विठ्ठल विठ्ठल नावाचा गजर करत आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन आज पुण्यात झाले. तर संत तुकाराम महाराजांची पालखीही आज पुण्यात आली. या दोन्ही पालख्यांचे पुण्यनगरीत भाविकांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत केले. साथीला टाळ आणि मृदुंगांचा गजर आणि ज्ञानोबा-माऊली -तुकारामचा जयघोष होताच. पाटील इस्टेट भागात दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागतासाठी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक हजर होत्या.

उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनीही दोन्ही पालख्यांचे स्वागत केले. आज तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतल्या निवडुंग्या विठ्ठल मंदिरात होणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतल्या विठ्ठल मंदिरात होणार आहे. दोन्ही पालख्या आपल्या मुक्कामच्या स्थळी दाखल झाल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही तरूणांचा वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. विठुनामाचा गजर करताना तरुण तल्लीन झालेले बघायला मिळाले. पुण्यातल्या विविधा संस्थांकडून येण्याऱ्या वारकऱ्यांसाठी आणि भाविकांसाठी सुविधा पुरविण्यात आल्या. दोन्ही पालख्यांचे आगमन होणार होते त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

४ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. तोवर वारीत चालण्याचा उत्साह काही औरच असतो. हा एक आनंद सोहळा आहे. तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसोबत हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात. पालखीसोबत चालण्याचा आणि वारीत एकरूप होण्याचा उत्साह काही औरच असतो. तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या मार्गस्थ होताना रिंगण सोहळाही रंगतो. या रिंगण सोहळ्याचे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी हजारो भाविक आणि वारकरी गर्दी करत असतात.