नियोजनाचा अभाव; यंदाही वारकऱ्यांची गैरसोय होण्याची चिन्हे

ऊन, वारा-पाऊस याची तमा न बाळगता समतेची पताका खांद्यावर घेऊन वैष्णवांचा मेळा पायी पंढरीला चालत येतो. आस असते ती लाडक्या विठोबाच्या दर्शनाची. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही जोमाने सुरू आहे. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी केंद्र, राज्य सरकार भरीव निधी जाहीर करतात. तर आषाढी यात्रेसाठी प्रशासन महिनाभर आधी नियोजन करीत असते. पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदींच्या बठका होतात. यात्रेची कामे पूर्ण करण्याची अंतिम तारीख निश्चित केली जाते. प्रत्यक्षात कामे पूर्ण करण्यात यंत्रणा अपयशी ठरते. अगदी वारीप्रमाणे यंदाही या यंत्रणांचे अपयश समोर आले आहे.

लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठूरायाचे लोभस रूप डोळ्यांत साठविण्यासाठी आणि भेटीची आस मनात धरून वारकरी मोठय़ा श्रद्धेने येतात. या वारकऱ्यांत प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे.  साधारत: मृग नक्षत्र म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पावसाने हजेरी लावली की पेरणी करायची आणि मग आषाढी यात्रेला पायी चालत यायचे हा शिरस्ताच बनला आहे. या वारकऱ्यांना पायी चालत येताना सोयीसुविधा देण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निधी दिला जातो.

आषाढी यात्रा ही जून महिन्यात येते. त्याआधी एक महिना प्रशासन या यात्रेची तयारी करण्यासाठी बठका घेण्यास सुरुवात करते. या बठकीत गेल्या वेळेस झालेल्या चुका, नव्याने कोणत्या सोयी देता येतील का, याचा आढावा घेतला जातो. त्यानंतर विभागीय आयुक्त हे बठक घेऊन यात्रा कालावधीतील विविध कामे पूर्ण करण्याची अंतिम तारीख जाहीर करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे जाहीर करतात. या बठकीत अधिकारी आपापल्या विभागाचे ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ सादर करून काम सुरू असल्याचा देखावा निर्माण करतात. प्रत्यक्षात अगदी वारकरी पंढरीत दाखल होईपर्यंत कामे पूर्ण होत नाहीत.

सध्या पंढरपुरात अनेक विकासकामे सुरू आहेत. चंद्रभागा नदीच्या पलतीरावरील ६५ एकर जागेत भाविकांना राहण्याची सोय केली जाते. या ठिकाणी जागोजागी काटेरी झाडे आणि गवत उगवले आहे. तर याच ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात शौचालय उभी करण्यात आली आहेत. या शौचालयात पाण्याची व्यवस्था नाही. मोठा पाऊस आला तर या ठिकाणी चिखल होऊ शकतो. याबाबत प्रशासनाकडे विचारले असता शौचालयासाठी पाण्याच्या टँकरची सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. काटेरी झाडे आणि गवत एक-दोन दिवसात काढले जाईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. अशीच काही परिस्थिती चंद्रभागा नदीची. नदी पात्र वाहते नसल्याने पात्रातील पाण्यावर शेवाळे आणि घाणीचे तवंग आहेत. तर काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पान गवत आहे. चार दिवसांपूर्वी पालिका प्रशासन नदी स्वच्छ करणार होती. मात्र, तीही अद्याप पूर्ण झाली नाही. असे असले तरी नदीपात्रातील खड्डे बुजवून मोठे काम केल्याचा आव प्रशासनाने आणला आहे.

शहरातील विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यातील काही रस्ते यात्रेपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. तर काही  ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवले खरे, मात्र पायी चालताना त्यावर पसरलेल्या खडीवरून चालताना भाविकांना कसरत करावी लागणार आहे. वाखरी येथील पालखीतळावरही अशीच परिस्थिती आहे. येथे शौचालय उभी करण्यात आली आहेत. मात्र, तेथे वीज आणि पाण्याची सुविधा नाही. अशा अर्धवट कामांची यादी मोठी आहे. मात्र, याबाबत प्रशासन गंभीर नाही. कोटय़वधी रुपये सरकार देत असेल तर त्याचा योग्य वापर होण्याची गरज आहे. यासाठी कर्तव्यकठोर अधिकारी आणि गतिमान प्रशासन हवे आहे. मात्र, सध्या तरी बा..विठ्ठला तूच आता सांभाळून घे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

  • नदी पात्र वाहते नसल्याने पात्रातील पाण्यावर शेवाळे आणि घाणीचे तवंग आहेत.
  • शहरातील विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यातील काही रस्ते यात्रेपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवले खरे, मात्र पायी चालताना त्यावर पसरलेल्या खडीवरून चालताना भाविकांना कसरत करावी लागणार आहे.
  • वाखरी येथे शौचालय उभी करण्यात आली आहेत. मात्र, तेथे वीज आणि पाण्याची सुविधा नाही. अशा अर्धवट कामांची यादी मोठी आहे.