व्हॅलेंटाइन डे आणि तरुणाई असं एक समीकरण झालंय. पण हे समीकरण पूर्णपणे बरोबर आहे असं नाही. कारण व्हॅलेंटाइन डे आता फक्त तरुणाईचा सण राहिलेला नाही; तर तो वयस्कर आणि मध्यमवयीन जोडप्यांचाही आनंदाचा भाग झालेला आहे.

व्हॅलेंटाइन डे हा दिवस म्हणजे प्रेमी युगुलांसाठी जणू एक सणच. अनेक जण या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. आपल्या प्रेयसी किंवा प्रियकरासोबत अनेकांना हा दिवस उत्साहात साजरा करायचा असतो. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या प्रेमाचा असतो, असं म्हटलं तरी व्हॅलेंटाइन डे प्रेमात असलेल्या प्रत्येकाला महत्त्वाचाच वाटत असतो. हा दिवस त्यांना त्यांच्या हक्काचा वाटतो. या दिवसाचं औचित्य साधून ते त्यांचं प्रेम पुन्हा नव्याने खुलवतात, व्यक्त करतात. या दिवसाच्या निमित्ताने ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. हा दिवस खास तरुणांचा वाटत असला तरी तरुण नसलेल्या काही जोडप्यांसाठीसुद्धा तो महत्त्वाचा ठरतो. ही जोडपी हा दिवस साजरा करण्यासाठी त्यांचं वय बघत नाहीत तर त्यांच्यातलं फक्त प्रेम बघतात. जसं त्यांच्या वयाचा आकडा त्यांना महत्त्वाचा वाटत नाही तसंच त्यांच्यातलं प्रेम किती जुनं, किती नवं हे गौण ठरतं. त्यांच्यासाठी प्रेम हे प्रेम असतं. निखळ, निर्मळ..!

Israeli missiles hit site in Iran
Iran-Israel War : इस्रायलची इराणविरोधात कारवाई सुरू, न्यूक्लीअर साईट्स असलेल्या शहरात अनेक स्फोट
stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
Love Jihad
व्हायरल होत असलेला लव्ह जिहादचा तो व्हिडीओ…
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल

लग्नाला अनेक र्वष उलटून गेलेली असतानाही आपल्या प्रेमाची पोचपावती देण्यासाठी अनेक वयस्कर जोडपी व्हॅलेंटाइन डे साजरा करतात. वयानुसार त्यांच्यातलं प्रेमही मोठं झालेलं असतं. लग्न झाल्यानंतर संसारात रमलेल्या अनेक जोडप्यांना एकमेकांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. कधी कधी काहीही न बोलता नुसतं एकमेकांसोबत असणं हेदेखील महत्त्वाचं असतं. पण अनेकदा तेही घडत नसतं. घर, संसार, आर्थिक परिस्थिती, मुलंबाळं या सगळ्या चक्रात व्यस्त असतात. पण याच चक्रातून बाहेर पडत एकमेकांना ठरवून वेळ देत, ठरवून एक अख्खा दिवस जोडीदारासोबत घालवत, एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त करत ते जोडपं त्यांच्यातलं प्रेम पुन्हा एकदा खुलवतं. तो दिवस असतो व्हॅलेंटाइन डेचा! तरुणांप्रमाणेच तेही त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची ही प्रेमळ संधी सोडत नाहीत. जनक थोरवी यांचा २७ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालाय. पण त्यांच्यातलं प्रेम आजही चिरतरुण असल्याचं त्या सांगतात. ‘आम्ही अजूनही व्हॅलेंटाइन डे अगदी पहिल्यासारखाच साजरा करतो’, असंही त्या आवर्जून सांगतात.

व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची पद्धत वेगळी असते. त्याच प्रकारे मोठी मंडळी साजरा करतात असं नाही. त्यांची पद्धत भलेही साधी असेल, पण ती त्यांच्यासाठी उत्तमच असते. एकमेकांना वेळ देणं म्हणजे नेमकं काय तर; एकमेकांसोबत असणं, जेवायला जाणं, फिरणं, एखादा सिनेमा किंवा नाटक बघणं. इतकी साधी कल्पना आहे त्यांची व्हॅलेंटाइन डे साजरी करण्याची. तरुण पिढीला गिफ्टचं इतकं नावीन्य राहिलं नाही. पण या मोठय़ा मंडळींमध्ये एकमेकांना भेटवस्तू देणं म्हणजे आनंदाचा सोहळा असतो. जसं गिफ्टचं तसंच सरप्राइजचंसुद्धा आहे. सरप्राइज देणं याचा उत्साह, आनंद त्यांना बराच असतो. संजय वाघ हे त्यांना मिळालेल्या एका सरप्राइजबद्दल कौतुकाने सांगतात. ‘माझी बायको खूप साधी आहे. पण गेल्या वर्षीच्या व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तिने मला चक्क प्रपोज केलं. मी तो दिवस कधीच विसरू शकणार नाही.’ आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी काहीतरी खास केलंय, ही भावना सुखावह असते. याचा अनुभव संजय यांना मिळाल्यामुळे त्यांचा व्हॅलेंटाइन डे उत्साहात साजरा झाला.

नोकरी-व्यवसायामुळे प्रत्येक जण आपापल्या कामात अडकला आहे. तरी काहीजण या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत आपल्या जोडीदाराला खूश ठेवण्याचा प्रयत्न करतं. संगीता जाधव सांगतात, ‘आपण रोजच कामात या ना त्या कारणाने व्यग्र असतो. त्यामुळे एकमेकांना वेळ देणं थोडं कठीण असतं. पण माझ्या नवऱ्याने व्हॅलेंटाइन डेला पूर्ण वेळ मला द्यायचा असं ठरवलं आहे. आज १२ र्वष झाली ते आपला शब्द पाळत आहेत.’ तर राधिका माने सांगतात, ‘आमच्या लग्नाला २२ र्वष झाली. माझ्या नवऱ्याला मला नेहमी वेळ देता येत नाही. पण व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने ते माझ्यासाठी नेहमी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात.’

तरुणांचा जोश, उत्साह, बिनधास्तपणा हा आपल्याला दिसून येतो. पण अशी अनेक वयस्कर जोडपी या दिवसाच्या निमित्ताने आनंद उपभोगायचा प्रयत्न करत असतात. हे आपल्या लक्षात येत नाही. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी बरेच जण आपल्या बायकोला फिरायला घेऊन जातात. तर अनेक जण बायकोला काही पदार्थ बनवून खाऊ घालायचा प्रयत्न करतात. अनेक जण तिच्या आवडीचा पदार्थ खाण्यासाठी तिच्या सोबत जातात. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या स्त्रिया आपल्या नवऱ्याकडे फिरायला घेऊन जाण्याकरता हट्ट धरतात आणि नवऱ्याला तो हट्ट मान्य करावाच लागतो.

काही दिवसांपूर्वी एका बागेत फिरत असताना तिथेच ६०-६५ वयाच्या काही आजी बसलेल्या दिसल्या. त्यातली एक आज्जी म्हणत होती की माझ्याने आता काही होत नाही, थकायला होतं. पण परवा यांच्या बोलण्यातून आलं की माझ्या हातचे रव्याचे लाडू खायची त्यांची इच्छा आहे. मला बाई मनाला हुरहुर लागलीय. जसे जमतील तसे बनवेन मी. पण मी ते त्यांना लगेच खायला देणार नाही. व्हॅलेंटाइन डेला मी त्यांना खाऊ घालणार आहे.

अशी अनेक वयस्कर, मध्यमवयीन जोडपी आपापल्या परीने आपल्या प्रेमासाठी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आता एक गोष्ट तर लक्षात आली आहे, व्हॅलेंटाइन डे हा दिवस फक्त तरुणाईचा राहिलेला नाही. तर उत्साही वयस्कर जोडप्यांचासुद्धा झाला आहे.ो
प्रियंका वाघुले – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा