संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने शनिवारी बारामती शहरात कविवर्य मोरोपंत पराडकरांच्या व शिवलीलामृताचे रचनाकार श्रीधरस्वामी यांच्या कर्मभूमीत प्रवेश केला. ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात वारकरी िदडय़ा तुकोबांच्या पालखी सोहळ्यासह बारामती मुक्कामी नगर पालिकेच्या समोरील शारदा प्रांगणात सायंकाळी विसावल्या.

हातात भगवा झेंडा, गळ्यात वीणा आणि मुखी तुकाराम माउलींचा जयघोष करत बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथील मुक्कामाहून संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबांचा पालखी सोहळा शनिवारी बारामती शहरात दाखल झाला. पालखी सोहळ्याचे शहरात जंगी स्वागत झाले. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. पालखी सोहळा मार्गावर रांगोळीच्या पायघडय़ा घालण्यात आल्या होत्या. स्वागत फलक लावण्यात आले होते. स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. तुकोबांच्या पालखी सोहळा दरम्यान सोहळा मार्गावर शालेय विद्यार्थिनींचे पथक व वारकऱ्यांच्या सुविधेची व्यवस्था करत होते. चहा, पाणी, नाश्ता तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. थकलेल्या वारकरी बंधुंसाठी रामचंद्र भिसे प्रतिष्ठानकडून विनामूल्य औषध उपचार देण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विजय भिसे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. गेली एकोणीस वष्रे देहू ते पंढरपूर फिरता नि:शुल्क दवाखाना चालवला जात असल्याची माहिती डॉ. भिसे यांनी दिली. संत तुकारामच्या पालखीच्या स्वागतासाठी बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पौणिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, मुख्याधिकारी मंगेश चितळे यांच्यासह नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, पक्षाचे कार्यकत्रे पाटस रस्त्यावर शहराच्या वेशीवर उपस्थित होते. यंदा प्रथमच या ठिकाणी बारामती नगरपालिकेनी वारकऱ्यांचे सुंदर पुतळे उभारून बारामतीच्या वैभवात भर घातली आहे. त्यांचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले होते. खासदार अमर साबळे यांनी शनिवारी सायंकाळी तुकोबांच्या पालखी सोहळ्याच्या सोबत पायी चालत सहभाग घेतला. सुनेत्रा पवार यांनीही तुळशी वृंदावन घेऊन वारीत सहभाग घेतला. बारामती मुक्कामानंतर संत तुकोबांचा भक्तिरूपी पालखी सोहळा रविवारी (२५ जून) सकाळी काटेवाडी आणि भवानीनगरकडे मार्गस्थ होईल. पालखी सोहळा दरम्यान शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बारामती पंचक्रोशीतील भक्तांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच पालिकेकडून पिण्याच्या पाण्यासह सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सुभाष नारखेडे यांनी दिली