तू आत्तापर्यंत कितीदा I love you म्हणाली (म्हणाला) असशील? अनेकदा आणि अनेकांना हे तीन छान शब्द सांगून झाले असतील. कधी कॅज्यूअली तर कधी डोळ्यातलं पाणी लवपवतं. आता पुढचा प्रश्न किती वेळा तू I love Me म्हणाली (म्हणाला) आहेस. उत्तर ९० टक्के विश्वास आहे शून्यच असेल. कारण आपण नेहमी वाट बघत असतो कोणीतरी येऊन आपल्यावर प्रेम करेल. का नाही ना आपण आधीच स्वत:वर प्रेम करत. उगच कोणीतरी येऊन आपण किती स्पेशल आहे असं आपल्याला भासवून देतो मग आपल्याला आपण खास आहोत असं वाटतं पण पहिल्यापासूनच का असं होत नाही ना?

अंग वेडे तुला अंदाज नसेल कसली मस्त दिसतेस तू जेव्हा तुझ्या केसांची लट डोळ्यावर येते आणि खाली बघत बघत असाइनमेन्ट लिहीताना त्याचे तुला भान नसते. काही पोरी अगदी पावडरचं दुकान बनून येतात तुझ्या डोळ्यातला ओलाव्यासमोर त्यांचा आयलायनर फिका पडतो. त्यांना लिपस्टीक लावून ओठांकडे नजर वेधून घ्यावी लागते तर तुझ्या ओठांवरची स्माईलच काही किलोमीटरवरून तुझे ओठ नोटीस करण्यास भाग पाडते. तू टिपीकल गर्लिश नाहीयस म्हणून तू अनेकांना आवडत असावीस. कधीतरी निवांत स्वत:बद्दल विचार कर ना. बाकी पोरी नेलपॉशीची कोणती शेड घेऊ या गहण चर्चेत रंगलेल्या असताना तू समोरचा बघ काय फटँग दिसतोय असं येऊन माझ्या कानात सांगतेस. कॉलेजच्या नाक्यावर उभी राहण्याची हिंम्मत असणाऱ्या मोजक्या पोरींपैकी एक आहेस तू. बरं मी जो मागील पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे त्यालाही तू पोरी दाखवतेस आपण भटकायला गेल्यावर. आणि नंतर मलाच धमक्या देतेस. हे सगळे तुझ्या व्यक्तीमत्वाचे पैलू आहेत आणि ते तुला खूप खास बनवतात. तू ट्रॅडिश्नलमध्ये आलीस की सर्वांच्याच काळजाचं पाणी होतं. ट्रॅडिश्नलमध्ये तू कॉलेजमध्ये दिसलीस की, कॉलेज कसं विधानसभेसारखं वाटतं, आणि तू एखाद्याकडे पाहुन हसली की त्याला बिनविरोध “आमदार”झाल्यासारखं वाटतं हे गाणं आठवतं एकदम. हो थोडं छपरी आहे अगदी तुझ्यासारखंच पण हेच गाणं तुला ट्रॅडिश्नलमध्ये पाहिल्यावर पहिल्यांदा डोक्यात येतं. इतकी मस्त दिसतेस तू ट्रॅडिश्नलमध्ये काय सांगू तुला…. हा आता ती वेगळी गोष्ट की तुला तो ट्रॅडिश्नल अटायर कॅरी करता येत नाही. म्हणजे नाक्यावरच्या मुलाला संस्कृत बोलायला सांगितल्यावर त्याच्या जिभेची चाळण होते तसं तुझ्या टॉमबॉयनेसचं होते ट्रॅडिश्नलमध्ये. तू खरंच पड ना स्वत:च्या प्रेमात कारण अनेकजण तुझ्या प्रेमात असतील, काहींनी येऊन सांगितलं असेल, तर काहींची तुझ्या रागाकडे पाहून तितकी हिंमत झाली नसेल. पण तू स्वत:वर कसं प्रेम करशील मला पाहायचं. कारण मला खात्री आहे की तू स्वत:वर बेभान होऊन प्रेम करशील मला ठाऊक आहे. म्हणजे पॅराग्लायडिंग करताना पहिल्यांदा धक्का दिल्यानंतर वाटणारी भिती आणि नंतर येणारा तो बेभानपणा आणि स्वच्छंदीपणाचा कॉम्बो असतो ना तसंच तू स्वत:वर प्रेम करशील याची पक्का खात्री आहे मला.

बघ ना जरा जमतंय का? आता आपल्या मैत्रीसाठी स्वत:वर प्रेम करं असं सांगणं पचत नाही म्हणून नाही सांगतंय.

आणि ए तू काय दात काढतोय? तू कधी स्वत:कडे प्रेझेन्टेशन देताना पाहिलंयस का? पोरींच पीपीटीकडे कमी एवढं तुझ्याकडे लक्ष असतं. टग इन केलेला शर्ट, हाफ कट टू कट फोल्ड केलेल्या हाताच्या बाह्या, जसे काही मैदानात परेडला उभे आहेत तसे सावधान स्थितीमध्ये असणारे केस आणि मध्येच नाकाजवळ चष्मा दाबून सेट करण्याची तुझी स्टाईल असं सगळं मिळून सांगायचं झालं तर एवढचं सांगेल की, ‘भावड्या बच्चन दिसतोस तू!’ तू नोटीस केलंय की नाही ठाऊक नाही काउन्सीलच्या मिटिंगला पोरी तुझ्या आजूबाजूला बसायला वेळेआधी येतात. आणि तू याच्या त्याच्या जवळ जाऊन गप्पा मारत असतोस. इथून तिथे तिथून तिथे करत वर्गभर फिरतो मिटींग सुरु होण्याआधी. मग अचानक मॅडम आल्यावर साहेब आहे तिथेच सेट होऊन मिटिंग सुरू असताना, ‘शूककक…. शूककक… ती बँग पास कर ना’ म्हणत त्याच पोरींच्या प्रेमाचा गैरफायदा घेणार. तुझ्यासाठी स्वयंवराची लाइन लागली तर काहीजणी दाखल्यामध्ये झोल करून लहान असल्याचे सांगत स्वयंवराच्या रांगेत उभ्या राहतील. पण तुला काय ना त्याचं? मला एक कळत नाही, तू काही खास दिवस सोडता बाकी वेळेस इतका गबाळ्यासारखा राहतोस तरी पोरी तुझ्यावर फिदा का? तुझ्या बागेत सदा हिरवळ आणि बाकीच्यांच्या बागेत अगदी दुष्काळात तेरावा महिना आल्याप्रमाणे सुकलेल्या गवताची पात हलवणारा वारा पण नाही. पण तुही तिच्यासारखाच तू कधी स्वत:चा विचार केला नाही. सगळीकडे तुझं आपलं ‘आपण… आपण… आपण…’ बेस्ट स्टुडंटचा पुरस्कार मिळाला तेव्हा पण हे सर्व माझ्या मित्रांमुळे आणि अजून बऱ्याच आलाना फलाना लोकांची नावं घेतली तू. कसला आहेस रे तू. कधीतरी स्वत:ला क्रेडिट घे लेका. लोकं स्वत:च्या हक्काचं नसताना क्रेडिट घेतात आणि तू कष्ट करुनही क्रेडिट घेत नाहीस. कदाचित तुझ्या याच आऊट ऑफ द बॉक्स पर्सनॅलिटीवर सगळेच फिदा असतील. पण तू स्वत:वर प्रेम करून बघ ना. स्व:तसाठी काहीतरी कर ना. मला ठाऊक आहे तुझ्यात लिडरशीप क्वॉलिटी वगैरे आहे पण सगळीकडे थोडी आपण आपण करायचं असत असाच राहिलास तर हनिमूनची ग्रुप टूर बुक करून घरी येशील त्याच दिवशी पत्नी स्वइच्छेने तुला सोडून जाईल.

वरील दोन्ही उदाहरणे प्रातिनिधिक उदाहरणे झाली. पण असे अनेक मस्तमौला आहेत जे स्वत:च्या जगात नाही तर आजूबाजूच्यांसाठी इन्फ्लूअन्सर्स आहेत. काहींना छावा-छावी आहेत काही अलोनच आहेत. पण असे सॅम्पल बाय चॉइस अलोन असतात. अशा लोकांनी मी तर म्हणतो रायदर सर्वांनीच स्वत:च्या प्रेमात पडायला हवं. आता स्वत:च्या प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं. एकटच सिनेमाला जायचं, हॉटेलमध्ये जायचं मुद्दाम एकट्याचंच चेक इन करायचं, रोज स्वत:बद्दल विचार करायला अर्धा तास तरी राखून ठेवायचा, कायम ग्रुपबरोबर भटकण्यापेक्षा एखादा एकट्याने जीवाची मुंबई करायची, स्वत:साठी टाइम द्यायचा.  शारीरिक आनंदाबरोबरच मानसिक आनंद म्हणजे स्वत:च्या प्रेमात पडणे. नाही बोलायला शिकणे म्हणजे स्वत:च्या प्रेमात पडणे. कसलाच स्वत:ला उगच त्रास करून न घेणे म्हणजे स्वत:च्या प्रेमात पडणे व.पु. म्हणतात तसं कणाकणांमध्ये साठलेलं हे आयुष्य जर जगता आलं तरच जगण्यातली मजा खरीखुरी अनुभवता येईल.  व.पु.चं आणखीन एक मस्त वाक्य म्हणजे, ‘खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे “आयुष्य”’. दुसऱ्यांवर आयुष्य उधळता उधळता बॅकअपमध्ये स्वत:वर उधळायला काहीतरी ठेवणं म्हणजे स्वत:वर प्रेम करणं.

मग कधी पडताय स्वत:च्या प्रेमात?

शब्दांकन- स्वप्निल घंगाळे

swapnil.ghangale@loksatta.com