माझ्या ध्यानी आलं की परब व ओक यांना अद्याप खरी मेख समजलेलीच नाही! मी कुजबुजलो, ‘‘परब, हा सेकंड इनिंगचा मामला आहे. हे लकी, नशीबवान गृहस्थ सेकंड इनिंग खेळताहेत! म्हणून तर ते रोज नव्या पत्नीला प्रसन्न ठेवण्याकरता, पुष्प प्रदान करताहेत.’’ ‘‘असं आहे होय! म्हणजे या गृहस्थांची ही दुसरी बायको आहे तर! म्हणून लेकाचा फुलं देतो आहे.’’ ओकांना माझा मुद्दा समजला. ओक थोडे कमी बावळट आहेत. परबांच्या चेहऱ्यावर मात्र मख्खपणा, लोकलच्या डब्यातील गर्दीप्रमाणे, भरून राहिला होता..

मी माझ्या मित्रांना विचारलं, ‘‘ओक, परब, आपणा सर्वाच्या समोर, गेले चार दिवस, एक अद्भुत, शृंगार प्रसंग घडतो आहे. ध्यानी येतं आहे का? उद्यानात आपण दोन फेऱ्या मारतो व बाकावर येऊन, गुडघे गोंजारत बसतो. गेले चार दिवस, एक प्रौढ देखणीबाई व सामान्य प्रौढ पुरुष थेट आपल्या बाकासमोरच परस्परांना भेटतात; पुरुष स्त्रीला फुले देतो!’’

self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

दोघांच्याही चेहऱ्यावर, मला अपेक्षित असलेलं आश्चर्य व औत्सुक्य नव्हतं. बरोबरच आहे; माझ्याप्रमाणे निरीक्षणशक्ती व चाणाक्षपणा नसेल तर प्रतिक्रिया उमटणारच कशी? वयानं अतिपक्व व बुद्धीनं अतिसामान्य अशा माझ्या मित्रांना शहाणं करणं मला भाग होतं. मी म्हणालो, ‘‘हे दोघे आपल्यासारखे पक्वं वृद्ध नाहीत, आपल्यापेक्षा वयानं, चांगले पंधरा-वीस वर्षांनी तरुण आहेत, पासष्ट वयाच्या खालचे आहेत. दोघं रोज भेटतात या कारणासाठी, मी तुमचं लक्ष त्यांच्याकडे वेधत नाही; मी गेले चार दिवस, या गृहस्थांना त्या बाईंना फुले देताना पाहतो आहे, फुले देणं हा कळीचा मुद्दा आहे.’’

परबांना मी केलेल्या खुलाशात काहीही स्फोटक आढळलं नसणार! ते म्हणाले, ‘‘मोकाशी, एकनिष्ठ प्रेम असं असतं. तुकोबा म्हणतात, ‘प्रीतीचा तो कळवळा। जिव्हाळाचि वेगळा॥ जाणोनिया नेणता तुका। नव्हे लोकासारिखा॥’ मोकाशी, त्या दोघांतील प्रेम, जिव्हाळा समजून घ्या. तुमच्यासारखे चार लोक त्याकडे शृंगारचेष्टा म्हणून पाहणार!  म्हणून तुकोबा म्हणतात, ‘‘मला तो कळवळा समजला आहे, तरीही मला तो समजला नाही असं मी इतरासाठी दाखवतो.’’ मला शहाणं करण्याची संधी ओक का गमावतील? ते म्हणाले, ‘‘मोकाशी, खरं प्रेम कसं असतं ते शिकून घ्या. या वयात शिकलात तरी खूप झालं. एक सुभाषित आहे. ते सांगतं, ‘प्रेमिक एकत्र असतात तेव्हा र्वष, भुर्रकन दिवसांसारखी उडून जातात आणि त्यांचा वियोग होतो तेव्हा वियोगाचा एक एक दिवस वर्षांप्रमाणे वाटतो! ‘प्रेम सत्यम् तयो: एव ययो: योगवियोगयो:। वत्सरा: वासरीयन्ति, वत्सरीयन्ति वासरा:॥’ वत्सर म्हणजे संवत्सर, वर्ष; वासर म्हणजे दिवस. म्हणून तर आपण सूर्याला वासरमणी म्हणतो.’’

माझ्या ध्यानी आलं की परब व ओक यांना अद्याप खरी मेख समजलेलीच नाही! ती समजायला माझ्यासारखा चाणाक्ष हवा. या बावळटांना शहाणं करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मी हलक्या स्वरात कुजबुजलो, ‘‘परब, हा सेकंड इनिंगचा मामला आहे. हे लकी, नशीबवान गृहस्थ सेकंड इनिंग खेळताहेत! म्हणून तर ते रोज नव्या पत्नीला प्रसन्न ठेवण्याकरता, पुष्प प्रदान करताहेत.’’

‘‘असं आहे होय! म्हणजे या गृहस्थांची ही दुसरी बायको आहे तर! म्हणून लेकाचा फुलं देतो आहे.’’ ओकांना माझा मुद्दा समजला. ओक थोडे कमी बावळट आहेत. परबांच्या चेहऱ्यावर मात्र मख्खपणा, लोकलच्या डब्यातील गर्दीप्रमाणे, भरून राहिला होता. परबांना सेकंड इनिंग म्हणजे काय हेच माहीत नव्हतं.

मी समजावू लागलो, ‘‘परब, पहिली पत्नी निधन पावली की पुरुषाला एकटं एकटं वाटू लागतं. आपणच केलेला भिकार चहा एकटय़ानं भिंतीकडं पाहात प्यावा लागतो. एकाकीपण डंख मारतं. पण काही पुरुष सुदैवी, भाग्यवंत असतात. ते पुनर्विवाह करतात. त्यांना पहिलीहून उजवी अशी दुसरी पत्नी मिळते. त्यांची दुसरी इनिंग चालू होते. असे दुसरे इनिंगवाले नवरे नव्या पत्नीला फुले देतात.’’

कधी नाही ते परब चिडले, ‘‘मोकाशी, पत्नी मरण पावणं, एकाकी पडणं हे प्रचंड दु:ख या गृहस्थांच्या वाटय़ाला आलं आहे! त्यांना तुम्ही सुदैवी, भाग्यवान म्हणता? तुमचं मन स्वच्छ नाही. त्या गृहस्थांची कीव करायच्या ऐवजी तुम्ही त्यांचा मत्सर करताय्?’’ परबांनी डोळे मिटून घेऊन ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणायला आरंभ केला.

मला माझी चूक समजली. ‘‘सुदैवी, भाग्यवंत हे शब्द मी मागं घेतो. मला माफ करा.’’ हे तर मी म्हणालोच, वरती ‘मी त्या अर्थाने हे शब्द वापरलेच नव्हते’ अशी राजकारणी पुस्ती जोडली. मी सौम्य पडेल स्वरात विचारलं, ‘‘आपल्या लग्नांना लवकरच साठ वर्षे पुरी होतील. आपण चुकून तरी आपल्या बायकांना फुलं देतो का?’’

परब चुकचुकले, ‘‘नाही, पण मी रोज विठ्ठलाची आरती करतो. आम्ही दोघं मिळून विठ्ठलचरणी फुलं वाहतो.’’ आपण पत्नीला फुलं देत नाही ही स्वत:ची चूक परबांना जाणवली होती. ओक वेगळ्या शब्दात माझ्या मनातील विचार बोलले, ‘‘आमच्या ओकांच्या कुळात बायकोला फुलं द्यायची रीत नाही.’’

सावध झालेल्या परबांनी विचारलं, ‘‘मोकाशी, त्या गृहस्थांची ही दुसरी बायको आहे हे कशावरून?’’

मी म्हणालो, ‘‘हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ व स्पष्ट आहे. जरा तर्क वापरा. थांबा मी संशोधन करून सखोल माहिती देतो.’’ मनात मी योजना आखली. एक दिवस, टपरीवरच्या चहाचा त्याग करून, फुलांची देवघेव करणाऱ्या पती-पत्नींचा पाठलाग करून त्यांच्या सोसायटीत जायचं. हाऊसिंग सोसायटीच्या बोर्डवरून त्यांची नावं समजून घ्यायची, त्यांच्या वरच्या खालच्या, जवळच्या शेजाऱ्यांच्या घरी जाऊन, चाणाक्षपणे, चार प्रश्न विचारायचे. बस्स! आहे काय आणि नाही काय? ‘शेजारधर्माला’ जागून शेजारी सर्व बित्तंबातमी सांगतीलच.

पण दुसरेच दिवशी खुद्द परबांनी मला माहिती दिली, ‘‘मोकाशी, त्या गृहस्थांचं आडनाव वाले आहे. त्यांची ही पहिलीच पत्नी आहे, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे दुसरी इनिंग वगैरे काही नाही. गेली कित्येक र्वष मिस्टर वाले मिसेस वाले यांना फुलं देतात.’’ मी गार पडलो, मी हवेत उंच उडालो! पहिल्याच बायकोवर हे अडाणी वाले एवढं प्रेम करतात म्हणजे काय? संत परबांनी एवढी सविस्तर माहिती मिळवलीच कशी? परबांची माहिती चुकीचीच असणार! मी परबांना विचारलं, ‘‘तुम्हाला ही माहिती दिली कोणी?’’

‘‘खुद्द वाले यांनीच.’’

‘‘काय? पण तुम्ही ही माहिती काढलीत कशी?’’

‘‘मी वालेंना थेट प्रश्न विचारले. ते मला मोफत वाचनालयात दिसले. मी त्यांना नमस्कार केला व म्हणालो, ‘‘माझं नाव परब. मी तुम्हांला काही दिवस बागेत पाहतो आहे. तुमचं नाव काय?’ ते म्हणाले, ‘वाले.’ मी म्हणालो, ‘तुम्ही पत्नीला रोज फुले देता. पाहताना छान वाटतं. ही प्रथा तुम्ही निवृत्तीनंतर चालू केलीत का थेट लग्नापासून?’ वाले म्हणाले, ‘माझ्या पत्नीला सोनचाफ्याची फुलं खूप आवडतात. ती फुलं मला मिळाली की मी ती कुसुमच्या हातात ठेवतो. तिचा फुललेला चेहरा पाहिला की माझा दिवस छान जातो. आमच्या लग्नाला लवकरच चाळीस वर्षे पुरी होतील. चाफ्याच्या फुलांवर आमचा गरिबीचा संसार मजेत झाला.’’

परबांच्या माहितीवर मी ‘ठीक आहे’ एवढंच म्हणालो. मात्र माझं मूळचं उनाड, उठवळ मन कुरकुरलं, ‘‘काय विपरीत काळ आला आहे! जी माहिती माझ्यासारख्या चाणाक्ष व्यक्तीलाच मिळावी ती परबासारख्या बावळट मित्राला सहज मिळते; वरती माहिती मिळते तीही निर्थक, तुच्छ! काय तर म्हणे पहिल्याच बायकोला एक भंपक नवरा वर्षांनुवर्षे फुलं देण्यात आनंद मानतो!’’

माझ्या चेहऱ्यावरच्या कातडीची थरथर पाहून ओक म्हणाले, ‘‘मोकाशी, मनात आहे ते बोलून टाका. नुसत्या ‘ठीक आहे’ वर थांबू नका. बोलून टाका. तुमच्या तोंडावर मारण्याकरता, परबांकडे ‘तुका म्हणे’ आहे.’’

चाणाक्षपणे मी म्हणालो, ‘‘ओक, माझ्या मनात वालेंविषयी नितांत आदर आहे. इतर काहीही नाही.’’

भा.ल. महाबळ chaturang@expressindia.com