08 August 2020

News Flash

Happy Valentine’s Day: प्रेमाच्या बदलत्या संकल्पना…

'वन नाइट स्टँड'पासून 'डेटिंग अॅप्स'पर्यंत..

Happy Valentine’s Day: प्रेमाच्या बदलत्या संकल्पना...

प्रेम या शब्दाच्या संकल्पना गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या वेगाने बदलल्या आहेत की विचारुन सोय नाही. मुळात या व्याख्या का बदलल्या याविषयी कधी विचार केलाय का आपण? निरागस प्रेमापासून कधी त्याचं रुपांतर ‘वन नाईट स्टँड’ आणि ‘व्हर्च्युअल डेटिंग’मध्ये झालं याचा साधा कानोसाही लागला नाही. पण, प्रेमाचे हे ‘स्मार्ट ट्रेंड’ जसजसे आपल्या आयुष्य़ात आले तसतशा काही संकल्पना जास्तच बदलल्या. त्या बोल्ड झाल्या असंही तुम्ही म्हणूच शकता. आपल्या प्रेयसीला, प्रियकराला किंवा एखाद्या आवडत्या व्यक्तीला भेटवस्तू द्यायची म्हटलं की मनात असंख्य भावना दाटून यायच्या, उगाचंच कवी वगैरे असल्यासारखं वाटू लागायचं.

काळ बदलला आणि भेट देण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी असणारी उत्सुकता काहीशी कमी झाली. ‘सेल्फ पॅम्परिंग’ने तोंड वर काढलं अन् नात्यात उगाचच औपचारिकता नको असं म्हणत अनेकांनीच काही सो कॉल्ड नियम बदलले. पण, एक क्षण असाही आला जेव्हा हीच औपचारिकता गरजेची असते याची अनुभूतीही झाली. फक्त एकत्र असणं, राहणं, फिरणं म्हणजे प्रेम नसतं तर एकत्र असताना त्या एका व्यक्तीची आपल्यावर जबाबदारी आहे, नात्यात विश्वास आहे आणि आपल्याला एकमेकांचा सहवास आवडतो या भावनांची चाहूलही तितकीच महत्त्वाची आहे.

प्रेम ही भावना प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळ्या रुपात समोर येते हे खरं. स्मार्ट आणि आधुनिक काळात प्रेमाच्या या बदलत्या संकल्पनाही तरुणाईने इतक्या सहजपणे स्विकारल्या आहेत की या पिढीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. मुळात ‘वन नाइट स्टँड’ हा शब्द जरी उच्चारला तरीही काहींच्या कापाळावर आठ्या येतात. अर्थात त्याला अपवाद असणारेही बरेच चेहरे आहेत. वाइट काय ‘वन नाइट स्टँड’मध्ये असा प्रश्न मग कोणा एका रोखठोक विचाराच्या तरुणाकडून किंवा तरुणीकडून विचारला जातो. खरंच वाइट काय आहे त्यात, हा विचार अनेकांनीच करायला पाहिजे. नात्याच्या बेडित अडकू न इच्छिणाऱ्या व्यक्ती भेटतात आणि परस्पर समजुतीनेच हे पुढचं पाऊल उचलतात. तो सर्वस्वी त्यांचा निर्णय असतो, जो त्या क्षणाला त्यांना योग्य वाटतो. तर, यात इतरांनी नाकं मुरडण्याचं कारणच नाही.
नव्या संकल्पनांच्या या गर्दीत कानावर येणारी आणखी एक वाट म्हणजे ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’. ही संकल्पना समजून घेण्याची आणि तिची व्याख्या हवी तशी वळवण्याची अनेकांचीच सवय. फ्रेंड्स विथ बेनिफिट्स म्हटलं की, तिच्या किंवा त्याच्यासोबतच्या मैत्रीत असतानाही आपण हक्काच्या व्यक्तीसोबत आहोत इतकी सहजता त्या नात्यात असते. मुळात मित्रमैत्रिणी हीसुद्धा आपल्या हक्काची माणसं असतात. पण, इथे हक्क वेगळ्या अर्थाने घेतला जातो. मैत्रीच्या नात्यात राहून कोणताही भावनिक बंध नाही, रिलेशनशिपमध्ये असल्याची अनुभूती नाही पण, तरीही रिलेशनशिपमध्ये असल्यावर नात्यात गरज असते त्य़ा सर्व गोष्टी वेळ पडल्यास शारीरिक नातंही या ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’मध्ये पाहायला मिळतं. भारतात सध्या ही संकल्पना फारशी रुजली नसली तरीही, त्याला अपवाद नाकारता येत नाहीत.

वन नाइट स्टँड, ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’ या संकल्पनांचाच आणखी एक पैलू म्हणजे डेटिंग अॅप्स आणि व्हर्च्युअल डेटिंग. या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. पण, त्यात डेटिंग मात्र एक सामान्य दुवा आहे. या दोन्ही संकल्पना तुलनेने सध्याच्या पिढीमध्ये जास्तच वापरल्या जात असल्याचं पाहायला मिळतंय. व्हर्च्युअल डेटिंगमध्ये जिथे मोबाईल, स्काईप, चॅटिंगच्या साथीने एक वेगळंच नातं आकारास येत असतं, तिथेच डेटिंग अॅप्समध्ये हे नातं अगदी झपाट्याने पुढच्या पायऱ्यांवर जातं. टिंडर, वू डेटिंग अॅप, ओके क्यूपिड आणि अशी असंख्य डेटिंग अॅप्स सध्या बऱ्याचजणांच्या मोबाईलमध्ये असतात. मुळात हे अॅप्स म्हणजे एखाद्या गंभीर नात्याची सुरुवात नसतेच. पण, सहज मॅच होतोय का, आपल्यासारखं कोणी आपल्या आसपास आहे का, मुळात समोरची व्यक्तीही अशीच कोणाच्यातरी शोधात आहे का, या एक वेगळा प्रयोग करण्यासाठी म्हणून अनेकजण डेटिंग अॅप्सच्या या दुनियेत एकदातरी फेरफटका मारतात. कधीकधी मजामस्करीत मारलेला हा फेरफटका एखाद्याला किंवा एखादीला त्यांच्या आयुष्याचा जोडीदारही मिळवून देतो. त्यामुळे संकल्पना कितीही आधुनिक असली तरीही त्या क्षणाला अमुक एका व्यक्तीची साथ आणि त्या व्यक्तीची उपस्थिती सर्वतोपरी महत्त्वाची असते हे खरं. तेव्हा आता त्या प्रेमाचं कोणतं रुप कोणाला नेमकं कसं आणि कुठे भावतं हे ठरवणंच जास्त महत्त्वाचं आहे. तोवर आयुष्य सुंदर आहे… आणि प्रेमाच्या या वातावरणात त्याला आणखी सुंदर करुन तुमच्या आयुष्य़ात महत्त्वाच्या असणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीला या खास दिवसाच्या शुभेच्छा द्याच.

शब्दांकन- सायली पाटील

sayali.patil@loksatta.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2018 3:08 pm

Web Title: changing concepts of love happy valentines day special
Next Stories
1 V फॉर व्हॅलेंटाइन्सबरोबर V फॉर व्हजायनाही
2 Happy Valentine’s Day: ‘कायदा आणि चप्पल दाराबाहेर ठेऊनच बेडरुममध्ये या’
3 Happy Valentine’s Day: ‘आई, तूच माझी व्हॅलेंटाइन’
Just Now!
X