15 December 2017

News Flash

पालखीतील वादाप्रकरणी संभाजी भिडे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पालखी सोहळा तब्बल अर्धा तास रोखण्यात आला होता.

पुणे | Updated: June 19, 2017 5:34 PM

FRI filed against Sambhaji Bhide guruji : फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करु लागले.

पुण्यात ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत अडथळा आणल्याप्रकरणी सोमवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे गुरूजी, संजय जठार, पराशर मोने, रावसाहेब देसाई यांच्यासह सुमारे एक हजार  जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्याच्या डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. काल पुण्यातील गुडलक चौकात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात वादावादी झाली होती. फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करु लागले. यापैकी काहीजणांकडे तलवारीही होत्या. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला. या घटनेच्या निषेधार्थ पालखी सोहळा तब्बल अर्धा तास रोखण्यात आला होता. त्यामुळे माऊलींच्या पालखीला पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला विलंब झाला होता.

पुण्यात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या आल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे असते. त्यानंतर जबरसेठ वाणी महाराजांची पालखी असते. त्या पाठोपाठ संताजी महाराज जगनाडे यांची पालखी असते आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असते. मात्र गेली काही वर्षे संभाजी भिडे गुरुजींच्या संघटनेतील लोक ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये घुसतात. यंदाही असाच प्रकार घडला असून भिडे गुरुजी संघटनामधील काही व्यक्तींच्या हातामध्ये तलवारी आणि डोक्याला फेटे घातलेले होते. तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे चोपदाराकडून सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी काल रात्री उशीरा पुन्हा असा प्रकार घडणार नाही, असे सांगितल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली.

First Published on June 19, 2017 5:20 pm

Web Title: fri filed against sambhaji bhide guruji for creating obstacles in tukaram maharaj palkhi