व्हॅलेंटाइन डे जवळ आलाय. ज्या मुलांना प्रेम व्यक्त करायचं आहे ते सगळे प्रपोज करायचं कसं, हा विचार करत असतील. मग हळूहळू त्याची पूर्वतयारी करू लागतील. प्रेमातल्या जाणकार, अनुभवी लोकांकडून काही सल्ले, मार्गदर्शन घेतीलसुद्धा; पण आता या प्रपोज करण्याच्या शर्यतीत मुलीसुद्धा उतरल्या आहेत. ‘हम भी कुछ कम नहीं’ म्हणत त्याही बिनधास्तपणे मुलांना प्रपोज करतात.

एखादा मुलगा आवडलेला असतो, त्याला प्रपोज करायचं हेही पक्कं असतं; पण ते करायचं कसं? नेमकी गाडी इथे अडते; पण याचा विचार मुलींना आता फारसा करावा लागत नाही, कारण त्यांच्याकडे प्रपोज करायच्या एकापेक्षा एक भन्नाट कल्पना असतात. त्यांचं प्रपोज एकदम हिंदी सिनेमांसारखं फिल्मीसुद्धा व्हायला नको आणि फार मुळमुळीतही व्हायला नको, याची खबरदारी त्या हमखास घेतात. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती जागा. कोणत्या ठिकाणी ती प्रपोज करणार हे तिच्यासाठी खास असतं. मग ती कॉलेजमधल्या मित्राला करणार असेल तर ती कॉलेजमध्ये प्रपोज करेल असं नाही किंवा ऑफिसातल्या सहकाऱ्याला विचारणार असेल तर तेव्हाही ती तिथेच प्रपोज करेल असंही नाही. थोडक्यात काय, तर ती एक खास जागा ठरवते. मग ते कॉलेज, ऑफिस, बाग, हॉटेल, घर, कॅफे असं काहीही असेल आणि हो, हे सगळं त्या एकटीच्या जिवावर करतात. त्या कोणत्याही मैत्रिणीला हाताशी घेत नाहीत हे विशेष.

माझ्याआधी कोणी दुसरीच मुलगी आधी प्रपोज करून गेली तर ही चिंता त्यांना नसते. तशी त्या ‘सेटिंग’ लावतात. सतत त्याच्या नजरेसमोर जाऊन, त्याच्याबद्दल इतर मित्रमत्रिणींना विचारून, स्टॉक करून (लॉग इन न करता वेब पेजवर सर्च करून, म्हणजे नाव न टाकून, त्या फेसबुकवर अशा पद्धतीने त्यांचा व्हच्र्युअल पाठलाग करत असतात. यावरून त्यांचा मार्ग मोकळा आहे की बंद आहे हे त्यांना समजतं). हे एवढं सगळं केल्यानंतर त्या मुलाचं तिच्याकडे लक्ष गेलं नाही तरच नवल आहे. प्रपोज करताना आपला प्रभाव जास्तीत जास्त चांगला पाडण्यासाठी तिचा प्रयत्न असतो. तिच्यासाठी फक्त दिसणंच नाही तर बोलणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळे ती दिसण्याबरोबरच  बोलण्यावरही मेहनत घेतले.

हे सगळं ती तिच्या मित्रमैत्रिणींना उत्साहाने सांगते. मग तिचे मित्रमैत्रिणी तिला त्याला काय आवडतं, तो कुठे असतो, कुठे राहतो, कसा आहे, त्याचे कोणकोण मित्र आहेत ही सगळी माहिती पुरवतात. ती सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा करून घेते. तो ज्या फोटोंमध्ये टॅग असेल, त्यावरून त्याच्या घरच्यांपासून ते तो आत्तापर्यंत कुठेकुठे गेला, त्याला काय आवडतं याची बरोबर सगळी माहिती ती मिळवते. तिने हे सगळे उपद्व्याप केले आहेत हे ती ते दोघे रिलेशनमध्ये आल्यानंतरही त्याला सांगत नाही.

मुली जास्त भावुक असतात असं म्हटलं जातं; पण अशा बाबतीत त्या धाडस दाखवतात. व्हॅलेन्टाइन डेला मुली फार वेळ न दवडता प्रपोज करण्याचे मार्ग शोधत असतात. त्यांना लवकरात लवकर व्यक्त होण्याची इच्छा असते. त्यामुळे त्या दृष्टीने त्या प्रयत्न करतात. व्हॅलेन्टाइन डेला कॉलेजमध्ये रोज डे, चॉकलेट डे वगैरे सेलिब्रेट होतातच. त्या वेळी मुली एक गुलाबाचं फूल खास आणतात. त्यात एक फंडा असतो. मुलांना साधारणपणे जो परफ्युम आवडतो तो गुलाबावर फवारतात, पण ते गुलाब आपणच दिलंय हे त्याला कळण्यासाठी कोडय़ात आपलं शॉर्ट फॉर्ममधलं नाव लिहितात.

अशी सगळी मेहनत घेत मुली मुलांना प्रपोज करण्यासाठी घेतात. मुली प्रपोज करतात हे नकारात्मकही नाही आणि भूषणावहही नाही; पण तो बदल नक्कीच आहे. हा बदल अलीकडचा नाही, तर आधीपासूनचा आहे; आता त्याचं प्रमाण वाढलंय इतकंच. तसंच मुलींची मुलांना प्रपोज करण्याची पद्धतही काहीशी बदलली आहे. मुलीला एखादा मुलगा आवडला तर त्यात काहीच गैर नाही. तिने त्याच्याप्रति असलेल्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करणं हे चांगलंच आहे!
गार्गी भोसले – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा