केविलवाण्या स्वरात ओक कुजबुजले, ‘‘मोकाशी, तुकोबांच्या संगतीत राहणाऱ्या परबांना ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये म्हणजे काय हे माहीत नाही. परब तरुण नातवंडांच्या मनात, प्रपंच टाका, लग्न करू नका असे विचित्र विचार पेरत आहेत. नातवंडांनी लग्न नाही केलं तर कसं होणार?’’

परब अपराधी स्वरात म्हणाले, ‘‘मोकाशी, ओक व मी एकत्रपणे विवाहाचा साठी समारंभ साजरा करणार आहोत. सोय म्हणून, पैसे वाचवण्याकरिता नाही.’’

ओकांनी खुलासा केला, ‘‘आम्हा दोघांच्या विवाहांना, पंधरा दिवसांच्या अंतराने, साठ र्वष पूर्ण होत आहेत. आपणा तिघांचे मित्र समान आहेत. प्रौढ मुलं, नोकरी करणाऱ्या सुना यांना दोन दोन समारंभांसाठी रजा मिळणंही कठीण जाईल. आपली तरुण नातवंडं आता आता नोकरीला लागली आहेत, काही परगावी आहेत. त्यांनाही दोन वेळा रजा मिळणार नाही. म्हणून आम्ही विचार केला की, समारंभ एकत्रच करू. खर्च वाटून घेणार.’’

मी कंजूष ऊर्फ मितव्ययी आहे. ‘मनी सेव्हड् इज मनी गेन्ड्’ हे वचन मी स्वयंपाकघरातील भिंतीवर लिहून ठेवलं आहे. मला ओकांची कल्पना पसंत पडली; तेवढय़ात डोक्यात वीज चमकली. मी म्हणालो, ‘‘आणखी दोन र्वष थांबा. माझ्याही लग्नाला साठ र्वष पुरी होतील. आपण तिघे एकत्र तिघांच्या विवाहाची साठी साजरी करू. खर्च विभागून घेऊ.’’

ओक म्हणाले, ‘‘आमच्या विवाहाला या महिन्यात साठ र्वष पुरी होतात, तुम्ही आम्हाला दोन र्वष थांबायला सांगताय? मोकाशी, ‘काल: हि व्यसनप्रसारितकर: गृण्हाति दूरात् अपि’ हे विसरू नका.’’

पैसे वाचवण्याच्या म्हणजे मिळवण्याच्या माझ्या बेतावर ओकांनी संस्कृत भाषेतून पाणी ओतलं! मी म्हणालो, ‘‘ओक, मराठीतून विघ्न आणा, न कळणाऱ्या संस्कृतमधून नको.’’

‘‘मोकाशी, अर्थ साधा व स्पष्ट आहे. मृत्यू हा आपले संकटरूपी हात पसरून दूरच्या व्यक्तींनाही उचलतो.’’ पैसे खर्च करताना माझा हात कापतो, पण मी मृत्यूला डरत नाही! मी म्हणालो, ‘‘हे पाहा, तुम्ही दोघं ‘विवाह साठी’ ठरल्याप्रमाणे साजरी करा. पण मी तुम्हा दोघांच्या नाकावर टिच्चून आणखी दोन र्वष जगून दाखवतो.’’

परब म्हणाले, ‘‘मोकाशी, हे विधान ओकांनी थोडंच तुमच्यापुरतं केलं होतं? तुम्ही दोन र्वष जगाल, पण काय नेम, परब व मी हे जग सोडून जाऊ. हा मृत्युलोक आहे हे विसरू नका. म्हणून तर तुकोबा म्हणतात, ‘मृत्युलोकी आम्हां आवडती परि। नाही एका हरिनामाविण॥’’

मी हेलावलो. परब व ओक नसलेल्या त्या जगात मला जगायचं नाही. मी जिवावर उदार होऊन म्हणालो, ‘‘परब, ओक, तुम्ही मला हवेत. मी माझ्या विवाहाची साठी दोन वर्षांनी स्वतंत्रपणे साजरी करीन. काय व्हायचा तो खर्च होऊ दे, साठी एकदाच तर करायची आहे!’’

साठी समारंभाच्या निमित्ताने आम्ही सर्व वयस्कर मित्र, सहकुटुंब, सहपरिवार एकत्र आलो. साठ वर्षांचं वैवाहिक आयुष्य जबाबदारीनं निभावलं याबद्दल, ओक व परब पती-पत्नीचं मी कौतुक केलं, त्या निमित्ताने नवीन पिढीवर मी तोंडसुख घेतलं. कधी नव्हे ते, तरुण नातवंडं माझ्या तावडीत सापडली होती.

मी सुनावलं, ‘‘आजकाल तुम्हा तरुण मंडळीत घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. कारण, ‘लग्नानंतरही, नवरा-बायकोंना स्वतंत्र स्पेस हवी, एकाने दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करता कामा नये, एकाने दुसऱ्याच्या मोबाइल फोनला हात लावता कामा नये’ असं तुम्ही तरुण नवरा-बायको म्हणता! यामुळंच तुमचे विवाह टिकत नाहीत. लग्नानंतर एकजीव व्हायला हवं.’’

ओक संस्कृतमधून माझ्या मदतीला धावले, ‘‘अर्धम् भार्या मनुष्यस्य, भार्या श्रेष्ठतम: सखा। भार्या मूलम् त्रिवर्गस्य, भार्या मूलम् तरिष्यत:॥ हे सुभाषित पाठ करा.’’

मी म्हणालो, ‘‘हे सुभाषित लग्नानंतर रोज चार वेळा पत्नीसमोर म्हणा. तिचं महत्त्व मान्य करा. घटस्फोटाचा विचार तुमच्या मनात येणार नाही. ओक, तुमचं संस्कृत नातवंडाना उलगडून सांगा.’’

मी हे सुभाषित घरी बायकोसमोर म्हणत नाही. कारण ते मला पाठ नाही. पण मी पत्नीचं महत्त्व रोज चार वेळा, दोन जेवणाच्या व दोन चहाच्या वेळी, मान्य करतो.

ओक अर्थ सांगू लागले, ‘‘पत्नी हे नवऱ्याचं अर्धाग आहे, तिच्याशिवाय पुरुष अर्धा राहतो. पत्नी हा सर्वश्रेष्ठ मित्र आहे. धर्म, अर्थ व काम हे तीन पुरुषार्थ पत्नीमुळे प्राप्त होतात. संसाराचा हा सागर पार करायचा तर पत्नी हे एकमेव साधन आहे.’

मी म्हणालो, ‘‘नातवंडांनो, घ्या लिहून.’’

नातवंडे म्हणाली, ‘‘अर्धम् भार्या मनुष्यस्य.. एवढं पुरं आहे. गुगलवर सर्च करून आम्ही सुभाषित व अर्थ मिळवू.’’

एक दीडशहाणा नातू आम्हा आजोबांना उद्देशून म्हणाला, ‘आम्ही तरुण घटस्फोट देत नाही व घेत नाही, कारण आम्ही लग्नाशिवाय, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार करतो.’’

‘‘लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नाशिवाय सहजीवन, होय ना?’’ मी चकित झालो.

पहिल्या दीडशहाण्या नातवामुळं प्रभावति होऊन, इतर तरणेबांड नातू बरळू लागले. नातू नं २ : आजोबा, घटस्फोट दिला की घटस्फोटित पत्नीला पोटगी मोजावी लागते. नोकरदार पत्नीला घटस्फोट देणं म्हणजे तिचा पगार गमवायचा आणि वर पोटगी द्यायची! हा दुप्पट तोटय़ाचा व्यवहार झाला.

नातू नं. ३ : आजोबा, लग्न करणं म्हणजे दिवस-रात्र आपल्या चुका शोधणारा व शिक्षा फर्मावणारा जेलर घरी आणणं.

नातू नं. ४ : लग्न करणं हा फायदेशीर व्यवहार आहे, पण तो फक्त घटस्फोटित स्त्रीला, नवऱ्याला नाही. स्त्रीला हवी असलेली मुक्ती मिळते, वरती पोटगीची खंडणी.

नातू नं. ५ : आजोबा, घटस्फोटानंतर सुख मिळतं ते फक्त दोन घरांतील प्रौढ आयांना; एका नवऱ्याची आई, एक बायकोची आई. घटस्फोट घडल्यावर, दोघी आपापल्या घरी म्हणत असतात, ‘मी तेव्हाच म्हणाले होते, हे लग्न करू नकोस, तू योग्य जोडीदार निवडलेला नाहीस. आता पटलं ना?’

मी तसा निरुत्तर झालो; ज्या पहिल्या दीडशहाण्या नातवामुळे ही फटाक्यांची माळ चालू झाली त्याला मी विचारलं, ‘‘बाळ, तुझं नाव काय रे?’’ तो म्हणाला, ‘‘आजोबा, माझं नाव उन्मेश मोकाशी. मी तुमचाच सख्खा नातू आहे.’’ हे ऐकल्यावर माझी जीभ मीच चावली!

वरती परब नातवंडांच्या मदतीला धावले, ‘‘नातवंडे लग्न करणार नाही असं म्हणतात ना? मग ते ठीकच आहे. तुकोबा तेच म्हणतात, ‘प्रपंच वोसरो। चित्त तुझे पायी मुरो॥ लटिके ते फेडा। तुका म्हणे जाय पीडा।’’ हे देवा, प्रपंच नाहीसा होऊन माझे मन तुझ्या पायी लीन व्हावे. हा लटिका म्हणजे खोटा संसार चालवा व माझी जन्माची पीडा नाहीशी करा.’ नातवंडं लग्न करत नसतील तर ते स्तुत्य आहे. तुकोबा म्हणतात, ‘प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही। एकही निदानी न घडे त्यासी॥ मी प्रपंच करीन व परमार्थही करीन असे कोणी म्हणेल तर त्याच्याकडून एकही होणे नाही.’’

केविलवाण्या स्वरात ओक कुजबुजले, ‘‘मोकाशी, तुकोबांच्या संगतीत राहणाऱ्या परबांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये म्हणजे काय हे माहीत नाही, समजावून  दिले तर ते समजणार नाही. परब तरुण नातवंडांच्या मनात, प्रपंच टाका, लग्न करू नका असे विचित्र विचार पेरत आहेत. नातवंडांनी लग्न नाही केलं व पतवंडं जन्माला आली नाहीत तर कसं होणार पुढे?’’

मला धोका नेमकेपणानं समजला. मी नातवंडांना म्हणालो, ‘‘या, पुढं या. परब आजोबांच्या पायावर हात ठेवून, गुलाबाची शपथ घेऊन म्हणा की, आम्हाला परमार्थच साधायचा आहे, प्रपंच नको, लग्नाशिवाय सहजीवन नको; परमार्थ म्हणजे फक्त परमार्थ.’’

एकही नातवंड पुढं आलं नाही. मग मी पर्याय दिला, ‘‘मग लग्न करा. आम्हा तिघा आजोबांप्रमाणे नेटका प्रपंच करा. प्रपंच किंवा परमार्थ, तुकोबरायांनी हे दोन पर्याय सुचवले आहेत, लग्नाशिवाय सहजीवन हा पर्याय दिलेला नाही.’’

 

भा.ल. महाबळ

chaturang@expressindia.com