा आणि त्यात आलेली वेगवेगळी वळणं दिसतात. जाणवलं, त्या त्या वाटेनं जाताना वळणं येत गेली ती तशी तशी पार करत गेले. त्या वेळी ती जाणवलीही नाहीत, कारण वाट पार करण्याचा ध्यास होता. ही सर्व वेगळी जगं आहेत. माझ्या तिथल्या वावरात एरवीच्या आयुष्यात कधी भेटली नसती अशी माणसं भेटली. माझं जीवन संपन्न करत गेली. आज आयुष्याचा जमाखर्च मांडताना मला जमेची बाजू जड झालेली दिसत आहे. ती यशस्वीपणे पार पाडण्याची ताकद ज्यांनी दिली ती भक्कम संस्कारांची मुळं खूप पूर्वीच रुजल्याचं लक्षात येतं. आता शेवटचं वळण सुलभ व्हावं एवढीच इच्छा!

‘देव’, ‘धर्म’ हे शब्दही न उच्चारता ताराबाईं मोडक यांनी माझ्या मनात त्या अव्यक्त, अलौकिक शक्तीबद्दल कुतूहल उत्पन्न केलं होतं. लहानसहान गोष्टीतलं सौंदर्य आणि अर्थ पाहायला आणि त्यांची निर्मिती करणाऱ्या त्या अव्यक्त शक्तीचा आदर करायला शिकवलं होतं. इतकी मोठी ही शक्ती! आपल्या हातनं काही चुकीचं झालं तर तिला ते आवडणार नाही, ही पापभीरू भावना त्या लहान वयातच मनात कायमसाठी वस्तीला आली.

माझ्या या सर्व व्यवसायांसाठी त्यांचे परवाने घेतलेले आहेत. एक एक परवान्यासाठी मिळवावी लागलेली ‘ना हरकत प्रमाणपत्रं’ अनेक विभागांत दहा-दहा खेपा घालून मिळवली. त्यात खूप ऊर्जा गेली. हे सर्व मिळवताना किती कष्ट घ्यावे लागले, किती लोकांना भेटायला लागलं तो एक मोठय़ा कथेचा विषय आहे, पण ते स्वच्छपणे मिळाल्याचं समाधान आणि आत्मविश्वास माझ्या कामातला कणा आहे.

स्क्रीन प्रिटिंगचं शास्त्र मी स्वत: शिकून माझ्या कर्मचाऱ्यांना शिकवलं. आश्चर्य वाटेल अशा कुशलतेनं रंगलेली पान, फुलं, पक्षी कागदावर उतरू लागले. पुढे आम्हाला ‘मार्ग पब्लिकेशन’च्या डायऱ्या छपाईचं काम आलं. काम पूर्ण करून ते छपाईला देऊन मी दुसऱ्या एका कामासाठी गेले. तेथून परतले तेव्हा दृष्ट लागेल अशी छपाई झाली होती, पण त्यातला एक कागद हाती घेतला आणि कळलं इंग्रजीतील आयवरचा टिंब आणि टीवरची रेघ गायब! कर्मचाऱ्यांच्या क्षमता जाणूनच काम द्यायला हवं हा मंत्र या उद्योगाने मला शिकवला पण तो फारच महागात पडला. त्यामुळे हा उद्योग मी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्यात येऊ घातलेला बनचुकेपणा कायमचा नाहिसा झाला. उद्योग अशा उदाहरणातून विनम्रता शिकवतो हेच खरे.

 

joshi.achala@gmail.com