News Flash

Valentine’s Week 2018: तिने त्याला लिहिलेलं पत्र…

माझ्याकडून तुला दिलेली ही पहिली भेट आहे असं समज.

letter
व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल

ऐकतोयस ना…. पत्र वाचताना हसू नकोस बरं….ऐकतोयस ना रे….
पत्र लिहिण्यास कारण की… अशी सुरुवात असणारी पत्र वाचली किंवा नुसत्या अशा ओळी आठवल्या की बऱ्याच आठवणी येतात. अर्थात आपल्या पिढीसाठी या आठवणी म्हणजे मराठीच्या पुस्तकाच्या शेवटच्या लेखन विभागातील अभ्यासक्रमाचा एक भाग. पण, काय सुंदर संकल्पना आहे ही. हे सर्व आता अचानक मला का आठवतंय हाच भलामोठा प्रश्न पडला असेल ना तुला? खरंतर पत्र लिहिण्यासाठी अमुक एका दिवसाची वाट पाहणाऱ्यांपैकी वगैरे मी नाही. हे तुला ठाऊकच आहे. मुळात पत्रबित्रं‘इज नॉट माय कप ऑफ टी…’ पण, ग्रुपमध्ये किंवा सर्व मित्रांसोबत असताना इतरांच्या गर्लफ्रेंड्स पाहताना, त्यांच्या नात्याकडे पाहताना तुझ्या डोळ्यात मला कशाचीतरी कमतरता जाणवते, म्हणून मी हे पत्र लिहितेय. अर्थात ती कमतरता हीच असावी की, मी ‘सो कॉल्ड रोमॅण्टिक’ का नाही? हसू नकोस… किंवा थक्कही होऊ नकोस. मी काही अंतर्यामी वगैरे नाही… पण, तरीही हा अंदाज मी बांधलाय. आता यासाठी तू मला मनकवडी म्हणालास तरीही चालेल. ए तुला आठवतंय का? आपण, कधी फिरायला गेल्यावर एकमेकांचा प्रेमाने हात वगैरे पकडल्याचं किंवा गोड, गोंडस असे कॅप्शन असणारे फोटो पोस्ट केल्याचं? नाही ना, एक्झॅक्टली… मलाही नाही आठवत यार…

तुला मी ‘यार’ किंवा ‘ब्रो’, ‘भाई’ म्हणून हाक मारते ना, तेव्हा बाकीच्यांना आश्चर्यच वाटतं. ‘अगं बॉयफ्रेंड आहे तो तुझा’, ‘भाई’काय म्हणे… त्याला काय वाटत असेल तुझ्या अशा उडाणटप्पू विशेषणांचं… ‘सो विअर्डो यू आर’.

खरंच का रे तुला हे उडाणटप्पू वाटतं… ‘शोना’, ‘बाबू’ वगैरे करुन बोलणं मला कधी जमलं नाही रे. बहुधा जमणारही नाही. आय होप हे तुलाही माहितीये. मुळात तू तशी सवयच लावली नाहीस. आपल्या नात्यात असणारा हाच सहजपणा आणि एकमेकांसाठी असणारी मोकळीक नात्याचं वेगळेपण सिद्ध करतं.

कसलं भारी वाटत असेल ना तुला, मी पत्र वगैरे लिहितेय… अनपेक्षितच असेल तुझ्यासाठी हे सर्व. आपण पहिल्यांदा भेटलो कधी हे तुला आठवतही नसेल, आता पत्रातून मी तुझ्या स्मरणशक्तीची वाहवा करणार नाहीये… हसू नकोस… हा उपरोधिक टोला होता, हे कळलंय तुला.
‘पर कोई ना, हमने आपको माफी बख्श दी…’

बरं आता थोडं प्रेमाचं बोलण्याचा प्रयत्न करते. माझ्या रागीट आणि क्षणात बदलणाऱ्या स्वभावाचा मारा सर्वात जास्त तुझ्यावर होतो हे मला माहितीये. पण, आता त्यावर उपाय नाही, कारण आपल्या नात्याचा हा पाया आहे असंच मी मानते. ज्या पद्धतीने अगदी हसू न येणाऱ्या वाईट विनोदांनी तू मला हसवतोस, तुझा तोच अंदाज मला खूप आवडतो. तुलाही कधीकधी माझा राग येत असेल ना रे… शंकाच नाही. पण, बोलत जा रे रागावलास की. मला कळतच नाही कधीकधी की तुला राग आलाय, की नाही ते. आता ही काही बोलून दाखवण्याची किंवा इमोजीतून व्यक्त होण्याची गोष्ट नाही हे मला माहितीये. पण, तरीही… आणि हो आपण आपण कधीतरी प्रियकर- प्रेयसी असल्यासारखं वागूया का? नात्यात औपचारिकता नसावी वगैरे हे ठरवलंच होतं आधी आपण, किंबहुना ते पुन्हा सांगण्याची वेळही आली नाही. पण, कधीकधी ही औपचारिकता, चौकटीबद्ध रिलेशनशिपमधल्या काही संकल्पना, रुसवे- फुगवे वगैरे बरे वाटतात अरे… तर आपण कधीतरी तसं वागण्याचा प्रयत्न करुया…
बरं आणखी एक गोष्ट, ज्या गोष्टींच्या बळावर आपलं नातं टिकून आहे ना त्या तशाच ठेव हा… नात्यात दिलेल्या स्वातंत्र्याबद्दल, न व्यक्त केलेल्या पण तरीही जाणवलेल्या प्रेमाबद्दल, मला समजून घेतल्याबद्दल आणि नेहमीच ‘यो…’ असं म्हणत अफलातूनपणे भेटल्याबद्दल खरंच मी तुझी आभारी आहे. हे पत्र वाचताना लिहिणारी मीच आहे ना, असा प्रश्न तुला पडला असेलच.

कारण, जसं मी सुरुवातीला म्हटलं, पत्र वगैरे लिहिणं हा माझा पिंड नाही… पण, कधीकधी मीसुद्धा सीमोल्लंघन करते बरं. तो हक्क फक्त पौराणिक कथांमधील पात्रांचाच आहे असं नाही… त्यामुळे प्रेमाच्या दिवसासाठी ही माझ्याकडून तुला दिलेली पहिली भेट आहे असं समज. पत्रं कसं वाटलं हे नक्की सांग… पत्र लिहूनच सांगितलस तर आवडेल मला. तसंही भेट वस्तू वगैरे तर आपण, फारशा देत नाही एकमेकांना… पत्र तर नक्कीच लिहू शकतोस तू. तेवढंच तुला लिहिता येतं हेसुद्धा तुझ्या लक्षात येईल.. कारण लिहितोच कुठे अरे आजकाल आपण, डिजिटल डिजिटल म्हणत आपण इतके डिजिटल झालो, की लिहिणंच विसरलोय, तर मग हा प्रयोग तूही कर असं मला वाटतं. कारण, भेटवस्तूंपेक्षा आपण दोघांनीही नेहमीच एकमेकांच्या भावनांचा आदर केलाय, एकमेकांच्या कामाचा आणि एकमेकांचा आदर केलाय. तो तसाच राहावा अशीच माझी इच्छा आहे… बाकी ‘तू बोहोत सही है यार…’ आपल्या नात्यात असंख्य हॅशटॅग, हसू न येणारे पण, तरीही खळखळून हसवणारे विनोद तसेच राहो हीच इच्छा. शेवटी काही लिहिण्याची गरज नाही असं मला वाटतंय, पण तरीही लिहितेय…
तुझीच….

(सदर पत्र हे सध्याच्या ‘ती’ला नजरेत ठेवून लिहिण्यात आलं आहे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 4:08 am

Web Title: valentines week 2018 open love letter written by her to him love relationship attraction respect girlfriend boyfriend
Next Stories
1 Happy Teddy day 2018 : हा ‘टेडी’ आला तरी कुठून?
2 Happy Chocolate Day : तिच्या आणि चॉकलेटवरच्या प्रेमापोटी त्याने लिहिलेलं एक गोड पत्रं…
3 दिल से..!
Just Now!
X