Happy Kiss Day 2018 : किस्सा पहिल्या ‘किस’चा…

प्रेमाची भाषा अखेर तिलाही उमगली

प्रतिकात्मक छायाचित्र

निरज उर्वीचा खूप चांगला मित्र होता. अगदी लहान सहान गोष्टीही उर्वी त्याच्याशी मोकळेपणानी शेअर करायची. नकळत ती त्याची काळजी कधी करायला लागली तिचे तिलाही समजले नाही. आता त्यांचे नाते मैत्रीच्या पलिकडे जायला लागल्याचे दोघांनाही जाणवले होते. मग वेगवेगळ्या विषयांवर एकमेकांशी छान गप्पा मारणे, मिळून करिअर मधल्या प्रगतीसाठी एकमेकांना प्रोत्साहन देणे यामुळे ते खऱ्या अर्थाने जवळ यायला लागले. हळूवार फुलणारे हे प्रेम आपसूकच वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त व्हायला लागले. निरज एका प्रतिथयश आयटी कंपनीमध्ये वरच्या हुद्द्यावर नोकरी करत होता. तर उर्वीला लहानपणापासून नृत्याची आवड असल्याने त्यातच पुढे आपले करिअर करायचे असे तिने ठरवले होते. दिवसातील ठराविक तास नृत्याचा सराव, नृत्याचे कार्यक्रम यामध्ये ती व्यग्र असायची.

दोघांनी एकमेकांना कोणतीही कमिटमेंट दिली नसली तरीही नाते मैत्रीच्या पुढे गेले असल्याने एखाद्या जोडप्याप्रमाणे ते वावरु लागले होते. एकदा संध्याकाळी कॉफीला भेटले अचानक निरजने तिला विचारले मला किस देशील? कदाचित हा प्रश्न तिच्यासाठी अनपेक्षित असल्याने ती सुरुवातीला काहीशी गोंधळून गेली. काहीशी सावरल्यावर त्या वेळेपुरते उत्तर देणे उर्वीने शिताफीने टाळले. त्यालाही ती काहीशी ऑकवर्ड झाल्याचे लक्षात आल्याने त्यानेही विषय फारसा ताणला नाही. थोड्याशा शांततेनंतर काही घडलेच नाही अशा अविर्भावात त्याने ऑफीसमधल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. मग तिही काहीशी सावरली. आपले असे थेट विचारणे कदाचित तिला आवडले नसावे असे वाटून निरजनेही पुन्हा तो विषय काढला नाही.

आठवड्यातून दोघांना जमेल तसे कॉफीसाठी भेटणे, विकेंडला एखाद्या छानशा हॉटेलमध्ये डिनरला किंवा एखादा मूव्ही पहायला जाणे सुरुच होते. त्यांचे नाते छान फुलत असल्याने नेहमीचे शेअरिंग, एकमेकांबाबत असणारा पझेसिव्हनेस हे सगळे होतेच. दोघांचे रुटिन खुप जास्त व्यग्र असल्याने त्यांना निवांत भेटायला आणि बोलायला वेळच मिळत नव्हता. मग एक दिवस उर्वीचा डान्स क्लास सुटल्यावर निरज थेट तिच्या क्लासखाली आला आणि तिला गाडीवर बसवून गाडीला किक मारली. ”अरे आपण कुठे जातोय, सांग तरी” असे उर्वीने दोनदा विचारुनही कुठे जातोय हे काही त्याने सांगितले नाही. मग नेहमीप्रमाणे गप्पा मारत त्यांनी शहराचे टोक गाठले होते. काहीशा लांब पण शांत अशा एका छान रेस्टॉरंटमध्ये त्याने गाडी नेली. त्या लॉन रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर ती त्याच्यावर भलतीच खुश झाली होती. हळूवार सुरु असलेले संगीत आणि हलका वारा यामुळे वातावरण आणखीनच रोमँटिक झाले होते. नेहमीप्रमाणे त्यांच्या गप्पांचा सूर पुन्हा जुळून आला होता.

संध्याकाळच्या या रोमँटीक वातावरणात उर्वी भलतीच खुलली होती. या आनंदातून सावरत निरजने तिला तलावाच्या बाजूच्या एका टेबलवर नेऊन बसवले. उर्वीला हॉटेल फारच आवडल्याने तिचा मूड एकदम छान होता. थोड्या वेळाने त्यांची नजर बाजूच्या टेबलवर गेली. तिथेही एक जोडपे बसलेले, साधारण त्यांच्याच वयाचे. त्यांचे या जोडप्याकडे लक्ष जायला आणि त्या मुलाने हळूवार त्या मुलीच्या गालावर किस करायला एकच वेळ झाली. दोघांनीही हे दृश्य टिपले आणि दोघांच्याही मनात एकच विचार आल्याने त्यांची अर्थपूर्ण नजरानजर झाली. उर्वी नेहमीप्रमाणे काहीशी अवघडली आणि निरज तिच्याकडे एकटक बघत राहिला. खूप वेळ तो तसाच बघत होता. शेवटी न राहवून उर्वीने त्याला बोलते करायचा प्रयत्न केला. विषय बदलायचा म्हणून आपल्या येत्या नृत्याच्या कार्यक्रमाविषयी उर्वी त्याला सांगायला लागली. निरजने तिला बोलताना मधेच तोडले आणि पुन्हा एकदा किससाठी विचारणा केली. यावर काहीच न बोलता उर्वीने खुर्चीतून उठत थेट निरजच्या कपाळावर छान कीस दिली.

उर्वीच्या या एका किसने निरज खूप सुखावून गेला होता. ज्या गोष्टीची त्याला मागच्या बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा होती, ती कपाळावर का होईना आज मिळाली होती. मग कपाळावर दिलेली किस म्हणजे एकमेकांवरच्या विश्वासाचे प्रतीक असते असा विचार त्याने मनोमन केला आणि उर्वीची खेचायच्या मूडमध्ये त्याने तिला चिडवायला सुरुवात केली. तिही काहीशी लाजतच त्याला झालेल्या आनंदाने आतल्या आत आनंदून गेली होती. किस ही व्यक्त होण्याची भाषा असते. किस म्हणजे प्रेमाचे प्रतीक असले तरीही त्यातून नात्यातला विश्वास व्यक्त होत असतो तर कधी एकमेकांना दिलासा. निरज तिला खूप आतून समजावत होता. किस ही व्यक्त होण्याची एक भाषा असते असे सांगताना त्याच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारे प्रेम उर्वीने आणि प्रतिक्रिया देत नसली तरीही उर्वीला आपण सांगत असलेले पटत असल्याची भावना निरजने डोळ्यातून ओळखले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हॅलेंटाइन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Happy kiss day 2018 know the different types of kisses and their meanings on this kiss day