आषाढी यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तनात असतो. कोणतेही घातपात होऊ नयेत म्हणून बॉम्बशोधक व नाशकपथक तसेच श्वानपथक तनात केले जाते. यातील श्वानपथकातील सांगलीच्या ‘मार्शल डॉग’ची ही चौथी वारी आहे. विशेष म्हणजे हा मार्शल तपासात तर निपुण आहेच, त्याचबरोबर तो देवाच्या पायादेखील पडतो. त्यामुळे हा मार्शल आता भाविकांच्याही गळय़ातील ताईत बनला आहे.

पंढरीला पायी चालत येण्याची परंपरा शेकडो वर्षांची आहे. न चुकता अनेक भाविक वारीला येतात. या पाश्र्वभूमीवर पालिका, पोलीस आदी प्रशासन सोयीसुविधा देत असते. यामध्ये भाविकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस खात्यावर असते. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून बॉम्बशोधक व नाशक तसेच श्वानपथक तनात केले जाते.

सध्या शहरामध्ये या बॉम्बशोधक व नाशकपथकांकडून चंद्रभागेचे वाळवंट तसेच चंद्रभागेचा पलतीर, ६५ एकर, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मंदिर परिसर, विठ्ठल मंदिर अशा विविध परिसरातील ठिकाणांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी सोलापूर जिल्हय़ातील दोन पथके, तसेच सांगली येथील पथके आणि कोल्हापूर परिक्षेत्रातील अन्य ठिकाणची पथकेदेखील कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

यातील श्वानपथकातील सांगलीचा मार्शल हा श्वान सध्या सगळय़ांचे लक्ष वेधून घेत आहे. सांगली जिल्हय़ातील बॉम्बशोधक व नाशक तसेच श्वानपथक सध्या ६५ एकर आणि चंद्रभागा बस्थानक येथे तपासणी करीत आहे. या पथकांतील मार्शल हा ८ वर्षांचा आहे आणि त्यांची ही पंढरपूरची चौथी वारी आहे. या मार्शलला कमांड देताच तो झेप घेतो. त्याचे दौलदार चालणे पाहून त्याचा दरारा दिसून येतो. मात्र याच मार्शलची दुसरी बाजू देखील मनाला भिडणारी आहे. हा मार्शल कोणत्या देवाच्या मूर्तीसमोर उभा राहिला तर तो दोन पाय खाली टेकवून नतमस्तक होतो. श्वानांची ओळख इमानदार म्हणून आहे, मात्र या मार्शलला पाहून तो भक्तदेखील आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.