नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनतर्फे आषाढी एकादशीचे औचित्य साधत पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमास मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन सायकल वारीच्या नोंदणीसाठी एक दिवसाची मुदत वाढवण्यात आली आहे. सायकल प्रेमींना आता १९ जूनपर्यंत नोंदणी करता येईल. यंदा या वारीत ‘सायकल रिंगण’ देखील पहावयास मिळणार आहे.

सायकल वारीचे हे सहावे वर्ष असून तिचे वैशिष्ठय़ म्हणजे नाशिकचे चार सायकलपटू त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळापासून नाशिक सायकलीस्टचा ध्वज घेऊन निघणार आहेत. त्यानंतर ते हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून सर्व सायकल वारकऱ्यांना सोबत घेत पुढे प्रस्थान करतील. यंदा पंढरपूर जवळच्या खेडलेकर महाराज यांच्या आश्रम परिसरात प्रथमच ‘सायकल रिंगण’ घालण्यात येणार आहे. या पंढरपुर सायकल वारीसाठी ५०० हुन अधिक सायकलपटू सहभागी होतील असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यंदा वारीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन नोंदणीची मुदत वाढविण्यात आली आहे. या वारीत पहिल्यांदा आठ वर्षीय मोक्ष सोनावणे तसेच नऊ  वर्षांची ऋतू भामरे यांनी नोंदणी केली आहे. एकूण वारकऱ्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक महिलांचा समावेश आहे. तसेच वारीत यंदा पोलीस दलातील अधिकारी सहभागी होत असून सिन्नर, अहमदनगर येथुनही सायकलपटूंचा प्रतिसाद लाभत आहे. २३ ते २५ जून या कालावधीत सायकल वारीचे नियोजन करण्यात आले आहे. इच्छुकांना नाव नोंदणीसाठी शहरातील शिवशक्ती सायकल, लुथरा एजन्सी (जुना गंगापूर नका, गंगापूर रोड), इंदिरानगर येथील भांड सायकल, स्माईल अँड ब्रेसेस डेंटल क्लिनिक (नाशिकरोड), ए टू झेड सायकल (जिल्हा परिषद भवन), डीकॅथलॉन (विल्होळी) या ठिकाणी अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. सायकल प्रेमींनी मोठय़ा संख्येने पंढरपुर सायकल वारीमध्ये सहभागी होऊन आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सायकल वारीचा कार्यक्रम

सायकल वारीचा मार्ग नाशिक, सिन्नर, नांदूरशिंगोटे, तळेगाव दिघी, नानज, कोल्हार, राहुरी, अहमदनगर, रुईछत्तीशी, चापडगाव, माहीजळगाव, करमाळा, टेंभूर्णी, पंढरपूर असा असणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच २३ जून रोजी सकाळी ६ वाजता पालखी निघून संध्याकाळपर्यंत अहमदनगर शहरात पोहचणार आहे. नगर शहरात मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी २४ जून रोजी टेंभुर्णी येथे मुक्काम करण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी २५ जून रोजी सकाळी विठुरायाचे दर्शन घेण्यात येणार आहे.