कोणतीही कृती करताना विचार करावा, हे खरं असलं तरी प्रत्येक गोष्टीला ते लागू होतंच असं नाही. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे प्रेम! प्रेम करण्यामागे कधीच कोणता विचार असू शकत नाही. कारण ते एकदम ‘दिल से’ असतं.

आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर काही ना काही निर्णय घेताना आपल्याला खूप विचार करावा लागतो. आयुष्यातल्या अनेक गोष्टी या विचार करूनच केलेल्या चांगल्या असं मोठय़ांचंही सांगणं असतं. मात्र काही भावना अशा असतात ज्यांना विचारांच्या चौकटीत बसवता येत नाही आणि कोणत्याही एका प्रकारच्या विचाराचे मापदंड त्यांना लावता येत नाहीत. काही भावना अशा असतात ज्यांचा उगमही आपल्या हातात नसतो आणि अंतही! प्रेम ही अशीच एक सर्वात नाजूक आणि हळुवार भावना जिचं मोल कोणत्याच विचारांच्या तराजूने करता येणार नाही. कदाचित प्रेम ‘व्यक्त’ करण्यामागे विचार असू शकतो, मात्र प्रेम या भावनेमागे कधीच विचार असू शकत नाही.

एखाद्या गोष्टीचा प्रतिसाद म्हणून मनात येणाऱ्या भावना नेहमीच उत्स्फूर्त असतात, त्यांच्यामागे ‘आता मला आनंद व्हायला पाहिजे’ अशा प्रकारचा कोणताही विचार नसतो. आनंद एकतर होतो किंवा होत नाही. अगदी तसंच प्रेमाचं! ही व्यक्ती मला आवडली पाहिजे, ही व्यक्ती माझ्यासाठी चांगली असू शकते, अमुक एका प्रकारची व्यक्ती मला नकोच आहे, इत्यादी इत्यादी विचार आधी करून ठेवून नंतर एखाद्याच्या प्रेमात पडणं म्हणजे नियमांच्या चौकटीत प्रेम करायला लावणं किंवा नियमांमुळे प्रेम न करण्यासारखं आहे. प्रेम ही भावना प्रत्येक वेळी प्रतिसादात्मक नसते; आणि जेव्हा ती प्रतिसादात्मक असते तेव्हा कोणीतरी आधी ‘साद’ घातलेली असते.

भावनिक व्यवस्थापन नावाचा एक प्रकार मानसशास्त्रात शिकवला आणि अभ्यासला जातो. त्यात आपल्या मनात येणाऱ्या भावनांवर नियंत्रण मिळवायला ‘शिकवलं’ जातं. मात्र खरंतर हे नियंत्रण भावनांवर नसून त्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धतींवर असतं. मनात येणारी कोणतीही भावना, स्वत: त्या व्यक्तीला किंवा बाहेरून दुसऱ्या कोणाला, नियंत्रणात ठेवता येत नाही. मुळात भावना ही नियंत्रणात ठेवायची गोष्टच नाही. भावना असणं हीच माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं ठरवणारी, श्रेष्ठ ठरवणारी देणगी आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, जर माणसाने सगळ्या भावनांपासून लांब जाऊन अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला तर माणसात आणि प्राण्यांत फरक तो काय उरला? जगाच्या निर्मितीचं रहस्य आणि मुख्य कारण म्हणून टागोर ‘प्रेम’ या संकल्पनेकडे पाहतात. जगातल्या सर्व सुंदर गोष्टींची अनुभूती घेऊनच परमोच्च आनंदाची प्राप्ती करून घेता येते असं टागोरांनी त्यांच्या ‘साधने’त म्हटलं आहे.

प्रेमाच्या बाबतीत एक उदाहरण नेहमी सांगितलं जातं. जेव्हा आपल्याला एखादं फूल आवडतं तेव्हा आपण ते तोडून घेतो, मात्र जेव्हा आपल्याला त्या फुलाबद्दल प्रेम वाटतं तेव्हा आपण त्या फुलाला रोज पाणी घालतो, त्याची जोपासना करतो, त्याची काळजी घेतो. या सगळ्या गोष्टी ठरवून करता येत नाहीत. प्रेम केलं म्हटल्यावर कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत यांची काही नियमावली नसते. प्रत्येकाला प्रेमासाठी करायच्या गोष्टींचं महत्त्व वेगवेगळं असतं, प्रत्येकजण प्रेमासाठी वेगवेगळे त्याग करत असतो, प्रत्येकाच्या प्रेमाच्या नात्याची गरज वेगवेगळी असते आणि त्यानुसार प्रत्येक जण वागत असतो. त्यामुळे ‘प्रेम असलं म्हणून काय झालं, एवढं करावं का’ हे बाहेरून बोलणं सोपं असलं तरी प्रत्यक्ष तिथे असणाऱ्याची भूमिका आणि परिस्थिती बाहेरून समजून घेता येत नाही. प्रेमाची एकच एक सरसकट कोणतीही आचारसंहिता नसते. प्रेम, त्याचे आयाम, त्याचं गांभीर्य, दोन व्यक्तींमधलं नातं या सगळ्या गोष्टी व्यक्तिसापेक्ष असतात.

यूटय़ूब चॅनल्सवर अनेकदा ‘रिलेशनशिपमध्ये काय बोलू नका’, ‘रिलेशनशिपचे डूज अँड डोन्ट्स’ वगरे धाटणीचे व्हिडीओ पाहायला मिळतात. खरंतर व्यावसायिक हितसंबंध सोडता कोणत्याच नात्यात असे ‘डूज अँड डोन्ट्स’ असता कामा नयेत; आणि प्रेमाच्या जोडीदारांमध्ये तर कधीच नाही! आपल्याला आपल्या साथीदारासोबत तितक्याच हक्काने भांडता आलं पाहिजे आणि तितक्याच हक्काने, लाडाने हट्टही करता आला पाहिजे. एखादे वेळी दोघांपकी एकाचा मूड चांगला नसेल तर दुसऱ्याने त्याची मन:स्थिती समजून घेतली पाहिजे. कोणाचा तरी तिसऱ्याचा राग आपल्यावर निघतोय हे समजून घेऊन शांत राहता आलं पाहिजे आणि तेवढी मुभा आपल्या जोडीदाराला असली पाहिजे. बाहेरच्या जगात सदैव मुखवटा घालून वावरणाऱ्या दोघांनाही एकमेकांशी वागताना कोणताच मुखवटा घालायची गरज भासता कामा नये. ‘शो मस्ट गो ऑन’ हे ब्रीदवाक्य बाहेरच्या जगात पाळावंच लागतं. मात्र आपल्या माणसासोबतच्या नात्यात ‘शो’ थांबवून मनमोकळं रडण्याचंही स्वातंत्र्य असलं पाहिजे. प्रेम आणि स्वातंत्र्य या दोन्ही हातात हात घालून जाणाऱ्या संकल्पना आहेत. आपल्या जोडीदाराशी वागतानाही जर व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य नसेल आणि तिथेही ‘डूज अँड डोन्ट्स’चे नियम पाळायचे असतील तर बाहेरच्या जगात आणि प्रेमाच्या, आपल्या माणसात फरक काय राहिला?

‘आपल्या बॉयफ्रेंडला देण्यासाठी बेस्ट अकरा गिफ्ट्स’ किंवा ‘गर्लफ्रेंडचा राग घालवण्याचे टॉप नऊ उपाय’ यांसारखे व्हिडीओ हे केवळ त्या पावणेतीन किंवा साडेचार मिनिटांपुरतं मनोरंजन करण्याचं साधन असतात. जसा प्रत्येकाचा डीएनए वेगळा असतो, प्रत्येकाच्या अंगठय़ाचा ठसा वेगळा असतो तसंच प्रत्येकाचं ‘आपलं माणूस’ वेगळं असतं आणि त्यामुळे त्याला खूश करण्याच्या पद्धतीही वेगळ्या असतात. एखादीला त्याने दिलेल्या फुलांचा वास आवडेल, एखादीला तिच्यासाठी केलेली शब्दांची आरास आवडेल तर एखादीला केवळ त्याचा सहवासही आवडेल. कोणी साद येण्याची वाट पाहत असेल तर कोणी प्रतिसादाची! कदाचित एखाद्याला ‘ती’च्यासोबत भटकायला जावंसं वाटत असेल तर एखाद्याला केवळ मनमोकळ्या गप्पा माराव्याशा वाटत असतील. एकाच प्रेमाच्या नात्याचे रंग हळूहळू बदलत जातात, गहिरे होत जातात, तर वेगवेगळ्या नात्यांची काय कथा! वेगवेगळ्या नात्यांना गणितासारखं एकाच सूत्रात कसं बांधणार ?

कोणत्याही सूत्रात न बांधली जाणारी आणि तरीही सगळ्यांमध्ये तितकीच तीव्र असणारी ही भावना म्हणजे प्रेम! प्रेमात कोणतीच गोष्ट ‘दिमाग से’ होत नाही; होते फक्त ‘दिल से..!’
वेदवती चिपळूणकर – response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा