धन्य आजि दिन । जालें संतांचे दर्शन॥

जाली पापातापा तुटी । दैन्य गेले उठाउठी॥

जालें समाधान । पायी विसावले मन॥

तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळी दसरा॥

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मंगळवारी सकाळी अकरा वाजता मालोजीराजे भोसले यांची ऐतिहासिक जहागिरी असलेल्या इंदापूर नगरीत प्रवेश केला. इंदापूरकरांनी मोठय़ा भक्तिभावाने पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा इंदापुरातील दुसऱ्या गोल रिंगणासाठी सौ. कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात आला.

विद्यालयाच्या प्रांगणात मानाच्या अश्वाची पूजा हर्षवर्धन पाटील व त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी केली. नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्यासह शहरातील हजारो नागरिक या वेळी उपस्थित होते. सुरुवातीला झेंडेकऱ्यांनी धावत रिंगण घातले. त्यानंतर डोईवर तुळस घेतलेल्या वैष्णव भगिनींनी रिंगण पूर्ण केले. नंतर विणेकरी व टाळकरी धावल्यानंतर पालखी सोहळा प्रमुख सुनील महाराज मोरे व विश्वस्तांनी मानाचा व देवाचा अश्व रिंगणासाठी आणला. भाविकांचे लक्ष दोन्ही अश्वांकडे वेधले होते. तुफान वेगाने दोन्ही अश्वांनी दोन प्रदक्षिणा पूर्ण करून रिंगण पूर्ण करताच पुन्हा विठुनामाचा गजर करत अश्वांच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी हजारो भाविक नतमस्तक झाले. त्यानंतर पालखी सोहळा श्री. नारायणदास रामदास हायस्कूलकडे दिवसभराची विश्रांती व मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. पालखी रथाचे सारथ्य हर्षवर्धन पाटील यांनी केले. दिवसभर इंदापूर शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.

इंदापुरातील अनेक सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम राबवून वारकऱ्यांची सेवा केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने वैद्यकीय शिक्षण विद्यार्थी कार्य म्हणून मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी डॉ. अक्षय करंदीकर, अक्षय लोणकर, सुमित साळुंखे, अक्षय शेळके यांनी संयोजन केले. हे शिबिर आयोजित करण्यासाठी प्रेमकुमार जगताप, प्रवीण िशदे, सतलज ननावरे, ईश्वरी जकाते, अभिजित पाटील यांनी आयोजन केले. आरोग्य संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ. संदेश शहा, राधिका शहा, श्राविका शहा यांनी विनामूल्य औषधोपचार केले. दिवसभर इंदापूरकर वैष्णवांच्या सेवेत दंग झाले होते.