Happy Promise Day: शब्द हा देतो तुला मी… शब्द हे तुझियाचसाठी…

ठाव मजला मीच घेतो… श्वासही तुझियाचसाठी !

promise day
प्रॉमिस डे

जो वादा किया वो निभाना पडेगा, असं म्हणत कोणी आपलं माणूस ज्यावेळी डोळ्यात डोळे घालून पाहतं ना, तेव्हा एका वेगळ्याच दुनियेत असल्याची जाणीव होते. मुळात प्रेमात भावना जितकी महत्त्वाची असते तितकेच शब्द आणि त्यामागे दडलेलं निस्सिम प्रेमही महत्त्वाचं असतं. अशा या प्रेमाचा दिवस जसजसा जवळ येतोय तसतशी त्याविषयीची उत्सुकता आणखीनच वाढतेय. आज ‘प्रॉमिस डे’. व्हॅलेंटाइन्स वीकच्या निमित्ताने या दिवसाचे औचित्य साधत आपल्या प्रिय व्यक्तीला असंख्य वचनं देण्याचा तुमचाही मनसुबा आहे का? जर तुमचं उत्तर हो आहे, तर ही कविता नक्की वाचा..

शब्द हा देतो तुला मी
शब्द हे तुझियाचसाठी ..
गीत माझे अन् कविता
गझलही तुझियाचसाठी !

बहरल्या बागा कितीदा
बघ सुगंधी या फुलांनी ..
बहरली वृंदावनी पण
तुळस ही तुझियाचसाठी !

चांदण्या चमचम नभातच
रात्र सारी थांबलेल्या ..
उजळतो तो चंद्र देखिल
रात्रभर तुझियाचसाठी !

ठाऊक हे आहे जगाला
मज सोस नाही गायकीचा ..
पण तरीही लागलेला
सूर हा तुझियाचसाठी !

वाटते आयुष्य माझे
चालले इतरांपरी पण ..
ठाव मजला मीच घेतो
श्वासही तुझियाचसाठी !

माधव दीक्षित

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Happy promise day love gift girlfriend boyfriend loved ones poem