02 December 2020

News Flash

माऊलींच्या पालखीने ओलांडला खडतर दिवेघाट, मुक्काम सोपानकाकांच्या गावी!

उन्हाचा तडाखा जाणवत असतानाही, पालखीने उत्साहाने पार केला दिवेघाट

ज्ञानोबा-माऊली-तुकाराम हा जयघोष करत आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने खडतर दिवेघाटाचा टप्पा पार केला. त्यानंतर रात्री ८ वाजता, सोपानकाकांच्या नगरीत अर्थात सासवडमध्ये माऊलींच्या पालखीचे आगमन झाले. पहाटे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर अजित कुलकर्णी यांच्या हस्ते माऊलींच्या पालखीची पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात आली. अत्यंत उत्साहात, सकाळी ६ वाजता माऊलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. पुणे ते सासवड हा ३० किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी पालखीसह असलेले वारकरी वेगात चालत होते.आज एकादशी असल्याने वारकऱ्यांना फराळाचे वाटपही करण्यात आले. पुणे ते दिवेघाटापर्यंत पालखी सोहळ्यात पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, तरूणांची संख्या लक्षणीय होती. माऊलींची पालखीने दुपारी ३.३० वाजता खडतर मानला जाणारा दिवेघाट चढण्यास सुरुवात केली.
॥ वैष्णवां संगती सुख वाटे जीवा
आणिक मी देवा काही नेणी ॥
गाये नाचे उडे आपुलिया छंदे
मनाच्या आनंदे आवडीने ॥

दिवेघाट चढत असताना वारकरी घामाच्या धारांनी भिजून गेले. पावसाचा एकही थेंब नसल्याने आधीच खडतर असलेली वाट आणखी खडतर वाटत होती. मात्र विठ्ठलाच्या ओढीने निघालेले वारकरी विठूनामाचा गजर करत कडक उन्हातही थोडासा दिलासा शोधत होते. कडक उन्हातही भक्तीचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही, त्याच उत्साहात संध्याकाळी पाच वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने दिवेघाट पार केला. हा सोहळा डोळ्यात साठवून घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,माजी मंत्री दादा जाधवराव,चंदुकाका जगताप,विजय कोलते,पुरंदर पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के,पुरंदरचे प्रांत संजय असवले,तहसीलदार सचिन गिरी,दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भरते,गटविकास अधिकारी डॉ.संजय काळे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. रात्री आठ वाजता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड मुक्कामी अर्थात सोपानकाकांच्या गावी पोहचली. आता दोन दिवस या पालखीचा मुक्काम सासवडमध्येच असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2017 9:45 pm

Web Title: maulis palkhi crossed the tough diveghat
Next Stories
1 वारकऱ्यांच्या सेवेत पुणेकर दंग
2 आषाढी यात्रेसाठी २५पासून चोवीस तास विठ्ठलाचे दर्शन
3 PHOTOS: काही न मागती देवा | त्यांची करूं धांवे सेवा
Just Now!
X