परबांना उन्हाळ्याचा त्रास होत नसणार. ‘आकाश मंडप, पृथिवी आसन’ करणाऱ्या तुकोबांच्या परबांना उन्हाचं काय आणि थंडीचं काय? तरीही मोकाशी प्रेमापोटी म्हणाले, ‘‘परब, देह नाशिवंत आहे हे मलाही माहीत आहे. पण हा नाशिवंत देह यमदूताच्या हाती पूर्ण व व्यवस्थित पडायला हवा. काळजी घ्या.’’

‘‘डॉक्टर, बसू का?’’ आम्ही तिघा म्हाताऱ्यांनी झाडाखाली बसलेल्या डॉ. कुरुंदकरांना विचारलं. सार्वजनिक बागेत, ‘बसू का?’ असं परवानगीवजा काही विचारायची तशी काहीच गरज नसते. पण आम्ही तिघे शिष्टाचार पाळणारे होतो. डॉ. कुरुंदकर म्हणाले, ‘‘बसा, बसा. तुम्ही ज्येष्ठ मंडळी हा आमचा आधार आहे.’’

मोकाशी (म्हणजे खुद्द मी!) मनात म्हणाले, ‘‘डॉक्टर बरोबर बोलले. आम्ही म्हातारे आजारी पडणार, डॉक्टरांच्या बिलाचे पैसे भरणार. आम्ही या डॉक्टरांचे खरोखरीचे आधार आहोत!’’

वय ८५च्या आसपास म्हणजे पक्कं म्हातारपण! ते वय मोकाशी, ओक व परब यांच्या वाटय़ाला आलं होतं. ऐंशी वयावरच्या व्यक्तींना, वर्षांला पाच लाख रुपये उत्पन्नापर्यंत, इन्कम टॅक्स माफ असतो म्हणे!

मोकाशी चुकचुकले, ‘‘एवढं वार्षिक उत्पन्न असतं तर काय पाहिजे होतं? अशा दणदणीत उत्पन्नाच्या जोरावर, उन्हाळ्यांवर उन्हाळ्यांची दहीहंडी रचून ती गोविंदाप्रमाणे मी फोडली असती!’’

ओकांनी सुचवलं, ‘‘मोकाशी, उन्हाळ्यांची दहीहंडी रचून ती फोडायची व उन्हाळ्यांची ऐशी का तैशी करण्याची तुमची कल्पना उत्तम आहे. पण ही दहीहंडी उंच आकाशात उभी रचायला नको, जमिनीवरच आडवी मांडा. रस्त्यावरून फुटपाथवर किंवा फुटपाथवरून रस्त्यावर अशी किरकोळ चढउतार करताना, आपण फुटपाथवरच्या कोणातरी तरुणाची मदत घेतो! पुढच्या वयात पडायचं नाही, पडणं म्हणजे हाडाचं फ्रॅक्चर. परवा भोसले आजोबा स्वत:च्या सावलीला अडखळून पडले म्हणे!’’

परब फक्त ‘विठ्ठल! विठ्ठल!’ म्हणाले. परबांना उन्हाळ्याचा त्रास होत नसणार. ‘आकाश मंडप, पृथिवी आसन’ करणाऱ्या तुकोबांच्या परबांना उन्हाचं काय आणि थंडीचं काय?

तरीही मोकाशी प्रेमापोटी म्हणाले, ‘‘परब, देह नाशिवंत आहे हे मलाही माहीत आहे. पण हा नाशिवंत देह यमदूताच्या हाती पूर्ण व व्यवस्थित पडायला हवा. काळजी घ्या. वृत्तपत्रांची रद्दी आपण रद्दीच्या दुकानात, साफसूफ करून नीट लावून देतो. आपला देह रद्दीच समजा, तो यमदूताच्या हवाली व्यवस्थित द्यायचा. उन्हात दुपारी बाहेर पडताना, डोळ्यांवर गॉगल हवाच.’’

परब म्हणाले, ‘‘मोकाशी, ‘डोळा भरियले रुप। चित्तीं पायांचा संकल्प॥ जिव्हा केली माप। राशी हरिनाम अमूप॥ अशी माझी धारणा आहे. डोळ्यात विठ्ठलाचे रूप व मनात विठ्ठलचरण ही इच्छा आहे. हरिनामाची रास मोजण्याकरिता जिभेचे माप केले आहे.’’

‘‘परब, ठीक आहे, ठीक आहे. पण डोळ्यांत विठ्ठल असताना गॉगल ठेवला तर तोटा काय? विठ्ठलालाही ऊन लागणार नाही.’’ मोकाशी गॉगलचा मुद्दा सोडायला तयार नव्हते.

ओकांनी नवा मुद्दा मांडला, ‘‘काकडीचे वर्तुळाकार काप करावयाचे व ते दुपारी झोपताना डोळ्यांवर ठेवायचे. गारवा मिळतो.’’

‘‘ओक, काकडीचे काप ठेवायचे असतील तर प्रथम गॉगल काढायला हवा. गॉगलवर काकडीचे काप ठेवलेत तर गॉगलचं भिंग गार होईल, पण तो गारवा आत डोळ्यांपर्यंत पोचणार नाही.’’

‘‘मोकाशी, वेळेवर सावध केलंत; नाहीतर, आपले ‘विठ्ठल! विठ्ठल!’ परब गॉगलवर काकडीचे काप लावतील! हा, एक मात्र आहे, डोळे, गॉगल, काकडीचे काप ही सारी परबांसाठी एकाच विठ्ठलाची रूपे आहेत.’’

परबांना तुकोबा आठवले. ते म्हणाले, ‘‘ओक. शाब्बास! काय नेमकं बोललात! तुकोबा हेच म्हणतात. परब्रह्म हे नामरूपरहित आहे. पण देवानं आपल्या सोयीसाठी रूप धारण केलं, आकार घेतले, नावं स्वीकारली. म्हणून आपण देवाला पाहू शकतो व नावांनी संबोधू शकतो.’’

मोकाशी थक्क झाले. तुकोबा म्हणतात तेच ओक म्हणाले. ओकांची कमालच आहे. मोकाशींनी ओकांची पाठ थोपटली.

मोकाशींनी भर घातली, ‘‘ओक, परब, मुख्य सांगायचं राहिलं. थंडगार ताक हे उन्हाळ्यातील अमृतच होय. लिंबू सरबतही छान आहे, पण ताक ते ताक! तुमच्या संस्कृतात, ‘तक्रम् शक्रस्य दुर्लभम्’ म्हणजे शक्राला ऊर्फ इंद्राला ताक दुर्लभ आहे असं म्हटलं आहे.’’

मोकाशींना वाटलं की ओक आपली पाठ थोपटतील. पण ओक हात नाचवत म्हणाले, ‘‘मोकाशी, काहीतरी काय बोलता? संस्कृत श्लोकातील हा चवथा चरण आहे. पूर्ण श्लोक आहे, ‘भोजनान्ते च किम् पेयम्। जयन्त: कस्य वै सुत:। कथम् विष्णुपदम् प्रोक्तम्। तक्रम् शक्रस्य दुर्लभम्॥’ पहिल्या तीन चरणांतील प्रश्नांची उत्तरे देणारे तीन शब्द घेऊन चवथी ओळ तयार झालेली आहे. जेवणानंतर काय घ्यावे? उत्तर आहे तक्र म्हणजे ताक. जयंत हा कोणाचा मुलगा? शक्राचा म्हणजे इंद्राचा. विष्णुपद म्हणजे मोक्ष कसं आहे? तर दुर्लभ. ‘तक्रम् शक्रस्य दुर्लभम्’ ही चवथी ओळ तयार झाली आहे. इंद्राला ताक दुर्लभ आहे असा अर्थ काढू नका. हे एक प्रकारचं कोडंच आहे. इंद्राला अप्सरा मिळतात, अमृत मिळतं; मोकाशी, जे ताक तुम्हाला मिळतं ते इंद्राला मिळत नाही असं तुम्हाला वाटलंच कसं?’’

मोकाशी खजील झाले. संस्कृतच्या जबडय़ात आपण हात घालायलाच नको होता! परब ‘विठ्ठल! विठ्ठल!’ म्हणत हसले. त्यांना श्लोकाची गंमत वाटली. पण मोकाशींना वाटलं की परबांनी त्यांच्या अज्ञानाची खिल्ली उडवली. शांत, मवाळ, स्वराच्या साखरेखाली आपला कढत राग लपवत मोकाशी म्हणाले, ‘‘परब, तुम्ही गार पाणी प्या. ताक काय, लिंबू सरबत काय किंवा गार पाणी काय; सगळी विठ्ठलाचीच रूपे!’’

परब निष्पापपणे म्हणाले, ‘‘सर्व उपाय ठीक आहेत. पण या उपायांमुळे, थंडीचा त्रास होऊ शकतो. बाम, मफलर, कानटोपी जवळ ठेवा. उन्हाळ्यापासून बचाव करताना आपले म्हातारे देह थंडाव्याचे बळी पडू शकतात. फार थंड, थंड वाटलं, पडसं आलं, डोकं दुखायला लागलं तर?’’

..डॉ. कुरुंदकर आम्हा तिघांची चर्चा ऐकत होते. ते म्हणाले, ‘‘मी तुमची चर्चा ऐकली. तुम्ही उन्हाची, उन्हाळ्याची एवढी धास्ती कशासाठी घेता? तुम्ही उन्हात घराबाहेर पडू नका, घरातच रहा.’’

मोकाशी म्हणाले, ‘‘डॉक्टर, तुमची कमाल आहे! आम्ही ऐंशीच्यावर उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. आम्ही उन्हात बाहेर पडतोय् कशाला? आम्ही उन्हाळ्यावर फक्त चर्चा करतो, तीही सार्वजनिक बागेत झाडाच्या खाली आणि तीही सकाळी किंवा संध्याकाळी! उन्हात बाहेर पडून, आजारी पडून, तुमची बिलं अंगावर कोण ओढून घेईल?’’

डॉ. कुरुंदकर म्हणाले, ‘‘उद्यापासून मी माझी बसायची जागा बदलली तर चालेल का? तुम्हा तिघांची परवानगी हवी.’’

भा.ल. महाबळ chaturang@expressindia.com