‘पाहू द्या रे मज विठोबाचे रूप’ असे म्हणत टाळ-मृदंगाच्या गजरात लाखो वारकरी आळंदीपासून पायी वारी करतात. भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात ‘ज्ञानोबा-माउली’चा मुखी जयघोष करीत आषाढी एकादशीपूर्वी विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेत वारकऱ्यांची मार्गक्रमणा सुरू असते. पारंपरिक पद्धतीने वारी जात असतानाच आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज समितीतर्फे निर्मलवारी आणि हरितवारी असे समाजाभिमुख कार्यक्रम राबविले जातात. यंदाच्या वारीमध्ये हे प्रयोग केले जाणार असल्याची माहिती समितीचे मुख्य विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी यांनी दिली.

प्रश्न : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात यंदा नेमके कोणते अभियान राबविले जाणार आहे?

कुलकर्णी : पालखी मार्गावरील रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी विसावा उरलेला नाही. यंदाच्या वर्षीपासून पालखी सोहळ्यामध्ये हरितवारी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत शासनाकडून वारकऱ्यांना बियाणे, रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वारकऱ्यांनी पालखी मार्गावर बीजारोपण आणि वृक्षारोपण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हे वृक्ष जगवण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपवण्यात आली आहे. आतापासून बीजारोपण केल्यास भविष्यात हिरवागार रस्ता पाहायला मिळेल. या वृक्षांचे पालकत्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविले जाणार असून या वृक्षांची निगा आणि जोपासना करून त्यांना जगवणे ही त्यांची जबाबदारी असेल. वृक्षारोपणाचा हा संदेश सर्वदूर पोचावा, यासाठी वारकरी पुढाकार घेणार आहेत.

प्रश्न : गेल्या वर्षी निर्मलवारी हा प्रयोग राबविला होता. यंदाही तो प्रयोग राबविणार आहे का?

कुलकर्णी : गेल्या वर्षीपासून पालखी सोहळ्यामध्ये ‘निर्मलवारी’ ही संकल्पना राबविली जात आहे. यामध्ये वारकऱ्यांनी उघडय़ावर शौचास बसू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्याला वारकऱ्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता. त्यामुळे पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर विसाव्याच्या गावामध्ये स्वच्छता राखली जाते. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये वारकरी अशा पद्धतीने योगदान देत आहेत. या प्रकल्पासाठी शासनाकडून गेल्या वर्षी आळंदी आणि देहू अशा दोन्ही पालख्यांसाठी मिळून दोन कोटी रुपयांचा निधी दिला गेला होता. यंदाच्या वर्षी त्यामध्ये वाढ करून हा निधी तीन कोटी रुपये करण्यात आला आहे.

प्रश्न : पालखीचे प्रस्थान कधी होणार आहे. नियोजन पूर्ण झाले आहे का?

कुलकर्णी : संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखीचे शनिवारी (१७ जून) आळंदीहून प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, पहिल्या दिवशी आजोळघर येथील दर्शन मंडपात पालखी विसावेल. दुसऱ्या दिवशी रविवारी (१८ जून) पालखी पुण्याकडे रवाना होईल. पुण्यात एक दिवस मुक्काम केल्यानंतर मंगळवारी (२० जून) पालखी सासवडकडे प्रस्थान करेल. वारकऱ्यांना पालखी मार्गावर आरोग्य, वाहतूक या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. ग्रामपंचायत, नगर परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्याशी पालखी सोहळ्याच्या नियोजनाविषयी संपर्क झाला असून, त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळा हा निर्विघ्न पार पडेल आणि हा आनंद सोहळा होईल.

प्रश्न : पालखी सोहळ्यामध्ये आणि विसाव्याच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी कोणते प्रयत्न केले जाणार आहेत?

कुलकर्णी : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याच्या उद्देशातून थर्माकोलची ताटे वापरण्याऐवजी पानांच्या पत्रावळी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वारकऱ्यांनी या पत्रावळी एका पिशवीमध्ये भरून ठेवाव्यात आणि जिल्हा प्रशासनातर्फे दुसऱ्या दिवशी हा कचरा संकलित करावा, असे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील परिसराचे र्निजतुकीकरण करण्यासाठी एका सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. वारीच्या माध्यमातून वारकरी साहित्य परिषदेच्या सहकार्याने संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे.

प्रश्न : पालखी सोहळ्याचे वैशिष्टय़ काय सांगता येईल?

कुलकर्णी : पालखी सोहळ्यामध्ये सर्वधर्मसमभावाचे अनोखे दर्शन होते. सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन भारतीय समाजातील सहकार्य, सहचर्य, सौहार्दता या त्रिसूत्रीचे दर्शन घडवतात. प्रत्येकाला पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने तन, मन, धन अर्पून काम करताना दिसतो. त्यामुळेच हा आनंद सोहळा विनासायास पार पडतो. पालखी सोहळ्यामध्ये परप्रांतातील िदडय़ाही सहभागी होतात. या िदडय़ांची प्रथा, परंपरा, योगदान सामान्यांपर्यंत पोचावी, यासाठी त्यांची माहिती करून दिली जाणार आहे.