गोष्ट तशी त्यांच्या अकरावी बारावीतली आहे… नुकतंच कॉलेज सुरु झालेलं… शाळेपासून एकत्र असणारा ग्रुप आत्तासारखी ऑनलाइन अॅडमिशनची पद्धत नसल्याने एकाच कॉलेजला टपकला… शाळा संपल्यावर ना आपलं मेंढरांसारखं होतं सगळे सायन्स तर मी पण सायन्स… आवड निवड सगळं गेलं तेल लावत… आणि करियर काऊन्सिलींग वगैरे प्रकाराचं तेव्हा इतकं फॅड नव्हतं…

कॉलेज शहरातलंच होतं याचा ग्रुप कॉलेजपासून चालत अर्ध्या तासाच्या अंतरावर असणाऱ्या एकाच एरियात राहायचं… त्यामुळे शाळेतली प्रथा इथेही सुरुच होती… एकत्र जाणं येणं…

कॉलेजचे दिवस एका मागून एक सरू लागले… पहिला बंक केलेला तास… पावासातून पळत येणं… एकाच छत्रीत पाच जणांनी कॅनटीनपर्यंत केलेला प्रवास… प्रॅक्टीकल्स… केमिस्ट्री, फिजिक्सच्या प्रॅक्टीकल्सला केलेले झोल… ब्रोकेज फी भरली म्हणून लॅबमधील फोडलेल्या टेस्ट ट्युब…. आलाना फलाना… डिंमका नी आमका अशा भरपूर कमिटींमधला सहभाग… डेज… असाइमेन्ट त्याच्या बॅचपासून सुरु झाल्या… हे यायाचे जायचे एकत्र पण होते वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये… तसा वर्ग मोठा आणि अनेकदा रिकामा असल्याने हा त्याच्या लेक्चरला आणि तो याच्या वर्गात असं अनेकदा झालं… अटेन्डस तेव्हा एवढी सिरीयसली घेतली जात नव्हती…

कॉलेज कमी म्हणून की काय यांचा अकरावी बारावी क्लास पण सेम होता… इथे मात्र हुशारीनुसार त्यांची विभागनी झाल्याने छपरी आणि हा सगळ्यात खालच्या तुकडीत होता… पण एकंदरितच काय तर हागणं मुतनं सोडल्यास आणि घरचा वेळ सोडल्यास सगळा ग्रुप जळी स्थळी काष्टी पाषाणी एकत्रच असायचे… मग तो नेचर्स क्लबचा पाहिला ट्रेक असू देत किंवा बसची शेवटची लांबलचक सीट पकडण्याची कसरत असू देत… सगळं एकत्रच…

ग्रुपमध्ये एक होती ‘छपरी’… म्हणजे फुलऑन टॉमबॉय… तुम्ही ‘आ रेssss’ केलं की ती ‘का रेएएssss’ आणि पार आयमायचा उद्धारपर्यंत जाणार… दुसरी होती ‘अभ्यासू’… तिचं घर कॉलेज जवळच असल्याने तो ग्रुपचा पार्टटाइम अड्डा होता… तिसरी होती ती… डोळ्यात तीळ असणारी लहरी वागणारी ‘ती’… चौथा होता ‘स्कॉलर’… शाळेपासून याच्या गृहपाठाच्या वह्या घेण्याची जी सवय ग्रुपला लागलेली ती कॉलेजमध्ये जरनल घरी घेऊन जाण्यापर्यंत कायम राहिली… पाचवा ‘हा’… असाच ‘सगळे सायन्सला म्हणून मी पण सायन्सला’वाला… सहावी ग्रुपची ‘ऑफीशियल स्पिकर’ होती नाही वक्ता या अर्थाने नाही ‘भोंगा’ या अर्थाने… आणि हो ही चालायची नाही ‘राजधानी’सारखी धावायची… घर ते कॉलेज आणि कॉलेज ते घर…

अकरावीतून सगळे बारावीत गेले… पण या प्रवासात काही खूप जवळ आले… काही लांब गेले… दोघांच्या बॉण्डमध्ये तिसरा घुसू लागला… मग हळूहळू या ना त्या कारणाने ग्रुपमधला प्रत्येकजण एकमेकांवर रुसू लागला… हे असंच होतं प्रत्येक ग्रुपचं ‘आपली आपल्याला नजर लागते’ ना तसं… पण ते वरवर सगळं नीट असल्याचं दाखवायचे आणि होतंही तसंच कारण अगदी ‘आर या पार’वाली भांडणे कधी झालीच नाहीत…

त्या दरम्यान याला ‘ती’ आवडू लागली… त्याच्या वागण्यातून ते लोकांना दिसत होते की नाही ठाऊक नाही पण ‘तो’ त्याच्या दृष्टीने ‘नॉर्मल’च वागायचा… ‘तिला’ ते कळलं की नाही ठाऊक नाही पण ग्रुपमध्ये खुसूर पुसूर होऊ लागली… त्यात कोणत्यातरी ‘सोम्या गोम्या’ने ‘तो’ आणि ‘ती’ हात पकडून चालत होते असे ‘स्कॉलर’ला सांगितले… ‘स्कॉलर’ ‘चढला ना मग भाई’ सगळ्यांवर आणि विशेष म्हणजे लेक्चरमधून एक ऐकाला उठवून कॉलेजच्या ‘क्वॉड्रँगल’मध्ये चढला तो सर्व ग्रुपवर… ‘ती’चीही सटकली

‘कोणय तो सांग?’, ‘ती’ने विचारले; ‘आत्ता त्याला इथे आणते’… ‘ती’ला ‘स्कॉलर’ने नाव सांगितले ‘ती’ त्या ‘सोम्या गोम्या’च्या वर्गात गेली आणि त्याला सगळ्या ग्रुपसमोर घेऊन आली… ‘हा’ ‘सगळे सायन्स मग मी पण सायन्स’वाला उभाच होता नुसता ‘स्कॉलर’ला समजवत… पण ‘स्कॉलर’च्या रागाचा पारा ऐवढा होता की सगळे रिपरिप पडणाऱ्या पावसात छत्री घेऊन उभे होते तर तो चष्मा घातला होता तरी पावसातच उभा होता आज त्याला ग्रुपमधली प्रकरणे एकदम ‘आर या पार’ मुद्दावर सोडवायीच होती… ‘ती’ने खडसावून विचारल्यानंतर ‘सोम्या गोम्या’ म्हणाला

‘नाही म्हणजे त्याने तिच्या बॅगचं हॅण्डल पकडलेलं क्रॉस करताना…’

आता चढायची पाळी ‘ती’ची होती…

‘घे… घे… सांगत होते मी असं काही असतं तर तुला सांगितलं असतं… पण नाही तुझा विश्वासच नाही ना आमच्यावर… तुला बाहेरची माणसं जवळची झाली…’

‘स्कॉलर’ काहीच बोलत नव्हता…

ते केमिस्टीमध्ये असतं ना ‘स्टेबल आयटमला डिस्टर्ब करायला एखादा इलेट्रॉन किंवा प्रोटॉन येतो आणि आयटमच्या स्ट्रक्चरची वाट लावून ठेवतो… मग अनकंट्रोलेबल रिअॅक्शन वगैरे होते…’
तसंच झालं आमच्या ग्रुपचं ‘आयटम’च्या जागी ग्रुप होता आणि इलेक्ट्रॉनच्या जागी हा ‘सोम्या गोम्या’ नावाचा ‘आयटम’ होता…

भडकलेल्या ‘ती’ने

‘याच्यापुढे मला वाटेल तेव्हा मी तुमच्याशी बोलेल’

असं सांगत तिथून काढता पाय घेतला… ‘ती’ निघून गेली… आणि ‘हा’ काहीही न बोलता तिचं नाव घेत ‘ती’च्या मागे पळत गेला… आज ‘ती’ही ‘राजधानी’ झाली होती…

पण तेव्हा एक मात्र बरं होतं हे व्हॉट्सअप वगैरे प्रकरण नव्हतं त्यामुळे ग्रुप लेफ्ट करणं… एकमेकांना ब्लॉक करणं… स्क्रीनशॉर्ट पाठवण हा चुझपा जरा नाही काहीच अस्तित्वात नव्हता…

मग ‘ती’ वेगळी राहू लागली… ‘स्कॉलर’ वेगळाच राहू लागला तो ऑल बॉइज ग्रुपचा झाला हळूहळू… कॉलेजच्या जवळच्या ‘अभ्यासू’ने ऑलमोस्ट कॉन्टॅक्ट तोडला आणि ‘छपरी’ आणि ‘भोंगा’ एकत्र येऊ जाऊ लागले… ‘हा’ ‘ती’च्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करु लागला… वाईटातून चांगलं शोधायंच म्हणतात ते असंच… ‘ती’ला ‘त्याचा’ आधार वाटू लागला…

पोरं इथेच फसतात… ‘ती’ थोडं गोड बोलली… थोडं जास्त शेअरिंग आणि कणभर अधिक केअरिंग वागली की पोरांकडून फ्रेण्डशीपचा पडदा हटतो आणि ते ‘ती’चं काही ऐकून घेण्याआधी पुढच्या गुलाबी स्टेशनवर ‘ती’ची वाट पाहात उभे असतात… इथेही तसंच झालं… म्हणजे त्याला ‘ती’ आधीपासूनच आवडायची आता ते कन्फर्म झालं… त्याने ‘ती’ला विचारायचं ठरवलं पण ‘त्याची’ हिम्मत होई ना… प्लॅन करून विचारायचा ‘त्याने’ एक दोनदा प्रयत्न केले पण तिसरं कोणीतरी आल्याने ते प्रयत्न फसले… मग ते म्हणतात ना तसं ‘चांगल्या आणि वाईट गोष्टींना मुहूर्त नसतो… ज्या क्षणी त्या होतीच तोच योग्य मुहूर्त…’ याच नियमाला पकडून त्याने अगदी टुकार जागी… टुकार वेळी तिला विचारले… आणि….

दुपारी जोरात पाऊस पडायला लागल्याने कॉलेज लवकर सोडून देण्यात आले… तेव्हा नुकतेच कुठे ‘सो कॉल्ड स्मार्टफोन’ डे टू डे लाइफचा भाग होत होते… ‘ती’ने त्याला फोन केला

‘निघतोयस का?’

तो ‘हो’ म्हणाला आणि ‘आलोच पाच मिनिटांत गेटवर थांब…’ सांगत फोन कट केला… जरी त्याला ‘ती’ आवडायची तरी त्याचा जीव ‘छपरी’मध्ये अडकलेली कारण ती होतीच इतकी ‘छपरी’ की मुलाशी मैत्री केलीय की मुलीशी प्रश्न पडायचा… ‘त्याने’ ‘छपरी’ला विचारलं ‘येतेस का?’ तर ती ‘नाही जरा जरनल पूर्ण करायचंय थोडा पाऊस कमी झाल्यावर संध्याकाळी निघेल…’ म्हणाली.
‘बरं ये वेळेत आणि पोहच्यावर मीस कॉल मार किंवा मेसेज टाक…’ (हो तेव्हा व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं)

‘तो’ विंडशीटर जितकं टाइट घालता येईल तितकं टाईट घालून धावत पळत एकदम त्या ‘मै हू ना’मध्ये शाहरुख धावतो ना तसा (हा उगचं रेफ्रन्स तेव्हा मै हू ना पण आला नव्हता) याला त्याला चकवत पोहचला तिच्या जवळ… ‘ती’ने ‘एवढा उशीर’वाला लूक दिला तेव्हाच ‘याने’ ‘सॉरी जरा ‘छपरी’ला विचारत होतो येतेस का…??’ असं सांगितलं. ‘ती’ने म्हशीसारखं रेकत ‘हम्ममम…’ करुन

‘चल रिक्षाने जाऊ’ म्हटलं…

ते गेटसमोरच्या शेडमधून बाहेर येऊन रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षाला हात दाखवू लागले… पण रिक्षा काही थांबेना… म्हणजे रिक्षावाल्यांना काय माज येतो काय कळतं नाही हो तेव्हापासून शहरातले रिक्षावाले माजुरडे आहेत… पेट्रोल जाऊन गाड्या सीएनजीवर धावू लागल्या त्यांच्या पण अॅटीट्यूड जाऊन सौजन्य आल्याचे चित्र आजही दिसतं नाही… पंधरा मिनिटे हाताची कावायत केल्यावर ती म्हणाली चल चालत जाऊ… तीस चाळीस मिनिटांमध्ये पोहचू… एवढ्या पावसात… हो मग काय २६ जुलैचा नाहीय… (फॉर अ चेंज हा रेफ्रन्स बरोबर आहे कारण तेव्हा २६ जुलैचा तो पाऊस होऊन गेला होता)… चल म्हणत ते मचाक मचाक पाणी तुडवत उडवत चालू लागले… कॉलेज, क्लास, शाळेचे दिवस असे एका मागून एक आठवणींच्या इंजिनिला जोडलेले गप्पाचे डब्बे त्या पावसाला चिरत आमची वाट घराच्या दिशेने मोकळी करुन देत होते…

तेवढ्यात तो विषय निघाला… प्रेमाचा… याचे हार्टबिट्स ढगात आणि जमिनीवर उड्या मारायला लागले… काही मिनीट त्याविषयावर गप्पा मारल्यानंतर तो म्हणाला विषय निघालायच तर विचारून टाकूयात…

चलत असताना न थांबता… भर पावसात दोघांची थोबाडं त्या विंडशीटरच्या कॅपच्या दोरीने आवळली असताना शहरातील एका खूप लोकप्रिय वडापाव सेंटरसमोर तिच्या डोळ्यात न बघता तो म्हणाला…

ऐक ना बऱ्याच दिवसापासून एक सांगायचं होतं…
विषयाचा सिरीयसनेस तिला नव्हताच तिच्यासाठी त्या गप्पा टीपी होता… आणि वाढत याचा बीपी होता…
मला ना तू खूप आवडतेस… I love you…

कठीण पेपर बेल झाल्यावर पर्यवेक्षिकेच्या हातात दिल्यावर जो मोकळेपणा वाटतो त्याच मोकळेपणाने तो तिच्याकडे पाहात नाजूक हसला… तिचा चेहरा वाचावा असं त्याच्या मनात आलं पण ती हसत सुटली… ते अगदी घर पाच मिनिटांवर येईपर्यंत… नॉर्मली एकटाच हसणाऱ्याला वेडा समजतात इथे ती हसत आणि तो ऑकवर्ड होऊन चालत असल्याने तो स्वत:ला वेडा समजत होता…

घराखाली आल्यावर ती इतकंच म्हणाली, ‘तु माझा खूप जवळचा मित्र आहेस… सध्या १२वी असल्याने अभ्यासावर फोकस करु… आणि भविष्यात काही व्हायचं असेल तर होईलच की पण आत्ता मी यावर काहीच नाही बोलू शकत…’

या बारावीच्या आईच्या तर असं झालं त्याचं थोडावेळ… पण त्यानंतर त्या प्रपोजमुळे कधी दोघांमध्ये अंतर आलेय किंवा ते डोक्यात ठेऊन टिपीकल बोलूयाच नको वगैरे असं नाही केलं त्यांनी… आज जवळजवळ एका तपानंतरही ते दोघे बोलतात… तिचं लग्न झालंय याची छावी आहे… दोघं आपल्या आपल्या आयुष्यात खूष आहेत… कधीतरी आठवण झाल्यावर एकमेकांना पीन करतात मीस यू पाठवतात… चल भेटू म्हणतात… भेटतात… खिदळतात… मैत्री पहिली असते हे त्यांच्याकडे पाहून कळते… त्या दोघांच्या जागी त्या पावासात दुसरे कोणी असते तर कदाचित पावसाबरोबर आयुष्यभर लक्षात राहिलं असं वादळ मनात घेऊन ते जगले असते… पण यांच जर वेगळंय…

आजही पावसात जेव्हा जेव्हा तो त्या वडापाव सेंटरसमोरून जातो त्याला तो प्रसंग आठवतो आणि आपसूकच तिच्या व्हॉट्सअपवर मीस यू पडतो… पण यातलं प्रेम ते वालं नाहीय हे पक्का कारण हे मॅच्यूअर प्रेम आहे ते बालिश म्हणजे तिच्या शब्दात सांगायचं तर १२वीच्या अभ्यासादरम्यान झालेलं प्रेम होतं… दोघंही त्याबद्दल थेट कधी बोलत नाही कारण बोलायची गरजच पडत नाही… रिग्रेट तर घंटा त्यांनी कधी केलं नाही त्या निर्णयाचं… आणि मग काय दे आर लिव्हींग हॅपिली एव्हर आफ्टर… कारण देवदास बनून त्या पावसाची आठवण काढत डोळ्यातून अश्रूंच्या धाऱ्या सोडण्यापेक्षा तिच्याचबरोबर एखाद्या विषयावर दात काढून काढून आलेले अश्रू कधीही उजवेच राहणार… अगदी शेवटपर्यंत…

शब्दांकन- स्वप्निल घंगाळे

swapnil.ghangale@loksatta.com