‘‘मी एक तमासगीराचा पोर, जगण्यासाठी आयुष्य सवलत देत नव्हतंच, बकऱ्या सांभाळल्या, शेणसारवण केलं, रुग्णालयात सफाई कामगाराचं काम केलं. हमालीही केली. पण शिक्षण चालूच होतं आणि तमाशात गाणंसुद्धा. पथनाटय़ं केली, राज्यनाटय़ाचे धडे गिरवले.. अनेकदा एक वेळ उपाशी राहिलो. दरम्यान, नाटय़शास्त्र विभागातलं शिक्षण पूर्ण झालं आणि जळगावच्या कॉलेजात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. पुढे पीएच.डी. ही केली. नंतर एक वेगळं वळण मिळालं ते मुंबई विद्यापीठातल्या लोककला अकादमीचा विभागप्रमुख पदाच्या नियुक्तीनं. पण गाणं चालूच आहे. राष्ट्रकुल खेळांच्या उद्घाटन समारंभातल्या सहभागामुळे लता मंगेशकर, पं. जसराज यांच्यासोबत शाहिरी परंपरा उभी राहिली. आता ‘लोकमान्य’ चित्रपटासाठी नि संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव- मस्तानीसाठी’ पोवाडा गायलोय.. पारंपरिक कलेनं मला माझी ओळख दिलीय..’’

आम्ही लोककलावंत त्यामुळे आम्ही एका जागी कधीच स्थिर नाही. आमच्या आयुष्यात वळणंच वळणं आणि वाटाच वाटा! लोकांच्या कृपेवर राहायचं. त्यांना हसवायचं. ते हसले की आपण हसलो. त्यांना राग आला की आपण संपलोच. कळायला लागलं तेव्हापासून मनोरंजनाच्या नवनव्या वाटा शोधतोय..
आम्ही चंदनशिवे मूळचे तमासगीरच. बीड जिल्ह्य़ातल्या राजेगावचे. माझे वडील संपतराव माधवराव चंदनशिवे. तमाशासाठी आम्ही गाव सोडून जाफरबाद तालुक्यातल्या टेंभुर्णीला आलो. गावाबाहेर कुठं तरी पालं टाकायचा. पावसाळा सोडून नऊ महिने भटकंती. गावोगाव जायचं. तमाशा करायचा आणि पहिल्या पाण्याला जालना जिल्ह्य़ातल्या आमच्या टेंभुर्णीला परतायचं. सात चुलते, दोन आत्या, आजी- आजोबा, वडील-आई असं मोठं कुटुंब. आमचं गुरू घराणं- संत परंपरेतलं! एकतारीवर भजनही गायचो, समगाथाही गायचो. त्यामुळे या दोन्ही परंपरा आमच्याकडे होत्या. आमची तमाशा पार्टी म्हणजे ‘शंकर महार चंदनशिवे लोकनाटय़ पार्टी! त्या काळात जातीचाही उल्लेख नावात असायचा. १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व दिली तेव्हापासून आम्ही नवबौद्ध झालो. माझे मोठे चुलते शंकरराव, हे आमच्या तमाशा पार्टीत सोंगाडय़ाचं काम करायचे आणि वडील नाच्या पोराचं. बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर एकदा मोठय़ा काकांनी तोताराम चंदनशिवेंनी बाबांना खूप मारलं. म्हणाले, ‘‘नाच्याची कामं करतोस. मग शिकणार कधी? शिकायला जात जा.’’ आमच्या त्या गावात शाळा नव्हती. ते निजामाचं संस्थान होतं. जाफराबादच्या किल्ल्यात शाळा भरायची. हाताशी पैसे नसायचे. वडील रात्री तमाशा करायचे. (आमच्या तमाशाला बालेघाटी तमाशा म्हणत.) ते करता करता बाबा कंटाळले. घर सोडून पळून गेले. जालन्यातल्या जनता हायस्कूलच्या बोर्डिगमध्ये राहिले व शिकले. कोणी तरी सांगितलं म्हणून भोपाळला गेले. तिथे
एन. डी. एस कोर्स करून फिजिकल इन्ट्रक्टर झाले. आणि १९६२ साष्टं पिंपळगावला त्यांची क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती झाली.
माझ्या जन्मानंतर आईला बाळंतरोग झाला असावा. ती वरचेवर आजारी पडू लागली. तोवर उत्साहाने जिथे जिथे नोकरी असेल तिथे तिथे स्पर्धा, गणेशोत्सव साजरे करणाऱ्या बाबांना दारूचं व्यसन लागलं. आम्ही एका जागी स्थिर होता होता वाताहत झाली. जालना जिल्ह्य़ातल्या मंठा तालुक्यातल्या बेलोटा गावी त्यांची बदली झाली. इथेही कोणी कर्ज देईना. किराणा दुकानदार रोजचा किराणा देईना. मी आठवीत असेन तेव्हा. बाबांना सांगून मी बकऱ्या आणल्या. त्या पाळल्या. सरपण गोळा करून आणायचो. ते विकायचो. बकऱ्या पाळताना, सरपण गोळा करताना माळावर मोठमोठय़ाने गायचो. शिक्षकाचा मुलगा असलो तरी रक्त तमासगीराचं होतं.
नववीत असताना वडिलांची बदली, तळणी गावी झाली. तिथे गणपतराव पाटील यांच्याकडे महिन्याने राहिलो. ‘महिन्याने राहिलो’ म्हणजे त्यांच्याकडच्या जनावरांना चारा घालायचा, शेणसारवण करायचं, शेताला पाटाने पाणी द्यायचं, हे सारं दहापर्यंत उरकून शाळेत जायचं, त्या बदल्यात पाटलांनी रोज भाकर द्यायची, महिन्याला चार पायल्या ज्वारी द्यायची, वर १०० रुपया महिना द्यायचे. असं चालायचं. दहावीत असताना वडील वारलेच. आम्ही टेंभुर्णीला परतो. मग आईच्या नावे वडिलांचे पेन्शन सुरू झाले. शिक्षकाची बायको असणारी माझी आई- मंदाबाई, पेन्शन पुरेना म्हणून घराबाहेर पडली, कापूस वेचू लागली, मका भिजवू लागली, त्यातून मिळणाऱ्या पैशानं आम्हाला जेवू घालू लागली. इकडे माझं गाणं आता रोजगाराचं साधन बनू लागलं. आमची तमाशा पार्टी मोडलीच होती. मग मी दुसऱ्या लोकांच्या तमाशा पार्टीत गाऊ लागलो. ग्रामीण रुग्णालयात नोकरी करू लागलो. रात्री फडात गायचं. दुपारी रुग्णालयात तात्पुरती नोकरी करायची. त्या वेळी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) सारखी संस्था आमच्या ग्रामीण भागात डोळय़ांची चिकित्सा शिबिरं भरवत असे. मी त्यांच्या प्रसिद्धीची कामं- हॅडबिलं वाटून, रस्त्यारस्त्यात-चौकाचौकात दवंडी पिटवून करत असे. दिवसाला १० रुपये मिळत. मी मनापासून काम करायचो. ‘नॅब’च्या डॉक्टर मंडळींना माझं काम आवडलं व त्यांनी ग्रामीण रुग्णालयात बदली सफाई कामगार म्हणून रोजगारावर लावलं. तिथं सगळी कामं करायचो. संडास सफाई, झाडलोट करणं, ड्रीप बेड साफ करणं, बाळंत झालेल्या स्त्रियांच्या नाळेची व्यवस्थित विल्हेवाट लावणं, पोस्ट मॉर्टमला मदत करायची एक ना एक हजार कामं. पण ती कामं करताना डोक्यात एखादं गाणं सुरू असायचं. सगनभाऊची लावणी असायची. त्यांच्या पद्धतीवर आपल्याला काही जुळवता येतं का ते मी पाहायचो. त्या वेळी मी जाफराबादला सिद्धार्थ महाविद्यालयात शिकत होतो. विनाअनुदानित महाविद्यालय होतं ते. तिथे डॉ. सुखदेव मांटे प्राचार्य होते. ते व गोपाळ बचेरेसर दोघांनी सांभाळून घेतलं. टेंभुर्णी-जाफराबाद अंतर ८ कि.मी. आहे. बसचं भाडं महिना ४० रुपये होतं. वडिलांचं र्कज आणि घरखर्च यातून हाती फारसा पैसा उरत नसे. तेव्हा स्वत:चा फार पगार नसतानाही हे शिक्षक मला बसभाडय़ाचे पैसे देत असत. दिवसाचे चोवीस तासही कमी पडत असत. तमाशा शनिवार, रविवार रात्री असे. आणि तमाशाचे दिवस सामान्यत: मार्च ते मे महिन्यात असत. त्यामुळे तमाशा, हॉस्पिटल, कॉलेज यांचं तंत्र सांभाळता येई. दीपावलीच्या सुट्टीत मी बिगारकाम करण्यासाठी मुंबईत येई. कांदिवलीच्या बहिणीकडे उतरे आणि भांडुप, कांदिवलीच्या नाक्यावर बिगारकामे मिळवायला उभा राही. दिवसाला १०० रुपये मिळायचे. सर्व खर्च वजा जाता उरे ती रक्कम घेऊन कॉलेजच्या फीची जुळवाजुळव, कर्जफेडीची धावपळ चाले. सरकारच्या सवलती मिळत होत्या. पण आयुष्य सवलत देत नव्हतं. खांद्यावरचं ओझं उचलताना प्रभाकर किंवा पठ्ठे बापूराव यांची मुंबईवरची लावणी मी गुणगुणत असे. शब्द गाताना खांद्यावरचं ओझं हलकं होई..
सिद्धार्थ कॉलेज, जाफराबाद इथे शिकताना
याचवेळी माझ्या शिक्षकांनी मला विद्यापीठाच्या युवा महोत्सवासाठी पाठवलं. पहिल्याच वर्षी गाण्याची आणि अभिनयाची सुवर्णपदके मला मिळाली. मग मी झोनल व नॅशनल स्पर्धासाठी खेळलो. मी बारा वेळा विद्यापीठाचे ब्लेझर मिळवलेत. पदवीची तीन र्वष आणि नंतर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागातर्फे पाच र्वष मी युथ फेस्टिवलमध्ये भाग घेतला. त्यानंतर एकदा मी टेंभुर्णीत गेलो आणि थंडीच्या दिवसात सर्वाना ब्लेझर वाटून टाकले. त्यांच्याही जगण्याचा थोडासा वाटा माझ्या गाण्यात होताच ना.
मला शिकायचं होतं. पदवी मिळवल्यावर मी पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं ठरवलं. याचं कारण साधंसं होतं, ते मिळवताना मला नाटय़शास्त्राचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करता येणार होता. पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या अभ्यासामुळे मला हॉस्टेल व स्कॉलरशिप मिळणार होती. त्यामुळे औरंगाबादचं वास्तव्य थोडंसं निभावलं जाणार होतं. मला त्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या योजनेचा फायदा मिळणार होता. एकाच वेळी पदवी आणि पदविका प्रमाणपत्र मिळणार होतं.
पदवी पूर्ण होई तो मी रुग्णालयात नोकरी केली. पदव्युत्तर अभ्यासाच्या वेळी म्हणजे १९९७ नंतर युथ फेस्टिवल वगैरेंच्या सोबतीनं मी पथनाटय़ं करू लागलो. स्वत:च लिहायची, मित्रांसोबत सादर करायची. त्यातून थोडेसे पैसे मिळायचे. डोक्यात सतत कलेचीच चकं्र चालू असायची. त्या काळात एकतर्फी प्रेमातून मुलींची हत्या करण्याची प्रकरणं घडत होती. तो विषय, एड्स जनजागृती, बेरोजगारी, व्यसनुमक्ती अशा सामाजिक विषयांवरही पथनाटय़ं सादर करायचो. त्याची संहिता नसायची. ऐन वेळी जसं सुचेल तसं करायचो. पण ते लोकांना आवडायचंच. जेव्हा डॉ. पी. सी. अलेक्झांडर, महाराष्ट्राचे राज्यपाल होते, तेव्हा त्यांनी आंतरविद्यापीठीय अश्वमेध क्रीडा महोत्सव सुरू केला. पहिल्याच महोत्सवाची थीम ‘एड्स जागृती’ ही होती. माझं पथनाटय़ तेव्हा सादर केलं होतं. गोपीनाथ मुंडे यांना ते एवढं आवडलं की त्यांनी त्यांचा त्या वेळचा एक महिन्याचा पगार आमच्या पथकाला बक्षीस म्हणून व एड्स मुक्तीच्या प्रसार-प्रचारासाठी दिला.
औरंगाबादचाही प्रवास खडतर होता. दिवसा एकदाच डबा यायचा. तो दोन वेळा पुरवायचा. त्यातला निम्मा डब्बा रात्रीपर्यंत नासून जायचा. मग पाणी पिऊन भूक मारून टाकायचो. आजही पोटभर जेवण जात नाही. पण माझी कलेची भूक भागत होती. प्रा. लक्ष्मणराव देशपांडे आणि डॉ. रुस्तुम अचलखांब यांनी जे नाटय़कलेचे धडे दिले ते मनात भिनले. रक्तात संगीत नाटक होतच. पण ते स्वैर होतं. ओबडधोबड होतं. देशपांडे सरांनी रंगमंचाची शिस्त दिली. अचलखांब सरांनी लोककलेकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. तिथे मोहन आगाशे, मोहन तोंडवळकर आदी मोठमोठी कलावंत मंडळी शिकवायला येत. त्यांचे अनुभव मिळाले. त्या काळात संध्याकाळी काही तास मी पी. सी. ओ.वर काम करत असे. रात्री विश्वास साळुंखे सरांसोबत ‘तमाशा’ करत असे. वेगवेगळे गण, गवळण, बतावण्या ऐकत असे. कुठून तरी एक रेकॉर्ड करू शकणारा वॉकमन मिळवला होता. त्यावर सारं रेकॉर्ड करत असे. अक्षरश: महाराष्ट्रभर फिरलो. भिका भीमा सांगलीकर यांच्याकडच्या हिराबाईंनी तर मला मुलगा मानलं होतं. त्यांनी त्यांच्याकडचं सारं संगीत, गण, गवळण आदी मला दिलं. त्यांनी खूप जीव लावला.
मार्चमध्ये मी तमाशात काम करायचो. रात्री कलेचा राजा असायचो तर दिवसा प्रजा असायचो. महाराष्ट्रात सगळीकडे जत्रा भरतात. त्या जत्रांत तमाशा ही महत्त्वाची गोष्ट. पंधरा पंधरा दिवस या जत्रा भरत. तमाशातला माझा पार्ट झाला की मी तिथून बाहेर पडे. एका मोडक्या बॅगेच्या अध्र्या भागात मी छोटे छोटे खण केले. त्यात पान, बिडी, सिगरेट, मावा, काडेपेटय़ा असं ठेवून ती बॅग गळ्यात अडकवून रात्रभर ते सारं विकत जत्राभर फिरायचो. रात्री सातेकशे रुपयांचा धंदा व्हायचा व शंभर-दोनशे रुपये सुटायचे. मी लहान होतो. एकदा जत्रेतल्या जादूचा खेळ करणाऱ्या माणसाने माझ्याकडचे सुटे पैसे घेतले व ते रात्री परत देतो, असं सांगितलं. पण त्याने ते परत दिले नाहीत. मी मागायला गेलो तर मला खूप मारलं. त्याच्याकडच्या मुलांनी माझी बॅग उधळून दिली. जमवलेले सारे पैसे तर गेलेच पण सामानही गेलं. मी रडत बसलो. थोडय़ा वेळाने मला सामान देणाऱ्या प्रमोद सोनावणे यांच्याकडे गेलो. त्यांनी माझी समजूत काढली व पाचशे रुपयांचा माल उधारीवर दिला. एका बाजूला वाईट माणसं असतात तर दुसऱ्या बाजूला चांगली माणसं त्यांची भरपाई करतात. म्हणून तर जग चालतं.
तमाशाचा फड उभा करताना सर्वप्रथम बल्ले उभा करावा लागतो. बल्ले म्हणजे तमाशाची कनात ज्या मधल्या मुख्य खांबावर उभी असते तो खांब. मी बल्ले उभे करणाऱ्या टीममध्ये असे. त्यामुळे सर्वप्रथम आम्हाला पुढच्या मुक्कामाला पळावं लागे. रात्री उशिरा झोपलं तर सकाळी उठवत नाही. अशा वेळी तमाशाचा मॅनेजर पेकाटात लाथ मारायचा व उठवायचा आणि पुढे पळवायचा. एका मुक्कामात आम्ही बल्ले उभा करत होतो. एक जण बल्लेसाठी पहारीने खणत होता व आम्ही दोघं तिघं माती उपसत होतो. ते उपसता उपसता पहार मारणाऱ्याच्या लक्षात आलं नाही. त्याने जोरात पहार मारली ती माझ्या डाव्या हाताच्या करंगळीच्या बाजूवर पडली. अक्षरश: दोन भाग झाले. डोक्यात कळ गेली. हात दाबून ठेवला. पट्टी बांधली. बल्ले उभा केला आणि रात्री गण, गवळण सादर केली. नंतर अभ्यासात कळलं की, शेक्सपीअर म्हणतो, ‘शो मस्ट गो ऑन.’
तमाशाचे फड नेहमी हागणदारीत – गावाबाहेर तिथे मातीची ढेकळं आणि त्यातून बाहेर पडणारे विंचू- साप. त्यांचं चावणं नेहमीचंच असायचं. मला कधी कधी असं वाटतं की, या एवढय़ा पारंपरिक कलेला जपणाऱ्या कलावंताच्या नशिबी ही हागणदारी का? सगळ्या पातळीवरून प्रयत्न होऊनही रसिक या कलेची उपेक्षा का करतात?
आम्ही तमाशा करणारे किंवा लोककलावंत तसे रागदारीच्या बंधनात नसतो. खरं तर ते आम्हाला कळतच नाही. मला एकही वाद्य येत नाही. रागांची ओळख आता आता होऊ लागलीय. लोककलेतलं गाणं ‘दांगट’ धाटणीतलं असतं. लोकगायक हा शास्त्रीय संगीत शिकलेला नसतो. तो तालाबाहेर ही जातो. तो त्याच्या आवाजाबरोबर खेळत असतो, त्याच्या त्याच्या आवाजाच्या टप्प्याप्रमाणे (रेंज) त्याच्या आवाजाच्या फेकीप्रमाणे स्वातंत्र्य घेतो पण तो समेवर अचूक येतो. ते त्याला अंगभूतपणे येतं. तबल्यासारखं परिपूर्ण वाद्य लोककलावंताकडे नसतं. त्याच्याकडे हलगीसारखं रणवाद्यं असतं. ढोलकी असते. त्यामुळे तो त्याच्या गाण्यातल्या रांगडेपणाला, रासवटपणाला सांभाळतो. आता आता ढोलकीतील बोल बंदिस्त करायला सुरुवात झालीय. आमच्या गाण्याला संगीताच्या भाषेत ‘आडवं’ गाणं म्हणतात.
हे सारं शास्त्र शिकता शिकता मी नाटय़शास्त्र विभागातलं शिक्षण पूर्ण केलं. प्रारंभी ग्रामीण भागातल्या, जळगावच्या एम्. जे. कॉलेजात प्राध्यापक म्हणून रुजू झालो. तिथे करमलं नाही. तिथून बीडला के. एस. के. महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काही र्वष काम केलं. हे करताना मुंबईतलं माझं सुट्टीतलं नाक्यावरचं हमालकामही सुरू होतंच. त्याच वेळी मुंबई विद्यापीठात लोककला अकादमीत
पदासाठी निवड सुरु होती. मी तिथे अर्ज टाकला. व पुन्हा तमाशा करायला आणि माझ्या नोकरीत रुजू झालो. मुलाखतीला बोलावणं आलं. केवढे थोरले लोक मुलाखतीला आले होते. त्यांची नावं ऐकली होती फक्त. डॉ. जब्बार पटेल, दामू केंकरे, कमलाकर सोनटक्के, तारा भवाळकर,
अरुणा ढेरे, प्रकाश खांडगे आणि डॉ. विजय खोले. धास्तावलो होतो. कमलाकर सोनटक्केंनी मला गाऊन दाखवायला सांगितलं. खडा आवाज लावला आणि जिंकलोच. काही दिवसांनी माझ्या नियुक्तीचं पत्र घरी आलं. हे पत्र आणि बायको एकदमच घरी आली.
माझ्या लग्नाचीपण कहाणीच आहे. मी लग्नाला तयार नव्हतो. मी लावणी महोत्सवासाठी अकलूजला गेलेलो. अचानक आईचा निरोप आला, ‘मी अत्यवस्थ आहे आठवण येतेय. भेटायला ये.’ धावत गेलो टेंभूर्णीला. तर तिथं आईनं, मामानं सांभाळलेली एक मुलगी माझी बायको म्हणून निश्चित करून ठेवलेली. तिची इच्छा कपाळी धरली. सकाळी नऊ वाजता मुलगी पाहिली, दुपारी एक वाजता लग्न केलं, चार वाजता तिला घरी आणली तर मुंबई विद्यापीठाचं पत्र आलं होतं. बायको अनिता पायगुणाची ठरली. तिला फक्त एकच सांगितलं, ‘लग्नाआधी तू एका मुलीची आई आहेस. तिला सांभाळायचंस.’
त्याचं असं झालं होतं. मी अकरावीत असताना मला रस्त्यात एक छोटं अर्भक कुत्रा पळवून नेताना दिसला. ती मुलगी होती. तिला कुत्र्यापासून सोडवलं. डॉक्टरांकडे नेऊन तपासणी करवली. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपासाअंती कळलं दारूच्या व्यसनानं सैरभैर झालेल्या माझ्या भावाचीच मुलगी होती ती. आमच्याशी भावाने संबंध ठेवला नव्हता. मी हट्टानं ते बाळ सांभाळायचं ठरवलं. तिला अनितानं स्वत:च्या लेकीसारखं प्रेमानं सांभाळलं. गेल्या साली तिचं- मनीषाचं लग्न झालं. मला दोन लेकरं. आदित्य आणि गौरी. मी लग्न झाल्यावर प्रारंभी कांदिवलीला दामूनगरच्या झोपडपट्टीत राहिलो व नंतर वसईला घर घेतलं. आई माझ्याकडेच असते.
मुंबईत आल्यावर माझं जगणंच बदललं. मी लोकांना परिचित होऊ लागलो होतो. विख्यात तालवाद्यवादक तौफिक कुरेशी हे ‘फॉरेस्ट’ नावाचा आल्बम बनवत होते व त्यांना एक लोकसंगीत गायला कोणी हवं होतं. माझा सहकारी मित्र विजय चव्हाण (सुलोचनाबाई चव्हाण यांचा मुलगा ) त्यांच्याकडे ढोलकी वाजवत होता. त्यानं माझं नाव त्यांना सुचवलं. तौफिकभाईंनी मला बोलावलं. मी त्यांना गाऊन दाखवलं. त्यांना आनंद झाला. ‘‘मी अशाच गायकाच्या शोधात होतो,’’ ते म्हणाले. मला रेकॉर्डिगचं काडीचंही ज्ञान नव्हतं. पण तौफिकभाईंनी मला धीर दिला. सगळं समजावलं. हळूहळू ट्रॅकवर कसं गायचं, क्लीकवर कसं गायचं ते कळलं. ‘फॉरेस्ट’ अल्बम हिट झाला. तौफिक भाईंनी माझं नाव ‘शैतान’ चित्रपटासाठी रणजित बरोटना सुचवलं. ‘शैतान’ ने मला हिंदी चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिलं. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टी मला ओळखू लागली. अजय-अतुल यांनी लोकसंगीताच्या अनेक रचना मला बोलावून रेकॉर्ड करून घेतल्या. त्याचा त्यांनी नंतर काही ठिकाणी वापरही केला. गुलराज सिंग हा आमचा मुंबई विद्यापीठाचा गुणी कलावंत विद्यार्थी. त्याने मला एके दिवशी स्टुडिओत बोलावलं आणि सांगितलं की, तुम्हाला आज शंकर महादेवन यांच्यासोबत गायचं आहे. मी थरारलोच. जालना जिल्ह्य़ातल्या छोटय़ाशा गावाचा एक लोककलावंत तौफिकभाई, रणजित बारोट, अजय-अतुल, शंकर महादेवन यांच्यासोबत काम करतोय? आजवरच्या कामाची ही पावतीच असावी. शंकरजींना माझं गाणं आवडलं. नंतर आम्ही एकत्र खूप कामं केली. त्यांनी भारतीय लोकसंगीतावर आधारित असा ‘माय कंट्री, माय म्युझिक’ हा कार्यक्रम तयार केला. त्यात माझ्या गणाने प्रारंभ होतो व शंकरजी त्यात सामील होतात. खूप मजा येते. आता आमचं साऱ्यांचं छान मेतकूट जमलंय. उमेश प्रधान आमची छान काळजी घेतात. सिंगापूरला या कार्यक्रमाचा पहिलाच शो पाच हजार रसिकांसमोर झाला. पारंपरिक गोंधळ्याचा झगा घालून जेव्हा मी स्टेजवर आलो तेव्हाचा तो थरार आजही लक्षात येतो. शंकरजी जेव्हा समोर गात असतात तेव्हा रांगडय़ा परंपरेतला मी, त्यांच्या सुसंस्कृत व शास्त्रीय परंपरेशी संमीलित होत असतो. धमाल येते. या साऱ्या दिग्गजांकडून खूप शिकायला मिळतं.
तौफिक भाईंनी मला एक जोमदार अनुभव दिला तो राष्ट्रकूल खेळांच्या उद्घाटन समारंभात गाण्याचा. भारतरत्न लता मंगेशकर, पं. जसराज यांच्यासोबत शाहिरी पंरपरा तिथे उभी राहू शकली, याचा अभिमान वाटला. यानंतर सतत नवनवीन घडत गेलं. मराठीत ओम राऊतबरोबर ‘लोकमान्य’ चित्रपटासाठी पोवाडा गायलो, नुकताच संजय लीला भन्सळींच्या ‘बाजीराव- मस्तानी’साठी पोवाडा, शाहिरी काव्य लिहिलं व गायलंही. ते लोकांना पसंत पडतंय हे महत्त्वाचं कारण शेवटी लोकानुरंजन करणं ही आमची परंपरा. मी घालतो तो घागरा हाही त्या परंपरेचेच प्रतिनिधित्व करतो. हा गोंधळी घागरा ही माझी प्रेरणा आहे. तो घातला की मला आदिशक्तीचा आशीर्वाद मिळतो, असंच वाटत राहतं. त्यातूनच
मग संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारासाठी माझी निवड होते, अ. भा.
मराठी नाटय़ परिषदेच्या बोरिवली शाखेचा
पुरस्कार मला लाभतो. पण हा पुरस्कार हजारो तमासगीरांनी रंगदेवतेपुढे वाहिलेल्या अश्रूंचा, त्यांच्या श्रद्धेचा, त्यांच्या कलेचा हा सन्मान आहे. मी कोणीच नाही.
दरम्यान माझी पीएच.डी. ही झाली. ‘तमाशाच्या सादरीकरणाची बदलती रुपे’ हा विषय घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत
डॉ. पंडित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मला ही पदवी मिळाली. आता सगळं आयुष्य मी कलेला वाहून टाकलंय..
मायबाप रसिकहो, मी आज एवढे नक्की सांगू इच्छितो- उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. ल्ल
शब्दांकन- प्रा. नीतिन आरेकर
nitinarekar@gmail.com

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…