सार्वजनिक उद्यानात आवाजच आवाज असतात. छोटी पाच वर्षांखालची मुले पळापळी करताना आनंदाने चीत्कारत असतात. ही मुले पाचशे-सहाशे चौरस फुटांच्या ब्लॉकमध्ये, एकटीदुकटी, दिवसभर बंदिस्त असतात. त्यांना उद्यानात लांबरुंद, प्रशस्त हिरवळ व आपल्यासारखी मुलेच मुले पाहायला, खेळायला मिळतात. मुले खिदळणारच. वृद्धपकाळामुळे ज्यांना बोलण्यापलीकडे काही जमत नाही व ज्यांचे मुलगा-सून-नातवंडे, नोकरी व शिक्षण या कारणाने, दिवसभर घरात नसतात असे एकाकी, ज्ञानी आजोबा उद्यानात फुलतात. राजकारण व भ्रष्टाचार या विषयांवर ते तोंडात खोकल्याची उबळ फुटेपर्यंत, तावातावानं मुद्दे मांडतात.

या सर्व आवाजांवर मात करून, मोकाशी संतापून कडाडले, ‘‘ओक, तानाजी को हाजीर करो.’’

Geographical mind Geographical knowledge about the battlefield
भूगोलाचा इतिहास: भौगोलिक बुद्धिबळ
Aurangzeb had changed the name of Pune to 'Muhiabad' after chatrapati shivaji maharaj death
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव; जाणून घ्या इतिहास
( Accident near Ambajogai Waghala Pati in Beed )
अपघातात नियोजित नवरदेवासह बहीण, भाची ठार; मृत रेणापूरजवळचे, अंबाजोगाईनजीकची दुर्घटना
Dilip Mohite patil,Shivajirao Adhalarao Patil
“आमच्यावर अविश्वास दाखवलात तर…”, पक्षप्रवेशावेळी मोहिते पाटलांचा शिवाजीराव आढळरावांना इशारा

ओक दचकले, पण समोर मोकाशींचे उघडलेले तोंड पाहिल्यावर पूर्ण स्वस्थ झाले व म्हणाले, ‘‘मोकाशी, उद्यानात येताना, घरात झालेले अपमान मागं सोडायचे. नोकरीत साहेब अपमान करायचे, निवृत्तीनंतर साहेबाची जागा बायकोनं घेतली असं समजायचं. मी कामाच्या बाईंना माझा चष्मा पाहिलात का असं विचारलं. तिनं प्रथम माझ्याकडं लक्षच दिलं नाही, नंतर तिनं मुद्दाम मला माझ्या मुलाचा चष्मा आणून दिला. सोनेरी काडय़ांचा, श्रीमंती चष्मा पाहून मी नापसंती दाखवली तर शेवंता म्हणाली, ‘भाऊसाहेब, मुलाची कार तुम्ही वापरता, आज त्याचा चष्मा वापरा!’ मी काही बोललो नाही. शेवंता या खोडसाळ कामवालीला मनातून बाहेर काढून, घरात सोडली व उद्यानात दाखल झालो.’’

परब म्हणाले, ‘‘ओक, पण तुमचा चष्मा तुमच्या डोळ्यांवर आहे!’’

‘‘चष्मा माझ्याजवळच होता, हरवला नव्हताच. शेवंता खोडसाळ आहे. ती फक्त माझ्या बायकोचं, सुनेचं व नातीचं ऐकते. म्हणून तिला धडा शिकवला.’’

परब शांतपणे म्हणाले, ‘‘ओक, तुम्हीही शेवंताप्रमाणेच खोडसाळ वागलात. तुकोबा म्हणतात, ‘मना सांडि हे वासना दुष्ट खोडी। मनी मानसी एक हे व्यर्थ गोडी॥’ खोडसाळपणात गोडी शोधू नका, खरी गोडी विठ्ठलनामात आहे.’’

‘‘निर्थक चर्चा नको. मी गंभीर आहे. तानाजी को हाजीर करो.’’ मोकाशींचा आवाज चढाच होता.

परब काकुळतीनं म्हणाले, ‘‘मोकाशी, हा तानाजी कोण? तो तुम्हाला का हवाय?’’

‘‘काल चिनू एक पुस्तक वाचत होता. त्यात तानाजी मालुसरेवर धडा होता. तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे सरदार कोंढाणा किल्ला सर करताना, युद्धात, ३ एप्रिल १६६३ रोजी, कामी आले. त्या तानाजींना हाजीर करा.’’

ओकांनी विचारलं, ‘‘मोकाशी, तुम्हाला अधूनमधून वेडाचे झटके येतात का हो? तुम्हीच सांगता की तानाजी १६६३ मध्ये मरण पावले, चालू वर्ष आहे २०१७; साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या तानाजींना आपण जिवंत कसे करणार? तानाजींवरचा धडा वाचून तुम्ही व्याकूळ झाला आहात. तुम्हाला आजच्या काळात चीनशी लढण्यासाठी तानाजी हवे आहेत. ते अशक्य आहे. आपण तानाजींचे पोवाडे गायचे, त्यांच्या चरित्रापासून स्फूर्ती घ्यायची.’’

परब म्हणाले, ‘‘मोकाशी, तुकोबा शूरांचा गौरव करतात, ‘शूरत्वासी मोल। न ये कामा फिके बोल॥ धीर तो कारण। साह्य़ होतो नारायण॥’ केवळ शब्दांना महत्त्व नाही हे तानाजींना माहीत होतं, म्हणून त्यांनी तलवार उचलली. तानाजींनी किल्ला जिंकला कारण नारायण साहाय्याला होता.’’

‘‘मला तानाजींवर खटला चालवायचा आहे. त्यासाठी तानाजी को हाजीर करो,’’ मोकाशींनी हेतू स्पष्ट केला.

कपाळावर हात मारून घेत, ओकांनी तोंडाचा शंख फुंकला, ‘‘तुम्हाला वेडाचे झटके येत नाहीत. तुम्ही ठार वेडेच आहात! फक्त चहा पिताना व दोन वेळा जेवताना तुम्हाला शहाणपणाचे झटके येत असणार. तानाजींना कोण हाजीर करणार? तानाजी हे फक्त शिवाजी महाराजांचं ऐकतात! मोकाशी, तुम्ही शेळीची शेपूट आहात, तुम्ही सिंहावर खटला भरणार? तुम्ही पाणी न देणारा कोरडा नळ आहात, तुम्ही समुद्रावर खटला भरणार? तुम्ही न पेटणारी मेणबत्ती आहात, तुम्ही तानाजी या सूर्यावर खटला भरणार?’’

मोकाशी, कधी नाही ते, नम्रपणे म्हणाले, ‘‘तानाजींपुढे मी शून्य आहे, ते मला मान्यही आहे. पण एखादी अति थोर व्यक्ती हयात नसली व त्या व्यक्तीची चूक ध्यानी आली तर आपण आपला राग त्या दिवंगत श्रेष्ठ व्यक्तीच्या पुतळ्यावर काढतो, शिक्षा म्हणून आपण तो पुतळा उखडून फेकून देतो. तानाजींना हाजीर करणं शक्य नाही हे मला समजलं आहे. ओक, तुम्ही तात्पुरते तानाजी व्हा. मी तुमच्यावर खटला चालवतो.’’

ओक म्हणाले, ‘‘मी तानाजी होणार नाही. माझी ती पात्रता नाही. पण तुम्ही तानाजीवर आरोप करा, तुमचा प्रत्येक आरोप मी खोडून काढतो. मी तुम्हाला दहा वेळा, कान पकडून, ‘तानाजी की जय’ म्हणायला लावीन.’’

परबमध्ये पडले, ‘‘मोकाशी, मला तुमची कीव येते. तुमच्यासारख्यांना उद्देशून तुकोबा म्हणतात, ‘काय ढोरासी घालूनि मिष्टान्न। खरासी विलेपन चंदनाचे॥ तुका म्हणे काय पाजूनि नवनीत। सर्पा विष थीत अमृताचे॥’

मोकाशी म्हणाले, ‘‘परब, सापाला दूध, नव्हे अमृतही पाजलं तरी त्याचं विष होऊन स्थिरावेल हे मला समजलं. पण मी साप नाही, प्राणिमित्र संघटनेतर्फे वकील म्हणून तानाजींवर आरोप करणार आहे. तुम्हीच न्यायाधीश व्हा.’’

परब, ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणाले. ते राजी आहेत असा अर्थ मोकाशींनी काढला. मोकाशींनी आरंभ केला, ‘‘घोरपड हा वाचा नसलेला, मूक प्राणी आहे. उंच, खडा कडा चढून कोंढाण्यावर जाणे ही तानाजी या सरदाराची, कोंढाणा हा किल्ला जिंकण्यासाठी गरज होती, गरीब घोरपडीची नव्हती. पण माणसाला कडा चढणं अशक्य होतं. म्हणून तानाजींनी घोरपडीच्या शेपटीला दोरखंड बांधून तिला वर चढणं भाग पाडलं. भोवताली गडद अंधार, द्रोणागिरीची दरी या भीषण पाश्र्वभूमीवर, तलवार उपसून तानाजींनी घोरपडीला दटावलं, ‘गुमान वर चढ. मागं फिरशील तलवारीनं तुझी खांडोळी करून भाकरीसंगं खाईन.’ बिच्चारी. एकाकी घोरपड! तिला वर चढणं भाग पडलं. प्राणिमित्रसंघटनेच्या वतीनं, घोरपडीतर्फे, मी तिच्यासाठी न्याय मागतो आहे. तानाजींवर कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी.’’

ओकांनी बचावाला आरंभ केला, ‘‘कुरुक्षेत्रावर, कौरव व पांडव मिळून अठरा अक्षौहिणी सैन्य लढलं. सैन्यात रथी, महारथी होते. खुद्द भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होते. युद्धात घोडे, हत्ती या प्राण्यांचा वापर करण्यात काही गैर असतं तर श्रीकृष्णांनी प्राणी वापरू दिले नसते. बरं, पांडवांनी प्राणी वापरले नसते तरी कौरवांनी वापरले असते, म्हणजे प्राण्यांचा वापर करून अन्यायाने वागणारा पक्ष विजयी झाला असता! छत्रपती शिवाजी महाराजांचं घोडदळ होतं. घोडा हाही मुका प्राणी आहे. उद्या मोकाशी महाराजांवर प्राणिमित्र संघटनेतर्फे खटला भरतील! युद्ध हे जिंकण्याकरता लढायचं असतं. साम-दाम-दंड-भेद हे सर्व वापरा, शत्रूचा नाश करा व देश स्वतंत्र राखा. मोकाशी, आजकाल कृतिशील, पराक्रमी, कल्पक, देशाकरिता जिवावर उदार होऊन लढणाऱ्या वीरांचा अपमान करण्याकरिता, तुमच्यासारखे देशद्रोही, फुसके, पोकळ मुद्दे, उद्यानाच्या हिरवळीवर बसून मांडतात.’’

‘‘मोकाशी, यावर तुम्हाला काही म्हणायचं आहे का?’’ परबांनी विचारलं.

मोकाशी म्हणाले, ‘‘माफ करा. मी चुकलो. आकाशात, विजेचा कडकडाट झाला तर मी सटपटतो व मी दोन्ही कानांत कापसाचे बोळे घालतो. मी तानाजींची क्षमा मागतो, ‘तानाजी सरदार की जय,’असं म्हणतो, वरती तानाजींच्या वंशजांची माफी मागतो.’’

परब म्हणाले, ‘‘थोरांची निंदा करू नका. तुकोबा म्हणतात, ‘अखंड संत निंदी। ऐसी दुर्जनांची बुद्धि॥’ मोकाशी, तुमची बुद्धी शुद्ध करा. त्यासाठी विठ्ठल, विठ्ठल म्हणा.’’

ओक म्हणाले, ‘‘परब, तुम्ही विठ्ठलभक्त, तुम्ही काय न्याय देणार? घोरपड ज्या कडय़ावर चढली त्या कडय़ावरून मोकाशींना कंबरेला दोर बांधून खाली सोडायची शिक्षा तरी द्यायला हवी.’’

भा.ल. महाबळ

chaturang@expressindia.com