संत तुकोबांचे माळीनगरात उभे रिंगण

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी पांडुरंगाला भेटण्याची आस घेऊन निघालेले वारकरी शुक्रवारी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह इतर संतांच्या पालख्यांमध्ये टाळ-मृदंगाच्या तालावर भजन, कीर्तनासह गोल रिंगण व उभे रिंगण, तसेच भारूड, उडी खेळ, धावा आदी माध्यमातून भेदाभेद विसरून आनंदाची लयलूट करीत आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्य़ातील दुसरे गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील खुडूस येथे पार पडले, तर अकलूजजवळील माळीनगरात संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्य़ातील पहिले उभे रिंगण झाले. या दोन्ही रिंगण सोहळ्यात आनंदाला कोठेही तोटा दिसत नव्हता.

काल गुरूवारी संत ज्ञानेश्वर माउलींचे सोलापूर जिल्ह्य़ातील पहिले गोल रिंगण माळशिरस तालुक्यात पुरूंदावडे येथे, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचेही पहिले गोल रिंगण अकलूज येथे पार पडले होते. त्यामुळे अकलूजसह संपूर्ण माळशिरस तालुक्यात भक्तीचा मळा फुलला असताना शुक्रवारी दुसऱ्या दिवशी हेच वातावरण कायम होते. अकलूजकरांनी केलेल्या आदराथित्यामुळे भारावून गेलेल्या संत तुकाराम महाराज पालखीने अकलूजच्या मुक्कामानंतर सकाळी पुढील मार्गावर प्रस्थान ठेवले. अकलूजच्या पुढे माळीनगरात पालखी सोहळा पोहोचल्यानंतर तेथील माळी-सासवड साखर कारखान्यासह माळीनगर ग्रामपंचायतीने पालखीचे जंगी स्वागत केले. हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी अगोदरपासून गर्दी केली होती. स्वागतानंतर उभे रिंगण पार पडले. हे उभे रिंगण तयार करण्यासाठी पोलीस प्रशासनाने व पालखी सोहळ्यातील प्रमुखांनी शिस्तीने नियोजन केले होते. चोपदाराने इशारा देताच देवाच्या अश्वाने दौड सुरू केली. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेल्या अश्वस्वाराने उभे रिंगण पूर्ण करताच ज्ञानबा-तुकारामाच्या नावाने जयघोष झाला. अश्व धावल्यानंतर त्यांच्या टाचाखालची माती मस्तकी लावताना समस्त वारकऱ्यांना धन्यता वाटत होती. उभे रिंगणाच्या ठिकाणी आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती. फुलांचीही उधळण केली जात होती.

उभे रिंगण पूर्ण होताच त्याठिकाणी आनंदाला अक्षरश: उधाण आले होते. वीणेकरींसह तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला वारकरी धावत होत्या. नंतर उडीचा खेळही झाला. वारकऱ्यानी फुगडीचाही खेळ खेळला. त्यामुळे माळीनगर भागात चैतन्य पाहावयास मिळाले. माळीनगर येथून हा पालखी सोहळा पुढे मुक्कामासाठी बोरगावकडे मार्गस्थ झाला.

संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा माळशिरस येथून खुडूस शिवारात पोहोचल्यानंतर पालखीचे स्वागत करण्यात आले. नंतर तेथे गोल रिंगण झाले.

धावाही करण्यात आला. खुम्डूस येथे माउलींचा पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर लगेचच गोल रिंगणाची तयारी झाली. ठरल्याप्रमाणे चोपदारांनी इशारा देताच गोल रिंगणास प्रारंभ झाला. अग्रभागी पांढरे शुभ्र अश्व अक्षरश: वारा पिऊन चौखूर पळत होते. त्यापाठोपाठ हाती भागवत धर्माची पताका डौलाने फडकावत दुसरा अश्वस्वार धावत होता. तत्पूर्वी, पताकाधारी, वीणेकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला व मृदंगवादकांनी रिंगण पूर्ण केले. गोल  रिंगणातून प्रदक्षिणा पूर्ण होताच त्याठिकाणी एकच उत्साह संचारला. विठ्ठल नामासह ज्ञानबा-तुकारामाच्या जयघोषाने अवघे आसमंत दुमदुमून गेले होते. यावेळी वारकऱ्यांनी आनंदाने खेळ सुरू केले. उडीचा खेळ, फुगडय़ा व धावण्याचा खेळ खेळताना वारकऱ्यांच्या उत्साहाला सीमा राहिली नव्हती. या उत्साहात लातूर जिल्ह्य़ाच्या चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील चंद्रकांत पांडरे या अपंग वारकऱ्याने एका नाकपुडीने बासरी वाजवून सर्वानाच थक्क केले. एवढेच नव्हे तर बासरीतून सुरेख सूर वाजवत आनंद देण्याबरोबरच चंद्रकांत पांढरे यानी अपंगत्वाची पर्वा न करता फुगडय़ा खेळण्याचा आनंद लुटला. गोल रिंगण झाल्यानंतर दुपारी वारकरी पुन्हा ताजेतवाने झाले आणि लगेचच धावा करण्याचा पारंपरिक कार्यक्रम झाला. वय आणि शारीरिक मर्यादा विसरून अनेक वयोवृध्द स्त्री-पुरूष वारकरी धावा करीत होते. धावतानाचा आनंद काही अनोखाच होता. त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचे वर्णन करणे केवळ अशक्य होते.