‘‘कुटुंब म्हणजे काय हे मला आज समजलं आहे. कुटुंबप्रमुखाची जबाबदारी ही किरकोळ बाब नाही.’’ मोकाशींनी उद्यानातील संध्याकाळच्या चर्चेचा भारदस्त प्रारंभ केला.

ओक म्हणाले, ‘‘कुटुंब म्हणजे पाच-सात जणांचा, शहरातील जागेच्या वाढलेल्या प्रचंड किमतीमुळे, नाइलाजाने एकत्र राहणारा गट. यापैकी फक्त एक-दोनच पैसे कमावतात. गटातील बाकीचे, पैसे घरी येण्यापूर्वीच, ते कसे खर्च करावयाचे हे ठरवतात.’’

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Ketu Nakshatra Gochar 2024 Ketu Transit In Hasta Nakshatra Positive Impact On These Zodiac Sign
छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
Declaration of self-reliance and policy of import dependence
घोषणा आत्मनिर्भतेच्या आणि धोरण आयातनिर्भरतेचे

मोकाशी उत्तरले, ‘‘विषय गंभीर आहे. गंमत म्हणून मी बोलत नाही.’’

‘‘गंभीर तर गंभीर! मी व्याख्या बदलतो. ज्या मंडळींकरिता, धडपडून पैसे मिळवावेत असे एकाला वाटते ती व्यक्ती म्हणजे कुटुंबप्रमुख व ती मंडळी म्हणजे कुटुंबीय. मोकाशी, कुटुंबप्रमुख म्हणजे काय ते तुम्हाला समजलं हे छान घडलं. आपलं वय त्र्याऐंशी आहे, पुढील सतरा वर्षे तरी प्रमुखाप्रमाणे वागा, पूर्वायुष्यातील चुका दुरुस्त करा.’’

‘‘ओक, करा, तुम्ही टिंगल करा. देशात सर्वत्र फाटाफुटीचं वातावरण आहे, अशा वेळी कुटुंबात एकोपा टिकवणं ही अवघड कसरत आहे. भक्कम कुटुंबप्रमुख असेल तरच कुटुंब एकमुखी राहतं.’’

‘‘बरोबर. कुटुंबातील सर्वानी मुखानं सतत ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणावं. वादाचे मुद्दे उच्चारायला तोंडाला सवडच देऊ नये. कुटुंब अभंग राहतं.’’ परबांनी सोपा उपाय सुचवला.

‘‘समजा, घर रंगवायचं आहे. कोणता रंग द्यावयाचा यावरून मतभेद घडतो, मने विटतात, घरात बेरंग होतो. अशा वेळी, कोणता एक रंग द्यावयाचा याबाबत भक्कम निर्णय घेणारा कुटुंबप्रमुख हवा.’’ मोकाशींनी उदाहरण दिलं.

ओकांनी विरोध केला, ‘‘मोकाशी, ही हुकूमशाही झाली. स्वयंपाकघर कसे रंगवावे हे सासू-सून ठरवतील, नातवंडांच्या मनाप्रमाणे त्यांची खोली रंगवा, हॉल कसा हवा हे मुलगा-सून ठरवतील. उरलेल्या शिल्लक ‘बचतरंगात’ माझी बाल्कनी रंगवा. घर बहुरंगी होईल, होऊ दे; पण सर्वाच्या मनात इच्छातृप्तीचा एक आनंदरंग भरून राहील.’’ ओकांनी हा नवा आनंदरंग निर्माण केला.

परबांचा वेगळाच रंग होता! ते म्हणाले, ‘‘‘रंगी रंगे रे श्रीरंगे। काय भुललासी पतंगे॥ अंतकाळीचा सोयरा। तुका म्हणे विठो धरा॥’ मोकाशी, अंतकाळीचा जवळचा नातेवाईक एकच, विठ्ठल, श्रीरंग. त्याच्या रंगात रंगा. पतंगाच्या रंगात दम नाही. पतंग एका झाडाचे नाव आहे. त्याच्या सालीपासून रंग तयार करत असत.’’

ओकांनी मोकाशींना गुगली प्रश्न टाकला, ‘‘तुमच्या घरी खरा कुटुंबप्रमुख कोण?’’

‘‘ओक, तुम्ही खुद्द मला, मिस्टर मोकाशींना, कुटुंबप्रमुखालाच, घरचा कुटुंबप्रमुख कोण हा प्रश्न विचारता? दुसऱ्या मजल्यावरच्या, तीन नंबरच्या ब्लॉकवरचं नाव पहा, रद्द झालेल्या रेशनकार्डावर व वीज बिलावरचं नाव वाचा. तुम्हाला सर्वत्र मै, मी स्वत:, इंग्रजीतील आय म्हणजे मिस्टर मोकाशी म्हणजे कुटुंबप्रमुख दिसेल.’’

‘‘बाप रे! म्हणजे घरातील सर्व कामे, घरखर्च, दुरुस्त्या हे तुम्ही सांभाळता?’’ ओकांनी खोटा धास्तावलेला स्वर लावला.

‘‘ओक, मी काय म्हणून काम करू? सर्व कामांची जबाबदारी मी केव्हाच घरातील इतरांवर सोपवली आहे. मी फक्त योग्य निर्णय घेतो. काहीही करायचं असेल तर ते माझी परवानगी घेतात. मी सांगतो त्याप्रमाणे वागतात. यामुळे आमचं कुटुंब एकसंध राहिलं आहे.’’

‘‘मोकाशी, तुम्ही योग्य निर्णय घेता हा भ्रम सोडा. तुमच्या घरातील मंडळी समंजस आहेत म्हणूनच तुमचं घर एकसंध राहिलं आहे. तुम्ही वयानं सर्वात वडील म्हणून योग्य निर्णय घेणारे समजता की काय? आपण वृद्धांनी ज्ञानेश्वरांची एक ओवी ध्यानी ठेवायला हवी.

‘जेयाचे आयुष्य धाकुटे होए।

बल, प्रज्ञा जिरौनि जाए।

तेयाचे नमस्काररिजिती पाए।

वडील म्हणौनी॥’

आपलं शिल्लक आयुष्य दहा-पंधरा वर्षांचं, ही वर्ष कशी? तर शक्ती व बुद्धी नसलेली, तरीही तरुण पिढी, केवळ आपल्या वयाकडं पाहून आपल्याला नमस्कार करते.’’

परबांनी न विचारता माहिती दिली,

‘‘बाळ काय जाणे जीवनउपाय।

मायबाप वाहे सर्व चिंता॥

तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता।

आमुची ते सत्ता तयावरी॥’’

मोकाशी म्हणाले, ‘‘तुम्ही परब मंडळी सुखी आहात. चार पिढय़ा तुम्ही वारकरी आहात. सर्व परबांचं शंभर वर्षे बाळपण चालू आहे! विठ्ठलाला बाप म्हणायचं व त्याच्याकडून सर्व करून घ्यायचं!’’

‘‘मोकाशी, परबांना जरा वेळ बाजूला ठेवा. कुटुंब एकसंध ठेवण्यासाठी कामाचं वाटप करू नये, या मताचा मी आहे. घरातील कामे तशी सर्वाची असतात. काम करताना तुझे माझे असे काही नसते, नसावे. दूध तापवत ठेवल्या ठेवल्या, आजी वा सून यापैकी कोणी तरी म्हणतं, ‘आजोबा, दुधाकडं पहा. श्री का रडतो आहे मी पाहून येते;’ अशा वेळी दूध तापवणे हे आजोबांचे काम होऊन जाते. बादली भरून वाहते आहे, नळ चालू आहे, हे कुटुंबातील कोणी तरी पाहतं. पाहणाऱ्यानं नळ सोडलेला नसतो, तरीही नळ बंद करणं हे त्याचं काम होऊन जातं. नातवंडाची शाळेची तयारी करून त्याला वेळेवर स्कूलबसमध्ये बसवणं हे महत्त्वाचं काम आहे. घरातील कोण्या एकानं ते रोज करायलाच हवं. जो मोकळा असेल त्यानं, ‘मी ईशानला खाली सोडून येतो’ असं ओरडून सांगून खाली गेलं पाहिजे. वीज – टेलिफोनची बिले आजकाल ऑनलाइन सहजी देता येतात. ही कामे आपण आजोबा करू शकत नाही; एक तर आपल्याकडे एवढे पैसे नसतात, वरती अशा प्रकारे तंत्रवापराचे ज्ञानही आपल्याकडे नाही. ही कामे तरुण मंडळीच करतात.’’

‘‘ओक, मी मोकाशी स्पष्टवक्ता आहे. तुमच्या घरी कामांचे शिस्तशीर वाटप दिसत नाही. अंदाधुंदीचा कारभार दिसतो. मला तुमचं कुटुंब विस्कळीत दिसतं, एकसंध वाटत नाही.’’

ओक म्हणाले, ‘‘मोकाशी कुटुंब म्हणजे ऑफिस नाही. ऑफिसात कामाचं वाटप केलं जातं, जबाबदारीही ठरवली जाते. कुटुंबातही स्थूल स्वरूपात कामे ठरली असतात, पण जबाबदारी सर्वाची असते. ऑफिस आठ तासांचं असतं, घर काही पिढय़ांचं असतं. आम्ही तीन पिढय़ा घरात राहतो. आम्ही नुसते परस्परांना पाहत नाही, परस्परांना कामे करताना पाहतो. आम्ही शेजारी नाही, आम्ही कुटुंबीय आहोत.’’

ओकांच्या पाठीवर थाप मारत परब म्हणाले,

‘‘जे का रंजले गांजले।

त्यासी म्हणे जो आपुले।

तोचि साधु ओळखावा।

देव तेथेचि जाणावा॥’’

विठ्ठलभक्त परबांचं कुटुंब फार म्हणजे फारच मोठं होतं, वरती ते रंजल्या-गांजल्यांचे होते. अशा कुटुंबाचे कुटुंबप्रमुख होणं बाजूलाच ठेवा, अशा कुटुंबात राहायलाही मोकाशी तयार नाहीत! मोकाशींना ओकांच्या कुटुंबात दुय्यम स्थान पत्करून राहायचं नाही, ते नातवंडाला स्कूलबसमध्ये बसवायचं सुनेचं काम का म्हणून करतील? हा! मोकाशींची एक इच्छा मात्र आहे; त्यांना संत परबांच्या, रंजल्यागांजल्यांच्या कुटुंबात, कामाचे कसलेही वाटप न करता, सर्वच्या सर्व कामे करण्याकरिता, स्वयंसेवक म्हणून ओकांना पाठवायचं आहे.

भा.ल. महाबळ

chaturang@expressindia.com