सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन शेकडो मल चालत आलेले भाविक सोमवारी पंढरी नगरीत विसावले. तालुक्यातील वाखरी येथे संतांच्या पालख्यांचे उभे रिंगण पार पडले. त्यानंतर आरती झाल्यावर संतांच्या पालख्य रात्री उशिरापर्यंत ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात पंढरपुरात पोहचल्या.

‘भेटी लागे जीवा लागलीसे आस’ या अभंगाप्रमाणे भाविकांना ओढ आता सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची लागली आहे. गेली १७ दिवस पायी चालत संतांच्या पालख्या रविवारी वाखरी येथे विसावल्या. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महराज, संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका यांच्या पालख्या वारी सोहळ्यातील अंतिम टप्प्यावर पोहचल्या होत्या. सोमवारी सकाळी संत मुक्ताई, संत एकनाथ महाराज आदी महाराजांच्या पालख्या वाखरी येथे संतांच्या भेटीस गेल्या. तिथे दुपारी उभे रिंगण सोहळा पार पडला. हा रिंगण सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली. टाळ-मृदुंग, ज्ञानोबामाउली तुकाराम याच्या जयघोषाने वाखरी परिसर दुमदुमून दिघाला

रिंगण सोहळा झाल्यानंतर आरती झाली आणि एक-एक करीत संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरच्या जवळ आल्यावर उभे रिंगण झाले. त्यानंतर आरती होऊन शितोळे सरकार यांच्या गळ्यात माउलीच्या पादुका घालण्यात आल्या. या वेळी शितोळे सरकार यांच्या उजव्या बाजूला ह.भ.प. वासकर महाराज तर डाव्या बाजूला आरफळकर मालक यांचा मान होता. रात्री उशिरापर्यंत सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात विसावल्या. राज्यात विदर्भ,मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्यने मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत. असे असले तरी ‘चला पंढरीस जाऊ..रखुमाई देवीवरा पाहू’ या अभंगाप्रमाणे वैष्णवांचा मेळा पंढरी नगरीत भरला आहे.