प्रेम म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे गुलाबाचं फुलं. त्यातही लाल रंगाचे गुलाब म्हणजे प्रेमाचे प्रतिकच. पण प्रेमाचा आणि गुलाबाचा संबंध काय असा तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? नाही ना… बरं आता विचारचक्र सुरु झालं असेलच तर डोक्याला जास्त ताण देऊ नका. आम्हीच आजच्या ‘व्हॅलेंटाइन्स वीक’च्या पहिल्या दिवशी म्हणजेच ‘रोझ डे’च्या दिवशी तुम्हाला प्रेम आणि गुलाबाचे काय ‘रिलेशन’ आहे हे सांगणार आहोत या लेखाच्या माध्यमातून.

तसं पाहायला गेलं तर जीवाश्म संशोधनातून उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार गुलाब हे ३ कोटी ५० लाख वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे. मात्र गुलाबांची औपचारिक शेती करण्याची सुरुवात अंदाजे पाच हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये झाली. रोमन साम्राज्याच्या काळात मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबांची लागवड केली जायची. गुलाबाच्या पाकळ्यांपासून सुगंधी अत्तरे, औषधे बनवण्याबरोबरच सजावटीसाठीही त्यांचा वापर त्याकाळापासूनच मोठ्या प्रमाणात केला जात असे. सातव्या शतकामध्ये काही ठिकाणी तर गुलाबांना आणि गुलाब पाण्याला अनेक राजांनी औपचारिक चलन म्हणून घोषित केले. त्यामुळे गुलाबांच्या मदतीने तेव्हा व्यापार होतं असे. जरी चीनमध्ये पाच हजार वर्षांपासून गुलाबाची लागवड होत असली तरी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात लागवडीची गुलाबे युरोपात दाखल झाली. हा झाला गुलाबांच्या जन्माचा आणि प्रसाराचा इतिहास.

Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
lakshmi narayan yoga 2024
एप्रिल महिना सुरु होताच या ३ राशींना मिळेल अपार पैसा; बुध-शुक्राच्या युतीमुळे निर्माण होईल लक्ष्मी नारायण योग!
naralachya rasatali bhendi recipe in marathi
नारळाच्या रसातली भेंडीची भाजी; भेंडीची भाजी गिळगिळीत म्हणून नाकं मुरडणारेही खातील आवडीने

आता गुलाबाला प्रेमाचे प्रतिक असल्याचे का समजले जाऊ लागले हे पाहूयात. गुलाब या फुलाच्या उत्पत्तीचा इतिहास पाहिल्यास त्याला वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळे अर्थ असले तरी ते पवित्र गोष्टींशी संबंधित आहेत. ख्रिश्चन धर्माचा सर्वदूर प्रसार होण्याआधी गुलाबाचे फूल देवीदेवतांच्या पुजेसाठी वापरले जायचे. खास करुन ‘अॅफ्रोडेएट’ म्हणजेच ‘व्हिनस’ (शुक्र) देवीच्या उपासनेसाठी वापरले जात असे. व्हिनस ही प्रेम, सौंदर्य आणि समाधानाची देवी आहे असे ग्रीक लोक मानतात. (ग्रीक भाषेतील मेन्स आर फ्रॉम मार्स अॅण्ड विमेन्स आर फ्रॉम व्हिनस ही म्हण जगभरात लोकप्रिय आहे.) ‘कॉन्स्टटाइन’ साम्राज्याने रोममध्येही ख्रिश्चन धर्माचा प्रसार केल्यानंतर गुलाब म्हणजे व्हर्जिन मेरीचे फूल म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्याप्रकारे गुलाबाचे महत्व धार्मिक कार्यात वाढू लागले त्याप्रमाणे त्यासंदर्भातील विधींनाही महत्व प्राप्त झाले. ख्रिश्चन धर्माप्रमाणेच इस्लाम धर्मातही गुलाबाला खूप महत्व होते. इराण आणि आजूबाजूच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात गुलाबाची लागवड मागील काही शतकांपासून होत आहे. त्यामुळे अगदी गझलांपासून ते देवाची स्तुती करणाऱ्या गाण्यांपर्यंत सगळीकडे गुलाबाचा संदर्भ पाहायला मिळतो. गुलाबाच्या सौंदर्यामुळे नाइटिंगेल पक्ष्याला दिवसरात्र गाण्याची प्रेरणा मिळते अशा संदर्भातील गझलही सुफी लिखाणात सापडतात. सुफी लिखाणात गुलाब आणि प्रेयसीचे तुलनात्मक वर्णन करणारी अनेक काव्य आढळून येतात.

तर दुसरीकडे व्हिनसमुळे ओळख मिळालेल्या गुलाबाला हळूहळू व्हर्जीन मेरीच्या उपासनेसाठी वापरले जाऊ लगाले. इराण वगैरेमध्ये गुलाबाला आधीच प्रेमाचे आणि सौंदर्याचे प्रतिक मानले जात असतानाच नंतरच्या काळात पाश्चिमात्य देशांमध्ये शेक्सपियर आणि समकालीन लेखक आणि कवींपासून गुलाबाने पाश्चिमात्य साहित्यामध्ये प्रवेश केला. सुफी साहित्याप्रमाणेच येथेही गुलाब आणि प्रेमाच्या नात्याला या कवींनी आपल्या शाईच्या रुपाने खतपाणीच घातले आणि पुन्हा एकदा गुलाब आणि प्रेमाचे नाते नव्याने खुलवले. पुढे हाच लिखाणातील गुलाब सिनेमांमधून पुन्हा पुन्हा नव्याने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला. त्यामुळेच आता गुलाबाचे फूल म्हणजे प्रेमाचे प्रतिक ही भावना अनेकांच्या मनात पक्की झाली आहे.

मागील अनेक शतकांपासून लिखित, मौखिक, धार्मिक, सिनेमा अशा अनेक माध्यमातून गुलाबाला पवित्र गोष्टींचे प्रतिक म्हणूनच दाखवण्यात आले आहे. त्यातही लोकप्रिय झालेल्या वाड्मयानंतर लाल गुलाबाला प्रेमाशी आणि एकमेकांबद्दल असणाऱ्या भावनांचे प्रतिक म्हणून त्याचे आदानप्रदान करण्याची प्रथा रुळली आणि म्हणूनच की काय आज अनेक रंगाची गुलाबे उपलब्ध असली तरी लाल रंगाच्या गुलाबाला प्रेमाच्या विश्वात विशेष महत्व आहे.

शब्दांकन- स्वप्निल घंगाळे

माहिती स्रोत: प्रोफ्लॉवर्स डॉट कॉम, गार्डनर्डी डॉट कॉम