१४ फेब्रुवारी म्हणजे प्रेमीयुगुलांसाठी खास दिवस. जगभरात प्रेम व्यक्त करण्यासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या या दिवसाबाबात आणखी एक वैशिष्ट्य आपल्यातील अनेकांना माहित नसेल. व्हॅलेंटाइनसाठी ओळखला जाणारा हा V आता व्हजायना आणि व्हायोलन्ससाठीही (महिलांवर होणारा हिंसाचार) ओळखला जाऊ लागला आहे. १९९८ पासून जगभरात यासाठीची जनजागृती केली जात असून महिलांवर होत असणारे अत्याचाराविरोधात आवाज उठविण्याच्या उद्देशाने काम केले जाते. V -Day असे नाव असलेल्या या स्वयंसेवी संस्थेव्दारे महिलांचे प्रश्न समजून घेऊन त्यादृष्टीने काम केले जाते.

जगभरातील महिला या मोहिमेमध्ये सहभागी होत असून अफगाणिस्तानमध्ये संस्थेतर्फे महिला नेतृत्व संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महिलांच्या बाजूने असणारे कायदे, त्याबाबतचे लिखाण, चर्चासत्रे, जनजागृती यांबाबत मोठ्या प्रमाणात काम करण्यात येते. काही वर्षात या चळवळीने बाळसे धरले असून आतापर्यंत जवळपास १५०० ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधातील ५४०० कार्यक्रम घेण्यात आले आहेत. समाजामध्ये महिलांना मुक्तपणे आणि सुरक्षितपणे जगता यावे यासाठी काम करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

महिलांवर होणारे बलात्कार, घरातील व्यक्तींकडून होणारा अत्याचार, विशिष्ट समाजात महिलांची होणारी सुंता, वेश्या व्यवसायासाठी होणारी महिलांची विक्री यांसारख्या विषयांवर या संस्थेव्दारे आवाज उठविण्याचे काम केले जाते. त्यामुळे सामान्य व्हॅलेंटाइनच्या पलिकडे जात या दिवसाच्या निमित्ताने जगभरात महिलांसाठी ही आगळीवेगळी चळवळ जोर धरत आहे. या मोहिमेचा आवाका आणि वेगाने होणारा प्रसार पाहता जागतिक स्तरावर महिलांचे प्रश्न समोर आणण्यासाठी आणि त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी येत्या काळात ही संस्था आणि त्यांनी सुरु केलेली मोहिम नक्कीच जागतिक स्तरावरील एक महत्वाचे व्यासपीठ म्हणून समोर होईल.