05 August 2020

News Flash

संगीतसेवक

मुलुंडच्या चिंतामण देशमुख उद्यानात, अजस्र, न वाजणारी, वेगवेगळी वाद्यं ठेवली आहेत

प्रतिनिधिक छायाचित्र

‘‘मला संगीत वाजवता येत नाही, पण ऐकता येतं. व्यायामशाळेच्या बॅण्डमुळे मला संगीत समजलं. मी ‘सूर झंकार’मध्ये गाणं ऐकायला तर जातोच, पण जाजमं पसरणं, खुर्च्या मांडणं, गायक कलाकार यांची सोय-गैरसोय पाहणं ही कामंही करतो. ओक, सूर माझ्या मनाला शांतता देतात.’’ मोकाशी म्हणाले आणि ओकांनी बालपणापासूनच्या या आपल्या मित्राला घट्ट मिठीत घेतलं.

मुलुंडच्या चिंतामण देशमुख उद्यानात, अजस्र, न वाजणारी, वेगवेगळी वाद्यं ठेवली आहेत. वाद्यं वाजत नाहीत कारण ती लाकडाची, शोभेच्या प्रतिकृती आहेत. उद्यानात येणाऱ्या चिमुकल्यांना वाद्यांची ओळख व्हावी म्हणून ही वाद्यं ठेवली आहेत. आजी-आजोबांबरोबर येणारी छोटुकली पाहता पाहता वाद्यं ओळखायला शिकतात. ती वाद्यं प्रत्यक्षात कशी वाजतात हे नातवंडांना आजोबा तोंडाने आवाज काढून दाखवतात. ओकांनी आजोबांच्या प्रयत्नांना  दाद दिली. त्यावर मोकाशी म्हणाले, ‘‘वाद्यांचे आवाज तोंडातून काढून दाखवता येणार नाहीत. या सर्व वाद्यांशी माझी उत्तम ओळख, वयाच्या दहाव्या वर्षांपासून आहे. कारण मी आमच्या व्यायामशाळेच्या बॅण्डपथकात होतो.’’

यावर छद्मी हसत, मोकाशींचे बालमित्र ओक म्हणाले, ‘‘परब, ऐकून ठेवा. मोकाशी बॅण्डपथकात? वा!’’

परबांच्या मनात संशय निर्माण करण्याचा ओकांचा दुष्ट हेतू साध्य झाला नाही, उलट घडलं. परब म्हणाले, ‘‘मोकाशी, एवढय़ा लहान वयात तुमचा संगीताकडे ओढा होता याचं मला कौतुक वाटतंच; वरती वयाच्या ८३व्या वर्षी, तुम्हाला तुमचे बॅण्डपथक आठवतं याचं दुप्पट कौतुक वाटतं. तुमची स्मरणशक्ती छान आहे.’’

मनातून खवळलेले ओक शांतपणे म्हणाले, ‘‘मोकाशी, परबांची शपथ घेऊन, तुम्ही कोणतं वाद्य वाजवत होता ते सांगा. परबांच्या गळ्याला हात लावून शपथ घ्या.’’

‘‘परब व ओक हे माझे जवळचे मित्र आहेत. आणखी पंधरा-सोळा वर्ष आम्ही जगलो की आम्ही तिघे शंभरी गाठू. आम्ही तिघे सोनं आहोतच; पण शंभर नंबरी सोनं म्हणजे शुद्ध सोनं हा वाक् प्रचार मला माहीत आहे. शुद्ध सोनं होण्यासाठी आम्हा तिघांना वयाची शंभरी गाठणं भागच आहे! त्यामुळे परबांच्या जिवाला धोकादायक ठरणारी खोटी शपथ न घेता, ‘मला एकही वाद्य वाजवता येत नाही, मात्र मी दहा वर्ष बॅण्डपथकात होतो’ हे सत्य मी ठासून सांगितलं.

ओकांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा मागमूस नव्हता. कारण त्यांना सत्य माहीतच होतं. परबांनी अचंब्यानं विचारलं, ‘‘एकही वाद्य वाजवता येत नसताना तुम्ही दहा वर्ष बॅण्डपथकात केलंत तरी काय?’’

मी खुलासा केला, ‘‘मला बॅण्डपथकात जायची तीव्र इच्छा होती. पण अथक प्रयत्न करूनही, बासरी, ढोल, ड्रम, बिगूल, झांजा, ट्रँगल, डफ यांपैकी एकही वाद्य मला थोडंसंही वाजवायला जमलं नाही. पंचाक्षरी स्वामी नावाचा माझा एक मित्र प्रकृतीनं एकदम किरकोळ होता; पण लेकाचा ढोल वाजवण्यात तरबेज होता! आमच्या व्यायामशाळेच्या बॅण्डला लग्नसमारंभात व व्यायामशाळेला मदत होते या दोन कारणांमुळे, भरपूर मागणी होती. लग्न म्हणजे, वरात आली. वरात सर्व देवालयांच्या समोरच्या रस्त्यांवरून जायची. पंचाक्षरी स्वामीला ढोल मानेला बांधून घेऊन वाजवत रस्तोरस्ती हिंडणं जमेना! मी कुस्ती खेळणारा होतो. मानेवर लोखंडी कडं ठेवून मी बैठका मारत असे. बॅण्ड पथकात येण्याची माझी धडपड सर्वाना माहीतच होती. ढोलवाहक म्हणून मी पथकात सामील झालो. मी माझ्या मानेवर ढोल टांगायचो व पंचाक्षरी तो वाजवायचा.’’

ओकांनी तोंड उघडले, ‘‘परब, दहा वर्षे मानेवर ढोलाचं ओझं वाहणं हा मोकाशींचा ढोल या वाद्याशी परिचय, वा! काय परिचय? राजकन्येची कार चालवणाऱ्या ड्रायव्हरने, राजकन्या माझी जवळची मैत्रीण आहे हे सांगायला काहीच हरकत नाही!’’

परब म्हणाले, ‘‘मला मनापासून मोकाशींच्या त्यागाचं कौतुक करावंसं वाटतं. स्वामी या मोकाशींच्या मित्राला एरवी, ढोल वाजवण्याची कला अंगी असूनही, ढोल वाजवण्याचा आनंद मिळाला नसता. मोकाशींनी दहा वर्ष ढोलचं ओझं सोसलं व आपल्या मित्राला आनंद मिळवून दिला. आम्हा वारकऱ्यांच्या कानांवर टाळांचा आवाज, दिंडीचं म्हणजे वीणेचं वादन व हरिनामाचा गजर पडला की आम्हाला ब्रह्मानंद मिळतो! तुकोबा म्हणतात, ‘टाळघोळ सुख नामाचा गजर। घोषे जयजयकार ब्रह्मानंदु॥ गरुडटके िदडी पताकांचे भार। आनंद अपार ब्रह्मादिका॥ तुका म्हणे सोपे वैकुंठासी जाता। रामकृष्णकथा हेचि वाटा॥’ वाद्यांची संगत हवी.’’

ओकांनी मोकाशींची नवी कमतरता पुढे आणली, ‘‘परब, मोकाशींची कन्या बेबी सुरेल गाते. गोड आवाजामुळे बेबीचा विवाह मागणी घालून झाला. बेबीनं संगीताच्या सर्व परीक्षा दिल्या आहेत. तिचे संगीताचे वर्ग आहेत. मोकाशी, तुम्ही मुलीची शिकवणी लावा! उलटी गंगा वाहते का ते पहा, मुलीकडून बापाला ज्ञान!’’

खाली मान खालून मोकाशी म्हणाले, ‘‘ओक, शिकवणीचा काहीही उपयोग नाही. दगडावर रोप काय रुजेल? ढोल गळ्यात अडकवून, दहा वर्ष, सर्व वाद्यं ऐकत हिंडलो, पण माझ्या गळ्यानं एकही सूर पकडला नाही. बेबीचा आवाज मधुर होता, म्हणून मी बेबीच्या मागं लागलो, ‘बेबी, गाणं शिक. आईनं तुला सांगितलेली व मला करता येणारी तुझी कामं मी करतो. तू गाणं शीक.’ परब, बेबी गाते, पेटी वाजवते, संगीताचे वर्ग चालवते.’’

परब म्हणाले, ‘‘मोकाशी, मान खाली काय घालता? मान वर करा. तुम्ही श्रेष्ठ आहात. तुम्हाला वाद्य वाजवणं जमलं नाही म्हणून तुम्ही संगीताचा, वाद्यांचा द्वेष करत बसला नाहीत; उलट तुम्ही मुलीला गाणं शिकण्याकरता उत्तेजन दिलंत.’’

मोकाशी उत्तेजित होऊन म्हणाले, ‘‘ढोल गळ्यात लटकवून मी हिंडत असे त्या लहान वयात मी, ‘गंगा यमुना डोळ्यात उभ्या का? जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा’ या गाण्याचे सूर अनेक वेळा ऐकले. माझी बेबी हे गाणं गायला लागली, गाण्याच्या जाहीर कार्यक्रमामुळे बेबीला राजेशने, तिच्या आवाजावर लुब्ध होऊन मागणी घातली. गाण्याच्या जोरावर, ती लग्नानंतर घरबसल्या आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झाली. मी भरून पावलो. ओक, गळ्यात ढोलाचं ओझं घेऊन, वरातीमुळं मी देवदेवतांच्या समोरील रस्त्यांवरून फिरलो. मला देव पावले. माझ्या गळ्यात ढोल बांधणाऱ्या व्यायामशाळेचा मी ऋ णी आहे.’’

मोकाशींनी रुमालानं डोळे पुसले. ओक चमकले. आपण मोकाशी या हळव्या बालमित्राला ओळखण्यात  कमी पडलो. मोकाशींना वाद्ये वाजवता आली नसतील, पण त्यांच्या हृदयात संगीतभक्तीचे ठोके कृतज्ञतेचा ताल धरून होते. ओकांनी मित्रभावनेनं विचारलं, ‘‘तुम्ही ‘सूरझंकार’ या संस्थेचे सभासद आहात. होय ना?’’

‘‘मला संगीत वाजवता येत नाही, पण ऐकता येतं. व्यायामशाळेच्या बॅण्डमुळे मला संगीत समजलं. मी ‘सूर झंकार’मध्ये गाणं ऐकायला तर जातोच, पण जाजमं पसरणं, खुर्च्या मांडणं, गायक कलाकार यांची सोय-गैरसोय पाहणं ही कामंही करतो. ओक, सूर माझ्या मनाला शांतता देतात.’’

ओकांनी बालपणापासूनच्या आपल्या मित्राला घट्ट मिठीत घेतलं व प्रेमचिंब स्वरात म्हणाले, ‘‘मोकाशी, तुम्ही कर्मयोगी संगीतसेवक आहात. तीन व्यक्ती या जगात सोन्याची फुलं वेचतात असं संस्कृत सुभाषित आहे. एक, उत्तम विद्याभ्यास केलेली, दुसरी शूर, पराक्रमी आणि तिसरी व्यक्ती म्हणजे मनापासून सेवा करणारी. मोकाशी, तुम्ही संगीतसेवक नाही, सेवकसम्राट आहात. सुभाषित आहे: ‘सुवर्णपुष्पाम् पृथिवीम् चिन्वन्ति पुरुषा:त्रय:। शूर:च कृतविद्य: च य : जानाति सेवितुम्॥’’

मोकाशींना मिठीत घेत, परब म्हणाले, ‘‘मोकाशी, तुमची ही सेवावृत्ती मला लाभावी. विठ्ठलाकारणी मी ती वापरीन.’’

मित्रद्वयीच्या प्रेमाने मोकाशी अवघडले, ते काही बोलूच शकत नव्हते, गाऊ तर शकतच नव्हते!

भा.ल. महाबळ chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2017 1:01 am

Web Title: musical instrument in chintamani deshmukh garden
Next Stories
1 खटला
2 प्रेम महत्त्वाचं!
3 किलबिल
Just Now!
X