तरुणाईचे तरुण लेखक..!

प्रेमकथा लिहिणाऱ्या अनेक लेखकांची क्रेझ सध्या तरुणाईमध्ये दिसून येतेय.

प्रेमकथा लिहिणारा प्रत्येक लेखक त्याच्या खास स्टाइलने प्रेमकथा मांडतो आहे.

तरुण पिढींच्या आवडीच्या विषयांवरची पुस्तकं हमखास वाचली जातात. तरुण लेखकांच्या लोकप्रियतेकडे बघून याचा प्रत्यय येतो. प्रेमकथा लिहिणाऱ्या अनेक लेखकांची क्रेझ सध्या तरुणाईमध्ये दिसून येतेय.

जगात अजूनही रोमियो-ज्यूलिएटची प्रेमकथा सर्वात हिट मानली जाते. एक कादंबरी म्हणून तेव्हा आणि आजही ही प्रेमकथा तरुणांमध्ये गाजली व गाजतेय. काळ बदलला, त्याचप्रमाणे प्रेमकथाही बदलल्या. वेगवेगळ्या धाटणीच्या प्रेमकथा आज नव्या रूपात येत आहेत. काळाप्रमाणे त्यातही बदल होत आहेत, त्यांच्या कथानकांमध्ये वैविध्य दिसून येतंय. आजचा प्रेमकथा लिहिणारा प्रत्येक लेखक त्याच्या खास स्टाइलने प्रेमकथा मांडतो आहे. त्याचा हा प्रयत्न तरुणाई उचलून धरत आहे. आजची तरुण पिढी आवडीने त्यांच्या प्रेमकथा वाचते, त्यात रमते.  म्हणूनच आजच्या पिढीच्या म्हणजे तरुण लेखकांचा नवाकोरा, ऊर्जा देणारा, उत्सुकता असलेला तरुण चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

आजच्या तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेले तरुण लेखक त्यांच्या प्रेमकथांमधून तरुण पिढीचे प्रश्न मांडतात. त्यामुळे आपल्या आयुष्याशी संबंधित असलेल्या विषयावर भाष्य करणाऱ्या प्रेमकथा म्हणून तरुणाई त्यांच्या प्रेमकथांकडे खेचली जाते. चेतन भगत हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे. त्याने तरुणाईतले विषय त्यांच्याच भाषेत अनेक पुस्तकांतून मांडले. ‘वन इंडियन गर्ल’, ‘टू स्टेट्स’ या दोन्ही प्रेमकथा वेगवेगळ्या धाटणीच्या असल्या तरी त्यांतून मिळणारा संदेश एकच आहे. दोन्ही पुस्तकांत त्याने मांडलेल्या कथा तरुणांना जवळच्या वाटल्या. या दोन्ही कथांमध्ये प्रेम व त्याभोवती फिरणाऱ्या सामाजिक, नतिक व भावनिक नात्यांमधून आजची तरुणाई कशी जात असते हे रेखाटलं आहे. म्हणूनच केवळ प्रेमकथा न लिहिता आजच्या तरुणांना नेमकं काय भावेल हे मांडण्याचा लेखकांचा प्रयत्न असतो.

चेतन भगतप्रमाणेच सुदीप नगरकर, द्रुजॉय दत्ता, रिवदर सिंग हे आघाडीचे व तरुणांमधले लोकप्रिय लेखक आहेत. या लेखकांची लिहिण्याची पद्धत, त्यांनी मांडलेले विषय व्यक्तिपरत्वे बदलत असतात. तसंच प्रेमात होणारे गैरसमज, वाद, संकटं, अडचणी अशा समस्या अधोरेखित होतात. त्यामुळेच त्यांच्या प्रेमकथा वाचल्या जातात. सुदीप नगरकर, चेतन भगत या लेखकांनी उच्च वर्गातील व्यक्तींपेक्षा अगदी मध्यमवर्गीय घरातील दोन व्यक्तींमधलं प्रेम दाखवलं. ‘टू स्टेट्स’मधून दोन वेगळ्या संस्कृतींतील प्रेम तर सुदीप नगरकरच्या ‘यू आर ट्रेण्डिंग इन माय ड्रीम्स’ या पुस्तकातून दोन वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या दोघांतलं प्रेम आहे. मल्टिकल्चर रोमान्स या पठडीखाली या लेखकांनी प्रेमकथा लिहिल्या. काही कथा अशा असतात ज्या फॅण्टसीच्या आधारे प्रेमकथांना एक वेगळं वळण देऊ शकतात. उदा; जर असे झाले तर, मला ती भेटली तर, तो असा असला तर या विचारानेच आपण जसं कल्पनेत रमतो, तसंच तरुणांचंही आहे. त्यामुळे अशी काल्पनिक प्रेमकथाही तरुणांच्या आवडीची आहे.  तरुणांच्या मनातले, त्यांच्या कल्पनेतले असे काहीतरी त्या लेखकांनी शोधले की त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. द्रुजॉय दत्ताचे ‘द गर्ल इन माय ड्रीमस’, ‘वर्ल्ड्स बेस्ट बॉयफ्रेंड’ तसंच रिवदर सिंग याचे ‘कॅन लव्ह हॅपन ट्वाइस?’ या कल्पनेतून उभ्या राहिलेल्या प्रेमकथा आहेत. त्या वाचताना आपल्या मनातील प्रेमासंबंधीच्या खूप गोष्टी प्रकार्षांने जवळच्या आणि खऱ्या वाटतात.

प्रेमकथा मांडताना लेखकांची स्वत:ची मते, त्यांना भावलेले काही विचार प्रेमकथांच्या रूपात आले किंवा अगदी त्यांची स्वत:ची प्रेमकथा पुस्तकरूपात आलेली असेल तरीही त्या कथांना तरुणांचा खूप मोठा प्रतिसाद मिळतो, हे प्रकर्षांने दिसून आलेलं आहे. ‘टू स्टेट्स्’ ही कथा खुद्द लेखक चेतन भगत याच्याच प्रेमकथेशी जोडली आहे. रिवदर सिंगची ‘लव्ह स्टोरीज दॅट टच माय हार्ट’ आणि ‘आय टू हॅड अ लव्ह स्टोरी’ यात त्याने त्याच्या प्रेमासंबंधीच्या खूप साऱ्या वैयक्तिक बाजू लिहिल्या आहेत. तसंच अजय पांडे याने त्याच्या प्रेमकथेवर ‘यू आर द बेस्ट फ्रेंड’ हे पुस्तक लिहिले.

तरुणांना प्रेमकथांमधून एक वेगळा आदर्शही मिळत असतो. काहींना प्रेमात पडायची भीती वाटते, एक प्रकारचा न्यूनगंड असतो, आपल्यावर कोणी प्रेम करेल का अशी शंका असते, असे विचार असलेल्या मंडळींचं दु:ख लक्षात घेऊन प्रेमकथेच्या आधाराने या विषयांवर भाष्य करणारी पुस्तकं काही लेखकांनी लिहिली. ‘एव्हरीवन हॅज अ स्टोरी’ आणि ‘दिस इज नॉट युअर स्टोरी’ ही सावी शर्मा हिने लिहिलेली पुस्तकं त्याच धाटणीची आहेत. अनुराग गार्ग या लेखकाने ‘लव्ह नॉट फॉर सेल’ तर सुदीप नगरकरने ‘सॉरी यू आर नॉट माय टाइप’, ‘इट स्टार्टेड विथ अ फ्रेंड रिक्वेस्ट’ आणि ‘फ्यू थिंग्स लेफ्ट अनसेड’ अशा विषयांवर प्रेमकथा लिहिल्या. अशा पद्धतीच्या कथांमधून फसवेगिरी, सोशल मीडिया, प्रेमाचा बाजार अशा गंभीर विषयांना समोर आणले. आताच्या तरुण लेखकांमध्ये प्रेमकथा लिहिणारे जास्त लेखक आहेत. त्यांनी लिहिलेल्या प्रेमकथांमध्ये वर्तमानकाळातील खऱ्या जगातील प्रेमातील बऱ्याच समस्यांना वाचा फोडलेली आहे. म्हणूनच हे लेखक तरुणाईत लोकप्रिय आहेत.

थरार, रहस्य हा कोणत्याही कथांमधला अविभाज्य घटक. रॉमॅण्टिक सस्पेन्स असल्याशिवाय कोणतीही प्रेमकथा आजही यशस्वी होऊच शकत नाही, असं मत लेखक अजय पांडे यांनी व्यक्त केलं. ‘प्रेमकथा या खऱ्या किंवा खोटय़ा जरी असल्या तरी ट्विस्ट, सस्पेन्स आणि ड्रामा हा सिनेमाप्रमाणे कथा, कादंबऱ्यांमध्येही असावा लागतो. त्यामुळे नुसते त्या दोन व्यक्तींमधील प्रेम दाखवून चालत नाही; तर त्यांच्या भूतकाळातील घटना, माणसे, त्यांची इतरांशी असणारी नाती, प्रेमभंग, वेगवेगळ्या घटना, अपघात असे प्रसंग आणावेच लागतात. त्यामुळे एक वाचक म्हणून त्यातला रस वाढतच जातो, हे फक्त प्रेमकथांमध्ये वाचायला मिळतं म्हणूनच तरुण मंडळी प्रेमकथा जास्त वाचतात’, असं ‘हर लास्ट विश’ या पुस्तकाचे लेखक अजय पांडे सांगतात, लग्न, करिअर असे विषय मांडले की प्रेमकथा जास्त दमदार होतात. सुधा नायर यांची ‘द वेिडग तमाशा’ आणि निकिता सिंग यांची ‘द प्रॉमिस’ ही पुस्तकं त्याचीच महत्त्वाची उदाहरणं आहेत. प्रेमकथांना एक वेगळा प्लॅटफॉर्म देण्याचाही प्रयत्न आहे. निकिता सिंग व द्रुजॉय दत्ता या दोघांनी मिळून ‘समवन लाइक यू’ आणि ‘इफ इट्स नॉट फॉर एव्हर’ ही दोन पुस्तकेही काढली. यामध्ये दोन लेखकांचे वेगळे अनुभव शेअर केले आहेत. त्यामुळे ती फक्त एक प्रेमकथा न राहता त्यात दोन लेखकांचे विचार मांडले आहेत.

तरुणाईत लोकप्रिय असलेले सगळेच लेखक तरुणाईला अपेक्षित असंच लेखन करतात. त्यांच्या कांदबऱ्या सर्वात जास्त वाचल्या जातात. यातले सगळे लेखक वेगवेगळ्या क्षेत्रांतले पदवीधर आहेत. कुणी डॉक्टर, कुणी सीए, कुणी इंजिनीअर तर कुणी इंटिरिअर डिझाइनर आहे. त्यामुळेच सर्वसामान्य तरुणांसारखे तेही प्रेमाच्या सर्व टप्प्यांमधून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांची बाजू त्यांच्या कथांमधून मांडता आली आहे. म्हणूनच त्यांची पुस्तकं तरुण पिढीत लोकप्रिय आहेत.
गायत्री हसबनीस – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Valentine week 2018 young writers