24 August 2019

News Flash

Happy Valentine’s Day: ‘आई, तूच माझी व्हॅलेंटाइन’

आई.. प्रत्येक मुलासाठी हक्काची प्रेयसी

Happy Valentine’s Day: 'आई, तूच माझी व्हॅलेंटाइन'

प्रिय आई,

बाहेरचा राग येऊन जिच्यावर काढू शकतो अशी तू एकमेव हक्काची आहेस. आईला काय कसंही बोललेलं चालतं, कारण आई असते ना ती, सगळं ऐकून घेते, चार शब्द रागावते आणि पुन्हा तितक्याच मायेने खायला नवनवीन पदार्थ करते, ती प्रेमळ आई. आजच्या मॉर्डन जगातली आई जरी मॉर्डन असली तरीदेखील तिच्यातलं ‘आई’पण काही अजूनही मॉर्डन झालेलं नाही आणि याचाच खरा आनंद आहे. पण आई, तुला खरं सांगू का गं, तू नोकरी कर किंवा करू नकोस, पण रात्री उशिरा घरी आल्यानंतर अर्धवट झोपेतून उठून तू दिलेले तुझ्या हातचे दोन घास खाल्ले कि घरी आल्याचं जे काही समाधान मिळतं ते ह्या जगात कशातच नाही मिळत.

असं म्हटलं जात कि आई आणि मुलीचं नातं हे मैत्रिणींच असतं, पण जगाला काय माहिती आहे, आपल्या दोघांमधलं नातं हे कोणत्याच मित्रमैत्रिणीच्या नात्याला मॅच नाही करू शकत. रात्री नाईट आउटसाठी जाताना बाबा घरी यायच्या आधी तुला मस्का लाऊन कल्टी मारणारा मी, सकाळी बाबांचा ओरडा मिळू नये म्हणून ते ऑफीसला गेल्यानंतर परतणाऱ्या मला वाचवताना तुझी जी काही धाकधूक होत असेल हे तुझे तूच जाणो. बाबा आणि मी, आम्ही दोघंही सारख्या स्वभावाचे आहोत, असं तू नेहमी म्हणतेस, आणि आमच्यातल्या दुवा असलेल्या तुला मात्र आम्ही नेहमी गृहीत धरतो. म्हणूनच आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सगळे आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देत असताना, तू…जे माझं आयुष्यभराचं प्रेम आहे, तिला माझ्याकडून हे छोटसं पत्र. आता तू म्हणशील कि आईला पत्र वगैरे लिहिण्याएवढा मोठा झालास का, तर होय, झालोय मी मोठा, आमच्यासाठी तू करत असणारी धडपड समजण्याइतका तरी मोठा झालोय गं मी. शाळेत कमी मार्क मिळाले तर बाबा मारतील आणि तू ओरडशील म्हणून तुझ्याही नकळत रिझल्टवर तुझी सही करणारा मी, आजही तुझ्याच नकळत तुझी अनेक रूपं पाहत कधी एवढा समजूतदार झालो असा प्रश्न पडत असेल ना तुला हे वाचताना.

मी कॉलेजहून घरी आलो कि मला न जाणवू देता माझ्या टीशर्टला सिगारेट किंवा दारूचा वास येतोय का हे जेव्हा तू बघायचीस ना तेव्हा मला फार मजा यायची तुझ्या भोळेपणाची. तू करत असलेली काळजी बघून तितकंच स्वतःला भाग्यवान देखील समजायचो. मला माहित नाही मी भविष्यात दुसरीकडे कुठे परदेशात वगैरे जाईन कि नाही ते, पण दिवसभर घरात असताना तू जे बोलत असतेस, जिथे मी बऱ्याचदा दुर्लक्ष करतो आणि ज्याला कटकट म्हणतो, ते मात्र मी मिस करेन हा, तुझ्या ह्या रोजच्या बोलण्याला! खरंतर तुला काय मी वेगळं लिहिणार, तुला तर सगळंच माहिती असतं, तू तसं जाणवू देत नसलीस तरीही, मी किती खोटं बोलतोय आणि किती खरं बोलतोय हे तुला व्यवस्थित कळत असतं. शेवटी तुझ्याच रक्तामासापासून बनलोय ना मी, पण मला हेही माहिती आहे कि मी कितीही खोटं बोललो तरीही तू माझी साथ देणार, चुकीच्या ठिकाणी ओरडणार आणि पुन्हा माझ्याच बाजूने उभी राहणार. कारण आई आहेस ना तू! आई, हा शब्द जरी छोटा असला तरी तुझं मन मात्र त्याच्या अगदी विरुद्ध, त्याहून शतपट मोठं आहे हे माहित आहे मला. म्हणूनच माझं हे छोटसं पत्र इथेच संपवतो, बाकी मी कधी काही चुकलो असेन तर मला माफ कर हं, आणि माझ्या ज्या अव्यक्त भावना आहेत, त्याही समजून घे!

तुझाच,

नेहमीच तुझ्यासाठी लहान असणारा…

शब्दांकन- श्रुती जोशी

First Published on February 14, 2018 12:00 pm

Web Title: happy valentine day mother valentine to her son letter from son to his mother