News Flash

पालखीतळांची विकासकामे रखडली

या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने पालखीतळांचा विकास करण्याचे धोरण निश्चित केले आहे.

शहरात पालखी आगमनाची तयारी सर्वत्र सुरू असून भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिराच्या परिसरात मंडप घालण्यात आले आहेत.

निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याने जिल्ह्य़ातील एकाही पालखीतळाचे काम सुरू नाही

पालखीतळांसाठी राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाअंतर्गत निधी मंजूर होऊनही जिल्ह्य़ातील एकाही पालखीतळाच्या विकासाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पहिल्या टप्प्यात पालखी तळांवर मुरुमीकरण होणार होते. मात्र, मुरुमही टाकला नसल्याची माहिती समोर आली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी, देहू आणि सासवड येथून पंढरपूरकडे जातात. ज्या गावात पालख्या मुक्कामाला असतात त्या ठिकाणच्या पालखीतळांवर गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वारकऱ्यांचे हाल होतात. या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने पालखीतळांचा विकास करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार प्रत्येक पालखीतळाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून पालखीतळांना संरक्षक भिंत बांधणे, स्वच्छतागृहांची उभारणी यासह पालखीतळांचे सपाटीकरण अशी विविध विकासकामे करण्यात येणार होती.

विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली १५ मे रोजी तीर्थक्षेत्र विकास कार्यकारी समितीची बैठकही पार पडली. बैठकीला पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी, जलसिंचन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उपस्थित होते. पालखीतळांचा विकास करण्यासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात निविदा काढण्यात येणार होत्या. मात्र, त्या निविदांची प्रकिया पूर्ण होईपर्यंत पालख्या मार्गस्थ होणार ही बाब लक्षात घेऊन पुणे विभागातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्य़ातील पालखीतळांवर पहिल्या टप्प्यात मागणीनुसार मुरुम टाकून सपाटीकरण करण्यात येणार होते. परंतु, अद्याप पालखीतळांच्या कामांसाठी जिल्हा प्रशासनाला मुहूर्त मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

खासगी संस्थाकडून कामे

पालखीतळ विकासातील पहिल्या टप्प्यात पुण्यातील सासवड, जेजुरी, वाल्हे, यवत, वरवंड, लोणी-काळभोर, बारामती, सणसर, अंथुर्णे, इंदापूर, सराटी, निंभोरे ओढा, निरवांगी, तर सोलापूर जिल्ह्य़ातील बोरगाव, माळशिरस, वेळापूर, पीराची कुरुली, भंडीशेगाव आणि सातारा जिल्ह्य़ातील लोणंद, तरडगाव, बरड येथे मुरुम व खडी टाकण्याचे काम केले जाणार होते. परंतु, शासन स्तरावर एकाही पालखीतळावर काम करण्यात आले नसून खासगी संस्थांकडून काही तळांवर कामे केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 4:55 am

Web Title: palkhi sohala development work stuck mauli palkhi sohala 2017
Next Stories
1 जिल्हा प्रशासनाच्या ‘पालखी सोहळा अ‍ॅप’ला भाविकांची पसंती
2 मुलाखत : माउलींच्या पालखीमध्ये हरितवारीचा प्रयोग
Just Now!
X