News Flash

उलटलेली चौकशी

आठवडय़ातून चार दिवस खोटे व किराणे ‘विरंगुळा’त गंधर्वमंच उभारतात.

उलटलेली चौकशी
‘विरंगुळा’च्या बाहेरच्या भव्य सभागृहात, प्रचंड संख्येतील फक्त चौदाच जणांपुढे माझा अपमान झाला होता.

मी शांतपणे म्हणालो, ‘‘चौकशी आयोग नेमा. खोटे व किराणे यांना बडतर्फ करा व ‘विरंगुळा’ वाचवा. मी लोकशाहीवादी आहे. खोटे व किराणे यांनी त्यांचं म्हणणं जरूर मांडावं.’’ थरथरत, कापत पुढं येण्याऐवजी खोटे व किराणे हासतनाचत पुढे आले व म्हणाले..

आमच्या ‘विरंगुळा’ केंद्राचे अध्यक्ष खोटे व कार्यवाह किराणे यांच्या विरुद्ध चौकशी आयोग नेमा व त्यांना बडतर्फ करा. ही वरवर विध्वंसक वाटणारी, पण प्रत्यक्षात विधायक ठरणारी सूचना माझी होती. मी ती सर्वसाधारण सभेत नम्रपणे मांडली. ओकांनी मला सावध केलं होतं, ‘‘मोकाशी, तुमचे मत चुकीचे आहे. ‘विरंगुळा’ चालवणे हे काम सोपे नाही. मोफत वैद्यकीय तपासणी असेल तेव्हाच तुम्ही ‘विरंगुळा’त येता व तपासणीत तुमच्या रक्तातील साखर जास्त निघाली की तपासणी बोगस आहे, असं ओरडता व फुकटचा चहा पिऊन निघून जाता!’’

मी शांतपणे बचाव केला, ‘‘मी कधीच पंतप्रधान होणार नाही. याचा अर्थ, पाकिस्तान व भारत यांच्यातील संबंध चर्चेतूनच सुधारतील, गोळ्या झाडून नाही हे मत मी मांडू नये असा थोडाच होतो? एक वेळ मुंबईतील नाले तुंबले, रस्त्यांवर खड्डे व खड्डय़ांत पुन्हा खड्डे पडले तर मी खपवून घेईन; पण सरहद्दीवर एकाही जवानाचा प्राण जाता कामा नये.’’

ओकांनी मला आपादमस्तक म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळलं व ते म्हणाले, ‘‘मोकाशी, तुम्हांला एकच डोकं आहे, दोन नाहीत, तरीही तुम्हांला असा भक्कम युक्तिवाद बरा सुचतो! ‘अव्यापारेषु व्यापार:’ हा तुमचा धर्म आहे.’’ ओकांनी मला संस्कृतात, ‘काय करायचं ते करा व मरा’ हे सांगितलं होतं.

विठ्ठलभक्त परब आकाशाकडे पाहत पुटपुटले, ‘‘म्हणे विठ्ठल पाषाण। त्याच्या तोंडावरी वहाण॥ शाळिग्रामासी म्हणे धोंडा। किडे पडोत त्याच्या तोंडा॥ तुका म्हणे किती ऐको। कोठवरी मर्यादा राखो॥’’

परब नेहमी तुकोबांचे शब्द माझ्या विरुद्ध वापरतात. तुकोबांनी नेमके माझ्या विरुद्ध कसे काय लिहून ठेवले आहे? खोटे व किराणे हे विठ्ठल व सत्य बोलणाऱ्या माझ्या तोंडावर वहाण काय?

ओक व परब यांना न जुमानता, सर्वसाधारण सभेत, मी माझ्या नेहमीच्या खुमासदार शैलीत प्रस्ताव मांडला, ‘‘विरंगुळा केंद्रात केव्हाही या, काही ना काही कार्यक्रम चालू असतो. वृद्धांना काय हवं असतं? विश्रांती, शांतता व ‘विरंगुळा’च्या खर्चानं, दोनतीन वेळा, फक्त अर्धा कप चहा. पण खोटे व किराणे ‘विरंगुळा’त आसनांचा वर्ग चालवतात! वर्ग कसला? हा उपसर्गच आहे. अवयव मोकळे असताना, आम्हांला धड चालता येत नाही; आसनांच्या वर्गात अवयव एकमेकात गुंतवायला शिकवतात! आम्ही तोल सांभाळत किंवा घालवत म्हणा, कसेतरी चालतो; मोकळे अवयव आसनात अडकून पडले तर ते चालणेही बंद होईल, वरती गुंतलेले अवयव सोडवून घेण्यासाठी रुग्णालयात भरती व्हावं लागेल. ‘म्हातारे’ या आदर, सहानुभूती निर्माण करणाऱ्या व पक्वता दाखवणाऱ्या शब्दाऐवजी ‘महातारे’ हा शब्द खोटे व किराणे या कोलंबसांनी शोधला आहे! म्हणे, आपण परस्परांना ‘महा-तारे’ म्हणून राहिलो तर म्हातारपण गळून पडेल व आपण तेजस्वी होऊ. माझे चार मित्र फसले व स्वत:ला ‘महा तारे’ म्हणवून घ्यायला लागले व घरीही महा ताऱ्यांप्रमाणे वागू लागले! त्यांच्या म्हाताऱ्या बायकांना, अवकाळी तारे झालेल्या म्हाताऱ्यांचा उपद्रव होऊ लागला. त्या बायकांनी माझ्या पत्नीकडे त्यांची व्यथा सांगितली म्हणून मला समजली. मग मी त्या महा-ताऱ्यांना समजावलं, ‘आणखी एक करा. तुम्ही प्रथम तोंडातील कवळ्या काढा, ‘महातारे’ म्हणवून घेणं थांबवा व त्या ऐवजी, चड्डी न घालण्याच्या तुमच्या शिशुवयातील, सोनू, राजू, बंडू व चंदू या नावांनी परस्परांना, रांगत हाका मारा. तुम्हांला तुमचे दुधाचे दात पुन्हा फुटतील व कवळ्या कायमच्या जातील! म्हणे म्हातारे ऐवजी ‘महा-तारे’ म्हटल्यावर तेजस्वी व्हाल!’ माझे मित्र सोनोपंत, राजाभाऊ, बंडूनाना व चंदू काका शहाणे झाले, त्यांनी ‘महातारा’ हा शब्द सोडला व शरीराला शोभणारा म्हातारा हा शब्द पुन्हा धरला, सरळ म्हाताऱ्याप्रमाणे वागू लागले. चार घरच्या चार आज्या नवरे म्हातारचक्रातून बाहेर पडले म्हणून खूश झाल्या. इकडे-तिकडे पाहू नका, मी सांगितलेली हकिगत खरी आहे, पण मी नावे काल्पनिक वापरली आहेत.

आठवडय़ातून चार दिवस खोटे व किराणे ‘विरंगुळा’त गंधर्वमंच उभारतात. हा मंच म्हणजे शांततेचा निकाल! आम्हा वृद्धांतील गंधर्वाना म्हणजे गायक-वादकांना, दोन तास त्यांच्यातील संगीतकला पेश करायला व्यासपीठ मिळतं म्हणे! मराठी शाळेत, चौथीत पाठ करून मनाचे चार श्लोक, आजोबांनी जिभेवर चढवलेले, गीतेतील अर्जुनाच्या न संपणाऱ्या शंका व त्याला उत्तर देणारे श्रीकृष्णाचे दोन श्लोक व बे एक्के बे असे काही पाढे (१९, २३ व २९ वगळून) या पलीकडे ज्या म्हाताऱ्यांच्या स्मरणात काही उरलं नाही ते गंधर्वमंचावरून भक्तीगीते आळवतात म्हणजे तोंडातल्या तोंडात जिभेवर घोळवतात! उतरत्या वयातील, कमी ऐकू येणाऱ्या श्रोत्यांच्या कानात, भक्तीगीते न कोंबता शृंगारिक लावण्या ऐकावा. आमचे म्हातारपण खळखळू, सळसळू व दरवळू लागेल, कानांना पुन्हा श्रवणफूट प्राप्त होईल! वृद्धत्व आणि वरती कानांवर भक्तीगीते म्हणजे वठलेल्या झाडावर कुऱ्हाड चालवणं.’’

जवळ बसलेले ओक पुटपुटले, ‘‘क्षते क्षारम्’ म्हणजे जखमेवर मीठ म्हणा.’’ ओकांच्या शेऱ्यामुळे मी हुरळलो नाही. ओकांचा मला पाठिंबा होता का हे त्यांचं संस्कृतचं प्रेम होतं? मी शांतपणे म्हणालो, ‘‘मी थांबतो. चौकशी आयोग नेमा. खोटे व किराणे यांना बडतर्फ करा व ‘विरंगुळा’ वाचवा. मी लोकशाहीवादी आहे. खोटे व किराणे यांनी त्यांचं म्हणणं जरूर मांडावं.’’

थरथरत, कापत पुढं येण्याऐवजी खोटे व किराणे हासतनाचत पुढे आले व म्हणाले, ‘‘चौकशी आयोग नेमू नका. आम्ही दोघे राजीनामे देतो. आम्ही मोकाशींचे आभारी आहोत. आपण त्यांनाच अध्यक्ष करू. या कामातून आम्हांला सोडवा. रोज सकाळ-संध्याकाळ ‘विरंगुळा’त येणं, एकमेव नोकराकडून, तो आला असला तर झाडलोट करून घेणं, नसला तर आपणच स्वच्छता करणं, सुतार-प्लंबर-गवंडी-इलेक्ट्रिशिअन मिळवणं, त्यांच्याकडून दुरुस्त्या करून घेणं, ‘वर्गणी द्या, वर्गणी द्या’ म्हणून सभासदांना विनंती करणं म्हणजे भीक मागणं, पत्ते व कॅरम खेळणाऱ्या सभासदांकरता कॅरम पावडर व पत्त्यांचे जोड पुरवणं, फुकट आरोग्य तपासणीकरता डॉक्टर मिळवणं, भाषणाकरता वक्ते आणि श्रोतेही जोडणं, वीज-पाणी-टेलिफोन ही बिलं भरणं हे आता आम्हांला पेलवत नाही. आमचे गुडघेही आजकाल दु:खतात. आता आम्हांला सोडा हे आम्ही दरवर्षी विनवून सांगतो. मोकाशी, तुम्ही ‘विरंगुळा’ ताब्यात घ्या व मनाप्रमाणे चालवा.’’

बाप रे! म्हणजे चौकशी आयोगाची मागणी करून मी, खोटे – किराणे यांचा फायदाच करून देत आहे तर! वरती अध्यक्षपदाच्या रोडरोलरखाली मी दडपला जातो आहे की काय?

पण ‘विरंगुळा’चे सभासद समंजस निघाले. ते एका आवाजात म्हणाले, ‘‘मोकाशी काय आहेत यांची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आम्हांला खोटे व किराणेच हवेत. झाडूवाला नोकर नियमितपणे येत नसेल तर त्या जागीही मोकाशींना नेमू नका. न येणारा नोकरच बरा होता म्हणण्याची पाळी तुमच्यावर येईल.’’

सभा संपली. सहानुभूतीची गरज होती म्हणून मी ‘संत’ परबाकडे पाहिले. परब पुटपुटले, ‘‘गाढव शृंगारिले कोडे। काही केल्या न हो घोडे॥ श्वान शिबिके बैसविले। भुंकता, न राहे उगले॥ तुका म्हणे स्वभावकर्म। काही केल्या न सुटे धर्म॥’’ (कोड = कौतुकाने, शिबिके = पालखीत, उगले = स्तब्ध, निवांत).

मी ओकांकडे पाहिलेच नाही. मराठीतून गाढव व श्वान हे अपशब्द मजपर्यंत पोचलेच होते. ते ओकांकडून पुन्हा का ऐका? बरं तर बरं, ‘विरंगुळा’च्या बाहेरच्या भव्य सभागृहात, प्रचंड संख्येतील फक्त चौदाच जणांपुढे माझा अपमान झाला होता. आतील हॉलमध्ये, रमी-ब्रीज-कॅरम खेळण्यात रमलेल्या ‘किरकोळ’ संख्येतील अडतीस सभासदांना बाहेर सर्वसाधारण वार्षिक सभा आहे. याचा पत्ताच नव्हता. पत्त्यातील व कॅरममधील क्वीन त्यांच्या नजरेत होती.

.. सारांश काय तर परब व ओक नेहमीच चुकतात असं नाही, एखादे वेळी ते बरोबरही ठरतात.

भा.ल. महाबळ chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2017 1:01 am

Web Title: activities in virangula center
Next Stories
1 चंदनाचं झाड!
2 भूमातेची प्रतिष्ठा
3 शब्द जपून वापरा!
Just Now!
X