News Flash

Happy Valentine’s Day: बाबा, ‘तो’ नव्हे तुम्ही आहात माझे व्हॅलेंटाइन

या नात्यातील प्रेमाची व्याख्याच अनोखी!

daughter and father
Happy Valentine's Day: बाबा, 'तो' नव्हे तुम्ही आहात माझे व्हॅलेंटाइन

प्रिय बाबा,

लहानपणापासून मी ऐकत आहे, मुलगी ही बापाची सगळ्यात लाडकी असते. पण तेव्हा वाटायचं, कि आई वडिलांसाठी सगळीच मुलं सारखी असतात, परंतु जसजशी मोठी होत गेले, तसं तुमची अनेक रूपं पाहायला मिळाली, कळायला लागली आणि मग ते शतकांपासून चालत आलेलं फॅक्ट पटलं आणि त्याबरोबर अजून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, माझ्या वाढत्या वयाबरोबरच तुमचे केसही पांढरे झाले आहेत हो!

आपलं नातं हे कधीच तितकं कठोर नव्हतं ना आहे. एक मित्र-मैत्रीण आणि बाप-मुलगी हा नात्यातला समतोल खरंतर तुम्ही फार छान पद्धतीने राखला म्हणूनच एखादी गोष्ट व्यक्त करताना आईपेक्षा तुम्हाला आधी सांगावसं वाटतं. लहानपणी शाळेत असताना निबंध लिहिला होता, ‘माझे बाबा’. त्यात असं लिहिलं होतं कि माझे बाबा मला रोज शाळेत आणायला येतात. आता जरी तसं होत नसलं तरीही अजूनदेखील तुमच्याबरोबर बाहेर जाताना तेवढच अप्रूप आणि भारी फिलिंग येतं. जेव्हा मी एखादी गोष्ट करते, तेव्हा बरेचजण म्हणतात, अगदी तुझ्या बाबावर गेली आहेस. ‘तुझ्या बाबावर गेली आहेस’ हे वाक्य कोणत्याही मुलीला इतकं समाधानकारक असतं कि त्याची तुलना ती जगातल्या कोणत्याच गोष्टीशी करू शकत नाही. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जात कि मुलीला बाबाचा धाक हवा. तू ही मला कधी कधी ओरडतोस पण त्या ओरडण्याची सुद्धा मला फार मज्जा येते. कारण तू ओरडलास कि माझ्या डोळ्यात चटकन येणारं पाणी आणि त्यानंतर तुझा गायब होणारा राग ह्या दोघांची जोडी मला खूप आवडते. (कारण नंतर मला माया आवडीच्या बऱ्याच गोष्टी करायला मिळतात), म्हणून खरंतर रडण्याचं नाटक करते मी, आणि मी नाटक करत आहे हे माहिती असून देखील तू तितक्याच प्रेमाने माझे सगळे लाड पुरवतोस. खरंतर आजच्या पिढीच्या बाप-मुलीच्या नात्याएवढं आपलं नातं खेळकर नसलं तरी आपलं नातं सुंदर आहे असं म्हणेन मी. कारण तुला थोडीशी घाबरणारी मी आणि तेवढ्याच मस्तीने तुझी टेर खेचणारी मी हा फरक आताच्या पिढीतल्या मुलींमध्ये नाही आहे. अरे! सॉरी ह, ‘तुम्ही’ वरून ‘तू’ वर आले म्हणून. पण हा मोकळेपणा आवडतोय मला, आणि तुला देखील आवडेल अशी खात्री आहे माझी.

आई नेहमी म्हणते कि एका मुलीचे पालक असणं हे किती कठीण असतं हे आता नाही कळणार तुला. पण हे तू मला कधीच नाही जाणवू दिलं. खरंतर आपण समाजात अशी कितीतरी उदाहरणं बघतो कि मुळीच पूर्ण शिक्षणंही न होऊ देता त्यांची लग्न लाऊन दिली जातात. पण मी ह्या बाबतीत खरंच भाग्यवान म्हणेन स्वतःला. कारण तू आतापर्यंत मला फक्त एक ‘इंडीपेंडंट व्हुमन’ कसं व्हायचं ह्याच हेतूने वाढवलं आहेस आणि अजूनही वाढवतो आहेस. पण एक खरं सांगू का बाबा, इंडीपेंडंट आणि स्वाभिमानी कसं व्हायचं हे मी केवळ तुझ्याकडूनचं शिकले आहे, कारण ‘बाप हा शेवटी बाप असतो’. तू आमच्यासाठी घेत असलेले कष्ट हे तू बोलून दाखवत नसलास तरीही ते समजतं मला आणि त्यानुसार माझ्यात झालेला फरकही तुला समजला असेल किंवा नसेल, पण तू सगळ्यात जास्त भारी बाबा आहेस, एवढचं सांगू शकेन मी. आयुष्यात मी जे काही केलं आहे, करेन ह्यात तुझाच वाटा खूप जास्त आहे, आणि माझ्या प्रत्येक निर्णयात तुझा असलेला पाठींबा हाच मला सगळ्यात जास्त महत्वाचा आहे.

ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षपणे व्यक्त करू शकत नव्हते म्हणून व्हॅलेंटाईन डेच्याच दिवशी मुद्दामून लिहिलं. कारण आपला बाबा पण आपल्यावर प्रियकर किंवा प्रेयसीपेक्षा जास्त प्रेम करतो हे इतरांना समजण्यासाठी आणि अर्थात मला बाकी कोणाहीपेक्षा तूच महत्वाचा व्हॅलेंटाईन आहेस म्हणून!

तुमची आणि तुमचीच लाडकी..

(टीप: हे पत्र सध्याच्या प्रत्येक इंडीपेंडंट असणाऱ्या, होऊ पाहणाऱ्या मुलीकडून…तिच्या बाबारुपी व्हॅलेंटाईनसाठी)

शब्दांकन- श्रुती जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2018 1:02 am

Web Title: happy valentines day my father is my valentine a letter to father from daughter
Next Stories
1 Happy Kiss Day 2018 : किस्सा पहिल्या ‘किस’चा…
2 Valentine’s Week 2018: जाणून घ्या Kiss या शब्दाच्या जन्माची कथा
3 Valentine’s Week 2018: तो तिला म्हणतोय, आज धन्यवाद उद्या वाद असं नकोच आपल्या नात्यात
Just Now!
X