News Flash

Valentine’s Week 2018: तो तिला म्हणतोय, आज धन्यवाद उद्या वाद असं नकोच आपल्या नात्यात

या पत्रातून त्याने व्यक्त केल्यात मनातील भावना...

letter writing
व्हॅलेंटाइन डे

प्रिय…
टीप: या पत्राला तू उत्तर द्यावं अशी माझी मुळीच अपेक्षा नाहीय. फक्त हे पत्र तू माझ्यासमोर बसून वाच. थोड्या थोड्यावेळाने प्रत्येक पॅरानंतर तू वर बघशील ना तेव्हा तुझ्या नजरेतूनच त्या पॅराचं उत्तर मला मिळेल…

पत्र… आज व्हॅलेटाइन्स डे… अनेकजण एकमेकांना देतात तशी अनेक गिफ्टस देता येतील पण यंदा पत्राच्या रुपाने खूप पर्सनलाइज गिफ्ट देण्याचं ठरवलंय म्हणून हा पत्रप्रपंच… (ठेवणीतलं वाक्य…)

तुला शेवटचं पत्र कोणी पाठवलं होतं मला ठाऊक नाही कारण पत्राबद्दल आपण फक्त इंटरनेटवरील ओपन लेटर्सवर चर्चा करतो आणि तितकाच काय तो आपला पत्राशी संबंध. पण आजही लोक वेड्यासारखी वाट पाहतात पत्राची. नाही तुला ही मस्करी वाटेल पण खरंच पत्रातून प्रेम व्यक्त करणं खूप कठीण आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आपण आज सकाळ संध्याकाळ Luv U… 143… Mu2… वगैरे पाठवतो ना तितकं सोपं नाहीये हे असं ऑफिशियली लव्ह लेटर लिहीणं. तरी मी केलेला प्रयत्न फसणार नाही हेही नक्कीच.

माणसाच्या बेसिक गरजा काय असं विचारलं तर अन्न, वस्त्र, निवारा असं सांगून मोकळं व्हायचो मी. पण तुला भेटल्यानंतर या यादीमध्ये तिचा दिवसभरातील किमान एक फोन कॉल हेही माझ्या बेसिक गरजांमध्ये अॅड झालंय. खरंच अगं ते लहानपणी रिकाम्या जागा भरा असायचं बघं तसं होतं तुझा फोन आला नाही तर दिवसभरातली ती तुझ्या फोनची रिकामी जागा कोणीच भरत नाही आणि मग तो दिवस अपूर्ण राहतो. हो म्हणजे
‘दिवस उगवतो…
रात्रही येऊन जाते…
त्यात मात्र
तू कुठेच नसतेस…’
असं काहीतरी होतं माझं त्यादिवशी. इतकी सवय झालीय तुझी. तुझ्याबद्दल सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे तू टिपीकल नाहीयेस. म्हणजे तू चारचौघात वागतानाचं भान, आपल्या नात्याबद्दल कुठे PDL करायचं कुठे नाही हे तुला व्यवस्थित समजतं. रस्तावरून चालताना तू अचानक माझा हात पकडतेस तेव्हा मला कळतंही नाही इतक्या आरामत करतेस ना हे सगळं तू की त्यात ऑकवर्डनेस कुठेच नसतो. हे मला खूप जास्त भावतं तुझ्यातलं.

अनेकांना आपण #CoupleGoals सेट करणारे वाटतो. यात तुझा आणि तुझाच खूप मोठा वाटा आहे. मला मित्रांपेक्षा मैत्रिणीच खूप आहेत पण तू कोणावरही जेलस वगैरे झालेली मला आठवत नाही. आपल्या नात्यावर असणाऱ्या विश्वासामुळे असणार हे असं सगळं. कारण कधीच तू मला हिच्याशी बोलू नको, तिला भेटू नको हे असं सांगितलेलं आठवतं नाही. कधी तू माझ्याकडे चॅट्स बघू दे तुझे अशी मागणीही केलेलं आठवत नाही. ही जी काही स्पेस दिलीयेस ना तू आपल्या नात्याला ती एक नंबर आहे. या दिलेल्या स्पेसमध्येच आपलं नातं खुललंय आणि ते बहरलंय. नाहीतर मी अनेक अशी रिलेशनशिप्स पाहिलीयत की एकमेकांना स्पेस न दिल्याने नाती गुदमरुन मेलीयेत. असा वेडेपणा आपल्याबद्दल कधीच होणार नाही याची खात्री आहे मला. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर एकमेकांशी जुळवून घेणं. म्हणजे मला मॅक-डीमध्ये ऑर्डर देता येत नाही इथपासून ते अगदी भेटायचं झालं तर याला कटिंग प्यायला जाऊ असं सांगितलं पाहिजे इथपर्यंत सगळं काही तुला आता ठाऊक आहे. (त्याचा गैरफायदाही घेतेस तू… पण मलाही तो फायदा तू घ्यावा असंच वाटतं म्हणून मीही काही बोलत नाही) तर दुसरीकडे माझ्याकडून सांगायचं झालं तर कॉमेडी सिनेमा सुरु असतानाही तू रडण्यापासून ते तिखट पाणीपुरी खाताना तुला उचकी लागणार ज्यासाठी मी पाण्याची बाटली तयार ठेवावी हेही अगदी सवयीचं करुन घेतलंय मी, तू नोटीस केलं असेल नाही आतापर्यंत हे? पण अशाही अनेक गोष्टी आहेत की ज्या तू आणि मी नोटीस करण्यापेक्षा आपला ग्रुप आणि इतर लोकं आपल्याबद्दल जास्त नोटीस करतं असतात. अर्थातच सकारात्मक गोष्टींबद्दलच बोलतोय मी. मला या बारीक-सारीक गोष्टी ते गप्पा मारताना बोलण्याच्या ओघात बोलून जातात तेव्हा लक्षात येतात. मग उगंच आपलं मनातल्या मनात स्वत:ची पाठ थोपटून घेत ‘कसले भारी आहोत यार आपणं’वालं फिलिंग येतं आणि मग जाणवतं की अरेच्चा आजच्या गडबड गोंधाळाच्या रिलेशनशिप्सच्या युगात आपण दोघे जोडीदार म्हणून खूप सॉर्टेड वागतो.

Valentine’s Week 2018: तिने त्याला लिहिलेलं पत्र…

आपण एकमेकांबरोबर असलो तरी काही गोष्टी इतरांपेक्षा वेगळ्या करतो ज्या आपल्याला आऊट स्टॅण्डिंग ठरवतात. म्हणजे एकमेकांवर आपण हक्क सांगत नाही तर तिथे टीटीएमएमला प्राधान्य देतो. तुझं तू माझं मी हे आपण आत्तापर्यंत अभ्यासात, नाती संभाळण्यात, पैसे खर्च करण्यात, आपल्या आपल्या अनकॉमन ग्रुपला वेळ देण्यात अनेकदा गरज पडेल तसं मुक्तपणे वापरलंय आणि त्याचा नेहमी फायदाच झालाय. पण हे करताना ‘कुठं अडलं तर पार्टनरचा सल्ला महत्वाचा’ हे व.पु.काळेचं लॉजिकही मोकळ्या मनाने स्वीकारलंय. म्हणूनच एकमेकांना सल्ला देणं (गरज असतानाच) आपल्या रिलेशनमधला माझा मला सर्वात आवडात भाग आहे. समोरच्या व्यक्तीचा परस्पेक्टीव्ह ऐकून घेतल्यावर मतांना आणि निर्णयांना आकार देणं सोपं होतं हे खरंच.

जाता जाता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तू जी ऐकून घेणाऱ्याची भूमिका बजावतेस ना माझ्या आयुष्यात तीही नॉन रिप्लेसेबल आहे. आज सल्ला देणारे अनेक आहेत पण ऐकून घेणारं माणूस सापडत नाही. तुम्हाला एखाद्याकडून सल्ला नको असतो फक्त मन मोकळं करायचं असतं पण अशी रिकामी होण्याची जागा अनेकांना आय़ुष्यभर सापडत नाही पण मला तुझ्या रुपात ती सापडलीय त्यासाठी धन्यवाद वगैरे काही म्हणणार नाही मी कारण धन्यवाद म्हणणाऱ्यांशी नातं फॉर्मल होतं आणि आज धन्यवाद उद्या वाद असं नकोय मला आपल्यात.

चला संपवतो… बाकी व्हॉट्सअपवर बोलूच आपण निवांत…

तुझाच…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2018 2:43 am

Web Title: valentines week 2018 open love letter written by him to her love relationship attraction respect girlfriend boyfriend
Next Stories
1 Valentine’s Week 2018 : कविता, माझी व्हॅलेंटाइन
2 Happy hug day : मिठीतली ‘मी’ पहिली की दुसरी?
3 Happy Promise Day: शब्द हा देतो तुला मी… शब्द हे तुझियाचसाठी…
Just Now!
X